🛑 गोंधळ : देवीचा एक परिपूर्ण जागर
काल आमच्या नातेवाईकांच्या लग्नाच्या गोंधळाला उपस्थित होतो. तसा हा माझ्या आयुष्यातील पहिला गोंधळ असेल. गोंधळाची गाणी ऐकली होती. जोगवा चित्रपट बघितला होता. अनेकदा गोंधळ झाल्यावर जेवायला गेलो असेन. संपूर्ण गोंधळ बघायला मिळाला नव्हता.
माहूरची रेणुका , तुळजापूरची तुळजाभवानी , कोल्हापूरची अंबाबाई यांना बोलावणे धाडत गोंधळ मांडला जातो. माझे गोंधळ्यांच्या प्रत्येक गोष्टीकडे लक्ष होतं. त्यांनी सुंदर मांडणी केली होती. खणावर रांगोळीसारखे तांदळाचे यंत्र तयार करण्यात आले होते. दिवट्या पेटवल्या होत्या. कापडाचे काकडे बनवले होते. पाच ऊसाच्या दांड्या उभारण्यात आल्या होत्या. मध्यावर कलश ठेवण्यात आला होता. सुके खोबरे , नागवेलीची पाने , सुपाऱ्या , लिंबू , खारीक , बदाम , केळी , फळे आणि इतर पुजा साहित्य मांडून छान सजावट करण्यात आली होती.
बाहेर बोकड ओरडत होता. त्याचा बळी द्यायची वेळ आली होती. त्याचा काळही जवळ आलेला मला दिसत होता. त्याला देवीचा भंडारा लावण्यात आला. काहीच मिनिटांत त्या बिचाऱ्या बोकडाचा बळी देण्यात आला होता. त्याचे ओरडणे कायमचे थांबले होते. त्यावेळी मला एक ओळ सुचली होती , " देवीला शरण आणि बोकडाचं मरण "…
देवीच्या गोंधळात बोकडाच्या जीवावर आलेले दिसले. त्याच्या जीवनाचा गोंधळच झाला होता. परंपरेने चालत आलेल्या रूढी माणसं जोपासत होती. बोकडाचं मुंडकं आणि पाय हे अवयव देवीला वाहण्यात आले होते.
जोगवा मागणे सुरु झाले होते. सात ते नऊ घरांमध्ये यजमान गेले होते. त्यांनी प्रत्येक घराच्या दारात जाऊन ' जोगवा ' मागितला होता. जोगवा पूर्ण झाला होता. त्यानंतर देवीला गोंधळाला येण्यासाठी आळवणी करण्यात आली होती. त्यासाठीची गाणी गोंधळी बुवांनी ठसक्यात म्हटली होती. संबळ वाजवत गाणी तालासुरात म्हटली जात होती.
या गोंधळी समाजातील कलाकारांचे आवाज कर्णमधुर असतात. वेगळ्या धाटणीचा आवाज , चाली यामुळे माझ्यासारखा माणूस तिकडे आकर्षिला जातो. मी त्यांची सर्वच गाणी ऐकत राहिलो होतो. आता त्यांनी काही नवीन गाणीसुदधा म्हटली होती.
मला त्यावेळी कणकवलीच्या ' पाचंगे ' गोंधळी यांची आठवण आली होती. त्यांचे खायच्या पानांचे दुकान होते. मी लहान असताना त्यांच्या दुकानातून बाबांसाठी पाने घेऊन येत असे. त्यांचे काही ग्रुप असत. एप्रिल , मे या दरम्यान अनेक गोंधळ असत. त्यावेळी हे सगळे ग्रुप आमच्या सलूनमध्ये केस दाढी करण्यासाठी येत असत. त्यात किसन नावाचे एक गोंधळी खूप चांगले होते. त्यांचा आवाज सुरेल होता. गळ्यात सूरपेटी घालून ते गाणे म्हणत. ते आता हयात नाहीत. त्यांच्या आठवणी माझ्या मनात हयात आहेत. त्यात एक ' संतु ' नावाचा गोंधळ्यांच्या संबळवादक होता. त्याचा चेहरा कायम हसरा दिसे. त्याला कितीही बोला , त्याची कितीही चेष्टा करा , तो हसतच राही. तो आता कुठे हसत असेल देव जाणे ?
प्राध्यापक हरिभाऊ भिसे यांची गोंधळाची गाणी ऐकली आहेत. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कणकवली कॉलेज कणकवलीचे ते अभ्यासकेंद्र प्रमुख होते. अक्षरसिंधु संस्थेचे ते पदाधिकारी आहेत. त्यांनी ही परंपरा जपली आहे.
लोककलाकार छगन चौगुले यांच्या अनेक कथा ऐकल्या आहेत. लोककला जोपासना करताना यांना सलाम केलाच पाहिजे.
गोंधळ बघताना मी नवीन पाहतोय म्हणून आश्चर्याने भारावून गेलो होतो. गोंधळाचा विधी साग्रसंगीत पार पडला होता. हा दिवसाचा गोंधळ असल्यामुळे ' आख्यान ' झाले नाही. आरती व पाळणा गीते झाली. त्यातील शिवाजीचा पाळणा विशेष होता.
दुपारी शाकाहार झाला होता. सायंकाळी किंवा रात्री लोकांनी त्या बोकडाचे मटण प्रसाद म्हणून घेतले होते. कार्यक्रम अतिशय सुंदर , नियोजनबद्ध झाला होता. तरीही माझ्या डोळ्यासमोरुन तो बोकड काही जाता जात नव्हता. मीही या सर्व घटनेचा साक्षीदार असल्यामुळे श्रद्धा आणि अंधश्रद्धा याबाबत मला काहीही लिहिणे शक्यच होत नाही. मी सपशेल माघार घेतो आहे.
©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 )

No comments:
Post a Comment