Showing posts with label नाभिक संघटना आणि मी. Show all posts
Showing posts with label नाभिक संघटना आणि मी. Show all posts

Friday, April 14, 2023

नाभिकांचे संत सेना महाराज आणि सिंधुदुर्ग नाभिक संघटना

      नाभिक म्हणजेच न्हावी समाजाचे संत सेना महाराज यांची आज जयंती आहे. त्यांचा जन्म मध्यप्रदेशातील बांधवगड येथे झाला. बांधवगडचे तत्कालीन राजा वीरसिंह यांच्या पदरी केशकर्तन , अंगमर्दन अशी सेवा देण्याचे काम संत सेना महाराज अतिशय इमाने इतबारे करीत असत. संत सेना हे स्वामी रामानंद यांचे शिष्य. विठ्ठलभक्तीची नितांत आवड असणारे सेना महाराज वारकरी संप्रदायाचे संत म्हणून ओळखले जातात. 

संत निळोबा , संत जनाबाई यांनी संत सेनांबद्दल गौरवोद्गार काढलेले दिसतात. संत जनाबाई म्हणतात , “ संत सेना न्हावी भला , तेणे देव भुलविला ”. संत निळोबा म्हणतात , “ जन्मोनि न्हावियाचे वंशी , भक्ती केली तुवा भोळी ”. अनेक संतांनी आपल्या अभंगांतून संत सेना महाराजांचे विशेषत्व सांगितले आहे.  

संत सेना महाराजांचे अभंग शिखांच्या ‘ गुरुग्रंथसाहिब ’ या ग्रंथात आढळतात , यावरूनच त्यांचे संतपण दिसून येते. तत्कालीन सर्व संतांना संत सेना महाराजांबद्दल कमालीचा आदर होता. संत सेना महाराज विठ्ठलाचे निस्सीम भक्त होते. विठ्ठलाची भेट घेण्यासाठी ते मध्यप्रदेशातून म्हणजेच उत्तरेकडून दक्षिणेकडे महाराष्ट्रात आले. महाराष्ट्रात ते सुमारे वीस वर्षे राहिले. या काळात त्यांनी मराठी भक्तिमय कविता लिहिल्या. इयत्ता पाचवीच्या मराठीच्या पुस्तकात ‘ धन कोणा कामा आले , पहा विचारुनी भले , ऐसे सकळ जाणती , कळोनिया आंधळे होती ’ या अभंगात संत सेना महाराज म्हणत आहेत , ‘ सखा पांडुरंगाविण , सेना म्हणे दुजा कोण ? ’ 

संत सेना महाराजांची पत्नी होती सुंदरबाई. तीही संत सेना महाराजांच्या सत्संग सेवेत सहभागी असे. घरी येणाऱ्या भक्त , संत यांची सेवा करण्यात हे दांपत्य कोणतीही कसर सोडत नसत. असेच एकदा घरी आलेल्या पाहुण्यांचे आदरातिथ्य करताना वीरसिंह बादशहाकडून संत सेनांना नाभिक सेवेसाठी निरोप पाठवण्यात आला. संत सेना परिवार सेवेत दंग होता. त्यामुळे त्यांना बादशहाच्या सेवेला जाण्यास थोडा उशीर झाला. इकडे बादशहा रागावला होता. राजाच्या आदेशाचे तात्काळ पालन न केल्यामुळे संत सेनांना पकडून आणण्यास सांगितले. राजाचे सैनिक संत सेनांना पकडण्यासाठी निघाले. 

बादशहा संत सेनांची वाट पाहत असतानाच संत सेना बांधवगडावर दाखल झाले. राजाला संत सेनांची  प्रसन्न मुद्रा पाहून आनंद झाला. बादशहाने संत सेनांकडून आपली दाढी करुन घेतली. अंगमर्दन करुन घेतले. राजा कुष्ठरोगाने पिडीत होता. ही गोष्ट फक्त राजाच्या पत्नीला आणि संत सेना यांनाच माहिती होती. बादशहाने आपला चेहरा आरशात पाहिला. त्यावेळी संत सेना त्यांना विठ्ठलासारखे दिसले. राजाने पुन्हा पुन्हा पाहिले तरी त्याला तोच अनुभव आला. राजाचा कुष्ठरोग निघून गेला होता. राजाला संत सेना यांचा खूप अभिमान वाटला. आपण विठ्ठलाकडून आपली शरीर सेवा करुन घेतली याची खंतही वाटली. संत सेना महाराजांच्या धोकटीमध्ये राजाने सुवर्णमुद्रा घातल्या. संत सेना आपल्या घरी जायला निघाले. खुद्द विठ्ठलच संत सेनांचे रुप घेऊन आल्यामुळे ते वाटेत अंतर्धान पावले. राजाच्या सैनिकांनी खऱ्या संत सेना महाराजांना पकडून राजासमोर उभे केले. संत सेना महाराज पुन्हा आलेले पाहून राजा आश्चर्यचकित झाला. राजाने घडलेली संपूर्ण घटना सांगितली. धोकटीमध्ये सुवर्णमुद्रा पाहताच संत सेनांना सर्व गोष्ट लक्षात आली. साक्षात पांडुरंगाने संत सेनांना शिक्षा होऊ नये म्हणून सेना महाराजांचे रुप घेतले होते. 

अशा प्रकारे संत सेना महाराज यांच्याबद्दलच्या घडलेल्या गोष्टी वाचायला मिळतात. संत सेना महाराज हे नाभिक समाजातील असल्यामुळे त्यांची पुण्यतिथी नाभिक समाजाचे ज्ञातिबांधव साजरी करतात. यंदा महाराष्ट्रातील तमाम नाभिकांनी संत सेना महाराजांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्याचे ठरवले आहे. महाराष्ट्रात सगळीकडे संत सेना महाराजांची जयंती साजरी होत असताना विविध समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे.

महाराष्ट्र नाभिक महामंडळ , मुंबई अशी नाभिक समाजाची नोंदणीकृत समाज संघटना आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात महाराष्ट्र नाभिक महामंडळाची जिल्हा शाखा कार्यरत आहे. गेली अनेक वर्षे या संघटनेचे कार्य सुरु आहे. संघटनेच्या माध्यमातून तळागाळातील नाभिक समाजाला एकत्र करण्याचे महत्त्वाचे कार्य ही संघटना करीत आहे. त्यासाठी तालुकास्तरावर आणि विभागस्तरावर पदाधिकारी , कार्यकारिणी स्थापन करुन संघटनात्मक कार्य सुरु आहे.

मी विद्यार्थीदशेत असल्यापासून नाभिक संघटनेचे कार्य अतिशय जवळून पाहिले आहे. कणकवली शहरातील कै. यशवंत हरी अणावकरगुरुजी , मालवणचे कै. विवेकानंद उर्फ स्वामी लाड , कुडाळचे कै. चंद्रकांत चव्हाण आणि सध्याचे राज्य प्रांत संघटक विजय चव्हाण यांचे संघटनात्मक कार्य पाहताना त्यावेळीही मी प्रभावित झालो होतो. त्यांनी केलेले संस्कार मी कदापि विसरु शकत नाही. शाळेत परीक्षेत चांगले यश मिळाल्याबद्दल त्यावेळी माझा मालवण येथील भैरवी मंदिरात झालेला सत्कार अजूनही लक्षात आहे. त्यामुळे मला मिळालेली प्रेरणा हा लेख लिहिण्यासाठी प्रवृत्त करुन गेला असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. 

त्या पहिल्या पिढीच्या काळात संपर्क साधनांची वानवा होती. तरीही या कार्यकर्त्यांनी नाभिक समाजाच्या बांधणीसाठी जंगजंग पछाडले होते. गावागावांत जाऊन घरोघरी भेटी देऊन त्यांनी केलेले मार्गदर्शन अतिशय मोलाचे असेच होते. त्यांची विचारसरणी त्यागाची होती. समाजहिताची होती. प्रोत्साहनाची होती. त्यांनी माझ्यासारखे संघटनेवर निस्सीम प्रेम करणारे कार्यकर्ते निर्माण केले. आज नाभिक संघटनेसाठी कार्य करणारे अनेक कार्यकर्ते निर्माण झाले आहेत. त्यासाठी जुन्या जाणत्या मंडळींनी संघटनेसाठी दिलेला वेळ मोलाचा होता. कै. स्वामी लाड आणि आजचे राज्य संघटक विजय सीताराम चव्हाण यांनी संघटनेसाठी केलेले अनमोल कार्य मालवण पासून सुरु झाले. आज सिंधुदुर्गात खारेपाटणपासून दोडामार्गपर्यंत सर्वदुर संघटनेचे पाईक पसरले आहेत. कुडाळात कै. चंद्रकांत चव्हाण यांच्या कार्यकारिणीने केलेले कार्य नव्या नाभिक पिढीचा उत्साह वाढवणारे आहे. आता यातील काही मंडळी हयात नसली तरी ती त्यांच्या कार्याच्या रुपाने कायमच अमर राहणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे. 

गेली सहा सात वर्षांत नाभिक संघटनेचे जिल्हाध्यक्षपद कणकवलीतील अनिल अणावकर यांनी सांभाळले. त्यांनी संघटनेला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले आहे. संघटनेचे काम करणारे अनेक धडाडीचे कार्यकर्ते त्यांच्या काळात त्यांनी निर्माण केले आहेत. मी शिक्षक झाल्यामुळे पहिली तेरा चौदा वर्षे संघटनेपासून दूर होतो. पण पुन्हा कणकवली तालुक्यात आल्यानंतर अनिल अणावकर यांच्यामुळे कणकवली तालुका नाभिक संघटनेचा सरचिटणीस म्हणून कार्य सांभाळीत आहे. संघटनेच्या समाजोपयोगी उपक्रमांना समाजमाध्यमांमध्ये प्रसिद्धी दिल्यामुळे संघटनेची नव्याने ओळख निर्माण होण्यास अधिक मदत होत आहे. संघटनेचे संकेतस्थळ , यु ट्युब चॅनेल यांचीही मदत होत आहेच. सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगात प्रसारमाध्यमांची मदत संघटना वाढवण्यासाठो मोलाची ठरत आहे हे वेगळे सांगायला नको. 

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नाभिक भवन असावे यासाठी शासनस्तरावर नाभिक संघटनेची मागणी जोर धरु लागली आहे. मालवण येथे भैरवी मंदिरात संत सेना महाराजांच्या मूर्तीची स्थापना करुन अनेक वर्षे उलटली आहेत. मालवण तालुक्याप्रमाणेच इतर तालुक्यातही नाभिक समाजाचे संत शिरोमणी सेना महाराज यांचे मंदिर बांधण्यासाठी , भवन बांधण्यासाठी सर्वांनी एकत्र येणे ही काळाची गरज वाटते आहे. जुन्या कार्यकारिणीने नव्या कार्यकारिणीकडे हे कार्य पूर्ण करण्याची मोठी जबाबदारी सोपवली आहे. नवीन कार्यकारिणी , माजी कार्यकारिणी आणि नाभिक कर्मचारी बंधु भगिनी यांनी मनात आणले तर नाभिक भवन उभारण्याची ताकद त्यांच्यात नक्कीच आहे हे मी सांगू शकतो. 

हल्लीच आमच्या एका नाभिक भगिनींवर संकट ओढवले. तिला मदत करण्यासाठी अनेक मदतीचे हात पुढे झाले हे त्याचेच एक छोटे उदाहरण आहे. कोरोना काळात जय भवानी ग्रुप आणि सिंधुदुर्ग जिल्हा नाभिक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने नाभिक व्यावसायिकांना , सावंतवाडी बांदा येथील पूरग्रस्तांना वस्तुरुपाने मदतीचा हात देण्यात आला. संघटनेचे अनेक उपक्रम सुरु असताना या कार्यात महिला वर्गानेही भरारी घेतली आहे. नाभिक समाजातील अनेक हिरकणी तयार होऊ लागल्या आहेत. ड्रेसकोडचा वापर , १० वी , १२ वी आणि स्पर्धा परीक्षांत यशस्वी विद्यार्थ्यांचा सन्मान , नाभिक रत्न पुरस्कार , समाजभूषण पुरस्कार , खेळाडू , कलावंत , ज्येष्ठ श्रेष्ठ , महिला ब्युटिशियन , नाभिक कर्मचारी , आदर्श नाभिक कार्यकर्ता यांचा सन्मान , वाढदिवस , पदाधिकारी यांच्या भेटी , जातीवाचक विधानाबद्दल विराट मोर्चा , सलून व्यवसायाला उभारी , गरीब होतकरु मुलींना आर्थिक सहाय्य मिळवून देणे , आंगणेवाडी पायी नाभिक वारी , व्यापारी महासंघात प्रवेश , योगविषयक मार्गदर्शन , महिलांना आरोग्यविषयक मार्गदर्शन , कायदेविषयक मार्गदर्शन , भव्य दिव्य वधु वर मेळावा , रक्तगट व हिमोग्लोबिन तपासणी शिबीर , ऑनलाईन गाऊ नाचू सेनानंदे उपक्रम आणि अशा प्रकारचे अनेक उत्तम उपक्रम राबवून पुढील नाभिक पिढी अधिक गतिमानतेने कार्य करण्यासाठी नेहमीच एक पाऊल पुढे ठेवील अशी आशा करतो. 


लेखन : प्रवीण अशितोष कुबल 

जिल्हाध्यक्ष , सिंधुदुर्ग जिल्हा नाभिक कर्मचारी संघटना 

महाराष्ट्र नाभिक महामंडळ , मुंबई ( शाखा : सिंधुदुर्ग ) 





Monday, April 10, 2023

🛑 आम्ही वारीक वारीक

🛑 आम्ही वारीक वारीक

          संत सेना महाराज हे नाभिक समाजाचे संत म्हणून सर्वांनाच ज्ञात आहेत. ते मूळ मध्यप्रदेशातील बांधवगडचे. त्यांनी अनेक काव्यरचना केल्या. कवने केली. आजही ती अभंग आहेत. त्यांनी केलेल्या रचना विठ्ठलभक्तीने ओथंबलेल्या आहेत. 

          त्या काळात नाभिक हे नाव वापरले जात नव्हते. न्हावी या नावाचा उच्चार पुनःपुन्हा होत होता. अजूनही कागदोपत्री ' न्हावी ' या नावालाच उल्लेख आढळतो. नाभिक समाजावर राम नगरकर या नाभिक समाजातील शाहिराने ' रामनगरी ' हे विनोदी पुस्तक लिहून नाभिक समाजाचे प्रश्न मांडले आहेत. नाभिक समाजाचे लोक हे केशकर्तनाचा पारंपरिक व्यवसाय करतात. त्यात आता आधुनिकता आली आहे. हा नाभिक आपली कात्री , फणी , वस्तरा , वाटी आणि एक कापड ज्या पिशवीत किंवा ट्रंकेत ठेवत असे , त्याला ' धोकटी ' असे म्हटले जाई. 

          गावोगावी फिरुन काम करणारे नाभिक व्यावसायिक आता कमी झाले आहेत. काही गावांमध्ये एकही नाभिकाचे घर नसेल तर दुसऱ्या गावातून नाभिक बोलावले जात. त्याला वर्षाची ' कुल ' दिली जाई. कुल म्हणजे न सडलेला भात. एका माणसाची वर्षभर स्वच्छता केल्याबद्दल एखादी गोणी भात मिळे. हळूहळू या गोणीचाही आकार कमी कमी होत गेला. 

          कुंभार , मांग , रामोशी , महार , सोनार , लोहार , सुतार , गुरव , चांभार , कोळी , परिट आणि न्हावी असे बारा बलुतेदार म्हणजे लोकांचे सेवकच. या लोकांमध्ये नाभिकांचा धंदा म्हणजे हातावरचं पोट. 

          लग्नातील नवऱ्याची रेग , मयत झालेल्या घरातील पुरुष सदस्यांचे शौरकर्म करणं , अशुभ कार्याच्या वेळी शेंडी कापणे इत्यादी कामे नाभिकाशिवाय पुढे जात नाहीत. या कामाबद्दलही पूर्वी जमीन , झाड , कपडे , टॉवेल इत्यादी मिळे. आता रोख रक्कम दिली जाते. रितीरिवाज असेल तर काही वस्तुरुपाने भेटी दिल्या जातात. 

          आता नाभिक समाजातील शिकलेली मुले  पारंपरिक व्यवसाय करण्यास पुढे सरसावताना दिसत नाहीत. जेंटस ब्युटीपार्लर , युनिसेक्स सलून , स्पा इत्यादी व्यवसाय वाढीस लागत असले तरी हे व्यवसाय नाभिकेतर लोक चालवू लागले आहेत. चांगला पैसा मिळत असल्याने इतर समाजही या धंद्याकडे आकर्षिला जात आहे. याचा परिणाम मूळ नाभिक बांधवांवर होऊ लागला आहे. 

          नाभिक व्यवसाय करणाऱ्या मुलास लग्नासाठी मुली मिळणेही अवघड बनत चालले आहे. सर्वांनाच मुंबईला स्थायिक असलेले नोकरीवाले नवरे हवे आहेत. याचाही मोठा फटका नाभिक बांधवांना बसतो आहे. 

          संत शिरोमणी सेना महाराज हे नाभिक समाजाचे आराध्य दैवत आहेत. त्यांची पुण्यतिथी मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते. विविध समाजोपयोगी कार्यक्रम केले जातात. तळागाळातील नाभिक समाज सुशिक्षित झाला पाहिजे असे प्रयत्न नाभिक  संघटनेच्या वतीने केले जातात. आधुनिकतेकडून अत्याधुनिकतेकडे जाण्यासाठी नाभिक युवक , युवतींनी नाभिक संघटनेच्या उपक्रमांमध्ये सक्रिय सहभागी होणे ही काळाची गरज आहे. आजची पिढी हे उद्याचे भविष्य आहे. त्यांनीच जर संघटनेकडे पाठ फिरवली तर उद्याचे भावी कर्तबगार नाभिक कसे निर्माण होणार ? नाभिक युवक , युवतींनी नाभिक व्यवसायाचा शास्त्रशुद्ध अभ्यास केला पाहिजे. लोकांना काय हवे आहे याचा अभ्यास करुन त्यांची सेवा करण्याचे हे लोकव्रत पुढे सुरु ठेवण्यासाठी अग्रस्थानी राहिले पाहिजे. नोकरी करण्यापेक्षा आपल्या दुकानात दुसऱ्याला नोकरीला ठेवण्याची क्षमता बाळगली पाहिजे. 

          संत सेना महाराजांनी बादशहाची सेवा केली. असेच एकदा संत सेना महाराजांना बादशहाकडे बोलावणे आले होते. संत सेना महाराज विठ्ठलाचे निस्सीम भक्त होते. त्यांना विठ्ठलासाठी वेळ देणे महत्त्वाचे वाटले. त्यामुळे बादशहाकडे जायला उशीर झाला. याचा राग येऊन बादशहाने सेना महाराजांना पकडून आणण्याचे फर्मान काढले. बादशहाचे सैनिक सेनांना पकडण्यासाठी घरी आले. इकडे बादशहाची दाढी करायला दुसरेच सेना आले होते. बादशाहाच्या सेवकांनी सेना महाराजांना बंदी करुन त्यांच्यासमोर उभे केले. बादशहाला आश्चर्यच वाटले. " सेना महाराज जर घरी होते , तर मग माझी दाढी करुन गेलेले सेना कोण होते ? " बादशहाला संत सेना महाराजांच्या विठ्ठलभक्तीबद्दल आदर वाटला. कारण बादशहाची दाढी करण्यास आलेले दुसरे संत सेना म्हणजे साक्षात विठ्ठल पांडुरंग होते. बादशहा शरमला. त्याने संत शिरोमणी सेना महाराजांचा गौरव केला. 

          असे हे संत सेना महाराज आपल्याला ' वारीक ' म्हणत. त्यांनी एका अभंगात असे म्हटले आहे , " आम्ही वारीक वारीक , हजामत करु बारीक. " आज त्यांची जयंती आहे . त्यानिमित्ताने या थोर विभूतीस माझे कोटी कोटी प्रणाम. 

©️ प्रवीण अशितोष कुबल , जिल्हाध्यक्ष , सिंधुदुर्ग नाभिक कर्मचारी संघटना





Thursday, November 17, 2022

🛑 प्रसिद्धी गणेशु

🛑 प्रसिद्धी गणेशु

          प्रसिद्धी करणं ही खूप कठीण गोष्ट नसली तरी सोपी मात्र अजिबात नाही. त्यासाठी अभ्यास लागतो. अभ्यास केल्यावर ती साध्य होणारी गोष्ट आहे. काहींना दुसऱ्यांची चांगली प्रसिद्धी करणं आवडतं. आपली स्वतःची प्रसिद्धी अशांना अजिबात नको असते. 

          असंच एक हसतमुख व्यक्तिमत्त्व म्हणजे गणेश चव्हाण. ते फक्त पत्रकारिता करत नाहीत , तर ती जोपासतात. ते एक उत्तम पत्रकार आहेत आणि खूप काही आहेत. पत्रकार हा त्यांचा एक पैलू आहे. त्यांच्या सहवासात जावं , तसे त्यांचे इतर पैलू दिसू लागतात. त्याचं बोलणं , त्यांचं वागणं , त्यांचं आदर देणं या सर्व गोष्टी मनाला अंतर्गत स्पर्श करीत जातात. 

          श्रावण गावातील हा एक हिरा आहे. हा माणूस स्वतः हिरा असला तरी दुसऱ्याचं आयुष्य चमकण्यासाठी प्रयत्न करताना दिसतो. कोणत्याही अपेक्षेने त्यांनी कार्य केलेलं नसतं. परोपकारी वृत्तीच त्यांना तसं करण्यासाठी भाग पाडते. कधी ते ऑटोरिक्षा चालवताना दिसतील तर कधी व्हॅन. कधी ते समाजसेवा करताना दिसतील. कधी ते छान लेख लिहून पाठवतील. लोकांना प्रेरणा देण्याचं महत्त्वाचं कार्य ते नेहमीच करताना दिसतात. त्यांचं ते अतिशय आवडीचं काम असतं. ते करताना त्यांना जो आनंद होत असतो तो आम्ही त्यांच्या चेहऱ्यावर अनेकदा पाहिला आहे. अर्थात कोणत्याही मानधनाची अपेक्षा त्यांनी कधीही केलेली नसते हे विशेष आहे. 

          ' जाता जाता भलं करावं ' या सुविचाराने ते नेहमीच प्रभावित झालेले मी स्वतः पाहिले आहेत. शिक्षणाने माणूस हुशार होतो , असे असले तरी त्यांनी आपल्या शिक्षणाच्या पदव्या कधीही पुढे पुढे केल्या नाहीत. उच्चशिक्षित असूनही एका साध्या , सरळ माणसाचं जीवन ते जगताना दिसतात. आपल्या शिक्षणाचा त्यांनी कधी टेंभा मिरवला नाही. 

          सिंधुदुर्ग जिल्हा नाभिक समाजाशी त्यांचा अतिशय जवळचा संबंध राहिला आहे. गोवा राज्यातील अखिल गोमंतक नाभिक समाजाशी त्यांचे सलोख्याचे संबंध आहेत. हल्लीच कुडाळ येथे संपन्न झालेल्या महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या राज्यस्तरीय सभेत त्यांची जिल्हा प्रसिद्धी प्रमुख या महत्त्वाच्या पदावर नियुक्ती झाली हे आमच्यासाठीही अभिमानास्पद आहे. प्रसिद्धी करणाऱ्या व्यक्तीलाच प्रसिद्धी प्रमुख हे पद मिळून त्या पदालाही योग्य असा न्याय मिळाला आहे असे आम्ही मानतो. त्यांचं प्रसिद्धीचं कार्य अविरत सुरुच आहे. त्यात खंड पडणार नाही यात तिळमात्र शंका नाही.

          आज त्यांचा वाढदिवस आहे. त्यांच्याबद्दल लिहिणं हे मी माझं कर्तव्य समजतो. हे शब्द जसे सुचतील तसे लिहित गेलो आहे. त्यांच्यासोबतच्या निवडक आठवणी असल्या तरी त्यांची प्रत्येक भेट माझ्यासाठी वैशिष्ट्यपूर्ण ठरलेली आहे हे सांगायला मला अतिशय आनंद होतो आहे. अशा या ' प्रसिद्धी गणेशु ' यांना त्यांच्या पुढील भव्य दिव्य आयुष्यासाठी कोटी कोटी शुभेच्छा.

©️ प्रवीण कुबल ( कणकवली ) 9881471684



Saturday, September 3, 2022

🛑 दशरथा , घे हे लेखन दान

🛑 दशरथा , घे हे लेखन दान

          बारावी सायन्स नंतर डीएड केलं. कै. सौ. इंगेट्राऊट नाईक अध्यापक विद्यालयात पहिल्या वर्षात चाळीस जणांना गुणवत्तेच्या आधारावर प्रवेश मिळाला. दहावी झाल्यानंतर डीएड बंद होऊन ते बारावी नंतर सुरु झाले होते. पदवीधर आणि पदव्युत्तर झालेल्या अनेकांनी बारावीच्या मार्कांवर प्रवेश मिळवला होता. 

          दहावी डीएड बॅचची मुलेही काही कमी नव्हती. पहिल्या परिपाठात त्यांच्या विद्वत्तेचा अनुभव आला. तीही जबरदस्त टक्क्यांनी गुणवत्ता सिद्ध करुन प्रवेश घेतलेली मुले होती. कदाचित आम्हीच त्यांच्यापुढे कमी पडू की काय असा धसका पहिल्या दिवसापासून आमच्या अनेकांच्या चेहऱ्यावर दिसू लागला होता. काहींनी कॉलेज लाईफ अनुभवलेले होते. त्यांना हे कठीण नव्हते. 

          अभ्यास एके अभ्यास करणाऱ्या मुलांसाठी मात्र थोडे कठीण जात होते. कारण आता फक्त लिहायचे नव्हते तर बोलायचेही होते. नुसतेच बोलायचे नव्हते तर शिक्षकाला शोभेल असे बोलायचे होते. त्यासाठी दोन वर्षे शिकून शिक्षक होण्यासाठी सगळे तयार झाले होते. 

          चाळीसच्या चाळीस छात्र अध्यापक विशेष तयारीचे होते. एकापेक्षा एक हुशार होते. प्रत्येकात काहीतरी वेगळा गुण होता , जो इतरांवर प्रभाव पाडायचा. अर्थात प्रत्येकावर दररोज एकोणचाळीस प्रभाव पडत होते. ते प्रभाव टिपणं सोपं काम नव्हतं. 

          परिपाठात प्रत्येकातील आगळे वेगळेपणा नजरेत भरायचा. आपल्याला असे जमेल का ? असे वाटायचे. प्रत्येकजण एकमेवाद्वितीय होता. आज हे सगळे शिक्षक कुठे ना कुठे आदर्श शिक्षक म्हणून काम करत असतील तेव्हा मला माझ्या बॅचचा सार्थ अभिमान वाटतो. त्यावेळी जे साधे सरळ वाटत होते , ते आता बोलके आणि उपक्रमशील झाले आहेत. शिक्षकी पेशाचा तो गुण असतो. पाण्यात पडले की जसे पोहायला शिकता येते , तसे शिक्षकी पेशा स्वीकारला की त्यातील सर्वकाही अंगी बाणत जाते. 

          संतोष तुळसकर नावाचा माझा मित्र उत्तम बोलका होता. स्मार्ट होता. सगळ्यांच्या गळ्यातील ताईत होता. मुलीदेखील त्याच्या अशा असण्यावर फिदा असाव्यात. बिचारा खेड येथील क्षमताधिष्ठित प्रशिक्षणाच्या सकाळी नदीवर आंघोळीला गेला तो वर आलाच नाही. तो गेला आणि आम्हां मित्रांमधील संतोषच हरपला. 

          संजय शेट्ये हा माझा बेंचमेट. कुठेही जाताना तो आणि मी सतत बरोबर असू. त्याचे तिरपे तिरपे अक्षर अजूनही आठवते. गोड गोबऱ्या गालांचा , मान तिरपी करुन हसणारा संज्या कुठेतरी हरवला आहे की त्याचे काय झाले आहे समजायला मार्ग नाही. दोन वर्षे एकत्र असणारा मित्र अचानक कुठे निघून जातो आणि सापडता सापडत नाही यासारखे दुःख नाही. तो कुठे असेल तर तो सुखात असावा हीच देवाकडे प्रार्थना आहे. 

          दशरथ सावंत एक सुजाण , संस्कारी मित्र. उंच , बारीक , गोरापान. गाल थोडेसे आत गेलेले. केस नीट विंचरलेले. सगळ्यांचा यथोचित आदर करणारा. काळजीपूर्वक पाठ टाचण काढणारा. पाठात चित्रांचा वापर करणारा. माझ्याही पाठीवर अलगद आश्वासक थाप मारुन प्रोत्साहन देणारा. 

          त्या दिवशी शिक्षक समितीचे धरणे आंदोलन होते. तिथे त्याच्या आत्महत्येची खबर ऐकायला मिळाली. खूप वाईट वाटले. त्याचे डीएडच्या वर्गातील क्रियाकलाप डोळ्यासमोर नाचू लागले. त्याला खेळाची खूप आवड होती. तो दरवर्षी आपले विद्यार्थी जिल्हास्तरापर्यंत आणायचा. त्यावेळी धावती भेट होई.  पण विद्यार्थ्यांसाठी तो सतत धाव घेणारा आदर्श शिक्षक होता. तो असा अचानक कसा निघून गेला हे आमच्यासमोर असलेले प्रश्नचिन्ह आहे. त्याने आत्महत्या का केली असावी ? कोणते प्रश्न त्याला भेडसावत होते ? सुखी संसाराला सोडून तो का जावा ? दुसऱ्यांना विजयी होण्यासाठी प्रेरणा देणारा एक उपक्रमशील शिक्षक एवढा स्वतःच्या जीवनावर नाराज का व्हावा नकळे !! जीवन सुंदर असताना त्या जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने बघायला हवे असे सांगणारा दशरथ निराशेच्या खाईत कसा जाऊ शकतो ? हे आम्हाला सर्वांना न उलगडणारे कोडे आहे. 

          दशरथासारखे अनेक शिक्षक असतील , ज्यांना अनेक संकटांना तोंड द्यावे लागत असेल. संकटे तर येतच असतात. कामाचा ताण येऊन तणाव येतच राहणार आहे. त्यावर मात करुन जगणे हेच खरे जगणे आहे. अशा आव्हानात्मक जगण्यात अर्थ आहे. आजच्या शिक्षकांना अनेक तणावांना सामोरे जावे लागत असेल , पण त्यामुळे त्यांनी असा मार्ग कधीही अवलंबू नये. आपल्याला जमेल तसे काम करत राहावे. दशरथा , माझे हे विचार तुझ्यापर्यंत अंतराळातून पोहोचत असतील तर तुझ्यासाठी माझ्याकडून हे लेखाचे दान आहे असे समज. 

©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 )

Monday, March 14, 2022

जिल्हा सचिव सुधीरसाहेब

🛑 जिल्हा सचिव सुधीरसाहेब

          सिंधुदुर्ग जिल्हा नाभिक संघटना गेली कित्येक वर्षे जोमाने कार्य करत आहे. त्यासाठी जी जिल्हा कार्यकारिणी आहे , त्यांची जाणीव जागृती आणि ज्ञाती बांधवांबद्दल असलेली आपुलकी अत्यंत महत्त्वाची आहे. त्यात जिल्हाध्यक्ष अनिल अणावकर साहेब यांचे कार्य अद्वितीय असेच आहे. त्यांना साथ देणारी त्यांची कार्यरत कार्यकारिणी त्यांच्या कायमच सोबत राहिलेली आहे. 

          कुडाळ पिंगुळीचे मूळ वालावलचे आमचे सचिव सुधीर चव्हाण यांचे कार्य त्यात लक्षात घेण्यासारखे आहे. ज्या ज्या वेळी  जिल्ह्याचे उपक्रम असतात , त्या त्या वेळी त्यात हिरीरीने सहभाग घेणारे व कार्यक्रमांची अंमलबजावणी करणारे सुधीर चव्हाण कायमच अग्रस्थानी असलेले दिसून येतात.

          हल्लीच त्यांच्या आईचे निधन झाले तेव्हा त्यांच्यावर मोठे संकट कोसळले होते. ते पुरते कोलमडून गेलेले दिसले. त्यांना उठताही येत नव्हते. त्यांना पाहून आम्हाला आमच्या आईची आठवण आली. खरंच आई गेल्यानंतर काय अवस्था होते , याची आम्हालाही कल्पना होती. पण सुधीरजी खूपच हळवे आहेत. त्यांना दोन मुली आहेत. त्यासुद्धा खूप हुशार आहेत. 

          वधु वर मेळाव्याच्या आयोजनात सुधीर साहेबांनी महत्त्वाची भूमिका बजावलेली दिसली. कोणी कोणाचे स्वागत करायचे हे त्यांनी सर्व नियोजनबद्ध करून माझ्याकडे दिले होते. सचिव कसा असावा याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे सुधीरजी आहेत. सूत्रसंचालन करतानाही मला त्यांनी अनेक ठिकाणी महत्त्वाच्या टिप्स दिल्या होत्या. सर्वसामान्यांसारखे सलून दुकानात काम करता करता असे काम करणे कठीण असते. पण त्यांना त्याचे काही वाटत नाही. त्यांची सेवाभावी वृत्ती असल्याने ते संघटनेचे कार्य आनंदाने न थकता करताना दिसतात. 

          जिल्ह्याचे सर्व कागद काळजीपूर्वक जपून ठेवणे , हिशोब ठेवणे ही सर्व कामे ते करताना बघून आम्हाला त्यांच्याकडूनही काही शिकायला मिळते. त्यांचा आर्थिक कारभार अगदी पारदर्शक असतो. 

          नुकताच त्यांना पडवे हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला. ते दवाखान्यात असताना त्यांना मी सपत्नीक भेटायला गेलो होतो. त्यांची तब्येत बरी नव्हती. त्यांना नीट बोलताही येत नव्हते. त्यांचा बोलताना धाप लागत होती. त्यांना पित्ताशयाचा त्रास होत होता. त्यावर शस्त्रक्रिया करुन आता त्यांची तब्येत साधारण बरी आहे. तरीही त्यांना आता भविष्यात अधिक काळजी घ्यावी लागणार आहे. त्यांना डॉक्टरांनी काळजी घ्यायला सूचना दिल्या आहेत. या सर्व सूचनांचे ते काटेकोर पालन करतीलच. आता ते काही काळ दुकानात जाऊन काम करु लागले आहेत. 

          सुधीर साहेबांचा हा त्रास लवकरच पूर्णपणे बरा होवो अशी आम्ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आज त्यांचा वाढदिवस आहे, त्यांना त्यांच्या प्रकट दिनाच्या कोटी कोटी शुभेच्छा. आमचे जिल्हा सरचिटणीस म्हणून कार्य करण्यासाठी व पुढील यशस्वी वाटचालीसाठी त्यांना कणकवली तालुका नाभिक संघटनेच्या वतीने हार्दिक शुभेच्छा. 

©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 )



Thursday, March 10, 2022

🛑 कणकवली शहर अध्यक्ष मा. अनिलजी शिंदे यांना हॅप्पी बर्थडे

          आम्हाला जे अनिल भेटले ते अफलातून आहेत. जिल्हाध्यक्ष अनिल अणावकर , देवगडचे अनिल चव्हाण आणि आता आमचे कणकवली शहराचे अध्यक्ष अनिल सहदेव शिंदे.

          त्यांचे चौकस व्यक्तिमत्त्व आहे. त्यांना अनेक प्रश्न पडतात. काही प्रश्नांची उत्तरे त्यांच्याकडेच असतात. काहीवेळा प्रश्न तेच उपस्थित करताना दिसतात आणि त्यांची उत्तरेही तेच देताना दिसतात.
          त्यांचे प्रश्न भारीच असतात. पण आता ते स्वतः अध्यक्ष आहेत. त्यामुळे त्यांनी आता आपले प्रश्न न मांडता दुसऱ्यांचे प्रश्न कसे सोडवता येतील यासाठी कार्यतत्पर असायला पाहिजे. ते एक धडाडीचे कार्यकर्ते आहेत. त्यांनी ठरवले तर आपल्या शहराचा ते कायापालट करु शकतात. पण त्यांनी आता स्वतःहून संघटनेत सक्रिय व्हायला हवे. संघटनेच्या सर्व उपक्रमांमध्ये हिरीरीने भाग घेत राहायला हवा. सभांव्यतिरिक्त कार्य करता यायला हवे. त्यांच्यामध्ये या सर्व क्षमता आहेत.
          ते एकदा गायला लागले तर समोरच्याने फक्त ऐकत राहायचे आहे मंत्रमुग्ध होऊन. इतका त्यांचा कर्णमधुर आवाज आहे. ते आध्यात्मिक आहेत. त्यांच्या पत्नीही आमच्या महिला आघाडीच्या कोषाध्यक्षा आहेत. त्याही हुशार आहेत. त्यांची मुलेही बोलकी आहेत.
          आज आमच्या या मित्राचा वाढदिवस आहे. नाभिक संघटनेच्या वतीने आम्ही सर्वजण त्यांना मनापासून शुभेच्छा देतो. त्यांचे पुढील आयुष्य सुखाचे , समृद्धीचे , भरभराटीचे व आरोग्यदायक जावो अशी संत सेना चरणी प्रार्थना करतो. संघटनेतील पुढील उत्तुंग कामगिरीसाठी त्यांना कोटी कोटी शुभेच्छा.

©️ सरचिटणीस , कणकवली नाभिक संघटना



🛑 नाभिक महिलांचा जल्लोष

           कित्येक दिवस कणकवली तालुक्यातील नाभिक महिलांच्या मनात होतं. जागतिक महिला दिन साजरा करण्याची संकल्पना त्यांचीच. एके दिवशी सायंकाळी ही संकल्पना घेऊन काही महिला भगिनी माझ्या घरी मला भेटायला व त्याचे नियोजन करण्यासाठी आल्या. मी सांगण्यापूर्वीच त्यांच्याकडे नियोजन तयार होतं. मी त्यांच्या नियोजनाला शब्दरूप दिलं इतकंच. त्या सर्वांच्या मनातला उपक्रम कागदावर मांडला गेला. माझ्यापेक्षा त्यांच्या चेहऱ्यावर कार्यक्रमाचे मूर्त रुप पाहून स्मित हास्य विलसताना दिसले. 

          ८ मार्च कार्यक्रमाची तारीख जवळ येऊ लागली होती. महिलांच्या हालचाली आणि भेटी वाढत गेल्या. त्यांच्या ग्रुपवर धडाधड मेसेज येऊन चर्चा घडू लागल्या होत्या. मीही त्यांना कार्यक्रमातील बारकावे समजावत होतो. जिल्हाध्यक्ष अनिल अणावकर , जिल्हा खजिनदार चंद्रशेखर चव्हाण महिलांच्या या धडपडींना पाहत होते. त्यांना प्रोत्साहन देताना दिसत होते. या प्रोत्साहनाची महिलांना जास्त गरज दिसून येत होती. महिलांनी खूप तयारी केलेली दिसत होती. सर्वांना फोनद्वारे , संदेशांद्वारे आमंत्रणे कळवली होती. नेहमीच्या महिलांव्यतिरिक्त त्यांना आणखी अधिक महिलांची उपस्थिती हवी होती. 

          शेवटी तो दिवस उजाडला. कार्यक्रम दुपारनंतर होता. पण सगळ्या महिलांनी सकाळपासून घरातली आवराआवर करायला सुरुवात केली होती. मी मला सोपवलेल्या गोष्टींची यादी करण्यात दंग होतो. सगळं घेऊन मी कार्यक्रमस्थळी पोहोचलो. मलासुद्धा तयारीसाठी दोन दिवस लागले. मी हे आनंदाने केले होते. मी त्यांना तसा शब्द दिला होता. त्यांचा माझ्यावर स्वतःपेक्षा जास्त विश्वास होता. म्हणून त्यांनी माझ्यावर काही जबाबदाऱ्या दिल्या होत्या. कार्यक्रमाचे संपूर्ण सूत्रसंचालन त्यांनी माझ्याकडेच दिले होते. त्याचा क्रम आम्ही सर्वांनी मिळून ठरवला होता. 

          कायम घरी चूल आणि मूल यात रमणाऱ्या या महिलांनी उत्तम प्रकारचं नियोजन करुन कार्यक्रमाला येणाऱ्या प्रत्येकाला तोंडात बोट घालण्यास भाग पाडलं होतं. 

          सुरुवातीला शाब्दिक स्वागत झालं. मान्यवर पदाधिकारी व नाभिक महिलांच्या शुभहस्ते कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन करुन जल्लोषात उदघाटन संपन्न झाले. संत शिरोमणी सेना महाराज आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करुन त्यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आला. 

          चार पाच निवडक महिलांच्या गटाने सुस्वर ईश्वस्तवन व स्वागतपद्य गाऊन उपस्थितांची मने जिंकली. कमी कालावधीत त्यांनी चांगली तयारी केलेली दिसली. पन्नास साठ जणांसमोर सामुदायिक सादरीकरण करणं तितकंसं सोपं नसतं. पण त्यांनी ते सहजपणे केलेलं दिसलं. हे सगळं करताना त्यांच्यावर कोणताही ताण आलेला दिसत नव्हता ही विशेष गोष्ट होती. रंगीत तालीम करुनही इतकं चांगलं सादरीकरण झालं नसतं. त्यानंतर मीच प्रास्ताविक केलं.

          वेशभूषेने कार्यक्रमाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. अनेक मुली , महिला सावित्रीबाई फुले बनून आल्या होत्या. महिलांनी विविध भूमिका सादर केल्या. जिजाबाई , शिक्षिका , बंगाली बाई , डॉक्टर , परिचारिका , साऊथ इंडियन , पारंपारिक वेशभूषा , मासेवाली , झाशीची राणी , नृत्यांगना इत्यादी विविधांगी वेशभूषा साकारताना महिला अधिक उत्साहाने समोर येताना दिसत होत्या. याचा अर्थ महिलांचा आत्मविश्वास वाढत चाललेला दिसून येत आहे ही आमच्यासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे. 

          हल्ली रेकॉर्डडान्सची सर्वांना सवय झाली आहे. त्यात देखील वैयक्तिक गीत गायन करुन काही महिलांनी वाहवा मिळवली हे विशेष. या महिलांचा अभिनय आम्ही घरात प्रत्यक्ष बघितला आहे , पण चारचौघातसुद्धा त्या त्याहीपेक्षा जास्त चांगला अभिनय करु शकतात हे त्यांचे त्यांनीच सिद्ध करुन दाखवले असे म्हणायला काहीच हरकत नाही. छोट्या मुलींनीही बाजी मारली. ठुमकत , मुरडत विविध पदविन्यास दाखवत त्यांनीही प्रेक्षकांकडून पुरेपूर टाळ्या वसूल केल्या. हा कार्यक्रम संपू नये असेच वाटत असताना महिलांचे गमतीदार खेळ सुरु झाले. 

          संगीत खुर्ची खेळात सर्व महिला सहभागी झाल्या. संगीत थांबल्यावर खुर्चीवर बसतानाची त्यांची तारांबळ बघणाऱ्यांना अधिक आनंद देऊन जात होती. सर्व महिला आनंदात होत्या. हरल्या तरी आनंदातच होत्या हे नमूद करायलाच हवे. प्रत्येकाने अक्षरशः जल्लोष साजरा केला होता. 

          मेणबत्या पेटवणे , बादलीतील वाटीत नाणे टाकणे , डोक्यावर वही घेऊन चालणे , सुईत दोरा ओवणे , लिंबू चमचा शर्यत अशा प्रकारच्या खेळात सर्व महिलांनी सहभाग घेऊन प्रथम , द्वितीय , तृतीय क्रमांक प्राप्त केला. 

          लकी ड्रॉ हा या कार्यक्रमाचा आकर्षण बिंदू ठरला होता. उपस्थितीशिवाय बक्षिस मिळणार नव्हते. त्यामुळे सर्व महिला शेवटपर्यंत थांबून कार्यक्रम यशस्वी करत होत्या. शेवटी चिठ्ठी उचलून लकी विजेते जाहीर करण्यात आले. त्यावेळी ज्यांचा लकी नंबर येत होता , त्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद होता त्या कॅमेऱ्यात टिपणेही शक्य झाले नसते. महिला सचिव हेमांगी अणावकर यांना हिरकणी पुरस्काराने गौरविण्यात आले. त्याचप्रमाणे संपदा चव्हाण यांनाही हिरकणी पुरस्कार देण्यात आला. अल्पोपहार व आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची गोड सांगता झाली. कणकवलीत विविध ठिकाणी जंगी महिला दिनाचे आयोजन केलेले असूनही आमच्या मेळाव्याला पन्नासपेक्षा जास्त महिला उपस्थित होत्या ही आमच्यासाठी नेहमीच गर्वाने सांगण्यासारखी गोष्ट असणार आहे. सर्व महिलांनी आपल्यातील सुप्तगुण विकसित करण्यासाठी असे व्यासपीठ निर्माण केले ही आमच्या नाभिक संघटनेलाही मानाचा तुरा असल्यासारखे आहे. 

©️ प्रवीण अशितोष कुबलसर। ( 9881471684 )
























Sunday, February 27, 2022

🛑 कॅरम कन्या दिक्षा

          आपल्या मुलांमधील सुप्तगुण जोपासणे हे प्रत्येक पालकांचं कर्तव्य आहे. मुलं म्हणजे चैतन्याचा झरा असतात. तो सतत पाझरत ठेवणं हेही पालकांचंच काम. मुलगी म्हणजे बापासाठी धनाची पेटीच असते असे म्हटले जाते. हे स्त्री धन जपायला हवं. त्यांच्या सुप्तगुणांना वाव देत राहायला हवा. 

          भिरवंडे गावातील एक मुलगी कॅरम खेळाने आपले नाव राष्ट्रीय स्तरावर नेऊ शकते ही मुलीची ताकद  तिच्या पालकांना म्हणूनच अभिमानास्पद ठरु शकते. तिचे नाव दिक्षा असे आहे. कणकवली तालुक्यातील कनेडी विभागाचे नाभिक अध्यक्ष नंदकिशोर चव्हाण यांच्या मोठ्या मुलीने आपले आणि आपल्या नाभिक समाजाचे नाव सर्वदूर पोहोचवले आहे. ती आम्हां नाभिकांसाठीची अस्मिता आहे. " मूर्ती छोटी , पण किर्ती मोठी " असे तिचे भव्य दिव्य कार्य बघितले की आमचा प्रत्येकाचा उर अभिमानाने भरुन येतो. तिच्या माता पित्यांची साथ तिच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. ती स्वतः दहावीच्या वर्गात शिकत असतानाही कॅरम खेळ खेळते आहे. हल्लीच तिची वरिष्ठ राष्ट्रीय कॅरम स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली आहे ही आमच्या मानाच्या शिरपेचात अभिमानाचा तुरा खोवण्यासारखी गोष्ट आहे. 

          दिक्षा ही मुलगी अभ्यासातही हुशार आहे. तिने आपल्या खेळातील कौशल्य अधिकाधिक वाढवावे. खेळाबरोबर अभ्यासातही लौकिक मिळवावा. तिच्या प्रत्येक स्ट्राईकला पॉकेटमध्ये जाणारी सोंगटी पाहिली की थक्क व्हायला होते. तिच्या हातात स्ट्रायकर आला की तो तिचा गुलामच बनतो. तिच्या मनात येईल तसा तिचा स्ट्रायकर चालतो. खूप कमी वेळात ती खेळ पूर्ण करते. तिचे हे यश असेच वृद्धिंगत होत राहावे अशी शुभेच्छा. 

©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 )






Saturday, February 26, 2022

🛑 नाभिकांचे कल्याण

           काही माणसे कल्याण करण्यासाठी जन्माला येतात. नाभिक समाजाचे कल्याण करण्यासाठीही काही व्यक्तींचा जन्म झाला. अशा नाभिक जमातीचे सदैव कल्याण करण्याचा विचार करणारे आपल्या नाभिक समाजाचे राज्यपातळीवर कार्य करणाऱ्या नेत्याचे नावही कल्याण असावे हासुद्धा दुग्धशर्करा योगच म्हणायला हवा. शिवाजी महाराजांच्या काळात घोडदळ , पायदळ असे सैन्य असे. दळे आडनाव म्हणजे एक प्रकारचं आमच्या नाभिक समाजाच्या समस्या सोडवणारे दलच आहे असे म्हटले तरी वावगे ठरु नये. एव्हाना मी कोणाबद्दल बोलतोय हे वाचकांच्या लक्षात आले असेलच. हो बरोबर !!! मी आपल्या महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे अध्यक्ष मा. कल्याणराव दळे यांच्याबद्दल बोलतोय. 

          नुकतीच त्यांची इतर मागास व बहुजन समाज संघटनेच्या कार्याध्यक्ष पदी अभिनंदनीय निवड झाली आहे ही आमच्या नाभिक संघटनेसाठी अत्यंत अभिमानास्पद गोष्ट आहे. त्यांनी यापूर्वीही अनेक राजकीय आणि संघटनात्मक उच्चस्तरीय पदे उपभोगली आहेत. 

          दोन वर्षांपूर्वी कणकवली येथे झालेल्या सिंधुदुर्ग जिल्हा नाभिक संघटनेच्या वधु वर मेळाव्यासाठी मा. दळेसाहेब अध्यक्षस्थानी विराजमान झाले होते. तेव्हा त्यांची प्रत्यक्ष भेट घडली. त्यांनी केलेले अध्यक्षीय भाषण म्हणजे वक्तृत्वाचा एक उत्कृष्ट नमुना ठरावा. त्यांचे व्यक्तिमत्त्व आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला भुरळ पाडेल असेच आहे. त्यांनी मांडलेले मुद्दे व त्यांचे स्पष्टीकरण प्रत्येक वाक्याला टाळ्या घेणारेच होते. नाभिक समाजाचा समूळ विकास व्हावा यासाठी त्यांची तळमळ त्यांच्या भाषणात दिसून येत होती. त्यांनी आपल्या भाषणात नाभिक जमातीच्या अनेक विषयांना स्पर्श केला. 

          आता ते एका मोठ्या संघटनेचे कार्याध्यक्ष झाले आहेत. त्यांच्या मनात नाभिक समाजाबद्दल अनेक संकल्पना असतील , योजना असतील , त्या अंमलात येण्यावर त्यांचा नक्कीच भर असेल. ते एखादी गोष्ट करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करताना दिसतात. त्यांचे राज्यस्तरीय पुढारपण आमच्या तळागाळातील समाजासाठी दिलासा देणारे ठरणार यात तिळमात्र शंका बाळगण्याचे कारण नाही. 

          आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नाभिक बांधवांसाठी मा. कल्याणराव दळेसाहेबांच्या रुपाने एक धडाडीचा समाजनेता गवसला आहे. त्यांना उदंड आयुआरोग्य लाभो अशी मी सिंधुदुर्ग जिल्हा नाभिक संघटनेच्या वतीने प्रार्थना करतो. मा. दळेसाहेब , आप आगे बढो , हम सब आपके साथ हैं ।

©️ प्रवीण अशितोष कुबलसर  ( 9881471684 )






Sunday, January 30, 2022

🛑 नाभिक वारी : एक मांदियाळी

           गेल्या तीन ते चार वर्षांपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नाभिक बांधव वारकरी होऊन आंगणेवाडी भराडी देवीला नतमस्तक होत आहेत. पंढरपूरला जाणारे वारकरी जसा भक्तिभाव ठेवतात , तसा भक्तिभाव ठेवून समस्त नाभिक जन निर्मळ मनाने देवीला वंदन करतात. 

          दोन वर्षांपूर्वी मी स्वतः या नाभिक वारीत सामील झालो. कणकवलीतून सकाळी सहा वाजता भालचंद्र मंदिरात जाऊन गाऱ्हाणे घालून वातावरण भक्तिमय करुन वारीचा शुभारंभ केला. २० ते २५ नाभिक बांधव सुरुवातीला होते. पुढे पुढे त्याचे दुप्पट होत गेले. संपूर्ण चालत जायचे होते. 

          मी पहिल्यांदाच एवढे लांब चालण्याचे मनोमन ठरवले होते. भराडीदेवीसाठी मी लहानपणापासून अनेकदा दर्शनाला गेलो असेन. रांगेत दोन ते तीन तास पुढे सरकत सरकत जाण्यात देवीच्या दर्शनाची तीव्र ओढ लागत असे. कधी एकदा देवीचे मुखदर्शन होते असे होऊन जाई. दर्शन घेण्याची वेळ जवळ आली कि दर्शनासाठी कासावीस होणारा मी क्षणात पुढे ढकलला जाई. मागचे लोक दर्शनासाठी आतुर झालेले असत. ती देवीची सजवलेली मनमोहक मूर्ती डोळ्यांत साठवून ठेवत आठवत राहताना दोन्ही हात जोडून काही सेकंदात नमस्कार पूर्ण होई.

          साष्टांग नमस्कार घालता येत नसे. मग बाहेर येऊन मंदिराच्या भिंतींना किंवा खांबांना घट्ट मिठी मारुन राहण्यात आनंद वाटे. खांबांना आलिंगन देताना देवीच्या पदस्पर्शाचा अनुभव केल्यासारखे वाटे. 

          बाहेरील भक्तगणांनी केलेली गर्दी पाहून देवीबद्दलची भक्ती अधिक वाढत जाई. सर्वजण काहीतरी मागणे किंवा गाऱ्हाणे घेऊन आलेले असत. कोणाला मुलगा हवा असे , कोणाला नोकरी हवी असे , कोणाला नोकरीवाली बायको हवी असे. काही लोक नवस करायला येत , काही नवस फेडायला येत. आपली तुला करुन त्या वजनाचा शिधा किंवा वस्तू देवीला वाहताना पाहून मलाही तसे करावेसे वाटे. मीही एकदा मनोमन नवस केला होता. मी माझ्या लग्नानंतर बायकोला घेऊन देवीचे दर्शन घेतले होते. नवसाला पावणारी भराडीदेवी आमची माताच जणू. तिच्याकडे आम्ही चांगलं बाळ व्हावं म्हणून मनातून नवस केला होता. सुंदर मुलगी जन्माला आल्यानंतर तिला देवीच्या चरणांवर ठेवले होते. देवीने आम्हाला इष्ट प्रसाद दिला होता. 

          त्यानंतर पुन्हा प्रत्येकवेळी मी आणि माझी पत्नी मुलीसह मंदिरात दर्शनासाठी जात राहिलो होतो. दोन हजार पाच साली माझ्या पत्नीने मुलगा व्हावा म्हणून मनस्वी नवस केला होता. मुलगा झाला होता , पण तो पोटातच गेल्यामुळे नवस फेडता आला नाही. तिने केलेला नवस फेडण्यासाठी तीही नव्हतीच. तिही देवाघरी किंवा देवीघरी निघून गेली ती कायमचीच. 

          त्यानंतर काही वर्षे मी आंगणेवाडीला गेलो नाही. पण पुन्हा माझी वारी सुरु झाली. वारी म्हणजे काय ? तर आपण दरवर्षी एखाद्या देवस्थानाला जातो , त्याला वारी असे म्हणतात. वारीला जाताना आपल्यासोबत अनेक बांधव असतात. त्यांच्याशी बोलत बोलत चालत किंवा गाडीने जाताना आपण भक्तिरसात ओथंबून जातो. देवीला नमस्कार करण्याचा वेळ काही क्षणांचाच असतो. पण त्या अभूतपूर्व क्षणसाठीच आपली वारी असते.

          थोडे स्वार्थी भावनेने आपण गेलेले असतो. काहीतरी मागण्यासाठी जातो म्हणजे स्वार्थीच नव्हे का ? आता मला जर काही मागायचे असले तर मी स्वतःसाठी काहीही मागत नाही. मी माझ्या बांधवांसाठी दीर्घायुष्य लाभावं आणि त्यांनी दरवर्षी देवीच्या वारीला आनंदानं सामील व्हावं अशीच प्रार्थना करतो. 

          माझ्या एका मामेभावाने या वारीला का जायचे असते याबद्दल छान सांगितले. तो म्हणाला , ' आपण दरवर्षी देवीसाठी एक दिवस तरी आपल्या शरीराची थोडीतरी झीज केली पाहिजे. खरंतर आपण देवीच्या दर्शनासाठी जातोय , पण त्या निमित्ताने आपण आपल्या शरीराचा व्यायामही घडवून आणतो. चालणे हा एक सर्वोत्तम व्यायाम प्रकार आहे.  चालत वारीला जाणे ही पद्धत म्हणूनच पूर्वापार चालत आलेली असावी. " माझ्या चालत चालत जाण्याने माझे पाय इतके दुखू लागले कि मला चालता येईना. अचानक तीस पस्तीस किलोमीटर चालल्यामुळे पायांवर ताण आला होता. पायांवर ताण आला तरी माझ्या मनावर अजिबात ताण आला नव्हता. मी मग दोन तीन किलोमीटर कोणाच्या तरी गाडीने गेलो. पुन्हा पुढे दोन तीन किलोमीटर जायचे शिल्लक होते. मी गाडीतून उतरुन चालण्याचा निर्णय घेतला होता. शेवटी नाभिक वारी पूर्ण केली तेव्हाच थांबलो होतो. येताना गाडीने आलो. त्यानंतर दोन दिवस अजिबात चालता येत नव्हते. पाय जमिनीला टेकवून उभेही राहता येत नव्हते. पण चालत वारीला गेल्याचा आनंद अपार होता. 

          आता दरवर्षी वारीचा संकल्प होतो. आम्ही नाभिक बांधव एकत्र येत राहतो. सर्व नाभिकांचे त्यानिमित्ताने मनोमिलन घडते. आपुलकी वाढते. ओळखीचे मैत्रीत रूपांतर होते. समाजातील आपल्या ज्ञातीबांधवांच्या गाठीभेटी होतात. नाभिकभक्तांचं दर्शन घडत राहतं. एकत्रित संवाद घडतो. हा हृदय संवाद घडण्यासाठीच या वारीची योजना केली असावी असेही वाटत राहते. पुढील वारी कधी येईल याची वाट पाहताना ती उद्या आली आहे हे लक्षात येताच वारीसाठी मन वाऱ्यासारखं उधाणतं , तसं माझं आता झालं आहे. 

©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 )


🔴 ब्रह्मचैतन्य आणि पूर्णब्रह्म

🔴 ब्रह्मचैतन्य आणि पूर्णब्रह्म           "आपल्यामध्ये धर्म आचरणाचा गुण असायला हवा," असे माझी आजी नेहमी सांगायची. ती केवळ सांगायची...