🛑 जिल्हा सचिव सुधीरसाहेब
सिंधुदुर्ग जिल्हा नाभिक संघटना गेली कित्येक वर्षे जोमाने कार्य करत आहे. त्यासाठी जी जिल्हा कार्यकारिणी आहे , त्यांची जाणीव जागृती आणि ज्ञाती बांधवांबद्दल असलेली आपुलकी अत्यंत महत्त्वाची आहे. त्यात जिल्हाध्यक्ष अनिल अणावकर साहेब यांचे कार्य अद्वितीय असेच आहे. त्यांना साथ देणारी त्यांची कार्यरत कार्यकारिणी त्यांच्या कायमच सोबत राहिलेली आहे.
कुडाळ पिंगुळीचे मूळ वालावलचे आमचे सचिव सुधीर चव्हाण यांचे कार्य त्यात लक्षात घेण्यासारखे आहे. ज्या ज्या वेळी जिल्ह्याचे उपक्रम असतात , त्या त्या वेळी त्यात हिरीरीने सहभाग घेणारे व कार्यक्रमांची अंमलबजावणी करणारे सुधीर चव्हाण कायमच अग्रस्थानी असलेले दिसून येतात.
हल्लीच त्यांच्या आईचे निधन झाले तेव्हा त्यांच्यावर मोठे संकट कोसळले होते. ते पुरते कोलमडून गेलेले दिसले. त्यांना उठताही येत नव्हते. त्यांना पाहून आम्हाला आमच्या आईची आठवण आली. खरंच आई गेल्यानंतर काय अवस्था होते , याची आम्हालाही कल्पना होती. पण सुधीरजी खूपच हळवे आहेत. त्यांना दोन मुली आहेत. त्यासुद्धा खूप हुशार आहेत.
वधु वर मेळाव्याच्या आयोजनात सुधीर साहेबांनी महत्त्वाची भूमिका बजावलेली दिसली. कोणी कोणाचे स्वागत करायचे हे त्यांनी सर्व नियोजनबद्ध करून माझ्याकडे दिले होते. सचिव कसा असावा याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे सुधीरजी आहेत. सूत्रसंचालन करतानाही मला त्यांनी अनेक ठिकाणी महत्त्वाच्या टिप्स दिल्या होत्या. सर्वसामान्यांसारखे सलून दुकानात काम करता करता असे काम करणे कठीण असते. पण त्यांना त्याचे काही वाटत नाही. त्यांची सेवाभावी वृत्ती असल्याने ते संघटनेचे कार्य आनंदाने न थकता करताना दिसतात.
जिल्ह्याचे सर्व कागद काळजीपूर्वक जपून ठेवणे , हिशोब ठेवणे ही सर्व कामे ते करताना बघून आम्हाला त्यांच्याकडूनही काही शिकायला मिळते. त्यांचा आर्थिक कारभार अगदी पारदर्शक असतो.
नुकताच त्यांना पडवे हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला. ते दवाखान्यात असताना त्यांना मी सपत्नीक भेटायला गेलो होतो. त्यांची तब्येत बरी नव्हती. त्यांना नीट बोलताही येत नव्हते. त्यांचा बोलताना धाप लागत होती. त्यांना पित्ताशयाचा त्रास होत होता. त्यावर शस्त्रक्रिया करुन आता त्यांची तब्येत साधारण बरी आहे. तरीही त्यांना आता भविष्यात अधिक काळजी घ्यावी लागणार आहे. त्यांना डॉक्टरांनी काळजी घ्यायला सूचना दिल्या आहेत. या सर्व सूचनांचे ते काटेकोर पालन करतीलच. आता ते काही काळ दुकानात जाऊन काम करु लागले आहेत.
सुधीर साहेबांचा हा त्रास लवकरच पूर्णपणे बरा होवो अशी आम्ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आज त्यांचा वाढदिवस आहे, त्यांना त्यांच्या प्रकट दिनाच्या कोटी कोटी शुभेच्छा. आमचे जिल्हा सरचिटणीस म्हणून कार्य करण्यासाठी व पुढील यशस्वी वाटचालीसाठी त्यांना कणकवली तालुका नाभिक संघटनेच्या वतीने हार्दिक शुभेच्छा.
©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 )
No comments:
Post a Comment