Showing posts with label निसर्गसंपन्न समृद्ध अनुभव. Show all posts
Showing posts with label निसर्गसंपन्न समृद्ध अनुभव. Show all posts

Sunday, July 30, 2023

🛑 असा रंगारी श्रावण

🛑 असा रंगारी श्रावण

          आषाढ महिना संपला कि श्रावण महिन्याची चाहुल लागते. तो येतो आणि जो आनंद होतो , तो शब्दबद्ध करणं खूपच कठीण असतं. हा स्वानंद अनुभवावा लागतो. तो अनुभवल्याशिवाय कळणार नाही. 

          बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांनाही श्रावण महिन्याने भुरळ घातली. त्यांनी लिहिलेली कविता सर्वश्रुत आहे. ' श्रावणमासी हर्षमानसी हिरवळ दाटे चोहीकडे ' ही कविता म्हणताना साक्षात श्रावण समोर उभा राहतो. इतकी त्यांच्या काव्यात ताकद आहे. 

          श्रावणात सर्व निसर्ग बहरुन जातो. पावसाला उधाण आलेलं असतं. हिरव्यागार झाडावेलींना पाहताना डोळे निवून जातात. आकाशात विविध रंगांची उधळण करणारं इंद्रधनुष्य त्यात भर घालत असतं. पशुपक्षी आनंदात नाचू लागतात. शेतकरी सुखावतात. त्यांची शेती करतानाची कार्ये उत्स्फूर्तपणे सुरु असतात. 

          या महात हिंदू धर्मातील विविध सण येतात. पावसाच्या रिमझिम रेशीमधारा बघतच रहाव्याशा वाटतात. फुलांची बाग अधिक आनंदाने हसताना दिसते. विविध रानभाज्या खुलून दिसतात. 

          गावाकडे घराघरात श्रावण सोमवारी शंकर महादेवाची व्रतवैकल्ये केली जातात. उपवास केले जातात. लहान मुलांनाच नव्हे तर मोठ्यांनाही झोपाळ्यावर झोके घेण्याचा आनंद घेता येत असतो. मंगळागौर , नागपंचमी , रक्षाबंधन , नारळीपौर्णिमा , गोकुळाष्टमी , गोपाळकाला असे सण श्रावण महिन्याचे मुकुटच असतात. मांसाहार न करता पूर्ण शाकाहारी राहण्यासाठी निसर्गदेवता श्रावण महिन्याच्या रुपाने माणसाला साद घालत असते. 

          भक्तीभावाने भारावून गेलेली माणसे श्रावणाची वाट पाहत असतात. एखाद्या ग्रंथाचे वाचन सुरु करण्यासाठी श्रावण महाचे औचित्य लागत असते. 

          असा हा श्रावण सर्वांचाच लाडका ऋतू असतो. 

©️ प्रवीण कुबलसर



Tuesday, July 4, 2023

🛑 पावसाची रंगतसंगत

🛑 पावसाची रंगतसंगत

          पाऊस आता चांगलाच सुरु झालाय. कालपासून त्याने संततधार सुरु केली आहे. गडगडाट नाही , मुसळधार तर नाहीच नाही. पण नुसता बरसतोय. सकाळी सकाळी त्याचा हा वर्षाव खुप सुखद आनंद देऊन जातोय. तो बाहेर छान कोसळतोय. मी मस्त पावसाची गाणी लावून ऐकत बसलोय. पावसाची जुनी गाणी आणि नवा पाऊस दोन्ही कसे भारावून टाकणारे आहे. 

          पाऊस आला की माझं असं होतं. पावसात जावसं वाटतं आणि घरात थांबावं असंही वाटतं. पण यापैकी एकच करता येऊ शकतं. 

          सकाळी लवकरच छोट्या उर्मीला शाळेत सोडायला जायचे असते. तिला मम्मीसुद्धा लागते. शाळेत जायची गडबड सुरु झालेली असते. ती उठायचे नाव घेत नाही. ती लाडात म्हणते , " पप्पा , जरा वेळ झोपते ना ? " माझी तयारी झालेली असते. उर्मीला मस्त आंघोळ करुन झाल्यावर कोमट पाण्यात हॉटबाथ घ्यायला नेहमीच आवडतं. आजही तिने हॉटशेक घेतलाच. रेनकोट वगैरे घालून तयारी करुन शाळेत निघालो. 

          पाऊस काही थांबण्याचे नाव घेत नव्हता. तो रेनकोटातून आत शिरु पाहत होता. पाच मिनिटांत पाऊस रेनकोटात शिरलाच. गारवा छान वाटतोय. मजा येतेय. मधूनच आलेली पावसाची मोठी सर थेट तोंडात पाणी ओतू पहात होती. चष्म्यातून धूसर दिसू लागले होते. चष्म्याला वायफर नाही म्हणून तो पुन्हा पुन्हा पुसावा लागतोय. रस्ता अस्पष्ट दिसू लागलाय. चष्मा वापरणाऱ्यांचे सर्वांचेच असे होत असले पाहिजे. 

          मुलीला घरी सोडून आलो , तेव्हा कपड्यातून आत घुसलेला पाऊस आता मला पाहून बाहेरुन मिश्किल हसताना मला दिसला. मीही गालातच छान हसलो. मिलिंद इंगळे ऐकत बसलो. सौमित्र ऐकत बसलो. दोघेही आपल्या शब्दांनी , स्वरांनी मला चिंब भिजवून टाकत होते. आत आणि बाहेर दोन्ही ठिकाणी मी मस्त पाऊस अनुभवत होतो. पत्नीने वाफाळलेला आलेयुक्त चहा दिला. तिच्यासोबत चहा पिताना पूर्वीचा पाऊस आठवत होता. स्मृतींचाही असाच पाऊस असतो नाही का ? तोही प्रत्येकाच्या मनात असाच उदंड वर्षत असतो. 

          मलाही आता शाळेत जायचं आहे. शिकायला आणि शिकवायला. जातानाही पुन्हा पावसाची साथसंगत असणारच आहे. धोय धोय पडणारा हा पाऊस मनातही शब्दांचा धबधबा कोसळवतोय. 

©️ प्रवीण कुबलसर



Friday, July 15, 2022

🛑 रिमझिम पाऊस लाडाचा

🛑 रिमझिम पाऊस लाडाचा

          धोय धोय धोय पाऊस नुसता कोसळतोय. संततधार पाऊस चिंब भिजवून टाकतोय. सकाळी सगळ्यांची शाळेत जायची घाई झालीय. तिकडे पावसाची मुसळधार कोसळण्याची घाई झालीय. तो थांबता थांबताना दिसत नाहीय. 

          " ए आई , मला पावसात जाऊ दे " म्हणणारी मुलेही " ये रे , ये रे पावसा , येऊ नको दिवसा " म्हणत असतील. शाळेभोवती तळे साचून ' सुट्टी ' मिळेल का ? असा प्रश्न त्यांना पडू लागलाय. शाळेचा अभ्यास , सेतूचा अभ्यास , अध्ययन निश्चितीच्या चाचण्या सोडवताना आणि सोडवून घेताना सर्वांच्याच नाकातून , डोळ्यातून धोय धोय पाऊस गळू लागलाय. 

          पावसाचे हे असेच असते. तो पडायला लागला कि थांबण्याचे नावच घेत नाही. नुसता बरसतच राहतो. छत्र्या घेऊन जाणाऱ्यांची त्रेधा उडताना दिसते आहे. छत्र्या उलट होत आहेत. वारा उधाणलाय. पाण्याचे ओहळ भरुन वाहू लागले आहेत. 

          एखादी सुसाट वेगाने जाणारी गाडी अंगावर चिखल उडवत जाते आहे. छत्री शोभेसाठी घेतल्यासारखे वाटते आहे. सगळा पाऊस छत्रीतून आत येऊ पाहतोय. नव्हे तो आलायसुद्धा. चिंब भिजलेले कपडे तसेच अंगावर लेवून दिवसभर राहणं शिक्षाच ठरु लागली आहे. 

          पक्ष्यांचे आवाज बंद झालेत. तेही थंडेलेत. कुठेतरी एखादा पक्षी पंख फडफडताना दिसला तर नशीब. तेही कुठल्या खोपच्यात लपलेत !!! बेडकांचे डराव डराव पाढे ऐकताना कधी झोप लागते समजतही नाही. 

          झाडं मस्त उभी आहेत. वाकडी होत आहेत. काही उन्मळून पडली तरी हसत आहेत. शेते आनंदाने डोलत आहेत. लव्हाळी लवत आहेत. ओहळ जोशात नदीला जाऊन मिळत आहेत. नद्या सुसाट वाहत आहेत. वाहतानाच्या आवाजाने कानसाटल्यासारखे वाटते आहे. कुर्ल्या दगडाखाली लपण्यासाठी वेगात पळत आहेत. मळ्यामळ्यात शेतकरी नांगरट करताहेत. बैल कमीच पण पॉवर टिलर शेतात दिसताहेत. " हिरी हिरी पाप्पारी " हे शब्द ऐकू येईनासे झालेत. 

          पूर्वीच्या आणि आताच्या पावसात खूपसा फरक जाणवतोय. की तो ही बदललाय काळाप्रमाणे वरुण राजाच जाणे ? 

©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 ) कणकवली



Thursday, June 2, 2022

🛑 माझी जलसफर

 🛑 माझी जलसफर


          लहानपणापासून मला पाण्याची भीती खूपच वाटत आली आहे. पाणी पितानाही अनेकदा माझ्या नाकातून आलेले होते. अर्थात मी पाणी तोंडावाटे पित होतो , पण नेहमी घाई नडायची. गडबडीत पाणी पिऊ नये हेच खरे. तोंड आकाशाच्या दिशेने उघडून त्यात पाणी भरल्यानंतर मला अनेकदा असा अनुभव आला आहे. पाणी तोंडातून घटाघटा आत पोहोचत असे. मध्येच ते नाकातून बाहेर पडताना मोठा ठसका लागे. 

          पाणी पिताना ही हालत होती. त्यामुळे पाण्यात सफर करताना त्याहीपेक्षा जास्त अनुभव आले होते. आम्हाला गावाकडे जाताना नदी ओलांडूनच जावे लागे. 

          माझा गाव किर्लोस आंबवणेवाडी. नदीच्या पल्याड आमचे मातीचे घर होते. आमचे घर शेत शिवार संपलं की पहिलंच होतं. आमची नदी पाऊस सुरु झाल्यानंतर पंधरा वीस दिवसांतच दुथडी भरुन वाहू लागते. तिच्या पाण्याचा प्रवाह गतिमान असतो. त्या प्रवाहाला तोडून पलिकडे जायचे म्हणजे एक दिव्यच होते. 

          अर्थात नदीकिनारी आमचा एक होडीवाला आम्हाला पलिकडे सुखरुप नेऊन सोडत असे. आम्ही त्यांना ' होडीवाले काका ' म्हणत असू. ते होडी बिनधास्त हाकत. मोठी माणसे त्यांना ' विठोबा ' नावाने प्रेमाची हाक मारत. 

          आम्ही पलिकडे नदीकिनारी आलो होतो. नदी वेगाने वाहत होती. मधेच एखादा लाकडाचा ओंडका जोरात वाहून जाताना दिसत होता. ती आपल्या पोटातून आणखी काय काय वाहून नेत होती तीच जाणे !! किनाऱ्यावर नदीचे पाणी जोरात आदळताना पाहून भीती वाटत होती.  आम्ही त्या रौद्ररूप धारण केलेल्या नदीच्या पलिकडे जाण्याची घाई करत होतो. पाऊस थांबण्याचे नाव घेत नव्हता. डोक्यावर धरलेली छत्री चार पाच वेळा उलटी होऊन पुन्हा सरळ झाली होती. 

          बाबांनी आणि काकांनी मोठ्यांदा कुकारे मारायला सुरुवात केली होती. होडीवाला कुकारे ऐकून होडी घेऊन येणार होता. बाबांना आणि काकांना व्यवस्थित कुकारे घालता येत. माझ्या कुकाऱ्यांचा आवाज ऐकू येतच नव्हता. 

          पलीकडील झोपडीतून कसलीशी हालचाल झाली होती. ते आमचे होडीवाले काका होते. एवढया  भयंकर नदीतून त्यांनी न घाबरता होडी घातली होती. पावसाचे पाणी होडीत साचले होते. काकांनी ते बाहेर काढले होते. काकांनी अतिशय कौशल्याने वल्हे मारत होडी आमच्या दिशेला हाकली होती. ते होडी प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने चढवत पुढे पुढे येत होते. नदीच्या मध्यभागी येताच होडी वाहून प्रवाहाबरोबर खालच्या दिशेने वेगात येत होती. काका पुन्हा वल्हे बदलून कधी उजवीकडे तर कधी डावीकडे वल्हे मारत लवकरच आमच्यापर्यंत येऊन पोहोचले होते. 

          होडी एकदम किनाऱ्यावर येऊ शकत नव्हती. त्यामुळे थोडे पाण्यात जाऊन आम्हाला होडीत बसावे लागले होते. आम्ही सर्व सात आठजण होडीत बसलो होतो. काकांनी होडी हाकायला पुन्हा सुरुवात केली होती. आमची जलसफर सुरु झाली होती. होडी पाण्यात हिंदोळे देत होती. आमची घाबरगुंडी उडाली होती. वारा थांबता थांबत नव्हता. पावसाचा जोर होताच. माझ्या भाईकाकांनी दुसऱ्या बाजूने वल्हा मारायला सुरुवात केली होती. आता पुन्हा एकदा होडी वरच्या दिशेला प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला हाकणे नेटाने सुरु झाले होते. 

          होडीला कुठेतरी बारीकसे छिद्र होते. त्यातून पाणी येत होते. पावसाचे पाणी होडीत येत होतेच. बाबांनी होडीतले पाणी बाहेर ओतायला सुरुवात केली होती. आता होडी प्रवाहाच्या दिशेने वेगाने वाहायला लागली होती. होडीवाले काका थोडेसे घाबरलेले दिसले. त्यांचा आत्मविश्वास कमी झालेला दिसत होता. होडी काही केल्या थांबता थांबत नव्हती. माझे काका जिवाच्या आकांताने वल्हे मारतच होते. होडी खूपच पुढे जाऊन एका झाडाच्या पाळाला जाऊन थबकली होती. आता किनारा जवळ होता. पण चारी बाजूला खोलवर पाणी होते. कोणीही होडीतून उतरु शकत नव्हते. शेवटी होडीवाले काकांनी जोरात वल्हे मारुन होडी किनाऱ्याला लावलीच. एवढया पावसातही त्यांच्या अंगातून थबाथब घाम ओथंबत होता. सर्वांचा जीव वाचल्याबद्दल आम्ही सर्वांनीच आमच्या कोसमीवाल्या महापुरुष देवाचे आभार मानले होते. 


 ©️ प्रवीण अशितोष कुबलसर

( 9881471684 )

Thursday, April 14, 2022

🛑 हृदयी वसंत फुलताना

🛑 हृदयी वसंत फुलताना

              ' अशी ही बनवाबनवी ' हा चित्रपट अनेकदा पाहिला असेन. त्यातील एक गाणं शरीर आणि मन दोघांनाही प्रसन्न करुन टाकतं. ' हृदयी वसंत फुलताना , प्रेमास रंग यावे ' हे शब्द कानी पडले की प्रत्येकाच्या मनात प्रेमरंग फुलत असतील. कवी शांताराम नांदगावकर यांनी किती निसर्गरम्य भाव या काव्यात पेरले आहेत !             

        निसर्ग आपलं चक्र सुरु ठेवत असतो. तसंच ऋतुचक्र फिरत राहतं. वसंताने या चक्राची सुरुवात होते. जणू सृष्टीवर नवचैतन्य पसरतं. झाडे , वेली , फुले , फळे आनंदाने डोलू लागतात. नवी हिरवाई जन्माला येत असते. शिशिर संपताना ' आला शिशिर संपत , पानगळती सरली ' हे कवयित्री इंदिरा संतांचे शब्द आठवू लागतात.           

        निसर्ग एक किमयागार आहे हे पटतं. धरतीला नवा शालू नेसून राहायचे असते. धरणी प्रफुल्लित होऊन वसंत ऋतूच्या आगमनाची आतुरतेने वाट बघत असते. झाडांना नवी पालवी फुटताना पाहून निसर्गदेवतेला सलाम करावासा वाटतो. पक्षी गुंजन करु लागतात. त्यांनाही निसर्ग बदलाची चाहूल लागलेली असते. ती त्यांच्या आनंदाची शीळ असते. त्यांचं कर्णमधुर गायन कान तृप्त करुन टाकणारं असतं.आपण सर्व पृथ्वीवासी मंत्रमुग्ध होऊन जातो.               गुढ्या , तोरणे उभारुन वसंताचे स्वागत केले जाते. एक नवीन आशेचा किरण सर्वांनाच खुणावू लागतो. प्रत्येकाच्या रोमारोमात वसंत संचारु लागतो. वसंत पंचमी उत्साहाने साजरी केली जाते. निसर्गाने केलेली पुष्पपर्णाची उधळण सर्वांचं मन मोहवून टाकते.              

        खेड तालुक्यातील जामगे सीमावाडी शाळेत शिक्षक होतो. जाता येताना वसंत खुल्या दिलाने माझे स्वागत करत असे. घनदाट वनराई , चिंचोळी वाट आणि मी एकटा. पण माझ्यासोबत वसंत नक्कीच सोबत करत असे. त्याने माझ्या निराशा घालवलेल्या असत. एकाकी जीवनाला पालवी देत चैतन्य निर्माण करणारा तोच तर होता.ऊन मी म्हणत असताना त्याची तीव्रता या वसंताने कमी केली होती. सर्व झाडे मला फळे काढण्यासाठी वाकून सांगत असत , " आमची फळे काढा हो , आम्हाला ती जड झालीत. " मी मग एखादा आंबा काढत असे. घरी त्याचे लोणचे होई. भाताबरोबर ते खाताना जणू वसंताची चव जिभेवर तरळत राही. खूप गोड आठवणी होत्या त्या. 

          शाळेत येताना मुले जास्वंदीची भरपूर फुले आणत. त्यांचा पुष्पहार शारदेला घालताना वसंताची माळ अर्पण केल्याचा आनंद होऊन जाई.सावरीच्या , पळसाच्या झाडाखाली फुलांचा सडा बघून त्यावर अलगद पाय ठेवताना गुदगुल्या होत. 

          परीक्षेचे वातावरण सुरु झालेले असे. एखाद्या बुटक्या झाडावर बसून अभ्यास करण्याची मजा काही औरच असे. दुपारनंतर वाडीतील पोरेसोरे गोळा होत. आंब्याचे , करवंदांचे खिरमाट बनवत. ते आंबटगोड असे. त्याची लज्जत आता येत नाही. तो वसंत वेगळाच होता. 

          परशुराम पांचाळ बुवांची भजने ऐकताना मंगलाचरण सुरु होई. ' आला वसंत घ्यारे नाम , हरी जय जय राम ' त्यात ते वसंत ऋतूत रामाला आळवावे असे सांगत. लवकरच रामनवमी , हनुमान जयंती साजरी होई. वासंतिक सुंठवडा मिळे. 

          वासंतिक व्याख्यानमाला सुरु होत. दिग्गज लेखक , कवींची व्याख्याने ऐकताना बौद्धिक वसंत फुलत राही. एखाद्या शाळेत मुले शिक्षकांना कलमाचे हापूस आंबे आणून देत. कदाचित त्या मुलांचा असा समज असेल की हे आंबे दिल्यानंतर आपले गुरुजी आपल्याला चांगल्या गुणांनी पास करतील. पिवळ्या रंगांची प्रगतीपत्रके बघून त्यांच्या मनाचा मोर नाचू लागे. 

          असा हा विविध रंगांचा आणि ढंगांचा वसंत ऋतू नित्यनेमाने येतच राहणार आहे. तो प्रत्येकाच्या आयुष्याचे सोने करु पाहत असतो. तो आपल्या जीवनाचे सोने करतोय हे समजण्याइतका आपला सकारात्मक दृष्टिकोन असला म्हणजे झाले. 


©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 ) कणकवली



Thursday, April 7, 2022

🛑 नको , नको हा उकाडा

🛑 नको , नको हा उकाडा

          टेरेस फ्लॅट असला की त्याखाली राहणारे उकाड्याने हैराण होतात. आम्ही सतत याचा अनुभव घेत आहोत. " कडाक्याची थंडी , मुसळधार पाऊस परवडला , पण उकाडा नको रे बाबा " असे सगळेच म्हणत असतील. दिवसातून कितीही वेळा आंघोळ करा , घाम यायचा काही थांबत नाही. 

          मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच सकाळची शाळा असली असती तर बरे झाले असते असे वाटू लागते. शासनाच्या १६ मार्च पर्यंत वाट बघता बघता सकाळशिप सुरु होते. सकाळी लवकरचा अलार्म लावावा लागतो. गर्मीमुळे अलार्म वाजण्याच्या अगोदरच जाग येत राहते. नंतर झोपावे तर झोप लागत नसते. फॅनचा रेग्युलेटर पाचच्या पुढे करावासा वाटतो. तोही गरम झालेला असतो. नंतर लक्षात येते की पाचवर म्हणजे तो टॉपवर असतो. एवढा फास्ट असूनही उकाडा थांबत नसतो.

          एकदा उठल्यावर पुन्हा झोप येण्याची शक्यताच नसते. शाळेत साडे बारापर्यंत थांबायचे असते. शाळेत दिवसभर थांबायलाही आवडले असते , पण दुपारच्या ऐन कडावर मुलांना घरी जाताना जो त्रास होत असेल त्याची कल्पना करुनच घामाघूम व्हायला होते.

          सूर्य डोक्यावर राहून आग ओकत असतो. त्याच्याकडे बघणे म्हणजे डोळे फुटायची पाळी. उन्हातान्हात उभी असणारी झाडे कशी सहन करत असतील या उकाड्याला ? दुसऱ्यांना सावली देत स्वतः तप्त ऊन खाणारी झाडे म्हणूनच वाळवंटातील मृगजळ वाटत राहतात. 

          खेड्यातील मुलांना या उन्हाची सवय झालेली असते. भर उन्हात शेतात काम करणारे शेतकरी पाहिले की आपण उगाचच ' उकाडा वाढलाय ' असं म्हणतो त्याची लाज वाटते. रस्त्यावर अनवाणी चालणारी मुले , माणसे पाहिली की त्यांच्या पायांची कीव करावीशी वाटते. त्यांचे पाय भाजत असले तरी त्यांनी त्या भाजण्याची सवय करुन घेतली असेल. 

          हे सगळं पाहिलं की आम्हाला गाडीने जाताना कडक उन्हाचे चटके बसले तरी ते सुसह्य वाटू लागतात. मग बिचाऱ्या या सहनशील माणसांची देवाला दया येत असेल. मग तो अचानक पाऊस घेऊन येतो. पाऊस पडताना गारवा येतो. पाऊस पडून गेल्यावर पुन्हा अधिक उकाडा जाणवू लागतो. 

          थंड हवेची ठिकाणं खुणावू लागतात. ज्यांचे खिसे गरम असतात , ती लोकं थंड होण्यासाठी जातात. पैसे संपले की त्यांना गरम होऊ लागतं. हल्ली लोकांना वातानुकूलित घरात राहण्याची सवय झाली आहे. जातील तिथे एसी सुरु करण्याची ऑर्डर सोडतील. त्यामुळे शरीराला कृत्रिमतेची सवय होऊ लागते आहे. ही कृत्रिम हवा आरोग्यदायक नाही हे माणसाला समजत नाही. काहीवेळा एसी सुरु असतानाही फॅन सुरु ठेवणारी माणसे मी पाहिली आहेत. उकाडा असताना फॅन लावणे ठिक आहे. काही मुलांना , मोठ्या माणसांना थंडीच्या दिवसातही पाचवर फॅन लावल्याशिवाय झोपच लागत नाही. पाचवर फॅन लावतील आणि डोक्यावरुन पांघरुण घेऊन मगच गाढ झोपी जातील. आता या माणसांचे उन्हाळ्यात काय हाल होत असतील याची कल्पना केलेलीच बरी. 

          त्यापेक्षा बाहेर पडताना छत्री वापरा , गाडीवर हेल्मेट वापरा. पांढरी सुती टोपी वापरा. निसर्गाच्या सानिध्यात राहा. संध्याकाळी थोडे चाला. मातीच्या माठातलं थंडगार पाणी प्या. लिंबूपाणी पिऊन तहान भागवा. साध्या थंड पाण्यात रतांबे पिळून त्यात थोडी साखर टाकून कोकम सरबत प्या. आता ही सगळी पेये तयार मिळू लागली आहेत. कोल्ड्रिंक्सपेक्षा फळांचा ज्यूस पिणं केव्हाही चांगलंच. 

          विहिरीवर जाऊन ताज्या थंड पाण्याची मस्त आंघोळ करा. आता या आंघोळीची तहान आपण शॉवरखाली आंघोळ करुन भागवतो आहोत. उष्माघात होऊ नये म्हणून शरीर थंड ठेवाच , आणि तुमचं मनही तसेच थंड ठेवा. नाहीतर कितीही एसीत असलात तरी उकाडा जाणवल्याशिवाय राहणार नाही. 

©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 )



Tuesday, April 5, 2022

🛑 ऊनसाळा

 🛑 ऊनसाळा

           " ऋतू आला वसंत सांगायला हो , अन घुंगरु घ्या तुम्ही बांधायला " हे गाणे आम्ही खूप पूर्वी या मोसमात म्हणत असू. शाळेत शिकवत असू. मुले हे गाणे नाचून म्हणताना खूप आनंदित होऊन जात. वसंत ऋतू आला की निसर्गाच्या बदलाने तनमन प्रफुल्लित होऊन जाई. 

          सध्या वसंत ऋतू सुरु आहे. वातावरणात घडून येत असलेले बदल पाहून ऋतूच समजेनासे झाले आहेत. सकाळी लवकर उठून शाळेत जायची तयारी सुरु केली होती. आंघोळ करायला गेलो असेन , बाहेर पाण्याची टाकी ओव्हर फ्लो झाल्यासारखे वाटले. पण पावसाळ्यात जसा पाऊस पडतो तसा मुसळधार पाऊस सुरु झाला होता. शॉवरखाली मस्त थंड पाण्याचे भराभर फवारे घेत असताना बाहेर पावसाचा आवाज वाढत चालला होता. मी जणू पावसात न्हात असल्याचा अनुभव घेऊ लागलो होतो. एप्रिलच्या उन्हाळ्यात पावसाच्या सरी पडाव्यात हे खरे वाटत नव्हते. पण पाऊस धो धो कोसळत होताच. बाहेरचा दरवाजा उघडला तसा थंड वारा गडबडीने आत शिरला होता. 

          यावर्षी तिन्ही ऋतूंमध्ये पावसाने हजेरी लावल्याने कमालीचे आश्चर्य वाटत होते. पावसाळ्यात ठीक आहे , पण आता बारमाही पाऊस हे जरा जास्तच वाटत होतं. पण हे पावसाला माहीत नसावे. त्याने   कदाचित कधीही बरसायचा विडा उचललेला असावा. असा हा अनाहूत पाऊस हिवाळ्यात पडला त्यावेळी आम्ही त्याला ' हिवसाळा ' म्हटले होते. आता तो उन्हाळ्यात कडाक्याचे ऊन पडण्याच्या दिवसात सकाळीच येऊन ठाण मांडून बसला होता. आता त्याला ' ऊनसाळा ' म्हटले तरी त्याला त्याचे काहीच वाटणार नव्हते. तो कुठे शाळेत जाणार होता शिकायला किंवा शिकवायला ? 

          शाळेत जायची घाई आणि पावसाची ही धिटाई. आलेयुक्त मस्त चहा समोर आला. गरमागरम असल्याने त्यावर फुंकर घालत पित पित पावसाच्या जाण्याची वाट बघितली. चहा पिऊन झाला आणि पाऊसही गेला. 

          मध्येच विजांच्या लख्ख रेषा आकाशात उजेड आणू पाहात होत्या. ' धुडूम म्हातारी ' जोराने ओरडत होती. ढगांच्या गडगडाटाला आम्ही ' घुडूम म्हातारी किंवा धुडूम म्हातारी ' म्हणत असू. लहानपणी आम्हाला या अक्राळविक्राळ म्हातारीची खूप भीती वाटे. तिच्या विचित्र असण्याची आम्ही विविध चित्रे मनात रंगवली होती. शाळेत गेल्यावर त्याचे शास्त्रीय कारण उमगले. वीजबाईने तोपर्यंत आमच्या शरीरातली वीज घालवून टाकली होती. 

          गडबडीत शाळेत निघालो. गाडीवर स्वार झालो. गाडीने आज आंघोळ केली होती. ती स्वच्छ दिसत होती. गाडी सुरु झाली. थोडे अंतर गेलो असेन , तोवर पुन्हा पावसाचे थेंब अंगावर कोसळत आहेत असे वाटले. मागे येऊन रेनकोट घ्यावा लागला. 

          सध्या छत्री आणि रेनकोट कधी लागेल सांगता येत नाही. त्यामुळे ते लवकर हाताला मिळतील अशा जागी मुद्दाम ठेवावे लागतात. 

          नेहमीप्रमाणे भरधाव निघालो. दहा पंधरा मिनिटे पाऊस सोबत करत होता. मस्त वाटत होतं. शाळेत जाणाऱ्या मुलांची , शिक्षकांची पावसाने त्रेधातिरपीट उडवून टाकली होती. मी आपला रेनकोट असल्याने मजेत निघालो होतो. पुढेही पाऊस पडून गेल्याची चिन्हे दिसत होती. 

          नंतर दिवसभर पाऊस दडून बसला होता. रात्रीच्या भोजनाच्या वेळी तो पुन्हा गडगडाट करत आलाच. थोड्या वेळापूर्वी जवळ वाढदिवसाच्या निमित्ताने कोणीतरी फटाके वाजवले होते. फटाक्यांच्या आवाजाने पुन्हा पावसाला धडामधुडूम करत यावेसे वाटले. तो बाहेर बरसत राहिला तसा मीही शब्दरूपाने तसाच बरसत राहिलो. 

©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 )



Saturday, January 8, 2022

धुके दाटलेले

 🟤 धुके दाटलेले

          शनिवार असल्यामुळे काल रात्री अलार्म लावून ठेवला होता. पण  अलार्म वाजण्याअगोदरच उठायला झाले. माझे नेहमी असेच होते. अलार्म लावला कि तो वाजायच्या आधीच मी उठलेला असतो. मग काय ? नंतर अलार्म वाजून दुसऱ्यांची झोपमोड करण्यापेक्षा अलार्म बंद करुन कामाला लागायचे. अलार्म लावलेला नसता तर वेळेवर उठलोही नसतो कदाचित. पण सगळ्यात आधी बाबा उठतात , मग हळूहळू सगळ्यांना जाग येते. 

          शाळा सकाळची होती. मी माझी तयारी केली. बायकोला चहासाठी मुद्दाम उठवण्यापेक्षा बाहेरच चहा पितो असे बाबांना सांगून मी निघालोही. बाहेर पहाटेचा संधीप्रकाश दिसत होता. थंडी म्हणावी तशी नव्हतीच. पण थंडीसाठी उगीचच जर्किन घालून मी माझ्या गाडीवर स्वार झालो. पण बाहेर थंडी माझ्याकडे आ वासून बघत होती. जाता जाता मस्त अमृततुल्य चहा घेतला आणि सुसाट निघालो नेहमीप्रमाणे. 

          जसजसा मी पुढे जात होतो , रस्त्यावर धुके दाटून आलेले दिसू लागले होते. दाट धुक्यातून वाट काढत , रस्ता कापत निघालो होतो. शाळेत गेलो तरी मुले शाळेत असणारच नव्हती. तिथे जाऊन हालचाल नोंद करुन गृहभेटीला जायचे होते. ऑनलाईन तासिका व्यवस्थित होत नाहीत , म्हणून हा मार्ग अवलंबला होता. तसंही गावात हायस्पीड इंटरनेटची कमतरता जाणवतच होती. सगळ्याच मुलांकडे मोबाईल नव्हते. असलेच तर ते अँड्रॉइड नव्हते. कधी त्यांची बॅटरी चार्ज नसे , तर कधी रेंजचा प्रॉब्लेम असे. कधी रिचार्ज नसण्याच्या तक्रारी येत. त्यापेक्षा प्रत्यक्ष गृहभेटी देऊन मार्गदर्शन करणे केव्हाही चांगले, म्हणून गृहभेटीला प्राधान्य दिले. मुले अगदी वेळेवर क्लासला ठराविक ठिकाणी गटागटाने येत होती. सामाजिक अंतर आणि मुखपट्टीचे नियम पाळत होती. 

          धुके दाट पडले होते. पुन्हा शाळा बंद झाल्यामुळे मला शिक्षण क्षेत्रातही हे असे शैक्षणिक धुके दिसू लागले होते. ऑक्टोबरपासून सुरु झालेले वर्ग पुन्हा बंद झाल्यामुळे मुलांना संमिश्र आनंद आणि दुःख दोन्ही झाल्याचं दिसत होतं. मला मात्र अजिबात आनंद होत नव्हता. आता मला पुन्हा एकदा गेल्यावेळचा लॉकडाऊन आठवू लागला होता. आता शैक्षणिक धुके अधिक दाट होणार की काय अशा शंका मनात येऊन उदास व्हायला होत होतं. मी आपला तेच गाणं गुणगुणत चाललो होतो. धुके दाटलेले ..... उदास उदास sss मी मनातल्या मनात गाण्याचा आलाप मारत होतो. 

          हुमरटपासून घनदाट धुके सुरु झाले होते. पण थोडे पुढे गेल्यावर पुन्हा स्पष्ट दिसू लागत होते. पुढे पुढे 30 किलोमीटर अंतर पार करीपर्यंत धुक्याने कोणाचीच पाठ सोडली नव्हती. धुक्यामुळे गाडीचा वेग वाढवून चालणार नव्हता. वेग वाढवला तर पुढून कोणी आले आणि आपण त्याला ठोकलं तर ? ही भीती मनात येत होतीच. शाळेच्या प्रवेशद्वारापाशी पोहोचलो. शाळेलाही धुक्याने वेढले होते. शाळा निर्विकारपणे माझ्याकडे पाहात होती. शाळेत मुले नसल्यामुळे कदाचित तिला आपल्या मुलांची आठवण आली असावी. तिने मला आपल्यात सामावून घेतले. आपल्याकडे विद्यार्थी नाही आले , पण शिक्षक तरी आले याचाही तिला आनंद झाला असेल कदाचित. 

          शेवटी मी काय शाळेत थांबणारच नव्हतो. मी मुलांना दिलेल्या वेळेत वाडीवार ठरवलेल्या ठिकाणी जाण्याची तयारी करत होतो. तयारी करेपर्यंत धुके निघून गेले होते. मी आपला ठरल्या ठिकाणी जायला निघालो. मुले माझी आधीच वाट पाहत होती. मी त्यांच्यासोबत जितका वेळ राहत होतो,  तितका वेळ त्यांना शिकवण्याचा नक्कीच प्रयत्न करत होतो. मुलं काहीतरी शिकण्याची धडपड करत आहेत या गोष्टींच्या आनंदाने माझ्या मनात दाटलेले धुके केव्हाच निघून गेले होते.

©️ प्रवीण अशितोष कुबलसर

( 9881471684 )



Friday, December 31, 2021

🔴 दाने दाने पर

           🔴 दाने दाने पर

            कालचीच गंमत गोष्ट आहे. तशा अनेक गंमत गोष्टी आपल्या आयुष्यात घडतात. पण त्या आवश्यकही असतात. कारण काहीवेळा त्यामधूनही आपल्याला धडे मिळत असतात. आपलीच गंमत सांगायला आपल्याला जमली पाहिजे. गंमत एकदा झाली म्हणजे ती पुन्हा होणार नाही हेही सांगता येत नाही. कधी कधी गंमत घडण्याचीही आपण वाट बघत असतो. ती घडली की मज्जा येते. ती मज्जा अनुभवता आली पाहिजे म्हणजे झाले.

          आम्ही मुंबईवरुन गावी आलो. दुपारी बारानंतर आल्यामुळे माझ्या वहिनीने तिच्याकडे जेवायला बोलावले. भाऊ आमच्यासोबतच होता. सहावीत शिकत असलेली माझी मुलगी तनिष्का क्लासला व तिथून शाळेत गेली होती. तिची शाळा  अडीच वाजता सुटणार होती. तोपर्यंत आम्ही सगळे जेवलो. तिला आणायला मी शाळेत जायला निघालो. माझ्याबरोबर पत्नी आणि छोटी मुलगी उर्मीही यायला निघाली. वहिनीने तनिष्कासाठी जेवणाचा डबा भरुन दिला होता. 

          सकाळी लवकर उठून प्रवासाला सुरुवात केली. रेल्वेत झोप मिळालीच नव्हती. त्यामुळे मुलीला शाळेतून घेऊन आल्यानंतर भरपूर झोपावे असे ठरवले होते. 

          वहिनीने मुलीसाठी दिलेला जेवणाचा डबा मी माझ्या पलेजर गाडीच्या पुढच्या पाय ठेवण्याच्या जागेवर ठेवला. शाळा जवळच होती. रुमसुद्धा जवळच होता. वाटले डबा कशाला डिकीत ठेवायचा ? म्हणून तिथेच ठेवला. शाळेच्या मागच्या बाजूच्या रस्त्यापाशी आलो. आम्ही तिघे तनिष्काला न्यायला आलो हे तिच्यासाठी सरप्राईज असणार होते.  तिला तीन दिवसानंतर अशा प्रकारे शाळेत भेटायला मिळणार हे आमच्यासाठीही वेगळेच फिलिंग असणार होते. 

          मी गाडी साईड स्टँडवर लावली. माझ्यासारखे आणखी काही पालक आपल्या मुलांना न्यायला आलेले दिसले. त्यातल्या ओळखीच्या पालकांना मी आदरपूर्वक हात वर करुन हाय केले. शाळा सुटली होती. मुले शाळेच्या मागील अरुंद गेटमधून येऊ लागली होती. आमची नजर तनिष्का कुठे दिसते का ? यासाठी भिरभिरत होती.  ती मुलींच्या घोळक्यातून बोलत बोलत येत होती. तिने आम्हाला पाहिले आणि सुखावली. छोट्या उर्मीने लगेच तिचा हात पकडला. आम्ही परत गाडीकडे आलो. गाडीवर बसणार तितक्यात ??? गाडीच्या समोरच्या फुटरेस्टवर ठेवलेला जेवणाचा डबा दिसत नव्हता. मला वाटले मी तो डिकीमध्ये ठेवला. म्हणून डिकी उघडून बघितली तर डिकी रिकामीच होती. 

          डबा कुठे गेला असावा म्हणून इकडे तिकडे पाहिले तर काय ? रस्त्याच्या शेजारच्या झाडांच्या अतिदाट झाडीमध्ये एक भटकता कुत्रा आमचा जेवणाचा डबा उघडताना दिसला. त्याला तो काही उघडता येत नव्हता. मी त्या डब्याची आणि त्यातल्या जेवणाची आशा सोडली. मुलीला एका हॉटेलमध्ये घेऊन जाऊन चपाती भाजी घेतली. येताना पुन्हा त्याच दिशेने सहजच आलो. आता मात्र त्या ठिकाणी कुत्रा दिसत नव्हता फक्त न उघडलेला डबा  दिसत होता. मी डबा आणायला त्या झाडीत शिरलो. डबा बाहेर काढला. डबा घट्ट झाकणाचा होता. तो थोडी ताकद लावून उघडला. त्यातले जेवण जसेच्या तसे होते. डबा उघडताच तो कुत्रा पुन्हा कुठूनतरी धावतच माझ्याजवळ आला. मी तो डबा त्याच्यासाठी जमिनीवर पालथा केला. अधाशासारखा त्याने तो पटकन संपवून टाकला. मी आणि माझी मुलगी दोघेही त्याच्याकडे तोंडात बोट घालून पाहतच राहिलो. एका कुत्र्याची भूक भागवली याचा आनंद मुलीच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहात होता. खरंच त्यावर आज त्याचेच नाव लिहिले होते याचा प्रत्यय आला. ' दाने दाने पर लिखा होता है खानेवाले का नाम ' हे पटल्याने आम्ही हसत हसत घरी परतलो. 

©️ प्रवीण अशितोष कुबल ( 9881471684 )



आमच्या शाळेतील ' अन्नपूर्णा ': सौ. समिता सुतार वहिनी

 ​ 🍽️ आमच्या शाळेतील ' अन्नपूर्णा ': सौ. समिता सुतार वहिनी 👩‍ ​          गेली काही वर्षे सौ. समिता सुतार वहिणी आमच्या शाळेत 'श...