🛑 सत्यनारायण आणि आरती
आरती करणे ही आपली सर्वांची आवड असते. गणपतीला आरती खूप आवडते. घरोघरी चतुर्थी सणाला आरत्यांची लगबग दिसून येते. दुपारी आणि रात्री दोन्ही वेळेला आरती केली जाते. घरची आरती आणि वाडीची आरती होत असते. एखाद्या घरी आरती म्हणणारे कुणी नसतील तर अशा आरत्यांची आवश्यकता भासते. एका घरीच आरती करण्यापेक्षा ती सगळ्या गणपतींकडे करण्याची प्रथा म्हणूनच सुरु झाली असावी.
या आरत्यांच्या चाली अफलातून असतात. दशावतारी चाल , साधी सरळ चाल , संथ चाल , उडती चाल , चित्रपटातील गाण्यांवर आधारित चाल अशा एक ना अनेक चाली लावून आरत्यांमधील भक्तिभाव वाढवण्यासाठी प्रयत्न सुरु राहतात. आरती पाठ नसणारे पुस्तके हातात घेऊन आरत्या म्हणताना दिसतात. त्यांच्या आरत्या कधीच पाठ होत नाहीत. प्रत्येक कडव्याला त्यांना पुस्तकात पाहावेच लागते. जुन्या जाणत्यांच्या या आरत्या तोंडपाठ असत.त्यांनी पुस्तक हातात धरल्याचे आठवत नाही.
मृदुंगाच्या किंवा ढोलकीच्या तालावर आरती म्हणताना तल्लीन व्हायला होते. टाळ , चकी यांची साथ नक्कीच उपयोगी ठरत असते. पेटीचे सुर संगतीला असतील तर आरती सुरुच राहावी असे वाटत राहते.
हल्ली आरती संपली की विविध गोडधोड किंवा तिखट , चमचमीत खाद्यपदार्थ वाटले जातात. त्यामुळे त्यांचे वास आधीच नाकात गेले तर आरतीपेक्षा तिकडेच जास्त लक्ष जाऊ लागले आहे. त्यांच्याकडे काय मिळणार ? यासाठी आरतीला जाणे हे भक्तिमय नक्कीच असणार नाही.
सत्यनारायण पुजा असली की आरतीला तुडुंब गर्दी असते. सत्यनारायण आरतीची चाल एका वेगळ्या धाटणीची असते. ती तशीच असली तरच बरी वाटते. टाळांचा खणखणाट मग कर्कश वाटत नाही.
आरतीमधून कलावती आणि अंगध्वजराजा यांची कहाणी ऐकताना सत्यनारायण प्रसादाची महती पटते. त्यामुळे लहानपणापासून सत्यनारायण पुजेचा प्रसाद न घेता पुढे जाण्याचे धैर्य झालेले नाही.
चतुर्थी सणामध्ये बऱ्याचदा नवसाच्या सत्यनारायण महापूजा सांगितल्या जातात. त्या केल्यानंतर मनशांती मिळते. मन आणि काया दोन्ही सकारात्मक होतात. मनातील वाईट नकारात्मक विचार कुठल्या कुठे पळून जातात.
हल्लीच मी एका नातेवाईकांकडे सत्यनारायण पुजेसाठी गेलो होतो. एक बाल भटजी कथा वाचन करत होते. त्यांचे सुवाच्य पठण समोर जसेच्या तसे चित्र निर्माण करत होते. वडिलांच्या अकाली निधनामुळे शाळेत शिकता शिकता त्याच्यावर पौरोहित्य करण्याची पाळी आली होती. त्याची आईही प्रसाद बनवण्यासाठी आलेली होती. दोघे मिळून अशा प्रकारे आपला वारसा पुढे चालवत होते. मला त्यांचा अभिमान वाटला.
आरतीची वेळ जवळ आली. वाडीचे भजन मंडळ साहित्यासह आले. त्यांनी सत्यनारायण आरती सुरु केली. त्यांनी म्हटलेली आरती कर्णमधुर आणि सुरात होती. मीही त्यात सामील झालो होतो. कित्येक दिवसांनी सुंदर आरतीचा लाभ मिळाला होता. कोणतीही गडबड नव्हती. व्यवस्थित शब्द उच्चार होत होते. कलावतीचा जीवनपट नयनचक्षूंसमोर उभा करण्याची कला त्यांच्या गायनातून दिसून आली.
चतुर्थी सणांच्या निमित्ताने अशा आरत्या , पुजा संपन्न होतात. मुले , माणसे , पाहुणेरावळे एकत्र येतात. समाज एकत्र येतो. हेवेदावे विसरले जातात. म्हणूनच की काय या सणांचे उपयोजन केले गेले असावे.
©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 )
No comments:
Post a Comment