🛑 हृदयी वसंत फुलताना
' अशी ही बनवाबनवी ' हा चित्रपट अनेकदा पाहिला असेन. त्यातील एक गाणं शरीर आणि मन दोघांनाही प्रसन्न करुन टाकतं. ' हृदयी वसंत फुलताना , प्रेमास रंग यावे ' हे शब्द कानी पडले की प्रत्येकाच्या मनात प्रेमरंग फुलत असतील. कवी शांताराम नांदगावकर यांनी किती निसर्गरम्य भाव या काव्यात पेरले आहेत !
निसर्ग आपलं चक्र सुरु ठेवत असतो. तसंच ऋतुचक्र फिरत राहतं. वसंताने या चक्राची सुरुवात होते. जणू सृष्टीवर नवचैतन्य पसरतं. झाडे , वेली , फुले , फळे आनंदाने डोलू लागतात. नवी हिरवाई जन्माला येत असते. शिशिर संपताना ' आला शिशिर संपत , पानगळती सरली ' हे कवयित्री इंदिरा संतांचे शब्द आठवू लागतात.
निसर्ग एक किमयागार आहे हे पटतं. धरतीला नवा शालू नेसून राहायचे असते. धरणी प्रफुल्लित होऊन वसंत ऋतूच्या आगमनाची आतुरतेने वाट बघत असते. झाडांना नवी पालवी फुटताना पाहून निसर्गदेवतेला सलाम करावासा वाटतो. पक्षी गुंजन करु लागतात. त्यांनाही निसर्ग बदलाची चाहूल लागलेली असते. ती त्यांच्या आनंदाची शीळ असते. त्यांचं कर्णमधुर गायन कान तृप्त करुन टाकणारं असतं.आपण सर्व पृथ्वीवासी मंत्रमुग्ध होऊन जातो. गुढ्या , तोरणे उभारुन वसंताचे स्वागत केले जाते. एक नवीन आशेचा किरण सर्वांनाच खुणावू लागतो. प्रत्येकाच्या रोमारोमात वसंत संचारु लागतो. वसंत पंचमी उत्साहाने साजरी केली जाते. निसर्गाने केलेली पुष्पपर्णाची उधळण सर्वांचं मन मोहवून टाकते.
खेड तालुक्यातील जामगे सीमावाडी शाळेत शिक्षक होतो. जाता येताना वसंत खुल्या दिलाने माझे स्वागत करत असे. घनदाट वनराई , चिंचोळी वाट आणि मी एकटा. पण माझ्यासोबत वसंत नक्कीच सोबत करत असे. त्याने माझ्या निराशा घालवलेल्या असत. एकाकी जीवनाला पालवी देत चैतन्य निर्माण करणारा तोच तर होता.ऊन मी म्हणत असताना त्याची तीव्रता या वसंताने कमी केली होती. सर्व झाडे मला फळे काढण्यासाठी वाकून सांगत असत , " आमची फळे काढा हो , आम्हाला ती जड झालीत. " मी मग एखादा आंबा काढत असे. घरी त्याचे लोणचे होई. भाताबरोबर ते खाताना जणू वसंताची चव जिभेवर तरळत राही. खूप गोड आठवणी होत्या त्या.
शाळेत येताना मुले जास्वंदीची भरपूर फुले आणत. त्यांचा पुष्पहार शारदेला घालताना वसंताची माळ अर्पण केल्याचा आनंद होऊन जाई.सावरीच्या , पळसाच्या झाडाखाली फुलांचा सडा बघून त्यावर अलगद पाय ठेवताना गुदगुल्या होत.
परीक्षेचे वातावरण सुरु झालेले असे. एखाद्या बुटक्या झाडावर बसून अभ्यास करण्याची मजा काही औरच असे. दुपारनंतर वाडीतील पोरेसोरे गोळा होत. आंब्याचे , करवंदांचे खिरमाट बनवत. ते आंबटगोड असे. त्याची लज्जत आता येत नाही. तो वसंत वेगळाच होता.
परशुराम पांचाळ बुवांची भजने ऐकताना मंगलाचरण सुरु होई. ' आला वसंत घ्यारे नाम , हरी जय जय राम ' त्यात ते वसंत ऋतूत रामाला आळवावे असे सांगत. लवकरच रामनवमी , हनुमान जयंती साजरी होई. वासंतिक सुंठवडा मिळे.
वासंतिक व्याख्यानमाला सुरु होत. दिग्गज लेखक , कवींची व्याख्याने ऐकताना बौद्धिक वसंत फुलत राही. एखाद्या शाळेत मुले शिक्षकांना कलमाचे हापूस आंबे आणून देत. कदाचित त्या मुलांचा असा समज असेल की हे आंबे दिल्यानंतर आपले गुरुजी आपल्याला चांगल्या गुणांनी पास करतील. पिवळ्या रंगांची प्रगतीपत्रके बघून त्यांच्या मनाचा मोर नाचू लागे.
असा हा विविध रंगांचा आणि ढंगांचा वसंत ऋतू नित्यनेमाने येतच राहणार आहे. तो प्रत्येकाच्या आयुष्याचे सोने करु पाहत असतो. तो आपल्या जीवनाचे सोने करतोय हे समजण्याइतका आपला सकारात्मक दृष्टिकोन असला म्हणजे झाले.
©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 ) कणकवली

No comments:
Post a Comment