🛑 स्वानंदी : एक जगण्याची उर्मी
जगण्यासाठी प्रत्येकाला एक उर्मी लागते. उर्मीशिवाय तुम्ही जगू शकत नाही. तुमचा आनंद सतत वाढवत राहणारी ही उर्मी जगण्यासाठी अत्यावश्यक असते. तुमचा स्वतःमधला आनंद म्हणजेच स्वानंद होय. हा स्वानंद मिळाला की तुमच्या जगण्याची उर्मी वाढलीच म्हणून समजा.
माझ्याही जीवनात ही उर्मी आली. या उर्मीने स्वानंदीपणाचे रुप घेतले. ही स्वानंदी सर्वांचीच जगण्याची उर्मी वाढवत निघाली आहे.
तो २२ मार्चचा दिवस होता. डॉक्टरांनी सिझर करायला हिच तारीख ठरवली होती. याच दिवशी तिचा सिझेरियनने जन्म होणार होता. डॉक्टरांपुढे आम्ही सर्वांनी आधीच माथे टेकले होते. तिचा रडण्याचा आवाज ऐकू आला. तिचे रडणे आम्हालाही रडू येण्यासारखेच होते. मुलगी झाली म्हणून जास्त रडू होते ते.
पहिल्या दोन मुली असताना तिसरीचे स्वागत हसत होणे कठीणच होते. पण पत्नीची मोठ्या दिव्यातून सुटका झाली याचा मात्र आनंद मी लपवू शकत नव्हतो. मुलगी झाली म्हणून दुःखाची एक पुसटशी छटा सर्वांच्याच चेहऱ्यावर आलेली दिसत होती.
डॉक्टरांनी मला ऑपरेशन थिएटरमध्ये बोलावले होते. मी माझ्या पत्नीला भेटलो होतो. मुलगी झाल्याचा तिलाही आनंद झालाच नव्हता. तिलाही मुलगा होण्याची अपेक्षा असावी.
मुलगी झाली तर ती कोणालाही तरी देऊन टाकावी इतका वाईट विचार त्यावेळी माझ्या मनात आला होता. तो वाईट विचार मी माझ्या पत्नीला बोलूनही दाखवला होता. तिला नऊ महिने उदरात जिवापाड सांभाळलेल्या बाळाबद्दल असे बोललेले रुचले नव्हते. पण ती गप्प राहिली होती.
हळूहळू ही तिसरी मुलगी मोठी मोठी होत गेली. तिचे नाव आम्ही स्वानंदी ठेवले. घरात म्हणायला साधे सोपे दोन अक्षरी नाव ठेवले , ' उर्मी ' . ही उर्मी जसजशी मोठी होत गेली तसतशी सगळ्यांच्या गळ्यातला ताईत होत गेली. तिचे बोबडे बोल सुखावणारेच. तुमचे कोणतेही दुःख विसरायला लावणारे.
आज तिला सहा वर्षे पूर्ण होत आहेत. तिने सगळ्यांना वेड लावले आहे. ती आमच्या घरातील सर्वात बडबडी मुलगी असेल. ती कोणाचीही ओळखीची होऊन जाते. एकदा ओळख झाली की समोरच्या अपरिचित व्यक्तीलाही तिचा कमालीचा लळा लागेल अशीच ती आहे. अशा या माझ्या मुलीला ' ती आम्हाला नको होती ' हे समजते आणि स्वतः सर्वांना सांगत सुटते. " पप्पांना मी नको होते , ते मला कचरा पेटीत टाकणार होते किंवा पिंकी आत्येला देऊन टाकणार होते. "
मुलगी झाली की ती सर्वानाच का नकोशी होते ? आमच्या शेजारी एका दांपत्याला सगळ्या मुळीच झाल्या होत्या. त्यातील एका मुलीचे नावच त्यांनी ' नकोशी ' असे ठेवले होते. आमच्यासारखी शिकलेली माणसं जर असा विचार करत असतील तर अशिक्षित लोकांचं काय ? त्यांच्याबद्दल न बोलणेच बरे.
आज आमची उर्मी सर्वांनाच हवीहवीशी वाटते. तिचं बोलणं हृदयाचा ठाव घेणारं असतं. तिचं निरागस बालप्रेम डोळ्यांत टचकन पाणीच आणतं. ती दररोज रात्री माझे पाय चेपते. तिच्या चिमुकल्या हातात पाय चेपण्याइतकी ताकद कुठे आहे ? पण तिने पाय चेपायला सुरुवात केली की पाय दुखायचे थांबतात हे मात्र नक्की. तिच्या अनेक अपेक्षा असतात. ती माझ्याजवळ हळूच येऊन सांगते. मी काही तितकासा मनावर घेत नाही. पण काही वेळाने मीही विरघळून जातो. तिचा राग आला कि तिच्यावर डोळे वटारले जातात. कधी कधी हातही उगारला जातो. पण आमची उर्मी ते पाचच मिनिटांत विसरुन जाते. मला हवी असलेली गोष्ट खायला आणून देते. मला घ्यायला सांगते. पप्पांनी मारले तरी तिला पप्पाच हवे असतात. मग ती म्हणून दाखवले , " पप्पा , तुम्ही माझे पप्पा आहात ना , मग मला कधीतरी मारलं तर काय होतं ? मारा तुम्ही , पण तुम्ही माझे लाडके आहात. मी तुमची जगातील सगळ्यात सुंदर मुलगी आहे ना ? "...... या तिच्या वाक्यांनी कोणीही निशब्द होईल यात शंका नाही.
तिला मोबाईलचे खूप वेड आहे. त्यातील यु ट्युब हा तिचा अतिशय जवळचा मित्रच. त्यातल्या अनेक गोष्टी , गाणी , हिंदी भाषा तिला तोंडपाठ झाल्या आहेत. ती खेळताना जास्त हिंदीच बोलते. ती अजून शाळेत गेलेली नाही. यंदा ती पहिलीत जाईल.
घरात त्रास देते म्हणून तिला एका बालवर्गात घातले होते. ती पहिला दिवस रमली. दुसऱ्या दिवशी तिला वर्गात करमेना. तिने बाईंना सांगितले , " मॅडम , मला पप्पांची आठवण येते आहे , त्यांना फोन करा. " मॅडमनी फोन केल्याचे नाटक केले हेही तिला समजले. तिला खोटे अजिबात आवडत नाही. मी शाळा सुटण्याच्या वेळी तिला आणायला गेलो होतो. ती माझीच वाट बघत बसली होती. मला बघताच तिचा बांध फुटला होता. ती वर्ग सोडूनच माझ्या दिशेने रडत रडत इतक्या वेगाने धावत आली होती. मीही मग धावत जाऊन तिला उचलून घेतले होते. ती तेव्हाच रडायची थांबली. मग येताना तिची न संपणारी बडबड सुरुच होती.
तिचा तिच्या मोठ्या दोन्ही बहिणींवर भारीच जीव आहे. काही क्षणांसाठी भांडतील आणि लगेच गळाभेटही घेतील. त्यांचे हे असेच चिरायु राहो.
प्रत्येकाच्या घरी अशी एखादी उर्मी जन्माला यायला हवी. मग तुमचं एकूण जीवनच बदलून जाईल. माझं जीवन तिन्ही मुलींसाठी आहे. त्याच माझं जीवन आहेत. त्या वेगवेगळ्या तिघी असल्या तरी माझ्यासाठी जगण्याच्या उर्मीच आहेत. आमचं स्वानंदी जगणं म्हणूनच उर्मीमय होत गेलं आहे.
©️ प्रवीण अशितोष कुबलसर
( 9881471684 )

लेखाचे शिर्षक अतिशय भावले
ReplyDeleteप्रत्येकास स्वत : ला स्वानंद जागृत ठेवता यायला पाहिजे आपल्या लेखनीस सलाम
धन्यवाद प्रतिक्रियेबद्दल
Deleteकुबल सर लेख छान आहे ,त्यात थोडासा लेख वाढवून जे लोक सर्व काही सुरळीत चालू असताना सुध्दा आत्महत्येचे विचार बोलुन दाखवतात अशा लोकांच्या मनात जगण्याची ऊर्मी निर्माण होऊ शकेल व श्वःताला समाजात सिद्ध करून आपले आयुष्य आनंदी जगेल.
ReplyDeleteसर,खूपच छान लेख.मुलगी नको असतानाही तुम्ही तिचे नाव स्वानंदी ठेवलेत.हेच सकारात्मक आहे.ती तुमच्या आयुष्यात आनंदच निर्माण करेल.
ReplyDelete