🛑 होळीचा सण लय भारी
" होळी रे होळी , पुरणाची पोळी " असे म्हणत सर्वजण होलिकोत्सव अतिशय उत्साहाने साजरा करताना दिसतात. होळी हा रंगांचा सण आहे. दुसऱ्याला मस्त रंगवण्याचा दिवस. होलिकेचे दहन करण्याचा दिवस.
लहानपणी कणकवली गांगोवाडीत राहायला असल्यापासून आम्हाला होळी कळू लागली होती. त्यावेळी तरुणांबरोबर आम्ही लहान मुले मुली होळीची मजा लुटत असू. आमच्या खोलीच्या जवळच होळदेव उभा केला जात असे. त्याला आंब्याच्या पानांनी लपेटून सजवले गेले की होळीचा ढंगच न्यारा दिसायचा. परंपरेने चालत आलेल्या रुढींचे पालन करत होळी मनोभावे साजरी व्हायची. होळीचा स्तंभ श्रीफळांनी नटत असे. मग गाऱ्हाणी होत. नवसाचे नारळ होळी स्तंभासमोर ठेवले जात.
आदल्या दिवसापासून आमची तयारी सुरु होई. लाकडे , शेणी गोळा करणे हे आमचे काम असे. वाडीतील प्रत्येक घरोघरी जाऊन एखादे दुसरे लाकूड , एक दोन शेणी मागून घेण्यात आनंदच वाटे. आता गॅस आले , लाकडे- शेणी मिळताना दिसत नाहीत. त्यामुळे आजकाल सरसकट वर्गण्या मागितल्या जातात व सण साजरा केला जातो.
कवळं तोडण्याची सुरुवात याच काळात होत असल्याने आम्हाला तीसुद्धा मिळत. त्यांनी होळीची आग लागलीच भडके. लाकडे , शेणी आणि कवळे यांचा आगडोंब होई. मग त्या होलिकोत्सवात गाणी म्हटली जात. कोणीतरी लाऊडस्पीकरची सोय केलेली असे. उत्स्फूर्त सांस्कृतिक कार्यक्रम सुरु होई. रात्रीचा जागर सुरु झालेला असे. बारा वाजेपर्यंत आम्ही कसेतरी थांबू. ' बाराच्या आत घरात ' अशी बाबांची ऑर्डर असे. त्या ऑर्डरचे पालन न करणाऱ्याच्या आनंदाची होळीच होत असे. त्यामुळे आम्ही वेळेचे काटेकोरपणे पालन करीत असू.
बाबांच्या भीतीने घरात येऊन झोपलो तरी स्पीकरचा आवाज कानात धडकत राही. परुळेकरांचा आवाज सुरेल होता. त्यांच्या गाण्यांचे सूर होळीची रंगत आणखीच वाढवताना दिसत. आपल्यालाही त्यांच्यासारखे स्पीकरवर गाणे कधी म्हणता येईल का ? असा प्रश्न पडे. असा विचार करता करता कधी झोप येई समजतही नसे.
सकाळी होळीच्या राखेचा गंध मस्तकावर लावून आम्ही धन्य होत असू. त्यानंतर अनेक खोल्या बदलल्या असतील पण त्यानंतरची होळी काही आठवत नाही. गावच्या घरी होळीला गेलो असेन , पण वडे सागोती , शिरवाळ्या पुरती मर्यादित होळी पाहिली. बोंबा लांबूनच ऐकल्या , ऐकू नये अशा शिव्यांच्या लाखोल्या ऐकल्या. त्यांचा अर्थ समजणे आमच्या बालवयाला अवघड असे. त्यांचा अर्थ समजून घेण्याचा कधी प्रयत्नसुद्धा केला नाही.
काल परवापासून माझ्या घरात होळीची तयारी सुरु आहे. सहावीतल्या तनिष्काने आमच्या इमारतीमध्ये छोट्यांचा ग्रुपमध्ये गुप्तपणे वर्गणी गोळा करायला सुरुवात केल्याचे सांगितले. रंग , पिचकाऱ्या आणि रंगांचे फुगे यासाठी त्यांचा मौजेचा दिवस जवळ येत होता. मोठ्यांनीही त्यांना वर्गण्या देऊन प्रोत्साहनच दिले होते. आज त्यांचे धुलिवंदन , रंगांची उधळण मजेशीर होणार यात शंकाच नाही.
आज धुलिवंदनाची सुट्टी आहे. काल शाळेत मुलांसोबत होतो. सातवीच्या मुलांकडून ' कचरा ' एकत्र करुन घेतला. त्याच्याभोवती गोल साखळी करुन कचऱ्याची होळी केली. सभोवती फिरता फिरता अनेक अभ्यासविषयक खेळ घेतले. मुले खेळता खेळता शिकत होती. होळीचा वेगळाच आनंद त्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहताना दिसत होता.
©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 )
No comments:
Post a Comment