🛑 वेताळ गेलो चोरीक
चांदोबा हे आमचे सर्वांचे लाडके मासिक. कणकवली नगर वाचनालय येथे बालवाचक म्हणून नोंदणी केल्यानंतर दर दोन दिवसांनी नवनवीन पुस्तके वाचायला मिळत. चांदोबा , कुमार , किशोर , ठकठक , लोटपोट अशी अनेक बालवाङमये आम्ही वाचत असू. चांदोबातील ' विक्रम वेताळाच्या गोष्टी ' क्रमशः असत. त्यामुळे पुढच्या अंकाची वाट पाहण्याशिवाय पर्याय नसे. त्या गोष्टीतील वेताळ विक्रमाला प्रत्येक कथेत प्रश्न विचारत असे. विक्रमाच्या पाठीवर लोंबणारा वेताळ त्याकाळी आमच्या स्वप्नातही यायचा. घाबरत उठून आम्ही भावंडे आईबाबांच्या कुशीत सामावत असू.
त्यानंतर पाचवी ते सातवीच्या दरम्यानच्या काळात महेश काणेकर नावाचे बालकादंबरीकार आम्हाला एक बालनाट्य शिकवायला येत. त्याचे नावच होते , " वेताळ गेलो चोरीक ". ते स्वतः त्याचे लेखक आणि दिग्दर्शक दोन्ही होते. त्यांनी लहानांसाठी अनेक पुस्तके लिहिली आहेत. ते चित्रकारिता करीत. ते पोर्ट्रेट काढत असताना मी अनेकदा थक्क होऊन पाहत बसत असे. उंच , कुरळे केस असलेले महेश काणेकर उत्तम गायक असल्याने त्यांची श्रवणीय गाणी ऐकून मलाही तसं गाण्याची सवय लागली असावी. त्यांच्या या नाटकाची स्टोरी आता अजिबात आठवत नाही. त्यात माझी भूमिका कोणती होती तेही आठवत नाही. रिहर्सलच्या वेळी भालचंद्र मठाच्या रंगमंचावर आम्ही बसत असू. तिथे एक भले मोठे पिंपळाचे झाड होते. त्याची सावली आम्हाला सोबत करी.
वाचता वाचता ' कॉमिक्स ' ची पुस्तकेही वाचत गेलो. त्यात वेताळ असे , स्पायडरमॅन असे. गोष्टी चित्ररुप असत. त्यामुळे ही पुस्तके पुन्हा पुन्हा वाचूनही कधीच कंटाळा आला नाही. त्यातील वेताळ वेगळाच असे. त्याच्या अंगावर कायम बुरखा असे. त्याचा बुरखा काढलेला चेहरा कधीच पाहता आला नाही.
अभ्यासामुळे काहीच दिवसांत त्यांचे वाचन मागे पडले. वाचण्याची आवड वाढल्यामुळे कणकवली कामगार केंद्रातील पुस्तके वाचायला जाऊ लागलो. अभ्यास जास्त आवडू लागल्याने किंवा स्कॉलरशिप परीक्षेला बसल्यामुळे अभ्यास करण्याचे माझे तास वाढत गेले.
' वेताळ गेलो चोरीक ' या बालनाट्याचे कथानक आठवत नसले तरी माझ्या वाचनातील ' वेताळ ' केव्हाच चोरीला गेला होता.
©️ प्रवीण अशितोष कुबलसर
( 9881471684 )

विक्रम वेताळ तसा विसरणं शक्यच नाहीए, तरी आपल्या लेख वाचनातून तो पुन्हा समोर उभा ठाकल्यासारखे वाटते🙂👌👌
ReplyDeleteमस्त कथा
ReplyDeleteNice
ReplyDeleteThanks
ReplyDelete