🛑 वर्सलीची सल
सध्या वर्सल संस्कृती वाढत चालली आहे. माफ करा. मला संस्कृती नव्हे पद्धती म्हणायचे आहे , पण ती संस्कृती असल्याप्रमाणे रुजू पाहत आहे. म्हणून आपसूकच तसा विचार येऊन गेला. काय आहे ही वर्सल ? मुळात हा शब्द इंग्रजी आहे की मराठी तेच समजताना कठीण जातंय. तसा तो शब्दकोशात न सापडणारा शब्द आहे. वर्सल हा शब्द वर्षलचे अपभ्रंश रुप असावे असे वाटते. वर्षल म्हणजे दरसाल. प्रत्येक वर्षी.
आपण सर्रास वर्सल हा शब्द वापरुन मोठमोठ्या घरात या पद्धतीने धार्मिक कामे करण्याची प्रथा सुरु केलेली दिसून येत आहे.
पूर्वी आपली एकत्र कुटुंब पद्धती होती. त्यात एकाच घरात अनेक कुटुंबे राहात असत. आजी, आजोबा त्यांचे मुलगे , त्यांच्या सुना , त्यांची नातवंडं , त्यांची पतवंडं आणि त्यांची खापर पतवंडं !!! ( हे जरा जास्त होत असेल तर पुढचं वाचू नका.) ही एवढी मंडळी घरात असे. ज्यांची लग्ने झालेली नसत , त्यांचाही समावेश यात असे. त्यामुळे घरातल्या माणसांची संख्याही वाढतच राही.
पूर्वी एखादा पुरुष दोन , तीन विवाह करत असे. त्यामुळे होणाऱ्या मुलांची संख्या वाढत जाई हे आणि वेगळेच. त्यामुळे एखादे कुटुंब शंभर माणसांचेही असू शकते हा ! त्याहीपेक्षा जास्त सदस्यसंख्या असण्याची संख्या नाकारता येत नाही.
त्यावेळी ' हम दो , हमारे दो ' चा नारा आला नव्हता. तो आल्यानंतर तो नारा पाळला जाऊ लागला कदाचित. त्यामुळे कुटुंबातील सदस्यांची संख्या कमी कमी होऊ लागली. ही सगळी एका कुटुंबातील एवढी मंडळी एकाच छताखाली राहात होती आणि एका चुलीवरचे जेवण जेवत होती. एखादे घर म्हणजे एखादी शाळा म्हटली तरी ते चुकीचे ठरु नये. ही माणसं एकमेकांसाठी जीवाला जीव देणारी असत. ' मी माझा ' असा संकुचित विचार त्यांनी त्यावेळी करायला सुरुवात केली नसेल. त्यावेळी शिक्षणाचा प्रसार झालेला होताच. काही सुशिक्षित , काही अर्धशिक्षित , काही साक्षर तर काही निरक्षर अडाणी असली तरी एकत्र राहण्याची संस्कृती त्यांच्यात जन्मापासूनच रुजली होती.
हळूहळू ही ' एकत्र कुटुंब संस्कृती ' लोप पावताना दिसू लागली. तिने ' विभक्त कुटुंब ' ची जागा घेतली. कर्ते सवरते कुटुंबप्रमुख यातून निखळत गेले. एका घराची दहा दहा घरे झाली. मी , माझी बायको आणि फक्त माझीच मुलं हेच सदस्य त्यात दिसू लागले. त्यात ' हम दो हमारे दो ' हे वाक्य सतत पाठ करत राहिल्यामुळे प्रत्येक कुटुंबात चारच सदस्य जास्तीत जास्त दिसू लागले. कोणी नोकरीनिमित्त , व्यवसायनिमित्त घराबाहेर पडले होते. गेले तिथे आपापला राजा राणीचा संसार थाटून मोकळे झाले होते. कधीतरी आपल्या मुळघरी आलेच तर परत जाण्यासाठीच. पूर्वी महिन्याने घरी येणारे , नंतर तीन , सहा , नऊ आणि बारा महिन्यांच्या फरकाने येत राहिले. आता त्याची वर्षेही झाली असतील. घर सोडून जाताना लहान असलेली मुले लग्न होऊनच किंवा आपली मुलंबाळं घेऊनच येताना दिसत आहेत. घराचे आणि त्यांचे ऋणानुबंध नावापुरतेच किंवा समाजाला दाखवण्यापुरतेच राहिलेत की काय असा प्रश्न पडावा.
आता ही वर्सल ही पद्धती त्यातूनच जन्माला आली. एकटया कुटुंबप्रमुखानेच खर्च का करावा ? असे म्हणत त्या खर्चाचे विभाजन करण्याचे सूत्र आले. झालेला खर्च वितरित होऊ लागला. त्याहीपुढे जाऊन आता दरसाल एकाने खर्च करण्याचीही प्रथा अस्तित्वात येऊ लागली. त्यामुळे सर्व सण एका वर्षात एकानेच साजरे करण्याचे आगळेच सूत्र या माणसांनी सुरु केले.
यंदा गणपती मोठे बाबा आणणार , पुढच्या वर्षी मधले , त्याच्या पुढच्या वर्षी ....... असा गणपतीही विभागाला गेला. दरवर्षी वेळ असला तर कुटुंबातील सर्व मुले , माणसे येतात , नाहीतर त्यांची वर्सल असली तरच येतात. या वर्सल पद्धतीमुळे काही गोष्टी सोयीच्या झाल्या असतील. पण त्यात नातेसंबंधांची ताटातूट झालेली आहे हे कटुसत्य आहे. आजी , आजोबा , आत्या , काका , काकी , चुलत भावंडं आणि बरीच माणसे परकी होत चालली आहेत. नाती जपायची म्हणून चाललेला त्यांचा केविलवाणा प्रयत्न लक्षात येऊ लागला आहे. ' हे माझे , तेही माझेच ' या भांडणात आपलेपणाचा लवलेश निघून जात चालला आहे. या ' वर्सल ' नावाच्या अभिनव पद्धतीने नाती कोलमडली आहेत. पूर्वीचा निरागस जिव्हाळा राहिलेला नाही. जिव्हाळा आहे पण तो बेगडी म्हणजे दाखवण्यापुरताच राहिला आहे याची सल लागून राहिली आहे.
©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 ) कणकवली.

No comments:
Post a Comment