🛑 सुहास्य वदनी साहेब
सरकारी नोकरीत असल्यामुळे अनेक अधिकाऱ्यांशी संपर्क येत असतो. अधिकारी हे अधिकार गाजवण्यासाठी नसतात. ते आपल्या हाताखालील माणसांकडून काम काढून घेण्यासाठी असतात. सगळेच कर्मचारी काम करत असतात. प्रत्येकाच्या कामाची पद्धत वेगवेगळी असते. त्यात अधिक गती देण्याचे काम अधिकारी करत असतात. म्हणून त्यांना अधिकारी म्हणत असावेत.
गेल्या पंचवीस वर्षात अनेक अधिकाऱ्यांचा सहवास लाभला आहे. त्यांच्या भेटीने नवीन शिकायला मिळाले आहे. प्रत्येक भेटीत भीतीची जाणीव झाली आहे. भीती म्हणजे आदरयुक्त भीती !! अधिकाऱ्यांची अनामिक भीती वाटलीच पाहिजे असा सर्वसाधारण समज असतो. तो सर्वत्रच असतो असे माझे ठाम मत आहे. याबाबत मतभिन्नता नाकारता येणार नाही.
एखाद्या अधिकाऱ्याबद्दल आत्यंतिक प्रेम , आपुलकी आणि जिव्हाळा निर्माण होण्यासाठी ते अधिकारी स्वतःच जबाबदार असतात. त्यांच्या कार्यप्रेरणेने सर्वसामान्य कर्मचारी अधिक कार्यप्रवण होत असतात. त्यांनी दिलेले प्रोत्साहन महत्त्वाची भूमिका बजावत असते.
2019 साली मी कणकवली तालुक्यातील तळेरे प्रभागातील शिडवणे नं.१ शाळेत दाखल झालो. आम्हाला सुहास पाताडेसाहेब हे शिक्षण विस्तार अधिकारी असल्याचे मला समजले. त्यांना मी वैभववाडी तालुक्यातील क्रीडा स्पर्धांमध्ये परीक्षक म्हणून पाहिले होते. त्यावेळी मला त्यांची खूपच भीती वाटली होती. त्यांच्या परीक्षण अधिकारी पदामुळे ती भीती असू शकेल.
आता मात्र ती भीती अजिबात राहिलेली नाही. त्यांची भेट सतत होत राहायला पाहिजे असे वाटत राहते. त्यांच्या भेटीमुळे आपला दिवस अधिक चांगला जातो. प्रोत्साहनाचे बळ मिळते. चुका लक्षात आणून दिल्या जातात. त्यावर अचूक मार्गदर्शन केले जाते. तुम्ही अजिबात नाउमेद होत नाही.
तालुक्यातील शाळांच्या गडकिल्ले स्पर्धा होत्या. आम्ही भाग घेण्याची चिन्हे ठळक दिसत नव्हती. पाताडेसाहेबांचा फोन आला. त्यांनी विचारले , " किल्ला बांधून झाला का ? " आमची पूर्वतयारीही झाली नव्हती. आम्ही काय उत्तर देणार ? तयारी सुरु आहे असे मोघम उत्तर दिलं. साहेब त्यावेळी रागाने की प्रेमाने बोलले होते , " मी कासार्ड्यातून किल्ला बनवण्यासाठी मुले घेऊन येऊ का ? " साहेब असे म्हणाले आणि आमची बोलतीच बंद करुन टाकली. त्या क्षणापासून आमची युद्धपातळीवर तयारी सुरु झाली होती. माझ्यासमोरच प्रांगणात रस्त्याच्या खडीचा भला मोठा डेपो दिसत होता. त्याचा उपयोग करुन आम्ही उंचावर किल्ल्याची प्रतिकृती साकार केली. साहेबांनी असं करायला भाग पाडलं होतं. न होऊ शकणारा किल्ला दोन तीन तासांत उभारला गेला होता. हे झाले ते साहेबांमुळे.
कागदपत्रे देण्याच्या निमित्ताने त्यांच्या घरी भेट होई. त्यावेळी ते माझ्या सारख्या उपशिक्षकांचं आदरातिथ्य करायला नेहमीच पुढे सरसावले आहेत. एकदा त्यांच्या घरी धोंडास नावाचा गोड पदार्थ खायला मिळाला. त्यावेळी मला माझी आई त्यात दिसली होती. साहेब आमची आईसुद्धा झाले आहेत. ते खरंच महान आहेत. असे अधिकारी लाभणे हे आमचे परमभाग्यच म्हणायला हवे.
एकदा मी त्यांना आमच्या नवीन घराच्या गृहप्रवेशाचं आमंत्रण फोनवरुन दिलं होतं. तेव्हा माझी मुलगी त्यांच्याशी बोलली होती. त्यामुळे माझ्या मुलीलाही त्यांना प्रत्यक्ष भेटण्याची इच्छा निर्माण झाली होती. यावरुन त्यांचं मुलांवरील निर्व्याज प्रेम दिसून येतं. त्यांच्याशी बोलताना अनेकदा भावनाविवश व्हायला झाले आहे. त्यांच्या डोळ्यांतील प्रेमाश्रु दिसले आहेत. कोण कोणासाठी असे अश्रू ढाळेल ? पाताडेसाहेब त्याला अपवाद असतील. ते सर्वांमध्ये मिसळतात. अशा सर्वांत मिसळून जाणाऱ्या अधिकाऱ्यांची आम्हां शिक्षकांना खरी गरज आहे. नवीन अधिकारी झालेल्यांना त्यांच्यासारखं आचरण करता आलं तर ते आमच्याकडून अपेक्षित काम नक्कीच काढून घेऊ शकतील.
असे अधिकारी सेवानिवृत्त होतात तेव्हा त्यांच्या सेवापूर्ती सोहळ्याला झालेली गर्दीच त्यांच्यावरील निस्सीम प्रेम व्यक्त करीत असते. त्यांच्यासाठी कितीही लिहिले , बोलले तरी ते कमीच असेल. त्यांनी दिलेल्या प्रेरणेमुळे मी खूप सुधारलो आहे.
साहेब माझं लेखन वाचत असतात. एकदा मी ' कळीचे निर्माल्य ' हा लेख लिहिला होता. तो वाचताना त्यांना त्यांची मुलगी ' स्नेहल ' आठवली होती. स्नेहलवर त्यांचे जिवापाड प्रेम होते. आपल्या वेलीवरील निरागस फुल उन्मळून पडल्यानंतर पाताडेसाहेब स्वतः किती हतबल झाले असतील याची मी कल्पना करु शकतो. माझा अनुभव वाचल्यानंतर त्यांनी आपला हृदयद्रावक अनुभव मला शेअर करताना त्यांच्या डोळ्यांतील वाहणाऱ्या गंगा यमुना मी माझ्या घरातून अनुभवत होतो.
ते सर्वांशी असेच घरगुती संबंध जोडतात आणि आपलेसे होऊन जातात. त्यांच्या आयुष्यात त्यांनी अशी अनेक संकटे पाहिली आहेत , त्यांना निकराने लढा दिला आहे. यापुढेही त्यांनी आपलं आयुष्य ' सुखी माणसासारखं ' जगावं आणि आम्हाला आजन्म प्रेरणा देत राहावी अशी त्यांच्या चरणी प्रार्थना करतो.
देऊ कसा निरोप
तुटतात आत धागे
हा देह दूर जाता
मन राहणार मागे
दाटून कंठ येतो.
©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 )

No comments:
Post a Comment