🛑 ऊनसाळा
" ऋतू आला वसंत सांगायला हो , अन घुंगरु घ्या तुम्ही बांधायला " हे गाणे आम्ही खूप पूर्वी या मोसमात म्हणत असू. शाळेत शिकवत असू. मुले हे गाणे नाचून म्हणताना खूप आनंदित होऊन जात. वसंत ऋतू आला की निसर्गाच्या बदलाने तनमन प्रफुल्लित होऊन जाई.
सध्या वसंत ऋतू सुरु आहे. वातावरणात घडून येत असलेले बदल पाहून ऋतूच समजेनासे झाले आहेत. सकाळी लवकर उठून शाळेत जायची तयारी सुरु केली होती. आंघोळ करायला गेलो असेन , बाहेर पाण्याची टाकी ओव्हर फ्लो झाल्यासारखे वाटले. पण पावसाळ्यात जसा पाऊस पडतो तसा मुसळधार पाऊस सुरु झाला होता. शॉवरखाली मस्त थंड पाण्याचे भराभर फवारे घेत असताना बाहेर पावसाचा आवाज वाढत चालला होता. मी जणू पावसात न्हात असल्याचा अनुभव घेऊ लागलो होतो. एप्रिलच्या उन्हाळ्यात पावसाच्या सरी पडाव्यात हे खरे वाटत नव्हते. पण पाऊस धो धो कोसळत होताच. बाहेरचा दरवाजा उघडला तसा थंड वारा गडबडीने आत शिरला होता.
यावर्षी तिन्ही ऋतूंमध्ये पावसाने हजेरी लावल्याने कमालीचे आश्चर्य वाटत होते. पावसाळ्यात ठीक आहे , पण आता बारमाही पाऊस हे जरा जास्तच वाटत होतं. पण हे पावसाला माहीत नसावे. त्याने कदाचित कधीही बरसायचा विडा उचललेला असावा. असा हा अनाहूत पाऊस हिवाळ्यात पडला त्यावेळी आम्ही त्याला ' हिवसाळा ' म्हटले होते. आता तो उन्हाळ्यात कडाक्याचे ऊन पडण्याच्या दिवसात सकाळीच येऊन ठाण मांडून बसला होता. आता त्याला ' ऊनसाळा ' म्हटले तरी त्याला त्याचे काहीच वाटणार नव्हते. तो कुठे शाळेत जाणार होता शिकायला किंवा शिकवायला ?
शाळेत जायची घाई आणि पावसाची ही धिटाई. आलेयुक्त मस्त चहा समोर आला. गरमागरम असल्याने त्यावर फुंकर घालत पित पित पावसाच्या जाण्याची वाट बघितली. चहा पिऊन झाला आणि पाऊसही गेला.
मध्येच विजांच्या लख्ख रेषा आकाशात उजेड आणू पाहात होत्या. ' धुडूम म्हातारी ' जोराने ओरडत होती. ढगांच्या गडगडाटाला आम्ही ' घुडूम म्हातारी किंवा धुडूम म्हातारी ' म्हणत असू. लहानपणी आम्हाला या अक्राळविक्राळ म्हातारीची खूप भीती वाटे. तिच्या विचित्र असण्याची आम्ही विविध चित्रे मनात रंगवली होती. शाळेत गेल्यावर त्याचे शास्त्रीय कारण उमगले. वीजबाईने तोपर्यंत आमच्या शरीरातली वीज घालवून टाकली होती.
गडबडीत शाळेत निघालो. गाडीवर स्वार झालो. गाडीने आज आंघोळ केली होती. ती स्वच्छ दिसत होती. गाडी सुरु झाली. थोडे अंतर गेलो असेन , तोवर पुन्हा पावसाचे थेंब अंगावर कोसळत आहेत असे वाटले. मागे येऊन रेनकोट घ्यावा लागला.
सध्या छत्री आणि रेनकोट कधी लागेल सांगता येत नाही. त्यामुळे ते लवकर हाताला मिळतील अशा जागी मुद्दाम ठेवावे लागतात.
नेहमीप्रमाणे भरधाव निघालो. दहा पंधरा मिनिटे पाऊस सोबत करत होता. मस्त वाटत होतं. शाळेत जाणाऱ्या मुलांची , शिक्षकांची पावसाने त्रेधातिरपीट उडवून टाकली होती. मी आपला रेनकोट असल्याने मजेत निघालो होतो. पुढेही पाऊस पडून गेल्याची चिन्हे दिसत होती.
नंतर दिवसभर पाऊस दडून बसला होता. रात्रीच्या भोजनाच्या वेळी तो पुन्हा गडगडाट करत आलाच. थोड्या वेळापूर्वी जवळ वाढदिवसाच्या निमित्ताने कोणीतरी फटाके वाजवले होते. फटाक्यांच्या आवाजाने पुन्हा पावसाला धडामधुडूम करत यावेसे वाटले. तो बाहेर बरसत राहिला तसा मीही शब्दरूपाने तसाच बरसत राहिलो.
©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 )

Very nice
ReplyDeleteथँक्स
ReplyDeleteBery nice
ReplyDelete