Showing posts with label माझ्या मुली - माझे प्राण. Show all posts
Showing posts with label माझ्या मुली - माझे प्राण. Show all posts

Tuesday, September 27, 2022

🛑 नृत्यानंदी : स्वानंदी

🛑 नृत्यानंदी : स्वानंदी

          गेले दोन दिवस वेशभूषेची तयारी सुरु होती. कणकवली शिवसेना नवरात्रोत्सव जिल्हास्तरीय रेकॉर्डडान्स स्पर्धेत छोट्या उर्मीने सहभाग घेतला होता. 

          आज तो दिवस उजाडला होता. संध्याकाळी कार्यक्रमस्थळी वेळेत पोहोचलो होतो. नृत्याची आवड असणारी मंडळी आमच्या आधीच येऊन विराजमान झाली होती. संगीत मैफिलीचे शौकिन वेगळे असतात , तसे नृत्याची आवड असणारे शौकिन आगळेवेगळे असतात. येथे आलेले प्रेक्षक संमिश्र होते. आपल्या पाल्यांना घेऊन आलेले पालक यांत जास्त होते. आमच्याच घरातून आम्ही सहाजण गेलो होतो. गर्दी बघून कार्यक्रमाची लवकर सुरुवात करण्यात आली. 

          माझी छोटी मुलगी स्वानंदी उर्फ उर्मीने देवीला मनोभावे नमस्कार केला होता. देवीची हसतमुख मूर्ती बघून ती भारावून गेलेली दिसली होती. ती आपलं देहभान विसरुन गेली होती. सूत्रसंचालकांचा आवाज कानात घुमू लागला होता. डिजेच्या एको साऊंडमुळे मी थोडा लांब बसण्याचा प्रयत्न करत होतो. शेवटी मध्यवर्ती ठिकाणी बसलो. कार्यक्रम सुरु झाला होता. 

          ' आई तुझं देऊल ' या नृत्याने कार्यक्रमाची बहारदार सुरुवात झाली होती. लोक टाळ्यांचा गजर करत होतेच. एक एक कार्यक्रम पुढे सरकत होता. उर्मी कधी आईकडे तर कधी माझ्याकडे येऊन बसत होती. तिचं सादरीकरण व्हायला अर्ध्या पाऊण तासांचा अवकाश होता. ती दोन दोन मिनिटांनी " पप्पा , माझा डान्स कधी आहे ? " असे विचारत होती. मी तिला " आता येईल हं तुझा नंबर " असं सांगत होतो. 

          समोरचे देधडक परफॉर्मन्स पाहून आम्हांला धडकी भरत होती. धडकी अशासाठी की ' माझी मुलगी डान्स करेल ना नीट ' ही भिती उफाळून येत होती. उर्मी मात्र अजिबात घाबरलेली दिसत नव्हती. स्टेजवर जाणं तिच्यासाठी तसं नवीन नव्हतं. भाग न घेताही तिने यापूर्वी ' ऑन द स्पॉट '  परफॉर्मन्स दिले होते.  डान्स तिच्या अंगाअंगात भिनला आहे. यु ट्युब वर बघेल तसं ती स्वतः नाचण्याचा प्रयत्न करते. तिला कोरिओग्राफर लागत नाही , ती स्वतःच स्वतःची कोरिओग्राफर आहे. तिच्या परफॉर्मन्स पूर्वी ' चंद्रमुखी ' चित्रपटातील ' चंद्रा ' या गाण्यावर तीन ते चार परफॉर्मन्स तिला पाहायला मिळाले होते. तिचं निरीक्षण जबरदस्त आहे. तिने आजही बारकाईने निरीक्षण केले होते. 

          तिचं नाव पुकारलं गेलं होतं. ती धावतच स्टेजवर गेली होती. दर्शकांकडे पाठ करुन उभी असलेली पाच सहा वर्षांची चिमुरडी पाहून सर्वच स्तब्ध झाले होते. ही चिमुरडी काय करणार परफॉर्मन्स ? किंवा बघुया तरी या चिमुरडीचा परफॉर्मन्स ? असे प्रत्येकाला वाटत असावे. 

          आणि ढोलकीचा आवाज स्पिकर मधून येऊ लागला होता. उर्मीचे पाय तालात थिरकायला सुरुवात झाली होती. तिने अजून आपला चेहरा दाखवला नव्हता. तिने तोंडावर पदर धरला होता. ती कधी एकदा पदर दूर करते असे प्रत्येक दर्शकाला झाले असेल. अखेर तिने पदर दूर केला आणि दर्शकांनी अधिक शांत होत जणू तिचे स्वागतच केले होते. कारण ते टाळ्या वाजवायला विसरले होते. 

          उर्मी स्वानंदात नाचत होती. सुरुवातीलाच तिचा केसांचा भला मोठा अंबाडा सुटून पडला होता. तरीही नाचताना तिने त्याकडे दुर्लक्ष केले होते. प्रॅक्टिस करताना ज्या स्टेप्स तिने केल्या नव्हत्या , त्या स्टेप्स तिने आकस्मिकपणे केल्या होत्या. लावणी नृत्याला साजेसा अभिनय तिने साकार केला होता.

          गाणे संपेपर्यंत तिचा अप्रतिम परफॉर्मन्स लोक डोळे भरुन पाहात होते. ती खुशीतच स्टेजवरुन खाली उतरत होती. उतरल्यावर ती मला भेटण्यासाठी धावतच येत होती आणि अरेरे ... ती पडली होती. न रडता तशीच ती आपलं बक्षीस घ्यायला पुन्हा धावली होती. आयोजकांनी सर्वांनाच मानधन दिले होते ही विशेष बाब होती. 

          परिक्षकांच्या टेबलापासून जवळच आम्ही बसलो होतो. एका परीक्षकांनी कौतुकाने तिला बोलावून घेतले होते. तिचे वैयक्तिक कौतुक केलेले तिलाही विशेष आवडले होते. लहान गटात खुप चांगले परफॉर्मन्स झाले होते. सगळे परफॉर्मन्स आम्ही बघायला थांबलो नाही. उर्मीला अनेकांनी वैयक्तिक बक्षिसे दिली होती. 

          मी तिला घरी घेऊन येत होतो. तिला आईस्क्रीम खूप आवडतं. तिने आपल्या आवडीचं मँगो डॉली खाल्लं. तिला मिळालेलं ते खरंखुरं बक्षीस असावं. आईस्क्रीमवाले नारायण अंधारी काका तिला ' सैतान ' म्हणतात. अर्थात ते गमतीने म्हणतात. त्यांनी तिचा डान्सचा व्हिडीओ पूर्ण पाहिला होता. त्यांनाही कमाल वाटली. त्यांना वाटले तिला हा डान्स कोणीतरी शिकवलेला असेल. पण कोणतीही विशेष मेहनत न घेता तिने केलेला तो नृत्याभिनय लक्षात राहण्यासारखा होता. 

          तिला उत्तेजनार्थ बक्षीस मिळाल्याचे आताच समजले आणि तिच्या अंगीभूत गुणांचा मला सार्थ अभिमान वाटला. अभिनंदन उमा.

©️ प्रवीण अशितोष कुबलसर  ( 9881471684 )



Saturday, June 4, 2022

🛑 उर्मीची ' चंद्रा '

 🛑 उर्मीची ' चंद्रा '

          काहीतरी कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण एखादया ठिकाणी जातो. जाताना कुटुंबातील व्यक्ती सोबत असतात. ते एखादे ठिकाण माहेर असले तर बायकोला जो आनंद होतो तो शब्दांत व्यक्त करणे अवघड आहे. त्या दिवसांत तिच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहताना दिसतो. त्यांना एखादी रात्र राहायला मिळाले तरी चालते. पण मुक्काम हवाच असतो. बाहेर पडताना नवऱ्यावरचे त्यांचे प्रेम उतू जाते हे मी अनुभवलेले आहे म्हणून सांगू शकतो. इतरांचा अनुभव असाच असेल याची मी खात्री कशी देऊ ? प्रत्येकाचा अनुभव जर असाच असेल तर मात्र ते माझ्या मताशी नक्कीच सहमत होतील. 

          माझ्या सासरी पडळी राधानगरीला कालिकादेवीचे एक सुंदर मंदिर बांधले आहे. आम्ही गेलो कि तिचे दर्शन घेतो. यावर्षी कालिका मंदिरात वर्धापन दिन महोत्सव संपन्न होणार होता. हिला तिकडे जायचे मनात होते. हिला म्हणजे बायकोला. तिने माझ्याशी प्रेमाने बोलायला सुरुवात केली होती. मी अवाक झालो होतो. आज काहीतरी मागणी असावी असा मला प्रश्न पडला होता. ती म्हणाली , " कारभारी , रागावणार नसाल तर सांगते , एक सांगू काय ? " मी म्हटले , " एक सांग , दोन सांग , काय ते सांग , आता सांगणारच आहेस तर मला ऐकण्याशिवाय पर्यायच नाही. " ती पुढे म्हणालीच , " अहो , मी काय म्हणते , आमच्या तिकडे मंदिरात उत्सव साजरा होणार आहे , आपण जाऊया ना !!! " ती एवढी काकुळतीला आली होती की मला होकार द्यावाच लागला. तिकडे जाईपर्यंत तिचे अपार प्रेम वाढत चाललेले दिसत होते. मी मनातल्या मनात हसत होतो. तिला माझे हसणे समजत असले तरी तिने तिकडे दुर्लक्ष केले होते. ती खूप खुश होती. ती दररोज अशीच खुशीत राहावी असे मला वाटत होते. पण ही खुशी फार काळ टिकली नाही तर त्रास होतो. 

          नुकताच आम्ही कुटुंबासह ' चंद्रमुखी ' हा मराठी चित्रपट पाहिला होता. त्यातील लावणी नृत्ये माझ्या लहानग्या ' उर्मी ' ला अतिशय आवडली होती. घरी येऊन तिने तसेच नृत्य करण्याचा स्वतःहून सराव करत राहिली होती. पाच सहा वर्षांची मुलगी नाचून काय नाचणार असे कोणालाही वाटू शकते. पण उर्मी याला अपवाद होती. तिने दोनच दिवसांत ते गाणे नाचून , गाऊन पाठ करुन टाकले. तिला नाचाची आवड असल्यामुळे आम्ही तिची ही उर्मी थांबवू शकणार नव्हतो. नृत्य दिग्दर्शकाच्या मार्गदर्शनाशिवाय तिने नृत्यात केलेली प्रगती उल्लेखनीय अशीच होती.

          बायकोने बॅगा भरल्या. आम्ही राधानगरीला निघालो. सोबत मेहुणा आणि त्याची पत्नी होती. प्रवास सुखाचा झाला. सासू सासऱ्यांनी जावयांचे स्वागत केले. बायको खुश होती. तिला खूपच बरे वाटत होते. एवढा प्रवास करुनही ती दमली नव्हती. तिथे गेल्यानंतर तिने भराभर जेवणाची तयारी केली. जेवल्यानंतर कालिकादेवीच्या मंदिरात कार्यक्रम बघायला जायचे होते. 

          कार्यक्रमांना सुरुवात झाली. वाडीतील सर्व कलाकारांनी आधीच आपली सादरीकरणे आयोजकांकडे दिली होती. स्टेजवरील कार्यक्रम पाहून छोट्या ' उर्मी ' ला नाचावेसे वाटले नसेल तरच नवल !! तिने आपल्या मामाला सांगून आपला डान्स सांगितला. रात्रीचे साडे बारा होत आले होते. उर्मीला झोप अनावर झाली होती. आता ती झोपणार म्हणून माझ्या बायकोनेच तिच्या ओळखीने उर्मीचा लवकर नंबर लावला होता. ' स्वानंदी प्रवीण कुबल ' असे नाव मोठ्यांदा पुकारले गेले. उर्मीची आता झोप उडून गेली होती. तिच्या अंगात ' चंद्रा ' संचारली होती. ती धावतच स्टेजवर गेली होती. गाणे सुरु झाले होते. वाद्याच्या तालावर पदविन्यास दाखवत तिने नाचायला सुरुवात केली आणि सर्वांचे डोळे तिच्यावर खिळले होते. ओठांचा अभिनय जसाच्या तसा करत असल्यामुळे जणू तीच गाणं म्हणून नाचत आहे असा भास होत होता. तिने फ्रॉक घातला होता. पदर म्हणून ओढणी घेतली होती. साडी परिधान केली नसली तरी डोक्यावरच्या ओढणीने पदराचे काम केले होते. ओढणीला तिने असे काही बाजूला करत जी अदाकारी दाखवली होती , तिला टाळ्यांचा आणि शिट्यांचा कडकडाट झाला होता. 

          कार्यक्रम झाल्यानंतर कित्येकांनी दुसऱ्या दिवसापर्यंत तिचे अभिनंदन करणे सुरुच ठेवले होते. कोणीतरी तिला सांगितले की तुझा नंबर आला आहे , तुला ट्रॉफी मिळणार आहे. दुसऱ्या दिवशी ट्रॉफी मिळणार या एकाच आशेने ती रात्रीच्या सन्मान सोहळ्याला गेली होती. सगळ्यांचे सन्मान झाले होते. आपले नाव आता येईल , मग येईल असे म्हणत असताना ती माझ्या मांडीवर गाढ झोपेच्या अधीन झाली होती. तिला खूप उशिरा जाग आली होती. तिने झोपेतच मला विचारले होते , " पप्पा , माझी ट्रॉफी मिळाली काय ? " मी तिला एवढेच बोललो , " तुझी ट्रॉफी त्यांच्याकडून हरवली आहे , ती सापडली की नक्की मिळेल. " उर्मी तरीही खुश झाली. ती मला म्हणाली , " पप्पा , माझीच ट्रॉफी यांनी हरवली कशी ? " मी आपला मनातल्या मनात हसत तिला थोपटवत गाढ झोपवलं. मी आपला तिच्या मम्मीच्या आणि माझ्या मुलींच्या चेहऱ्यावर असा स्वानंद सतत येत राहावा हे माझे जागेपणीच स्वप्न शांतपणे बघत राहिलो होतो.

©️ प्रवीण अशितोष कुबलसर

( 9881471684 ) कणकवली



Monday, March 21, 2022

🛑 स्वानंदी : एक जगण्याची उर्मी

🛑 स्वानंदी : एक जगण्याची उर्मी

          जगण्यासाठी प्रत्येकाला एक उर्मी लागते. उर्मीशिवाय तुम्ही जगू शकत नाही. तुमचा आनंद सतत वाढवत राहणारी ही उर्मी जगण्यासाठी अत्यावश्यक असते. तुमचा स्वतःमधला आनंद म्हणजेच स्वानंद होय. हा स्वानंद मिळाला की तुमच्या जगण्याची उर्मी वाढलीच म्हणून समजा. 

          माझ्याही जीवनात ही उर्मी आली.  या उर्मीने स्वानंदीपणाचे रुप घेतले. ही स्वानंदी सर्वांचीच जगण्याची उर्मी वाढवत निघाली आहे. 

          तो २२ मार्चचा दिवस होता. डॉक्टरांनी सिझर करायला हिच तारीख ठरवली होती. याच दिवशी तिचा सिझेरियनने जन्म होणार होता. डॉक्टरांपुढे आम्ही सर्वांनी आधीच माथे टेकले होते. तिचा रडण्याचा आवाज ऐकू आला. तिचे रडणे आम्हालाही रडू येण्यासारखेच होते. मुलगी झाली म्हणून जास्त रडू होते ते. 

          पहिल्या दोन मुली असताना तिसरीचे स्वागत हसत होणे कठीणच होते. पण पत्नीची मोठ्या दिव्यातून सुटका झाली याचा मात्र आनंद मी लपवू शकत नव्हतो. मुलगी झाली म्हणून दुःखाची एक पुसटशी छटा सर्वांच्याच चेहऱ्यावर आलेली दिसत होती. 

          डॉक्टरांनी मला ऑपरेशन थिएटरमध्ये बोलावले होते. मी माझ्या पत्नीला भेटलो होतो. मुलगी झाल्याचा तिलाही आनंद झालाच नव्हता. तिलाही मुलगा होण्याची अपेक्षा असावी. 

          मुलगी झाली तर ती कोणालाही तरी देऊन टाकावी इतका वाईट विचार त्यावेळी माझ्या मनात आला होता. तो वाईट विचार मी माझ्या पत्नीला बोलूनही दाखवला होता. तिला नऊ महिने उदरात जिवापाड सांभाळलेल्या बाळाबद्दल असे बोललेले रुचले नव्हते. पण ती गप्प राहिली होती. 

          हळूहळू ही तिसरी मुलगी मोठी मोठी होत गेली. तिचे नाव आम्ही स्वानंदी ठेवले. घरात म्हणायला साधे सोपे दोन अक्षरी नाव ठेवले , ' उर्मी ' . ही उर्मी जसजशी मोठी होत गेली तसतशी सगळ्यांच्या गळ्यातला ताईत होत गेली. तिचे बोबडे बोल सुखावणारेच. तुमचे कोणतेही दुःख विसरायला लावणारे. 

          आज तिला सहा वर्षे पूर्ण होत आहेत. तिने सगळ्यांना वेड लावले आहे. ती आमच्या घरातील सर्वात बडबडी मुलगी असेल. ती कोणाचीही ओळखीची होऊन जाते. एकदा ओळख झाली की समोरच्या अपरिचित व्यक्तीलाही तिचा कमालीचा लळा लागेल अशीच ती आहे. अशा या माझ्या मुलीला ' ती आम्हाला नको होती ' हे समजते आणि स्वतः सर्वांना सांगत सुटते. " पप्पांना मी नको होते , ते मला कचरा पेटीत टाकणार होते किंवा पिंकी आत्येला देऊन टाकणार होते. " 

          मुलगी झाली की ती सर्वानाच का नकोशी होते ? आमच्या शेजारी एका दांपत्याला सगळ्या मुळीच झाल्या होत्या. त्यातील एका मुलीचे नावच त्यांनी ' नकोशी ' असे ठेवले होते. आमच्यासारखी शिकलेली माणसं जर असा विचार करत असतील तर अशिक्षित लोकांचं काय ? त्यांच्याबद्दल न बोलणेच बरे. 

          आज आमची उर्मी सर्वांनाच हवीहवीशी वाटते. तिचं बोलणं हृदयाचा ठाव घेणारं असतं. तिचं निरागस बालप्रेम डोळ्यांत टचकन पाणीच आणतं. ती दररोज रात्री माझे पाय चेपते. तिच्या चिमुकल्या हातात पाय चेपण्याइतकी ताकद कुठे आहे ? पण तिने पाय चेपायला सुरुवात केली की पाय दुखायचे थांबतात हे मात्र नक्की. तिच्या अनेक अपेक्षा असतात. ती माझ्याजवळ हळूच येऊन सांगते. मी काही तितकासा मनावर घेत नाही. पण काही वेळाने मीही विरघळून जातो. तिचा राग आला कि तिच्यावर डोळे वटारले जातात. कधी कधी हातही उगारला जातो. पण आमची उर्मी ते पाचच मिनिटांत विसरुन जाते. मला हवी असलेली गोष्ट खायला आणून देते. मला घ्यायला सांगते. पप्पांनी मारले तरी तिला पप्पाच हवे असतात. मग ती म्हणून दाखवले , " पप्पा , तुम्ही माझे पप्पा आहात ना , मग मला कधीतरी मारलं तर काय होतं ? मारा तुम्ही , पण तुम्ही माझे लाडके आहात. मी तुमची जगातील सगळ्यात सुंदर मुलगी आहे ना ? "...... या तिच्या वाक्यांनी कोणीही निशब्द होईल यात शंका नाही. 

          तिला मोबाईलचे खूप वेड आहे. त्यातील यु ट्युब हा तिचा अतिशय जवळचा मित्रच. त्यातल्या अनेक गोष्टी , गाणी , हिंदी भाषा तिला तोंडपाठ झाल्या आहेत. ती खेळताना जास्त हिंदीच बोलते. ती अजून शाळेत गेलेली नाही. यंदा ती पहिलीत जाईल. 

          घरात त्रास देते म्हणून तिला एका बालवर्गात घातले होते. ती पहिला दिवस रमली. दुसऱ्या दिवशी तिला वर्गात करमेना. तिने बाईंना सांगितले , " मॅडम , मला पप्पांची आठवण येते आहे , त्यांना फोन करा. " मॅडमनी फोन केल्याचे नाटक केले हेही तिला समजले. तिला खोटे अजिबात आवडत नाही. मी शाळा सुटण्याच्या वेळी तिला आणायला गेलो होतो. ती माझीच वाट बघत बसली होती. मला बघताच तिचा बांध फुटला होता. ती वर्ग सोडूनच माझ्या दिशेने रडत रडत इतक्या वेगाने धावत आली होती. मीही मग धावत जाऊन तिला उचलून घेतले होते. ती तेव्हाच रडायची थांबली. मग येताना तिची न संपणारी बडबड सुरुच होती. 

          तिचा तिच्या मोठ्या दोन्ही बहिणींवर भारीच जीव आहे. काही क्षणांसाठी भांडतील आणि लगेच गळाभेटही घेतील. त्यांचे हे असेच चिरायु राहो. 

          प्रत्येकाच्या घरी अशी एखादी उर्मी जन्माला यायला हवी. मग तुमचं एकूण जीवनच बदलून जाईल. माझं जीवन तिन्ही मुलींसाठी आहे. त्याच माझं जीवन आहेत. त्या वेगवेगळ्या तिघी असल्या तरी माझ्यासाठी जगण्याच्या उर्मीच आहेत. आमचं स्वानंदी जगणं म्हणूनच उर्मीमय होत गेलं आहे. 

©️ प्रवीण अशितोष कुबलसर

( 9881471684 )



Tuesday, January 18, 2022

रिटर्न गिफ्ट

 🛑 रिटर्न गिफ्ट


          अमिताभ बच्चन यांचा मी पूर्वीपासून फॅन आहे. त्यांचे अनेक पिक्चर्स मी पाहिलेत. कितीही वेळा पाहिले तरी ते पुन्हा पुन्हा पाहावेसे वाटतात. माझं लग्न होण्यापूर्वी मी अमिताभ यांचा ' अभिमान ' हा पिक्चर पाहिला होता. त्यावेळी जया भादुरी त्यांची नायिका झाली होती. खरंच किती निरागस अभिनय होता त्या दोघांचाही ! त्या चित्रपटातील गाणी अजूनही ऐकताना पूर्वीच्या क्षणांची आठवण येते. 

          आजही तसेच झाले. जेवता जेवता एखादे सुमधुर गाणे लावले होते. ते एखादे गाणे अभिमान मधलेच असावे आणि त्या गाण्यांच्या ओळींबरोबर थेट मागील सर्व जीवनपट डोळ्यांसमोर येऊन नाचत राहावा हे मला गाणे लावताना अजिबातच वाटले नव्हते. 

          आपलं लग्न व्हावं , पत्नीनं आपल्यावर जिवापाड प्रेम करावं , ते प्रेम वाढत असताना अचानक आपल्या मुलाची चाहूल लागावी अशी दिवास्वप्नं बघता बघता खरीही होतील असं वाटलंही नव्हतं. त्यावेळी मी अनेकदा चिमटा काढून बघितला आहे. अरे हे तर खरंच घडतंय , असे समजल्यानंतर गालातल्या गालात हसलोही आहे. 

          आज अगदी तेच गाणं लागलं होतं. जेवताना घास पटापट चावले जात होते. जिच्यावर जिवापाड प्रेम केलं होतं , तिच्या आठवणींची सनक येऊन डोळ्यातून पाणी यायला बघत होते. पण मी ते आवरले. आता ती जाऊन १५ वर्षं होतील , पण तरीही तिची आठवण येते आणि मी कासावीस होतो. तिने जाताना माझ्याकडे ४ वर्षांची मुलगी सुपूर्द करुन गेली. ती आमची मुलगी आज एकोणीस वर्षांची झाली आहे. अगदी तिच्यासारखीच आहे आमची हर्षदा ;  अभ्यासू , समंजस , जिवाला जीव देणारी. परखडपणे आपली मतं मांडणारी , व्यावहारिक , खरं तेच माझं म्हणणारी. 

          माझ्या गेल्या वाढदिवसाला तिने मला किती छान , अविस्मरणीय गिफ्ट दिली होती ! शब्दरूपाने लिहिलेला एक साहित्यमय लेख तिने माझ्यासाठी लिहिला होता. माझी आवड तिने जाणली. मला नक्की काय आवडतं ते तिला समजलं. तिनं लिहिलेला लेख माझ्यासाठीच होता. तो कोणाला दाखवण्यासाठी नक्कीच नव्हता. तिला फक्त आपल्या पप्पांना खुश करायचे होते. तिला आपला मोठेपणा सांगणे कधीच आवडत नाही. ती तिच्या मम्मीसारखीच आपल्या मताशी कायम ठाम असते. 

          मी मात्र तिचा तो लेख सगळ्यांना पाठवला तेव्हा ती किंचितशी नाखुश झालेली दिसली. तिचा लेख पुढच्याच सोमवारी लोकमतच्या लोकमंच पुरवणीत दिमाखात छापून आला तेव्हाही तिला आनंद झाला नव्हता. अर्थात माझेच चुकले होते. पण माझ्या मुलीच्या निर्मळ भावना सर्वांपर्यंत पोहोचवाव्यात असे मला वाटले. तिच्या भावना काहीशा दुखावल्या गेल्या. पण नंतर ती हसून म्हणालीही , " चला जाऊ द्या पप्पा. तुम्ही माझ्यासाठी एवढं करता , पण आता मला तुमच्यासाठी करायचे आहे. " 

          तिच्या या वाक्याने मी सद्गदित झालो. तिला कोणतीही वस्तू घ्यायची म्हणजे मला प्रश्नच पडतो. पहिल्यांदा ती त्याची किंमत विचारणार. मग ती म्हणणार , " एवढी महाग !!!! कशाला आणली ती !! मला आता एवढी काय गरज नव्हती. " यावर माझ्याकडे कधीही उत्तर नसते. मी फक्त हसतो आणि तिच्या पाठीवर आश्वासक थाप मारतो आणि बाजूला होतो. 

          आज तिचा वाढदिवस आहे आणि आजही मला तोच प्रश्न पडला आहे , " काय घ्यावे तिला , जे तिला बघताक्षणी आवडेल !!  मला सुचेलही खूप , पण ते तिला आवडेल का कोण जाणे ? " 

          मुलीचा वाढदिवस हा प्रत्येक बापासाठी अत्यंत आनंदाचा दिवस असायला हवा. कोरोना काळात मला बरे नसताना ती मला स्वतःच्या जबाबदारीवर दवाखान्यात घेऊन गेली होती , तेव्हा मला किती धीर आला होता म्हणून सांगू !!! मला आता तिन्ही मुलीच आहेत , तरीही मला त्याचे अजिबात दुःख होत नाही. उलट मी या जगातील सर्वांत सुखी बाप आहे याचा मला अभिमान वाटतो. 

          हर्षदाच्या मम्मीची ऐश्वर्याची उणीव भरुन काढणारी ईश्वरी माझ्या आयुष्यात आली आणि माझं भरकटलेलं जीवन पुन्हा एकदा किनाऱ्यावर आलं. तिने मला सावरलं. ती पुन्हा माझी ऐश्वर्या बनली. तिचं आपल्या कारभाऱ्यावरील प्रेम अथांग आहे. आज मी आणि माझी मोठी मुलगी फक्त आणि फक्त तिच्यामुळेच आहोत हे मी आताही साश्रु नयनांनी सांगू शकतो. 


 ©️ प्रवीण अशितोष कुबल

( 9881471684 )



🔴 ब्रह्मचैतन्य आणि पूर्णब्रह्म

🔴 ब्रह्मचैतन्य आणि पूर्णब्रह्म           "आपल्यामध्ये धर्म आचरणाचा गुण असायला हवा," असे माझी आजी नेहमी सांगायची. ती केवळ सांगायची...