Thursday, July 23, 2026

🔴 ब्रह्मचैतन्य आणि पूर्णब्रह्म

🔴 ब्रह्मचैतन्य आणि पूर्णब्रह्म

          "आपल्यामध्ये धर्म आचरणाचा गुण असायला हवा," असे माझी आजी नेहमी सांगायची. ती केवळ सांगायची नाही, तर स्वतः तसे जीवन जगत होती. ती सातत्याने दानधर्म करायची. परिस्थिती अत्यंत गरिबीची होती, तरीही तिचे मन मात्र एखाद्या राजासारखे दानशूर होते. रोज कोणाला ना कोणाला काही ना काही मदत केल्याशिवाय तिचा दिवस जात नसे.

          आमचे घर अगदी खेड्यातले... मातीचे ते छोटेसे घर! पण त्या घरात आमचे सगळे कुटुंब अत्यंत आनंदात आणि प्रेमात एकत्र राहायचे. माझी आजी जे असेल त्यात कायम समाधानी असायची. पोटी जन्माला आलेल्या आपल्या नवरत्नांना तिने अतिशय कष्टाने आणि प्रेमाने सांभाळले. हे करत असतानाच, घरावरून जाणारे-येणारे पांथस्थ (प्रवासी) तिच्या हातची उकडी पेज आणि मीठ-भाकरी खाऊन तृप्तीचा ढेकर देऊन जायचे. तिने केलेल्या याच पुण्याची गोड फळे आज आम्ही सगळे भोगत आहोत. आम्ही तिला मायेने 'म्हातारी आये' म्हणत असू.

          नुकतीच मी युट्यूबवर श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्यावर आधारित एक लघुपट (Short Film) पाहिली. त्यात एका खानावळ चालवणाऱ्या मुलाची गोष्ट होती. त्याचे वडील गोंदवलेकर महाराजांचे परमभक्त होते. ते सतत ‘श्रीराम जय राम जय जय राम’ या नामाचा जप करत असत. त्यांची वही या जपाने पूर्ण भरून गेली होती. पण काही काळाने ते ब्रह्मलीन झाले. वडिलांनंतर मुलाने खानावळ चालवायला घेतली; परंतु वडिलांचे विचार आणि आचरण मुलाला अजिबात मान्य नव्हते. वडिलांनी हयातीत खानावळीच्या बाहेर एक पाटी लावली होती— ‘भुकेलेल्याला कधीही नाही म्हणायचे नाही.’ पण मुलाने वडिलांच्या पश्चात ती पाटी काढून टाकली आणि तिथे ‘आज रोख, उद्या उधार’ अशी पाटी लावली. एवढेच नाही, तर कालच्या उरलेल्या वरणाला पुन्हा फोडणी देऊन शिळे अन्न गिऱ्हाइकांना देण्याइतकी त्याची वृत्ती घसरली होती.

          एकदा त्याच्या खानावळीत एक वृद्ध बाबा आले. त्यावेळी मुलगा एकटाच तिथे होता. त्या वृद्धाने आपल्याला खूप भूक लागल्याचे सांगून जेवणाचा आग्रह धरला. मुलाने नाइलाजाने कालच्या शिळ्या वरणाला फोडणी देऊन त्यांना खायला दिले. त्या म्हाताऱ्या बाबांनी पहिल्याच घासात अन्नाची बदललेली चव ओळखली. त्यांनी त्या मुलाच्या वडिलांच्या हाताच्या चवीचे आणि त्यांच्या अन्नदान धर्माचे कौतुक केले. जेवून झाल्यावर बाबांनी पैसे काढले, पण मुलाने पैसे घेण्यास नकार दिला. म्हणून त्या वृद्धाने मुलाच्या हातात एक जपमाळ दिली आणि ते निघून गेले.

          ते वृद्ध बाबा गेल्यानंतर मुलाने सहज म्हणून वडिलांची ती नामावळीची वही उघडली. तो पाने चाळू लागला. वहीच्या शेवटच्या पानावर वडिलांनी लिहून ठेवले होते— ‘महाराज, तुम्ही माझ्या खानावळीत कधीतरी जेवायला या...’

         आणि आज प्रत्यक्ष श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजच त्या वृद्धाच्या रूपात त्याच्या खानावळीत जेवून गेले होते! हे लक्षात येताच तो मुलगा अवाक झाला, त्याचे डोळे उघडले. पश्चात्तापाने भरलेल्या मनाने त्याने पुन्हा आपल्या वडिलांचा तोच अन्नदानाचा वारसा आणि आचरण स्वतः सुरू केले.

          देव किंवा संत कुठे वेगळे नसतात; आपल्या रोजच्या आयुष्यात भेटणाऱ्या माणसांमध्येच ते वसलेले असतात. आपल्याला फक्त ते ओळखता आले पाहिजे!

         माझ्या आजीने हा भाव अगदी पक्का ओळखला होता. म्हणूनच, आजिबात अतिशयोक्ती नाही—आजही तुम्ही आमच्या गावाकडच्या घरी गेलात, तर जेवल्याशिवाय किंवा तृप्त झाल्याशिवाय बाहेर पडूच शकत नाही. आजीने पेरलेला हा अन्नदानाचा आणि अतिथीसत्काराचा वारसा आमच्या घरात आजही तितक्याच श्रद्धेने सुरू आहे, याचा मला सार्थ अभिमान वाटतो.

🔹 लेखन : प्रवीण अशितोष कुबल, कणकवली




Sunday, February 15, 2026

आमच्या शाळेतील ' अन्नपूर्णा ': सौ. समिता सुतार वहिनी

 ​🍽️ आमच्या शाळेतील ' अन्नपूर्णा ': सौ. समिता सुतार वहिनी 👩‍

​          गेली काही वर्षे सौ. समिता सुतार वहिणी आमच्या शाळेत 'शालेय पोषण आहार' शिजवण्याचे पवित्र काम करत आहेत. पण आमच्यासाठी त्या केवळ कर्मचारी नाहीत, तर त्या खऱ्या अर्थाने आमच्या शाळेच्या 'अन्नपूर्णा' आहेत! 😇

          ​त्यांच्या हाताला इतकी अप्रतिम चव आहे की, जो तो त्यांच्या पदार्थांची स्तुती केल्याशिवाय राहत नाही. 😋 आमचे केंद्रप्रमुख तर त्यांनी बनवलेल्या 'कांदेपोह्यांचे' इतके चाहते आहेत की, ते नेहमीच त्याचं मुक्तकंठाने कौतुक करतात. 🥣

✨ प्रेमाचा ओलावा आणि मातृत्व

          त्यांच्या जेवणात एक वेगळीच गोडी असते, कारण ते त्यांनी केवळ ड्युटी म्हणून नाही, तर अगदी मनापासून बनवलेलं असतं. 🌸 "शाळेतली ही सर्व मुलं आपलीच आहेत," या मातृत्वाच्या भावनेतून त्या स्वयंपाक करतात. त्यामुळेच त्यांनी शिजवलेल्या प्रत्येक घासात त्यांचं प्रेम उतरतं. 🧒👧

🦋 निर्मळ स्वभाव आणि शिस्त 

          वहिनींचा स्वभाव अत्यंत हळवा आणि मृदू आहे. त्यांच्या कामाचं कोणी कौतुक केलं की, त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद द्विगुणित होताना मी अनेकदा पाहिला आहे. 😊 विशेष म्हणजे, त्यांना कधीच कामाबद्दल सूचना द्यावी लागत नाही. त्यांचं काम अत्यंत नीटनेटके आणि वेळेत असतं. 🕒 सगळा व्याप एकट्यालाच सांभाळावा लागत असला, तरी कपाळावर आठी न आणता त्या नेहमी हसतमुख चेहऱ्याने काम करताना दिसतात. ✨

📚 एक आदर्श माता

          त्या स्वतः खूप हुशार आहेत आणि आपली दोन्ही मुलं अभ्यासात अन् इतर उपक्रमात नेहमी पुढे असावीत, यासाठी त्या भक्कमपणे मुलांच्या पाठीशी उभ्या असतात. 💪 मुलांच्या प्रत्येक शालेय सादरीकरणाचं सोनं करण्यात वहिनींचा सिंहाचा वाटा असतो. 🏆

​🤗 एक जिव्हाळ्याचं नातं

          आपल्या माहेरच्या माणसांवर - आई-वडील आणि भावावर - असलेलं त्यांचं प्रेम त्यांच्या बोलण्यातून ओसंडून वाहतं. 🥺 आपलं घर आणि माहेर नेहमी सुखात राहावं, यासाठी त्या अहोरात्र झटताना दिसतात. शाळेतील सर्व मुलांशी त्यांचं मायेचं बोलणं असतं आणि सर्व शिक्षकांशी त्या अत्यंत आदराने वागतात. 🙏

          ​रक्षाबंधन किंवा भाऊबीज असली की, आमच्या शाळेतील शिक्षिकांसोबत वहिनी सुद्धा आम्हा शिक्षकांना ओवाळतात. 🎁 त्यामुळे शाळेत आम्ही सर्व कर्मचारी एका कुटुंबासारखे, भाऊ-बहिणीच्या नात्याने वागतो. शाळेच्या वतीने आम्ही अनेकदा त्यांचा सन्मान केला आहे. त्यांना सत्कार नको असतो, तरीही आम्ही तो आग्रह धरतो. अशा वेळी त्या स्वतःचं मनोगत व्यक्त करतात, एखादं सुंदर गाणं म्हणतात... 🎤 यावरून त्यांचं शाळेवर किती प्रेम आहे हेच सिद्ध होतं. 🤝

😔 मनातील मळभ

          ​प्रत्येक वेळी सन्मान करता आला नाही तरी त्यांची काहीच अपेक्षा नसते. पण जेव्हा कधी त्या दुःखी दिसतात, तेव्हा शाळेचा मुख्याध्यापक म्हणून मला खूप वाईट वाटतं. 😟 त्या आपलं दुःख लपवण्याचा प्रयत्न करतात, पण गेल्या अनेक वर्षांच्या ओळखीमुळे त्यांच्या मनातील अस्वस्थता चटकन जाणवते.

          ​गेले तीन-चार दिवस त्या म्हणाव्या तशा आनंदात दिसत नाहीत. ⛈️ त्याचं काय कारण आहे, हे कदाचित त्या स्वतःच सांगू शकतील. त्यांनी ते मनातील दुःख बोलून मोकळं व्हावं, अशी माझी मनापासून इच्छा आहे. कारण त्यांचं हसणं हेच आमच्या शाळेचं चैतन्य आहे! 🌟

✍️ लेखन: प्रवीण अशितोष कुबल

Thursday, January 15, 2026

🔴 ब्रह्मचैतन्य आणि पूर्णब्रह्म

🔴 ब्रह्मचैतन्य आणि पूर्णब्रह्म           "आपल्यामध्ये धर्म आचरणाचा गुण असायला हवा," असे माझी आजी नेहमी सांगायची. ती केवळ सांगायची...