Thursday, April 7, 2022

🛑 भाव अंतरीचे हळवे

🛑 भाव अंतरीचे हळवे

          सगळे शिक्षक नाटक सुरु होण्याची वाट बघत होते. त्या दिवशी वीजबाईने मात्र हिरमोड केला होता. ती एक दोन वेळा गायब झाली होती. आमच्या शिक्षक मित्रांचा दशावतार पाहण्यासाठी आम्ही उत्सुक आणि आतुर झालेले होतो. आणि एकदाचे नाटक सुरु झाले होते.

          पात्रे परिचय सुरु झाला होता. त्यावेळी अंगात दशावतार संचारु लागले होते. सगळे प्रेक्षागृह भारावले गेले होते. सुनिल गावकरबुवांची बोटे पेटीवर वेगाने फिरु लागली होती. त्यांचा तिसऱ्या पट्टीतील आवाज रंगमंचाच्या आसमंतात घुमू लागला होता. ते तल्लीन होऊन गात होते. माझे शिक्षक स्वतःचा दशावतार सादर करत होते , याचा मला सार्थ अभिमान वाटत होता. प्रथमेश तांबे आणि उत्तम कदमांनी त्यांना उत्तम साथ दिली होती. 

          दिनेश सुद्रीकसरांनी केलेली रंगमंच व्यवस्था साजेशी होती. खूप कमी वेळात त्यांनी व्यासपीठाचे रूपांतर रंगमंचात केले होते. लेखक आणि दिग्दर्शक सुभाष तांबे गुरुजींनी केलेले मार्गदर्शन नाटक बघताना तोंडात बोट घालायला भाग पाडत होतं. सर्व कलाकार शिक्षकांकडून त्यांनी त्यांच्या भूमिका अचूक वटवून घेण्यात बाजी मारली होती. कोणालाही स्टेजमागून प्रॉमटिंग केलेले दिसत नव्हते. सर्वच कलाकारांनी आपापल्या भूमिका चांगल्या रितीने वटवलेल्या दिसत होत्या. 

          संतोष तांबे यांनी साकारलेला भ्रमरासुर खरा भ्रमरासुर वाटत होता. त्यांची वेशभूषा , रंगभूषा , आवाजाची शब्दफेक , रंगमंचावरील वावर अप्रतिमच म्हणायला हवा. त्यांच्या प्रवेशाला जबरदस्त टाळ्यांचा कडकडाट झाला होता. 

          नाटक सुरु झालं होतं. मी जवळून शुटींग करत होतो. अचानक प्रेक्षागृहातूनच मला एका शिक्षकमित्राचा फोन आला होता. भ्रमरासुराची भूमिका करणारे कोण आहेत असे मला त्यांनी विचारले होते. इतके संतोष तांबे ओळखले जाऊ शकत नव्हते. याचा अर्थ त्यांनी साकारलेला भ्रमरासुर खराखुरा असुर ठरला होता. संतोष तांबे हे एक गुणी प्राथमिक शिक्षक आहेत. ते आमच्या किर्लोस आंबवणे गावच्या शाळेत होते. तेव्हापासून मी त्यांना ओळखतो. त्यांनी आमच्या गावातील अनेक विद्यार्थी घडवले आहेत. 

          कोणत्याही नाटकात नारदाची भूमिका करणारा कलाकार अवलिया लागतो. त्याच्यावर सर्व नाटकाची भिस्त असते. आपल्या महेंद्र पवारांनी  नारदाची इन्ट्री घेतली तेव्हा झालेला जल्लोष त्यांच्या कलेला केलेला सलामच होता. कसले भारी दिसत होते ते !!!  त्यांची मान हलवण्याची व हसण्याची पद्धत खऱ्या नारदालाही लाजवणारी होती. त्यांचे दशावतारी भाषेवर असलेले प्रभुत्व उल्लेखनीय होते. 

          त्यानंतर ब्रम्हराक्षस मोठ्या हास्याचा स्फोट करत आला होता. हा कोण आहे हे ओळखेपर्यंत ' मंगेश राणे ' सरांच्या नावाने टाळ्या आणि शिट्या वाजू लागल्या होत्या. त्यांनी केलेले युद्धनृत्य पुन्हा पुन्हा पाहावे असे होते. 

          कार्यक्रमाच्या दीपप्रज्वलन समारंभात ज्यांच्या बासरीवादनाने प्रेक्षक शिक्षक मंत्रमुग्ध होऊन गेले होते ते सदाशिव राणेसर. नाटकात त्यांनी मारुतीची भूमिका उत्तम प्रकारे वटविली. सदाशिव सरांच्या सुप्तगुणांचा हा मुक्त आविष्कारच होता. 

          चंद्रकेतू राजाची भूमिका राजा भिसे सरांनी राजासारखी निभावली. खरंच राजा भिसे सामान्य जीवनात राजाच आहेत. चंद्रवंदना साकारणारा मसुरकर हा मूळ दशावतारी कलाकार होता. त्याने आमच्या सर्व कलाकारांना जे सांभाळून घेतले त्याबद्दल त्याला धन्यवाद द्यावे तितके थोडेच असतील. सुसंस्कृत स्त्रीच्या सर्व लकबी पाहताना हा पुरुष आहे असे कधीही वाटले नाही. 

          दशावतारी नाटकाची संकल्पना राबवणारे शिक्षक नेते गिल्बर्ट फर्नांडिस , तालुकाध्यक्ष विनायक जाधव , तालुका सरचिटणीस सुशांत मर्गज यांनी घेतलेल्या मेहनतीचे ' भ्रमरासुर वध ' हे नाटक म्हणजे मधुर फळच म्हणायला हवे. पडद्याआड असणारे व पडद्यासमोर राहून नाटक पाहणारे शेवटपर्यंत थांबून असल्यामुळे नाटकाला चार चांद लागले. एक अविस्मरणीय नाट्यप्रयोग नाट्यगृहानेही नक्कीच पाहिला असेल असे म्हटले तरीही वावगे ठरु नये. 

          मी राधानगरीला एका गोंधळाला आलो असताना तिथे अजित कडकडेचे गाणे लागले होते. " तुझे नाम आले ओठी , सूर भारावले "  हे गाणे ऐकत असताना या ओळी ऐकायला मिळाल्या. " भाव अंतरीचे हळवे , जसे जुई फुल , स्वतःच्याच सुगंधाची स्वतःलाच भूल " या ओळी ऐकल्या आणि आमच्या समितीच्या कलाकारांचा नाट्यप्रयोग डोळ्यासमोर जसाच्या तसा उभा राहिला. खरंच प्रत्येकाच्या अंतरीचे भाव असेच हळवे असायला हवे , तर आणि तरच स्वतःच्या सुगंधाची भूल पडून असे विलक्षण ' न भूतो , न भविष्यति ' नाट्य घडू शकते.

©️ प्रवीण अशितोष कुबलसर

( 9881471684 )



13 comments:

  1. अतिशय अभ्यासपूर्वक लेखन
    आपल्या कार्याला सलाम सर

    ReplyDelete
  2. अप्रतिम लेखन सर. हुबेहुब दशावतार डोळ्यासमोर उभा राहिला.

    ReplyDelete
  3. धन्यवाद साऱ्यांचे

    ReplyDelete
  4. आदरणीय कुबलसर
    आपले लेखनात इतका जिवंतपणा असतो. वाचताना प्रसंग डोळ्यासमोर उभा राहिलाच पाहिजे इतकी शक्ती आपल्या लेखनात आहे. धन्यवाद
    आमचं भरभरून कौतुक केल्याबद्दल

    ReplyDelete
  5. अतिशय सुरेख शब्दांकन सर👌👌

    ReplyDelete
  6. फारच सुंदर लेखन सर

    ReplyDelete
  7. प्रवीण,
    खुपच वास्तवदर्शी शब्दांकन !
    तुझी साहित्यिक क्षमता वादातीत आहे. मनःपूर्वक धन्यवाद ! लिहीत राहा! मनःपूर्वक सदिच्छा !💐💐💐

    ReplyDelete
  8. सुंदर लेखन सर

    ReplyDelete

💖 भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये एक अविस्मरणीय सायंकाळ 💖

 💖 भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये एक अविस्मरणीय सायंकाळ 💖           कणकवली येथील भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये कीर्तन महोत्सवाच्या निमित्...