Showing posts with label माझा गाव आणि मी. Show all posts
Showing posts with label माझा गाव आणि मी. Show all posts

Friday, April 7, 2023

ओढ गावाची

         प्रत्येकाला आपला गाव आवडत असतो. ज्या गावात आपला जन्म झाला , तोही आपलाच गाव असं आपल्याला वाटत असतं. अर्थात जन्मस्थळ आणि गाव यांत साम्य असलं तर त्या गावाविषयी आपल्याला कमालीची ओढ असते. नव्हे ती असायलाच हवी. आपल्या गावाशी आपली नाळ जोडलेली असते. त्या गावातील आठवणी आपल्याला सतत गावाची ओढ तीव्र करत राहतात. 

        ' गड्या आपला गावच बरा ' असं म्हणणारी अनेक माणसं मी बघितली आहेत. त्यांना हे सतत कळत असतं . गावात आले कि त्यांना शहराचा विसर पडतो. रजा संपत आली कि पोटात भला मोठा गोळा येतो. शहराकडे जाताना पावले जड होत जातात. शेवटी आपल्या मातृभूमीला सोडताना जणू आईलाच पारखे होत असल्याचा अनुभव येत असतो. गावातील ते अविस्मरणीय क्षण आठवले कि पाय पुढे पडणारच कसे ? 

        माझा जन्म कणकवलीत झाला. त्यावेळी वाहतुकीची आतासारखी साधनं नव्हती. संपर्क साधनं तर नव्हतीच म्हणाना. गोरगरिबांसाठी कुठला आलाय फोन ?  तो फक्त बघण्यापुरता मर्यादित होता. कणकवलीपासून दहा मैलावर असणारं माझं किर्लोस गाव. आता त्याचं नाव आंबवणेवाडी असं झालं आहे. पण आम्ही किर्लोस या नावाचाच उच्चार करतो. किर्लोस हेच नाव आमच्या तनामनात कोरले गेले आहे. सर्व धार्मिक कार्यक्रम आमच्या गावीच केले जातात. मराठी दिनदर्शिकेप्रमाणे येणाऱ्या अधिकाधिक सणांना बालपणी आम्ही किर्लोस गावी जात असू. बालपणीचा तो काळ खूप सुखाचा म्हणायला हवा. त्याचं वर्णन करताना प्रत्येकवेळी वेगवेगळ्या उपमा सुचू शकतात. बालपणी गावात घालवलेले क्षण आनंदाचे परमोच्च बिंदूच म्हणायला हवेत. 

        शेतावर गुरे घेऊन जाणे , गुरे पाण्यावर घेऊन जाणे , गुरे पाण्यावर नेत असताना वाटेत सापडणारी सगळी झाडे आपल्याला फळे द्यायला आधीच उत्सुक असत. झाडाखाली पडलेली जांभळे , चिंचा , बोरे खाताना येणारी मजा काही औरच. करवंदे खाऊन ओठ चिकटत. करवंदांचा लालभडक कोंबडा खातानाचे दिवस पार काळवंडून गेले आहेत. नदीवर नेलेल्या गुरांना पाण्यात डुंबताना पाहून आपणांस डुंबता येत नाही ही खंत अजूनही सलते आहे.  काकांनी पोटाखाली हात धरून पोहायला शिकवतानाचे धडे लक्षात आहेत. पण आता मात्र त्याच पाण्याची ज्याम भीती वाटते. आमच्या नदीने त्यावेळी मुंबईकरांचे घेतलेले जलबळी आमच्या मनात थरकाप आणत. त्यामुळे पाण्याची भीती वाटत गेली. पोहोणे राहूनच गेले. कपडे धुणाऱ्या फडतरीच्या पुढे पोहत जाण्याचे आमचे धाडस काहीकेल्या झालेच नाही. 

        पावसाळ्यात शेतावरील गुट्यावर बसून चिखलात पडताना झालेला आनंद अजूनही अंगावर रोमांच आणतो आहे. रात्रीच्या वेळी काकांनी पकडून आणलेले ' न्हयचे  माश्ये ' मनःचक्षूंसमोर फडफडताना दिसत आहेत. त्याचं तिखट सार आणि हाताचा दोन दिवस न जाणारा वास गायबच झाला आहे. हे सगळे क्षण अविस्मरणीय आहेत म्हणूनच मला माझ्या गावाची ओढ वाटत राहते. सुट्टी कधी एकदा पडते आणि गावाला जायला मिळते असे आम्हाला होऊन जाई. शनिवारी आणि रविवारी मिळालेली संधीही आम्ही सोडत नसू. आंबे , काजू तर होतेच. फणसाचे गरे खाताना स्पर्धा लागे. माझे बाबा एकावेळी पन्नास साठ पेक्षा जास्त बरके गरे खात. त्यांचा कायम पहिला नंबर ठरलेला असे. आम्ही वीस पंचवीसच्या पुढे कधी गेलोच नाही. खाऊन पचवणे त्यावेळी चांगले जमे. आता जास्त खाल्ले तर त्रास होईल म्हणून स्पर्धाच लावली जात नाही. 

        मी रत्नागिरी जिल्ह्यात नोकरीला लागलो. आता जन्मभूमी आणि कर्मभूमी बदलली होती. नोकरीत खुश होतो. पण गावाकडे जाण्याची ओढ काही कमी होत नव्हती. एक नोकरी सोडून दुसरी नोकरी पकडली. तीही रत्नागिरीतच. माध्यमिक शाळेतील नोकरी सोडून मराठी जिल्हा परिषदेची नोकरी स्विकारताना मनस्वी त्रास होत होताच. सरांचा गुरुजी झालो. तिथेही अठरा ते एकोणीस महिने छान नोकरी केली. गावाकडून येणारी पत्रे डोळ्यात पाणी आणत होती. मीही पाणी भरल्या डोळ्यांनी उत्तरे देत राहिलो. 

        शेवटी माझ्या सिंधुदुर्ग जिल्ह्याची ओढ तीव्र झाली. नवीन भरतीच्या वेळी माझी सिंधुदुर्गात निवड झाली. एका दिवसांत निर्णय घेतला. रत्नागिरीतील नोकरी सोडून सिंधुदुर्गात आलो. देवगडात नऊ वर्षे नोकरी केली. पुन्हा कणकवलीत पाच वर्षे , वैभववाडीत सात वर्षे आणि आता पुन्हा कणकवलीत म्हणजे माझ्या जन्मभूमीत आलो आहे. माझी माणसे माझ्यासोबत आहेत. ती मला रोज भेटत आहेत. त्यांच्यासोबत आयुष्य जगताना आयुष्याचं सोनं होत आहे. 

© प्रवीण अशितोष कुबल ( पदवीधर शिक्षक , शाळा शिडवणे नं. १ ) 





        

Friday, November 11, 2022

🛑 कुठे हरवली मळणी

🛑 कुठे हरवली मळणी

          पंचवीस वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. मी नुकताच रत्नागिरी जिल्हा परिषद शाळेत जामगे सीमावाडी येथे हजर झालो होतो. त्या आठवणी अजूनही ताज्या वाटत आहेत. त्या सर्व आठवणी स्मरणकुपीत जतन करुन ठेवण्यासारख्याच आहेत , म्हणून जपून ठेवल्या आहेत. 

          मी तेव्हा एकवीस बावीस वर्षांचा असेन. मिशीसुद्धा दिसत नव्हती. दाढी तर आलीच नव्हती. शाळेत शिक्षक असल्याने मोठ्या वयस्कर माणसांचा आदर स्विकारताना भारावून जायला होत होते. दोन वाड्यांच्या मध्यभागी द्विशिक्षकी शाळा होती. शाळा रस्त्यालगत होती. त्यावेळी तो मार्ग एसटी साठी सुरु झाला नव्हता. शाळेपासून जवळपास शेतीच शेती होती. त्यामुळे भात कापणी झाल्यानंतर शाळेसमोरुन भाताच्या पेंड्या नेताना पालक , गावकरी यांच्या भेटीगाठी होत असत. त्यांच्या मनात शिक्षकांबद्दल कमालीचा आदर असे. डोळ्यात बघून ते कधीही बोलत नसत. ' गुर्जी , गुर्जी ..... अशी प्रेमळ हाक तिथे कायम ऐकू येई. त्यात असलेला आदर ओसंडून वाहत असल्यासारखा असे. त्यात कृत्रिमता अजिबात नसे. 

          मी तेव्हा एका रिकाम्या घरात राहत होतो. मोरे , शेलार आणि सुर्वे नावांच्या घरमालकांनी दिलेले प्रेम विसरलेलो नाही. सुर्वे आणि शेलार यांच्या घरात त्यांचं कुटुंब होतं. मोरे यांचं बंद घर मला शाळेपासून जवळ होतं. म्हणून मी तिथे राहायला लागलो. 

          शाळा सुटल्यानंतर मी त्या रिकाम्या घरात एकटाच कंटाळून जाई. मग हळूहळू मी सायंकाळची अभ्यासिका घेऊ लागलो. दहा पंधरा मुले दररोज अभ्यासासाठी येऊ लागली. त्यांना येणाऱ्या शंका मी सोडवू लागलो. त्यांना न्यायला पालक येत असत. त्यामुळे सगळ्या पालकांशी माझी चांगली ओळख झाली. 

          ओळखी सुरु झाल्या होत्याच आणि भात कापणीचे दिवसही सुरु झाले होते. कापलेले भात एकावर एक रचून ठेऊन नंतर समूहाने एकदम झोडण्याची त्या लोकांची सवय माझ्यासाठी नवीनच होती. 

          आमच्या गावी गाईबैलांचा किंवा रेड्यांचा वापर करुन मोठ्या जाड खांबाभोवती भात पसरवून मळणी करत असत. गुरांच्या पायाखाली पेंड्या तुडवल्या जात. त्याखाली भाताच्या पेंडीला उरलेसुरले शिल्लक भाताचे  गोटे तुटून पडत. दोन तीनदा असे करुन मग भाताच्या पेंड्यांचे गवतात रूपांतर होई. ते गवत गुरांना चारा म्हणून वापरले जाई. लहानपणी आम्ही कधी गावी गेलो असताना रात्री रात्री गॅसबत्तीच्या उजेडात मळण्या बघितल्या आहेत. 

          मोठया पाटावर भात झोडल्यावर काही दिवसानंतर ही मळणी पार पडे. मळणी झाली की घरात मस्त गरमागरम पिठी आणि उकडाभात भरपेट खायला मिळे. लाकडी डोण्यात ठेवलेल्या उकड्या पेजेवर दुधासारखी जाड सुरसुरीत साय जमा झालेली दिसे. तशी उकडी पेज आता पाहायला मिळत असेल असे वाटत नाही. मातीच्या गोलीमध्ये पेज केली जात असे. गोली म्हणजे मातीची कळशी. ती चुलीवर ठेऊन ठेऊन काळीकुट्ट झालेली असे. त्यात बनलेली पेज मात्र पांढरीशुभ्र दिसे. करवंटीच्या डवलीतून पेज वाढणारी माझी आजी सर्वांना प्रेमाने पुन्हा पुन्हा वाढत राही. तिला नाही उरली तरी खरवडून वाढणारी आजी आज जिवंत हवी होती. 

          रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील ग्रामीण भागातील मळणी म्हणजे सामुहिक भात झोडणीच असे. एका दिवसांत त्यांची मळणी आणि झोडणी पूर्ण होताना मी बघितली आहे. 

          त्या दिवशी माझ्याकडे माझा एक शिक्षक मित्र आला होता. आम्ही मालवणी भाषेत मस्त बोलत होतो. कितीतरी दिवसांनी मालवणीत बोलण्याची संधी मिळाली होती. गावाकडे आल्यासारखा अनुभव येत होता. मस्तपैकी गाव गाता गजाली सुरु होत्या. तेवढ्यात एक विद्यार्थी निरोप घेऊन आला. म्हणाला , " गुर्जी , गुर्जी , तुम्हाला आमच्या मळणीकडे बोलावले आहे."   आम्हांला गंमतच वाटली. आम्ही दोघेही धावतच मळणीच्या ठिकाणी गेलो. मळणीचा धबधब आवाज येत होता. मोठ्या काळ्या पत्थरावर भाताच्या ओंब्या रपारप आपटल्या जात होत्या. पिवळेजर्द भाताचे दाणे चहूकडे उडत होते. आम्हीही सहज मळणीत भाग घ्यायला जाण्याच्या प्रयत्नात होतो. पण आम्ही आल्याचे समजताच मळणी करणाऱ्या सर्व ग्रामस्थांनी आम्हांला आदरपूर्वक नमस्कार केला आणि बसण्याची विनंती केली. 

          आम्ही आतल्या खोलीत जाऊन बसलो. पाच दहा मिनिटांत आमच्यासमोर कोंबडीचे जेवण आले. आमच्याकडे ज्याला ' वडे सागोती ' म्हणतात , तसा त्यांचा जेवणाचा बेत पाहून आम्ही आश्चर्यचकित झालो. सगळ्यांच्या जेवणापूर्वी आम्हाला आदरपूर्वक वाढण्यात आले होते. पुन्हा पुन्हा आग्रहाने वाढले गेले. नारळाच्या वापराशिवाय केलेल्या जेवणाची एव्हाना सवय झाली होती. 

          आमचे जेवण झाले तरी मळणी सुरु होतीच. मळणी संपल्यावर सर्व मंडळी जेवली असतील. त्यांनी आम्हां शिक्षकांना प्रथम जेवण्याचा मान दिला होता. त्यातले काही लोक कधीही शाळेत गेले नव्हते , तरीही शिकलेल्या माणसांपेक्षा जास्त आदर देण्यास शिकलेले पाहून माझं शिक्षण मला त्यांच्यासमोर खुजं वाटायला लागलं. 

          त्यानंतर प्रत्येकवेळी आम्हाला मळणीच्या जेवणाला बोलावणे व्हायचे. नेहमी तसाच आदर पाहायला मिळायचा.  ही मळणी आणि आदर दोन्ही आता हरवलीत की काय ? असा प्रश्न पडणे साहजिकच आहे. नवीन युगातील तंत्रज्ञान वापरून केली जाणारी मळणी आणि आदर या दोहोंचा आज अंगीकार करण्याशिवाय पर्याय नाही. 

©️ प्रवीण अशितोष कुबलसर

( 9881471684 )




Monday, September 19, 2022

🛑 करु देवाशी भांडण

🛑 करु देवाशी भांडण 

          कैलासवासी चुलत्यांचे वर्षश्राद्ध होते. आदल्या दिवसापासून आमच्या सर्व बहिणी , नातेवाईक यायला सुरुवात झाली होती. मोठा गोतावळा असल्यामुळे माणसांची गर्दी नेहमीसारखीच होती. हे सर्वांचे आमच्यावरचे प्रेमच आहे असे मी मानतो. 

          भटजीकाका सांगितलेल्या वेळेवर आले होते. सर्व धार्मिक विधी वेळेवर पूर्ण होत होते. अशा वेळी एक वेगळे भावपूर्ण वातावरण तयार झालेले असते. येणारे नातेवाईक , पाहुणेरावळे अनेक दिवसांच्या अंतराने एकत्र आलेले असतात. त्यांच्या अश्रूपूर्ण गाठीभेटी जिव्हाळ्याचे प्रतिक असतात. ज्ञातीबांधव एकत्र येतात. समाजातील वाडीतील गावकरी येतात. 

          हे सगळं आज घडत होतं. दुपार होत चालली होती. येणारी मंडळी पिंडाला नमस्कार करत होती.  मनोभावे नमस्कार करुन मृतात्म्यास भावपूर्ण श्रद्धांजली वाहताना दिसत होती. अजून काही माणसं येतच होती. 

          मी पिंडांचे विसर्जन करण्यासाठी नदीकडे निघालो होतो. माझ्यासोबत माझे बालाकाका होते. बालाकाका आमच्या घरातील एक जाणते व्यक्ती आहेत. त्यांच्याशिवाय कुणाचे पान हलत नाही. त्यांना सगळ्या धार्मिक गोष्टी परिपूर्ण माहिती असतात. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्याकडील सर्व कार्यक्रम होत असतात. आमचे सर्व भावोजी आणि बहिणी आम्हाला जे सहकार्य करतात त्याने आम्ही नेहमीच भारावून जातो. ही सर्व माणसे स्वतःच्या घरातील कार्यक्रम असल्याप्रमाणे सर्वांसमोर वाकत असतात. या सर्वांबद्दल कायम मला ऋणात राहावेसे वाटते. येणारी माणसे हसतमुखाने निघून जातात. जाताना त्यांचे पाय आमच्या घरातून निघण्यास तयार नसतात. ते बराच काळ रेंगाळत राहतात. मग जाताना जड पावलाने जायचे म्हणून जातात. 

          वाडीतील सर्व गावकरी मंडळी हिरीरीने सहभाग घेतात. कित्येक कार्यक्रमात मी त्यांना मिळून मिसळून काम करताना बघितले आहे. हा एकोपा बघून खूप समाधान वाटते. मग ही वाडीतील माणसे वाटतच नाहीत , एकाच कुटुंबातील माणसे वाटत राहतात. मला बघताच हात उंचावतात. आपुलकीने चौकशी करतात. आम्हांला खूप सारे प्रेम देतात. आमच्याकडून प्रेम घेतात. आम्ही प्रेम देतो , त्यामुळे आम्हाला जे प्रेम मिळते त्याला तोड नाही. हे प्रेम आजन्म जपून ठेवायची आमची जबाबदारी असते. 

          जी माणसे काही काळ आमच्या सोबत नव्हती , तीही आता आमच्यासोबत येऊ लागली आहेत ही त्या देवाचीच कृपा आहे. त्या माणसांत नेहमीच चांगली भावना भरुन राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे. 

          अशा मोठ्या गजबजाटात काही चुका घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. चुका घडत असतात , त्या मुद्दाम केल्या जात नसतात. माणसे नुसती येत असतात. सर्वांचा आदर सन्मान करायचे मनात असते. पण गर्दीत कधीतरी काहीतरी राहून जातेच. 

          आलेली सर्व पितरे असतात. ती माणसाच्या रुपाने महालय किंवा श्राद्धाला खूप मोठ्या श्रद्धेने आलेली असतात. त्यांना आदराने जेवायला वाढणे हे यजमानांचे कार्य असते. आज हे कार्य आमच्याकडून करण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. त्यात काही चुका झाल्या असतील तर येणाऱ्या अस्मादिकांनी आम्हांला क्षमा करावी अशीही विनंती आम्ही साष्टांग नमस्कार करुन केलेली आहे. 

          आलेली माणसं जायला लागली , तसं घर रिकामं होऊ लागलं. तरीही बहिणी , भावोजी आणि आत्या अशी माणसं मुद्दाम थांबली होती. वर्षश्राद्ध असलं की रात्री नेहमी भजन केलं जातं. त्यावेळी ज्यांचं वर्षश्राद्ध असतं , त्यांचा आत्मा कोणाच्याही अंगात येत असतो. तो कोणाच्या अंगात येतो हे पाहण्याची उत्सुकता असते. 

          आमचा भाई तिच्या मुलीच्या अंगात येतो हे आम्हाला गेल्या वर्षभरात माहीत झालेले आहे. तो येतो , तो मृदुंग वाजवतो , तो बोलतो आणि ते पाहून सगळे भाईची आठवण काढून ओक्साबोक्सी रडू लागतात. 

          आजही अगदी तसेच घडत होते. भजन मधुर सुरात सुरु झाले होते. अभंग आणि गजराचा आळवणीचा आर्त सुर , धुपाचा सुगंध  , मृदुंगाचा नाद ऐकून भाईचा आत्मा आजही अगदी वेळेवर आला होता. त्याची वाट पाहावी लागली नव्हती. भाई आला आणि त्याने मृदुंग वाजवायला सुरुवात केली. त्याच्या आत्म्याचे घुमणे सुरु झाले होते. भाईच्या सगळ्या मुली रडू लागल्या होत्या.  

          सगळे भाईला नमस्कार करत होते. मीही नमस्कार करायला गेलो होतो. मी भाईचा हात हातात घट्ट पकडून त्याला विचारले , " मी कोण आहे ? " भाईने तातडीने उत्तर दिले होते. भाईचा आत्मा बोलला , " बाळू "…  तू माझी आठवण काढ. माझ्या पोरग्यांकडे लक्ष दे. " मी सद्गदित झालो. पुढे भाईने सर्वांची नावे सांगितली. त्यांचे गुण सांगितले. तो चतुर्थीला दोन वेळा आला होता. आज तो पुन्हा आलाच. तो यावा अशी आमची सर्वांचीच इच्छा होती. ती पूर्ण झाली. 

          तो असाच येत राहतो , त्यामुळे तो गेला आहे असे आम्हाला वाटत नाही. त्याचा वरदहस्त आमच्यावर असाच राहो अशी त्याच्या चरणी आमची कायमची प्रार्थना असणार आहे. भजनाचा शेवट भैरवीने होत होता. " मिळोनिया संतजन , करु देवाशी भांडण " हे शब्द माझ्या कानात नुसते गुंजत राहिले होते. 

©️ प्रवीण अशितोष कुबलसर। ( 9881471684 )

Friday, September 2, 2022

🛑 भटजी काका

🛑 भटजी काका

          प्रत्येक घरी बाप्पाची पुजा करायला भटजी काका येतात. त्यांना सन्मानपूर्वक वागणूक दिली जाते. एखाद्या घरी सत्यनारायण महापूजा आयोजित केलेली असते. त्यावेळी भटजी काकांची सर्वजण चातकासारखी वाट बघत असतात. हल्ली भटजी काका दुर्मिळ झाले आहेत. एखाद्या गावासाठी एक भटजी काका असतात. मोठा गाव असला तर त्या बिचाऱ्या काकांची त्रेधातिरपीट उडून जाते. शुभकार्य आणि अशुभकार्य अशी दोन्ही कार्ये एकाच भटजी काकांना पार पाडत असताना किती त्रास होत असेल तेच जाणो !! आम्हाला त्याची कल्पना जरी आली तरी पुरे. 

          गणपतीच्या दहा दिवसांत तर या काकांना उसंतच नसते. त्यांचे सर्व दिवस बुकिंग झालेले असतात. त्यात एखादी आकस्मिक पुजा ठरली तर तीही त्यांना पार पाडावीच लागते. मग त्यांना त्यांच्या दैनंदिन कार्याचा वेग वाढवावा लागतो.एका दिवसांत त्यांना नाईलाजाने दोन , तीन , चार किंवा जास्त पुजा कराव्या लागत असतील. दक्षिणा मिळत असली तरी त्याचा त्रास भटजी काकांनाच सहन करावा लागतो. त्यांना तसे करायचे नसते , पण आम्हीच त्यांना तसे करायला भाग पाडत असतो.

          या भटजी काकांचा अभ्यास दांडगा असतो. ते कितीही वयाचे असले तरी त्यांना ' भटजीकाका ' म्हटले जाते. पोरवयाच्या भटजींना ' काका ' च म्हणतात. 

          काही गावांमध्ये ' भटवाडी ' असते. तिथे असलेल्या पौरोहित्य करणाऱ्या काकांना वेगवेगळ्या वाड्या किंवा पंचक्रोशीतील गावे ठरवून दिलेली असतात. ज्या गावांत असे काका नसतात , त्यांना ते आणून ठेवावे लागतात. त्यांना एखादे झोपडीवजा घरही बांधून द्यावे लागत असेल. त्यांची नवी पिढी निर्माण झाली तर पुढच्या पौरोहित्याचा प्रश्न सुटत राहण्याची चिन्हे दिसतात. अर्थात काकांच्या नवीन पिढीने ' भटजीकाका ' व्रत जोपासायला हवे असते. नाहीतर पुन्हा प्रश्नचिन्ह होते तसेच दिसायला लागते. नवीन पिढी जन्माला आलीच नाहीतर मोठेच प्रश्नचिन्ह उभे राहते. 

          वृद्ध झालेल्या अशा काकांची अवस्था कावरीबावरी होत असेल. जुन्या पद्धतीने मांडणी करुन पूजा व्रत करणारे काका आताच्या नवीन पिढीला सामोरे जाताना घामाघूम होत असावेत. एखादी पोथी वाचत असताना गरिबीमुळे ऑपरेशन न करता आल्याने दिसत नसल्याने पुन्हा पुन्हा चष्मा काढून पुसणारे भटजी काका मी प्रत्यक्ष पाहिले आहेत. त्यांनी केलेल्या प्रसादाची चव मात्र अप्रतिम असते. त्यांनी ब्राम्हण भोजनासाठी केलेल्या महाप्रसादातील वरण पातळ असले तरी तशी चव घरच्या वरणाला कधीच कशी येत नाही हे समजायला मार्ग नाही. अर्थात त्यांच्या हाताची चव कुणा दुसऱ्याच्या हाताला येणार नाहीच. 

          गावोगावी पूजा व्रत करण्याचे कार्य करणाऱ्या या भटजी काकांचा सदोदित सन्मान होत राहायला हवा. त्यांना आदर दिलात तर तुम्हाला मिळणारे पुण्य नक्कीच वाढत जाईल. 

          आम्ही आमच्या भटजी काकांचा कमालीचा आदर करतो. त्यांना घेऊन येतो , नेऊन सोडतो. त्यांनी खुश राहावे यासाठी प्रयत्न करत असतो. त्यामुळे आमचे भटजी काका माझ्यावर एवढे खुश झाले की त्यांनी मला त्यांच्या घरी ' गोड शिरा ' खायला येण्यासाठी गोड शब्दांत आमंत्रण दिले आहे. अजून मी त्यांच्या गृही गेलेलो नाही. बघुयात कधी जायला मिळते ते ?

©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 )



Thursday, September 1, 2022

🛑 मी पुन्हा पुन्हा येईन

🛑 मी पुन्हा पुन्हा येईन

          दरवर्षी बाप्पा घरी येतात. ते पुन्हा पुन्हा येत राहतात. त्यांचं येणं किती आनंददायी असतं ! त्यांचं पुन्हा येणं असलं तरी त्यांचं जाणं हुरहुर लावणारं असतं. 

          लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्वानाच बाप्पाचं असणं स्वर्गीय सुखासारखं असतं.  वर्षातले हे गणपतीचे दिवस प्रत्येकाला हवेहवेसे वाटत राहतात. त्या निमित्ताने सर्व कुटुंब एकत्र आलेले असते. हेवेदावे विसरुन एकत्र आल्यामुळे गणपतीचे दिवस स्नेहपूर्ण वाटतात. मनाने एकत्र येण्यासाठी गणपतीचा सण नेहमीच लाभदायक ठरत आला आहे. 

          आमचे मोठे कुटुंब. बाबा , तीन काका , त्यांची कुटुंबे , आम्ही दोन भाऊ आणि आमची कुटुंबे मिळून सतरा अठरा मुले माणसे एकत्र येतो , तेव्हा खरी चतुर्थी साजरी होत असते. लग्न होऊन सासरी गेलेल्या बहिणी येतात. त्यांचं हे येणं चतुर्थीमुळेच शक्य होते. आपला हा बाप्पा असा सर्वांना एकत्र आणतो म्हणून हा सण खऱ्या अर्थाने साजरा होतो. 

          गणपती आमच्याच शाळेतला. त्यामुळे तो आणायला जावे लागत नाही. उलट इतर कुटुंबे आमच्याकडून गणपती घेऊन जाताना आमच्या कुटुंबाची लगबग सुरु असते. गणपती सुखरुप आसनावर पोहोचेपर्यंत जीवात जीव नसतो. एकदा बाप्पा सुखरुप घरोघर पोहोचले की जीव भांड्यात पडतो. 

          आम्ही आमचा गणपती घरात आणला. बाबांनी प्रथम पूजा केली. प्रथम पूजा म्हणजे सुरुवातीची पूजा. ही पूजा नेहमी बाबांकडूनच होत असते. यंदा भाईकाका नव्हते , गेल्या वर्षी ते दीर्घ आजारामुळे गणपतीच्या दिवसांत देवाघरी गेले होते. त्यांचा फक्त देह दिसत नव्हता. मात्र त्यांचा आत्मा जिथे तिथे वावरताना जाणवतो आहे. 

          आमच्या भाईकाकांचे सजावट , स्पिकर आणि लायटिंगवर भारी प्रेम होते. ते नाहीत तर त्यांच्या या सगळ्या वस्तू पारख्या झाल्या आहेत. त्यांच्या परमप्रिय वस्तूंना कोणीही वाली राहिलेला नाही. त्यांचा आत्मा त्या सर्व वस्तूंमध्ये वास करत असेल. त्यांची ती मालमत्ता जपून ठेवणे हे आमचे कर्तव्य आहे. त्या सजावटीच्या वस्तू लावताना प्रत्येकक्षणी त्यांची आठवण दाटून येते आहे. त्यांनी जिवापाड प्रेम केलेली तोरणे लुकलुकताना दिसत आहेत. स्पिकरमधले अजित कडकडे  अभंग गात आहेत. त्यांच्या संग्रहातील हजारो गाण्यांच्या सिड्या त्यांच्याशिवाय अधुऱ्या आहेत. 

          पहिले पूजन संपन्न झाले. पहिली आरती सुरु झाली. घालीन लोटांगणचा टिपेचा सुर भाईकाकांच्या कानी पोचला असेल. त्यांच्या मुलीच्या अंगात भाईकाका संचारले. आमची आरती संपण्याऐवजी वाढत चालली होती. गणेशभक्तीचे सूर ' भाईकाकांना ' परत आणण्यात यशस्वी ठरले होते. बहिणीच्या अंगातील भाईकाका आपली नेहमीची वज्रमांडी घालून आले होते. त्यांनी मृदुंगाचा ताबा घेतला. एक वर्षानंतर वाजवायला मिळाल्यामुळे त्यांनी मनसोक्त वाजवायला सुरुवात केली होती. वाजवून झाल्यानंतर त्यांनी गणपती पूजनाची इच्छा व्यक्त केली. डोळे बंद असूनही त्यांना अक्षता , गंध आणि फुले दिसत होती. त्यांनी पूजन केले. हे सगळे आम्ही साक्षात पाहात होतो. सगळ्यांच्या डोळ्यांत भाईकाकांसाठी गंगा यमुना दाटून आल्या होत्या. दरवर्षी गणपती येणारच होता , तसे आमचे भाईकाकाही पुन्हा पुन्हा येणार म्हणून आम्हा सगळ्यांनाच झालेला आनंद लपवता येत नव्हता.

©️ प्रवीण अशितोष कुबलसर  ( 9881471684 )



Tuesday, August 2, 2022

🛑 गणपतीची शाळा

🛑 गणपतीची शाळा

          दर नागपंचमीला आम्ही घरी किर्लोसला जातो. आज नागपंचमीला मी माझ्या कुटुंबासह घरी आलो. जुन्या सर्व आठवणी प्रत्येक पावलाला येत होत्या. छोट्या उर्मीला गृहपाठ म्हणून नागोबाचे चित्र रेखाटून दिले. तिनेच सांगितले , " पप्पा , मला आमच्या घरातल्या भिंतीवरचा नागोबा काढून द्या. " पूर्वीच्या घरी भिंतीवर दरवर्षी नागोबा काढला जात असे. जमिनीवर चुन्याची रांगोळी काढली जाई. माझी मोठी आत्या छान रांगोळी काढत असे. गावाकडे या रांगोळीला ' कणे ' असा शब्द वापरत. मालवणीत त्याला ' कनो ' असेही म्हणत. सुंदर रांगोळी बघत राहावीशी वाटे. स्वच्छ आणि पांढरीशुभ्र रांगोळी हिरव्यागार शेणाने सारवलेल्या जमिनीवर उठून दिसत असे. चुन्यात तीन बोटे बुडवून त्यातून तयार झालेली ती कलाकृती असे. याच चुन्याच्या रांगोळीपासून भिंतीवर ' नागोबा ' काढला जाई. आता असे चुन्याचे नागोबा क्वचित पाहायला मिळत असावेत.

          सिमेंटच्या घरांमुळे टाईल्सचे रेडिमेड नागोबा भिंतीवर चिकटले आहेत. ते तसेच दरवर्षी दिसत राहतात. त्यात कोणताही जिवंतपणा दिसत नाही. 

          आम्ही लहानपणी आमच्याच गणपतीच्या शाळेत नागोबा बनवत असताना जी मज्जा केली आहे ती आताच्या मुलांना अनुभवायला मिळते आहे. आमचा मयुरेश आणि उर्मी दोघेही मातीचे नागोबा करण्यात दंग होऊन गेले आहेत. बाबा , काका आणि माझा भाऊ गणपतीच्या मूर्तींवर शेवटचे हात फिरवत आहेत. यंदा आमच्या शाळेत पस्तीस गणपती तयार करुन झाले आहेत. दरवर्षी नागपंचमीच्या दिवशी गणपतीचे पाट आणून ऑर्डर देण्याची जुनी पद्धत आहे. ती अजूनही तशीच सुरु राहिली आहे. आमच्या सर्व मूर्ती शाडूच्या मातीच्या असतात. मातीची किंमत महाग झाल्याने मूर्ती स्वस्त देता येणे शक्य नाही. ज्यांना परवडत नाही ते प्लास्टर ऑफ पॅरिसच्या हलक्या मूर्ती असलेल्या शाळांची वाट चोखाळतात. पण या मूर्ती पर्यावरण पूरक नसतात हे त्यांना कुणी सांगायचे ? 

          गणपतीची शाळा चतुर्थीपर्यंत कायमस्वरूपी उघडलेली असते. आपला तयार होत असलेला गणपती पाहायला लोक येत राहतात. त्यात काही बदल करावयाचा असल्यास सुचना करत राहतात. बिचारे आमचे मूर्तीकार काका त्यांचे ऐकून त्याप्रमाणे करायला नाईलाजाने तयार होतात. आम्हाला प्रत्येकाला सुबक मूर्ती द्यायची असते. गेली पन्नास साठ वर्षे ही मूर्तीकला जोपासणारे माझे कुटुंब आमच्या पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. गणपती रंगवताना तर रोजची गर्दी असते. दुसऱ्या गणपतीपेक्षा आपला गणपती सरस दिसावा असे प्रत्येकाला वाटत असते.

          पूर्वी पार्वती गणपती , शंकर पार्वती गणपती , गाय गणपती , राधाकृष्ण,  वाघावर , सिंहावर , उंदरावर , गरुडावर बसलेला गणपती , सिंहाचा जबडा उघडणारा गणपती , शिवाजी , राक्षसाला मारत असलेला गणपती , राम लक्ष्मण सीता , दत्ताचा अवतार , कंसवध , शेष गणपती , मयुरेश आणि असे अनेक प्रकारचे गणपती असत. आता हे प्रमाण कमी झाले आहे. साईबाबा , बालगणेश , कमळातील , फुलातील गणपती , सिंहासनाधिश्वर , फेटेवाला , उभा गणपती , लालबागचा गणपती , टिटवाळा गणपती , दगडूशेठ , चिंतामणी , बाहुबली , मंगलमूर्ती असे अनेक प्रकार सध्या बघायला मिळतात. ग्राहकांना स्वस्त आणि मस्त गणपती हवा असतो. काही हौशी ग्राहक किमतीकडे बघत नाहीत. तुम्ही सांगाल ती रक्कम न बोलता निमूटपणे देतात. नारळ , विडा ठेवून नेहमीची रक्कम ठेवली जाते. वाढलेली जादा रक्कम मूर्तिकाराच्या हातात दिली जाते. काही गरीब हौशी ग्राहकांच्या मनात असूनही चतुर्थीला गणपतीचे पूर्ण पैसे देणे त्यांना जमत नाही. त्यांचा गणपती पाण्यात गेला तरी पैसे जमा व्हायचे बाकीच असतात. मूर्तीकारांना हा आर्थिक फटका बसत असला तरी गणपती त्यांना सुखात ठेवतो हे अगदी खरे आहे. त्याचे अकरा दिवस तरी मजेत जातात. 

          श्रावण महिना पाळणारे लोक केस दाढी करत नाहीत. त्यामुळे आमच्या सलूनमध्ये कमी काम असे. त्यामुळे गणपतीची शाळा सुरु ठेवणे हे बाबांना अतिशय गरजेचे बनले होते. एका वर्षी तर आमच्या पाच ठिकाणी ' गणपतीच्या शाळा ' होत्या.  त्यावेळी बाबांची आणि काकांची जी धावपळ चाले ती मी प्रत्यक्ष अनुभवली आहे. 

          आमचा ' घरचा गणपती ' आमच्याच शाळेतला असे. तो नेहमीच मोठा असे. सोबत देखाव्याची चित्रे बाबा बनवत. ट्रिक सिन नसला तरी शेजारच्या गावातील शेकडो गणपतीप्रेमी आमचा गणपती मुद्दाम पाहण्यास येत. कधी अकरा दिवस , कधी एकवीस दिवस आमच्या घरातील जल्लोष संपता संपूच नये असे वाटत राही. 

          इंग्रजी शाळांमुळे जशी जिल्हा परिषद शाळांमधील मुलांची पटसंख्या कमी झाली आहे , तशीच पिओपीच्या मूर्तीशाळांमुळे आमच्यासारख्या पर्यावरणपूरक गणपतीच्या शाळांमधील गणपतींची पटसंख्या कमी कमी होत चालली आहे ही प्राथमिक शाळांसारखी गणपती शाळांचीही शोकांतिका आहे. 

©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 ) कणकवली.









Friday, July 1, 2022

🛑 आठवणींचा महापूर

 🛑 आठवणींचा महापूर

          आम्ही आमच्या किर्लोस गावी गेलो होतो.  आमची किर्लोस आता आंबवणेवाडी या नावानेदेखील ओळखली जाते. आमचा आंबवणे गाव आता महसुली गाव झाला आहे. नागपंचमीच्या दिवशी पाऊस अगदी बेसुमार पडत होता. आमच्या वरवडे कासरल बंधाऱ्यावरून पाणी वाहून जाताना दिसत होते. पाण्याचा वेग वाढत चाललेला दिसत होता. तरीही आमची घरी जायची ओढसुद्धा तितकीच वाढत चालली होती.  कधी एकदा घरी पोहोचतो असे झाले होते. ही ओढ नागोबासाठी आणि आमच्या घरच्या माणसांसाठी अधिक होती. नदीच्या पलीकडे आमचा गाव असल्यामुळे काहीही झाले तरी नदी पार करून जाणे भागच होते. मग आम्ही ठरवले कि, गाडी अलीकडेच ठेवून लोखंडी साकवावरून जायचे. 

          आम्ही गाडी अलीकडे सुरक्षित ठिकाणी लावली होती आणि चालत- चालत आमच्या घराच्या दिशेने निघालो होतो. वाटेतील वर्षा ऋतूचा वर्षाव धो- धो सुरु होताच. पण त्यातही एक अनोखी गंमत अनुभवत शेतीच्या मेरेवरून चाललो होतो. चालता- चालता  नदी कधी आली ते समजले देखील नव्हते. नदीच्या वर आम्ही फक्त १०-१५ फुटांवरून साकवावरून जात होतो. नदीचे पाणी अतिशय वेगाने समुद्राला भेटायला चालले होते. तो वेग इतका भयानक होता कि तो वेग पाहून आमचे डोळे गरगरायला लागले होते. पण नदीचे ते रौद्ररूप पाहून निसर्ग आपल्यावर इतका का कोपला आहे याचा प्रश्न मला पडला होता.

          लांबलचक लोखंडी साकव एकदाचा पार करून आम्ही आमच्या शेतमळ्यांमध्ये प्रवेश केला होता. शेत छान डुलत होतं. आम्हाला जणू बोलावत होतं. आमचं स्वागत करत होतं. बऱ्याच दिवसानंतर हिरवे हिरवे गार गालिचे पाहण्याची संधी उपलब्ध झाली होती. आम्ही ते आमच्या डोळ्यात साठवून ठेवत होतो. निसर्गाने दिलेले ते अविस्मरणीय क्षण टिपताना आमची तारांबळ उडत होती. काय पाहू आणि काय नको असे झाले होते. मस्त मजेत रमत गमत आम्ही आमच्या घरी कधी पोचलो ते समजलेदेखील नव्हते. 

          आमची श्रीगणेश चित्रशाळा समोरच होती. त्यात प्रथम प्रवेश केला होता. गणेशाच्या अप्रतिम मातीच्या मूर्ती पाहून पुन्हा जुन्या आठवणी ताज्या झाल्या होत्या. तेव्हा आम्ही भावंडे मातीच्या मूर्ती बनवताना तासनतास आमच्या चित्रशाळेत बसून आमच्या  बाबांची,काकांची बोटे मातीत कशी लिलया फिरत त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेत असू. नागोबा बनवून त्यांना रंग देण्यास बाबा आम्हास सांगत असत. नागोबा बनवून ते रंगवताना आमचे भान हरवून जात असे. जो आनंद होई त्याचे शब्दात वर्णन करणे खरेच कठीण होते.

          घरी आलो होतो. मस्त वाफाळलेला चहा घेतला होता. आमच्या बाबांनी  बनवलेला, भावाने रंगवलेला मातीचा नागोबा पाटावर घेऊन मी घरी आणला होता. सोबत सर्व लहान मुले जल्लोष करत होती.बबली आणि गुड्डी नागोबा विकून आलेले पैसे मोजण्यात दंग झाली होती.

          बाबांनी नागोबाचे पूजन सुरु केले होते. नागोबा पूजन सुरु असताना आम्ही सर्व मंडळी त्यांच्या भोवती बसून होतो. लाह्यांचा नैवेद्द्य,  दुर्वा, फुले,बेलाची पाने आणि सुंदरशी रांगोळी असा सोहळा संपन्न होत होता. सुखकर्ता दुःखहर्ता ,  लवथवती विक्राळा अशा आरत्या म्हणत सर्वांनी नागोबाचे मनोभावे पूजन केले होते. नंतर केळीच्या पानावर भोजन वाढण्यात आले होते. साधा पांढरा भात , गोडी डाळ, कारल्याची भाजी, जिलेबी, पापड, वाटाण्या- बटाट्याची तिखट भाजी, मोदक असा मस्त बेत काकींनी केला होता. त्यांनी त्यात आपले प्रेम भरभरून ओतले होते. सर्वांनी आपापली पाने संपूर्णपणे स्वच्छ केली होती. स्वाद काही औरच होता त्या भोजनाचा. वर्षातून एकच असा दिवस असतो ज्या दिवशी आम्ही घरातील सर्व मंडळी एकत्र असतो. काहीही झाले , किंवा कितीही अडचणी आल्या तरी आम्ही सर्व कुटुंबीय या दिवशी एकत्र येतोच येतो.

         त्याला कारणही तसेच होते. बाबांच्या बालपणीची खरी गोष्ट घडली होती. नागपंचमीचा दिवस होता. सर्वजण जेवायला बसले होते. माझे बाबासुद्धा जेवत होते. आजीने खीर बनवली होती. माझ्या बाबांना ती खूपच आवडली होती. त्यामुळे त्यांनी खीर पुन्हा पुन्हा मागून घेतली होती. आजी जेवली नव्हती. आजोबा जेवल्याशिवाय आजी जेवायला बसत नसे. सर्वांची जेवणे झाली होती. 

          आता आजी जेवायला बसली होती. बाबा तिच्या जवळच रेंगाळत होते. जेवल्यानंतर मुलांनी खाल्लेली खिरीची पाने आजी चाटू लागली होती. ते माझ्या बाबांनी पाहिले होते व आजीवर ओरडले होते. ते म्हणाले होते , " आज सणादिवशी तू आमची पाने चाटून खातेस म्हणजे काय ? हे काही बरोबर नाही. " सर्व भावंडांनी ते ऐकले होते व बाबांवरच ओरडायला लागली होती ,  " तू आईच्या वाटणीची सर्वच्या सर्व खीर फस्त केलीस , त्यामुळे आईसाठी अजिबात खीर उरली नाही. तुझ्यामुळेच तिला आमची सर्वांची पाने चाटण्याची  वेळ आली आहे. तूच या गोष्टीला जबाबदार आहेस."  हे ऐकल्याबरोबर माझ्या बाबांच्या सर्व प्रकार लक्षात आला होता. ते सरळ आजीच्या कुशीत शिरले होते आणि मोठ्याने रडू लागले होते. त्यावेळी आजी बाबांना म्हणाली होती, " अरे बाळा, तू खीर खाल्लीस तेव्हाच माझे पोट भरले, पण मी केलेली खीर कशी होती ती मला  बघायची होती, म्हणून मी माझ्या मुलांची उष्टी पाने चाटून खात होते, तू वाईट वाटून घेऊ नकोस , आपल्याला यापेक्षा चांगले दिवस येतील तेव्हा तू मला आणखी चांगले पदार्थ खाऊ घालशील आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण करशील ना ? " आजीचे ते शब्द ऐकून त्यादिवसापासून माझ्या बाबांनी लहानपणीच ठरवले होते कि काहीही झाले तरी आपण आपली परिस्थिती बदलायचीच. म्हणून नागपंचमीचा तो दिवस बाबांच्या आणि आता आमच्याही आयुष्यातील एक अविस्मरणीय सण आणि अविस्मरणीय क्षण बनला आहे तो यासाठीच. 

          संध्याकाळी नागाचे विसर्जन केले होते आणि आम्ही परत कणकवलीला येण्यासाठी बाहेर पडणार होतो. पण बाहेर पावसाने अगदी उधाण मांडले होते. तो आम्हाला बाहेर पडायला देत नव्हता. शेवटी आम्ही थांबण्याचा निर्णय घेतला होता. रात्रीपर्यंत नदीचे पाणी आमच्या घराच्या खालच्या कोपऱ्यापर्यंत येऊन पोहोचले होते. सर्वजण झोपण्याचा केविलवाणा प्रयत्न करत होते, पण पावसाचे पाणी आमच्या घरात घुसेल या भीतीने अनेकांची झोपच उडाली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी आज इतकेच पाणी वाढले होते. ते कमी होण्याची शक्यताच दिसत नव्हती. शेवटी खाजगी गाडी करून आम्हाला आमच्या कणकवलीत घरी यावे लागले होते. शासनाने सर्व शाळांना एक दिवसाची सुट्टी जाहीर केल्याचे आम्हाला समजले होते आणि जीव भांड्यात पडला होता. कारण आम्हाला शाळेत जायचे नव्हते. दोन दिवसांच्या पूरमय आठवणी सर्वांच्या डोळ्यात पाण्याचा पूर आणत होत्या.

©️ प्रवीण अशितोष कुबलसर  ( 9881471684 ) कणकवली.

Thursday, June 2, 2022

🛑 माझी जलसफर

 🛑 माझी जलसफर


          लहानपणापासून मला पाण्याची भीती खूपच वाटत आली आहे. पाणी पितानाही अनेकदा माझ्या नाकातून आलेले होते. अर्थात मी पाणी तोंडावाटे पित होतो , पण नेहमी घाई नडायची. गडबडीत पाणी पिऊ नये हेच खरे. तोंड आकाशाच्या दिशेने उघडून त्यात पाणी भरल्यानंतर मला अनेकदा असा अनुभव आला आहे. पाणी तोंडातून घटाघटा आत पोहोचत असे. मध्येच ते नाकातून बाहेर पडताना मोठा ठसका लागे. 

          पाणी पिताना ही हालत होती. त्यामुळे पाण्यात सफर करताना त्याहीपेक्षा जास्त अनुभव आले होते. आम्हाला गावाकडे जाताना नदी ओलांडूनच जावे लागे. 

          माझा गाव किर्लोस आंबवणेवाडी. नदीच्या पल्याड आमचे मातीचे घर होते. आमचे घर शेत शिवार संपलं की पहिलंच होतं. आमची नदी पाऊस सुरु झाल्यानंतर पंधरा वीस दिवसांतच दुथडी भरुन वाहू लागते. तिच्या पाण्याचा प्रवाह गतिमान असतो. त्या प्रवाहाला तोडून पलिकडे जायचे म्हणजे एक दिव्यच होते. 

          अर्थात नदीकिनारी आमचा एक होडीवाला आम्हाला पलिकडे सुखरुप नेऊन सोडत असे. आम्ही त्यांना ' होडीवाले काका ' म्हणत असू. ते होडी बिनधास्त हाकत. मोठी माणसे त्यांना ' विठोबा ' नावाने प्रेमाची हाक मारत. 

          आम्ही पलिकडे नदीकिनारी आलो होतो. नदी वेगाने वाहत होती. मधेच एखादा लाकडाचा ओंडका जोरात वाहून जाताना दिसत होता. ती आपल्या पोटातून आणखी काय काय वाहून नेत होती तीच जाणे !! किनाऱ्यावर नदीचे पाणी जोरात आदळताना पाहून भीती वाटत होती.  आम्ही त्या रौद्ररूप धारण केलेल्या नदीच्या पलिकडे जाण्याची घाई करत होतो. पाऊस थांबण्याचे नाव घेत नव्हता. डोक्यावर धरलेली छत्री चार पाच वेळा उलटी होऊन पुन्हा सरळ झाली होती. 

          बाबांनी आणि काकांनी मोठ्यांदा कुकारे मारायला सुरुवात केली होती. होडीवाला कुकारे ऐकून होडी घेऊन येणार होता. बाबांना आणि काकांना व्यवस्थित कुकारे घालता येत. माझ्या कुकाऱ्यांचा आवाज ऐकू येतच नव्हता. 

          पलीकडील झोपडीतून कसलीशी हालचाल झाली होती. ते आमचे होडीवाले काका होते. एवढया  भयंकर नदीतून त्यांनी न घाबरता होडी घातली होती. पावसाचे पाणी होडीत साचले होते. काकांनी ते बाहेर काढले होते. काकांनी अतिशय कौशल्याने वल्हे मारत होडी आमच्या दिशेला हाकली होती. ते होडी प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने चढवत पुढे पुढे येत होते. नदीच्या मध्यभागी येताच होडी वाहून प्रवाहाबरोबर खालच्या दिशेने वेगात येत होती. काका पुन्हा वल्हे बदलून कधी उजवीकडे तर कधी डावीकडे वल्हे मारत लवकरच आमच्यापर्यंत येऊन पोहोचले होते. 

          होडी एकदम किनाऱ्यावर येऊ शकत नव्हती. त्यामुळे थोडे पाण्यात जाऊन आम्हाला होडीत बसावे लागले होते. आम्ही सर्व सात आठजण होडीत बसलो होतो. काकांनी होडी हाकायला पुन्हा सुरुवात केली होती. आमची जलसफर सुरु झाली होती. होडी पाण्यात हिंदोळे देत होती. आमची घाबरगुंडी उडाली होती. वारा थांबता थांबत नव्हता. पावसाचा जोर होताच. माझ्या भाईकाकांनी दुसऱ्या बाजूने वल्हा मारायला सुरुवात केली होती. आता पुन्हा एकदा होडी वरच्या दिशेला प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला हाकणे नेटाने सुरु झाले होते. 

          होडीला कुठेतरी बारीकसे छिद्र होते. त्यातून पाणी येत होते. पावसाचे पाणी होडीत येत होतेच. बाबांनी होडीतले पाणी बाहेर ओतायला सुरुवात केली होती. आता होडी प्रवाहाच्या दिशेने वेगाने वाहायला लागली होती. होडीवाले काका थोडेसे घाबरलेले दिसले. त्यांचा आत्मविश्वास कमी झालेला दिसत होता. होडी काही केल्या थांबता थांबत नव्हती. माझे काका जिवाच्या आकांताने वल्हे मारतच होते. होडी खूपच पुढे जाऊन एका झाडाच्या पाळाला जाऊन थबकली होती. आता किनारा जवळ होता. पण चारी बाजूला खोलवर पाणी होते. कोणीही होडीतून उतरु शकत नव्हते. शेवटी होडीवाले काकांनी जोरात वल्हे मारुन होडी किनाऱ्याला लावलीच. एवढया पावसातही त्यांच्या अंगातून थबाथब घाम ओथंबत होता. सर्वांचा जीव वाचल्याबद्दल आम्ही सर्वांनीच आमच्या कोसमीवाल्या महापुरुष देवाचे आभार मानले होते. 


 ©️ प्रवीण अशितोष कुबलसर

( 9881471684 )

Monday, March 21, 2022

🛑 दांडगी आई : आमची बहिणाबाई

 🛑 दांडगी आई : आमची बहिणाबाई

          त्या दिवशी ' बहिणाबाईंच्या गाण्यांवर आधारित ' कार्यक्रम बघण्याची संधी मिळाली. कार्यक्रम शेवटपर्यंत बघितला. कितीतरी दिवसांनी एक सुंदर कार्यक्रम बघायला मिळाला. बहिणाबाईंच्या मुलाने सोपानदेव चौधरी यांनी किती चांगले काम केले आहे. आपल्या आईच्या म्हणजेच बहिणाबाई चौधरींच्या सर्व रचना लिखित करुन सर्वांना त्यांचा लाभ मिळवून दिला आहे. या बहिणाबाईंचा संपूर्ण कार्यक्रम बघताना मला बहिणाबाईंच्या ठिकाणी आमची दांडगी आई दिसत होती. 

          दांडगी आई जरी वयाने दांडगी नसली तरी तिला सगळेजण दांडगी आईच म्हणत असत. आमची सर्वात मोठी आत्या होती ती. 

          आम्ही मालवणी भाषेत तिला दांडगी आई न म्हणता ' दांडगे आये ' असा उल्लेख करत असू. ती सगळ्यांचीच ' दांडगी आये ' झाली होती. तिचे लग्न तिच्या वयाच्या खूप कमी वयात झाले होते. तिच्या नवऱ्याला कोणत्या तरी असाध्य रोगाने पछाडले होते. तेव्हा तिच्या पोटात बाळ होते. तिने एका सुंदर कन्येला जन्म दिला होता. पण काहीच दिवसात आमची दांडगी आये अकाली विधवा झाली होती. मग ती आमच्या घरी म्हणजे तिच्या माहेरीच राहिली. आपल्या मूळ घरी ती परत गेलीच नाही. आपल्या मुलीला आमच्याच घरी लहानाची मोठी केली. सोबत आमच्या काकांना , आत्यांना आणि आम्हालाही मोठे करण्यात तिचा सिंहाचा वाटा होता. तिने स्वतःकडे कधीच लक्ष दिले नाही. माहेरी असल्यामुळे तिला आजोबांची बोलणी खावी लागली. प्रसंगी शिव्यांसोबत मारही खावा लागला. वादावरून वाद वाढत जात आणि माझ्या आजोबांची आणि तिची शाब्दिक आणि शारीरिक चकमक घडे. 

          तिने आमच्या संपूर्ण कुटुंबासाठी आपल्या जीवाचे रान केले होते. ती रात्री उशिरा झोपे आणि सकाळी लवकर उठत असे. सकाळी जात्यावर दळण दळताना तिच्या तोंडी ओव्या येत. तिच्या ओव्या अर्थाने भरलेल्या असत. त्यावेळी त्यांचा अर्थ समजण्याइतके आम्ही समंजस नव्हतो. पण तिच्या गोड आवाजाने आमची झोप निघून जाई , पुन्हा तिच्या आवाजाने गाढ झोपही येई. उठल्यानंतर तिच्या ओव्या मी आठवण्याचा प्रयत्न करत असे. पण काहीही लक्षात राहत नसे. 

          रात्री आम्हाला झोपवताना कधीतरी छान छान गोष्टी सांगी. ' आकडी कोयती लावतय, शिळी रोटी खातंय, चल पिटु येतंय ' अशी सुरुवात असलेली गोष्ट मला खूप आवडे. आता तीही विसरायला झाली आहे. 

          माझ्यावर तिचा खूप जीव होता. सगळ्यांवर तिचे आणि सगळ्यांचे तिच्यावर जिवापाड प्रेम होते. ती आपल्या मुलीच्या चुका काढुन तिला शिव्या शाप देत असे. पण आम्हाला तिने कधी वाईट बोलल्याचे आठवत नाही. 

          गणपतीच्या सणाला तिच्या फुगड्या जगावेगळ्या असत. तिने त्या कुठे ऐकल्या होत्या तीच जाणे. ती म्हणूनच आमच्यासाठी बहिणाबाईच ठरली होती. 'तुजा फु फु , माजा फु फु ' ही फुगडी तिच्या तोंडूनच ऐकावी आणि पहावीदेखील.

          नवस करण्यात ती पटाईत होती. एकदा तिने वेगळाच नवस केला होता. गणपतीसमोर ती विवस्त्र फुगडी घालणार होती.  तिने तो नवस  सगळ्यांना नकळत फेडलाही. 

          तिचा संताप बघताना कुणालाही रडू येईल. मी तिचा संताप बघितला आहे. ती स्वतःवरच चरफडत राही. तिला तिच्या प्रश्नांची उत्तरे देवाकडून हवी असत. समर्पक उत्तरे मिळाली नाहीत की ती देवावर संतापे. देवाला अरे तुरे करी. 

          आमच्या घरातील चूल तिच्याच हातात होती. काकांची लग्ने झाली. त्यांच्या बायका आल्या. तरीही तिने चूल काही सोडली नाही. आजी तिला चूल सोडायचा हुकूम देत असे. तेव्हा त्यांच्यात झालेली भांडणे मी ऐकली आहेत. मी लहान होतो , आजीही माझीच होती आणि आत्याही. पण आम्ही काहीही बोलू शकत नव्हतो. शेवटी माझी आजीच नमतं घेत असे. अशी त्यांची लुटूपुटूसारखी भांडणे दर आठवड्याला एकदा तरी हमखास होत. ती नेहमीची असल्याने त्यात कोणीही पडत नसत. 

          तिच्या मुलीचे लग्न झाले. तिला नवरा मिळाला तोही दारुच्या व्यसनाने गेला. तिच्यावर अनेक संकटे आली , पण ती डगमगली नाही. 

          मी रत्नागिरी जिल्ह्यात खेड तालुक्यात नोकरीला लागलो होतो. तेव्हा माझे जेवण बनवण्यासाठी दांडगी आये आली होती.सकाळी उठल्यापासून ती माझ्यासाठी मरमर मरे. जंगलात जाऊन लाकडे गोळा करी. माझ्या आवडीचा फोडणीचा गरमागरम भात करुन देई. चुलीवरच्या थाळीला लावलेल्या भाकऱ्या करुन देई. पेज देई. तिच्या जेवणाला अप्रतिम चव होती. मी जेवत असताना ती माझ्याकडे कौतुकाने बघत बसे. माझे जेवण झाल्यानंतरच त जेवत असे.

          एकदा मी शाळेतून उशिराच घरी आलो होतो, शाळेचे काहीतरी काम होते. मी आधीच वैतागलो होतो. मी आलो तर ती मला म्हणालीं , " अरे बाळू , माज्या पाटीवर जरा मुटके मार रे !!! आज नाकडा हाडलंय ना , पाट कशी दुकाक लागली हा " मी मुटके मारायचे सोडाच , मी तिच्यावर खूप खूप रागावलो. बिचारी काहीही न बोलता चुलीकडे गेली आणि गरमागरम चहा करुन मला आणून दिला. थोड्या वेळाने गरमागरम फोडणीचा भात समोर हजर होताच. ' माज्या बाबूक भूक लागली आसात ना ? ' असं म्हणत जेव्हा तिने मला भात पुढे केला होता तेव्हा मी तर तिच्याकडे बघतच राहिलो होतो. किती सहनशील होती ती !!! ग्रेटच. 

          पावसाळ्याचे दिवस होते. मी तालुक्याच्या ठिकाणी कामानिमित्त गेलो होतो. मला यायला उशीरच झाला होता. संध्याकाळचे सहा वाजत आले असतील. ती माझ्या वाटेवर नजर ठेवून बसली होती. 'आजून कसो माजो पोरगो येत नाय ' असे म्हणत ती निघाली होती. वाटेत एक मोठा ओढा होता. पावसामुळे त्याचे पाणी वाढले होते. त्यावर साकवसुद्धा नव्हता. मी ओढ्याच्या पलीकडे येऊन थांबलो होतो. ओढ्याचे पाणी कमी होण्याची वाट पहात बसलो होतो. दांडगी आये तिथे येऊन पोहोचली होती. तिने माझ्यासाठी मोठी आरोळी ठोकली होती. तिने आपली नऊवारी साडी वर खोचून घेतली आणि पाण्याच्या गतिमान प्रवाहात न घाबरता धाव घेतली होती. मीही तिच्यामुळे हळूहळू पलीकडून येण्याचा प्रयत्न करु लागलो होतो. मध्यावर तिने मला घट्ट मिठी मारली आणि ओक्साबोक्शी रडू लागली. तिचे रडणे खोलीवर येईपर्यंत सुरुच होते. 

          आता ही आमची दांडगी आये हयात नाही. तिच्या आठवणी काही केल्या जाता जात नाहीत. तिच्यासोबतचे प्रसंग आठवले की आजही माझ्या डोळ्यांत गंगा यमुनेचा पूर आल्याशिवाय राहत नाही. 

©️ प्रवीण अशितोष कुबलसर

( 9881471684 )



Thursday, March 17, 2022

🛑 होळीचा सण लय भारी

🛑 होळीचा सण लय भारी

          "  होळी रे होळी , पुरणाची पोळी " असे म्हणत सर्वजण होलिकोत्सव अतिशय उत्साहाने साजरा करताना दिसतात. होळी हा रंगांचा सण आहे. दुसऱ्याला मस्त रंगवण्याचा दिवस. होलिकेचे दहन करण्याचा दिवस. 

          लहानपणी कणकवली गांगोवाडीत राहायला असल्यापासून आम्हाला होळी कळू लागली होती. त्यावेळी तरुणांबरोबर आम्ही लहान मुले मुली होळीची मजा लुटत असू. आमच्या खोलीच्या जवळच होळदेव उभा केला जात असे. त्याला आंब्याच्या पानांनी लपेटून सजवले गेले की होळीचा ढंगच न्यारा दिसायचा. परंपरेने चालत आलेल्या रुढींचे पालन करत होळी मनोभावे साजरी व्हायची. होळीचा स्तंभ श्रीफळांनी नटत असे. मग गाऱ्हाणी होत. नवसाचे नारळ होळी स्तंभासमोर ठेवले जात. 

          आदल्या दिवसापासून आमची तयारी सुरु होई. लाकडे , शेणी गोळा करणे हे आमचे काम असे. वाडीतील प्रत्येक घरोघरी जाऊन एखादे दुसरे लाकूड , एक दोन शेणी मागून घेण्यात आनंदच वाटे. आता गॅस आले , लाकडे- शेणी मिळताना दिसत नाहीत. त्यामुळे आजकाल सरसकट वर्गण्या मागितल्या जातात व सण साजरा केला जातो. 

          कवळं तोडण्याची सुरुवात याच काळात होत असल्याने आम्हाला तीसुद्धा मिळत. त्यांनी होळीची आग लागलीच भडके. लाकडे , शेणी आणि कवळे यांचा आगडोंब होई. मग त्या होलिकोत्सवात गाणी म्हटली जात. कोणीतरी लाऊडस्पीकरची सोय केलेली असे. उत्स्फूर्त सांस्कृतिक कार्यक्रम सुरु होई. रात्रीचा जागर सुरु झालेला असे. बारा वाजेपर्यंत आम्ही कसेतरी थांबू. ' बाराच्या आत घरात '  अशी बाबांची ऑर्डर असे. त्या ऑर्डरचे पालन न करणाऱ्याच्या आनंदाची होळीच होत असे. त्यामुळे आम्ही वेळेचे काटेकोरपणे पालन करीत असू.

          बाबांच्या भीतीने घरात येऊन झोपलो तरी स्पीकरचा आवाज कानात धडकत राही. परुळेकरांचा आवाज सुरेल होता. त्यांच्या गाण्यांचे सूर होळीची रंगत आणखीच वाढवताना दिसत. आपल्यालाही त्यांच्यासारखे स्पीकरवर गाणे कधी म्हणता येईल का ? असा प्रश्न पडे. असा विचार करता करता कधी झोप येई समजतही नसे. 

          सकाळी होळीच्या राखेचा गंध मस्तकावर लावून आम्ही धन्य होत असू. त्यानंतर अनेक खोल्या बदलल्या असतील पण त्यानंतरची होळी काही आठवत नाही. गावच्या घरी होळीला गेलो असेन , पण वडे सागोती , शिरवाळ्या पुरती मर्यादित होळी पाहिली. बोंबा लांबूनच ऐकल्या , ऐकू नये अशा शिव्यांच्या लाखोल्या ऐकल्या. त्यांचा अर्थ समजणे आमच्या बालवयाला अवघड असे. त्यांचा अर्थ समजून घेण्याचा कधी प्रयत्नसुद्धा केला नाही. 

          काल परवापासून माझ्या घरात होळीची तयारी सुरु आहे. सहावीतल्या तनिष्काने आमच्या इमारतीमध्ये छोट्यांचा ग्रुपमध्ये गुप्तपणे वर्गणी गोळा करायला सुरुवात केल्याचे सांगितले. रंग , पिचकाऱ्या आणि रंगांचे फुगे यासाठी त्यांचा मौजेचा दिवस जवळ येत होता. मोठ्यांनीही त्यांना वर्गण्या देऊन प्रोत्साहनच दिले होते. आज त्यांचे धुलिवंदन , रंगांची उधळण मजेशीर होणार यात शंकाच नाही. 

          आज धुलिवंदनाची सुट्टी आहे. काल शाळेत मुलांसोबत होतो. सातवीच्या मुलांकडून ' कचरा ' एकत्र करुन घेतला. त्याच्याभोवती गोल साखळी करुन कचऱ्याची होळी केली. सभोवती फिरता फिरता अनेक अभ्यासविषयक खेळ घेतले. मुले खेळता खेळता शिकत होती. होळीचा वेगळाच आनंद त्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहताना दिसत होता. 

©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 )



Monday, March 14, 2022

🛑 गोमू संगतीनं

🛑 गोमू संगतीनं

          होळी आली की गोमुची आठवण येते. प्रत्येक घराघरात खेळे घेऊन जाणारे गावागावातील गट पुन्हा एकदा त्यानिमित्ताने एकत्र येतात. काही गावात ' कोळीण ' नावाचा प्रकार असतो. ही कोळीण म्हणजे एक पुरुषच असतो. त्याने साडी परिधान केलेली असते. तो किंवा ती अगदी बालगंधर्व दिसत नसली तरी बाईसारखी तरी नक्कीच दिसते. मेकअप थोडा भडकच केलेला असतो. पण ही ' कोळीण ' होळीच्या काळात भाव खाऊन जाते.      

          पूर्वी परंपरेने एकाच घरातील पुरुष साड्या नेसून कोळीणी बनत. मग पुढे पुढे साड्या नेसणारे मिळेनासे झाले. मग आता कोणालाही धर दपट साडी नेसवून रंग फासून कोळीण बनवले जाते. थोडे नाचायला आले की झाले. 

          होळीच्या दिवसांत या कोळीणीचा दर वाढतो. अशा कोळिणी आता अडवून दाखवू लागल्या आहेत. देवस्थानासाठी करावे लागते म्हणून या कोळीण होणाऱ्या नटांच्या हाता पाया पडण्याची वेळ येते. 

          लहानपणी आम्ही कोळीणीच्या मागे फिरत असू. तीच तीच गाणी असली तरी ऐकायला मजा वाटे. कोळीण आपली रुमाल हातात धरुन पुढे मागे  ठेक्यात नाचत राही. डफाच्या तालावर पायांचा ठेका धरणाऱ्या गवळणी प्रशंसेस पात्र ठरत. कोणी वीस , पन्नास , शंभर रुपये तळीमध्ये ठेवून कोळीणीला शबय देत. 

          माझे बालाकाका कोळीण झाले की छान नाचत. त्यांच्यासारखे नाचून गाणे म्हणणारी गवळण मी आजपावेतो पाहिली नाही. सूर , ताल आणि चाळांचा अचूक ठेका असल्यामुळे त्यांची कोळीण सर्वांनाच आवडे. त्यांच्या लावण्या सुद्धा वैविध्यपूर्ण असत. चाली श्रवणीय असत. त्यामुळे प्रत्येक घरात वेगळा नाच पहावयास मिळे. आमच्या भाईकाकांची डफावरची थाप कोणालाही नाचायला भाग पाडेल अशी होती. 

          गुढीपाडव्याच्या रात्री मांडावर सगळी गाणी होत. मध्येच एखादी बतावणी असे. विनोद असत. काही माणसे विचित्र सोंगे आणून उपस्थितांना हसवून सोडत. ती सोंगे पुन्हा पुन्हा पहावीशी वाटत. 

          आम्ही कणकवलीत असल्यामुळे शाळा करुन ' गोमुचा नाच ' करताना खूपच धावपळ उडून जाई. आम्हाला अभ्यासही करायचा असे आणि गोमुचा नाचही करायचा असे. मग शनिवार , रविवार दोन दिवस निवडून किंवा जोडून एखाद्या दिवसाची शाळेला दांडी मारुन गोमुचा नाच घेऊन जात असू. 

          त्यावेळी आम्ही जळकेवाडीत राहत होतो. सदानंद डिचोलकरांच्या घरी भाड्याच्या खोलीत राहत असलो तरी मालक आणि सर्व शेजारी यांच्याशी आमचे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध होते. मी गाणी म्हणण्यात पटाईत होतो. माझा छोटा भाऊ कृष्ण होत असे. शेजारचे दोघे सवंगडी होत असत. 

          त्या दिवशी रविवार होता. आम्ही दिवसभर आमचा गोमू घेऊन फिरत होतो. कोणी दहा पैसे , वीस पैसे असे पैसे देत असत. पन्नास पैसे म्हणजे आमच्यासाठी त्यावेळी सगळ्यात मोठी देणगी असे. सोबत मोठा संजयदादा डिचोलकर कायम असायचा. तो आमचा खजिनदार होता. संध्याकाळपर्यंत आमचे एकूण सोळा रुपये जमले होते. एका दिवसात आमच्या गोमूने केलेली ही कमाई आमच्यासाठी त्यावेळी लाखमोलाची होती. आमच्या वाटणीला येणारे सर्व पैसे आम्ही आमच्या आईच्या ताब्यात देऊन ठेवू. आम्हाला शिक्षणासाठी लागणाऱ्या वस्तूंसाठी आई त्यातले थोडे थोडे पैसे देत राही. आम्ही त्या पैशातून कधीही खाऊ घेतल्याचे मला आठवत नाही. आपल्या या कलेचा उपयोग आम्ही शेवटी शिक्षणासाठीच केला होता या गोष्टीचा आजही मला सार्थ अभिमान वाटतो. 

          लहान असताना लाज वाटत नसे , थोडा मोठा झाल्यानंतर गोमू घेऊन जायला लाज वाटू लागली. होळीच्या काळात परीक्षांचे वातावरण असे. त्यामुळे काही लोक आम्हाला ओरडत असत. परीक्षेत ' गोमूची गाणी ' लिहिणार आहात काय ? असेही म्हणणारी माणसे भेटली आहेत. काहींनी पाठीवर शाबासकीही दिली आहे. शाबासकी देणाऱ्या लोकांना आम्ही नेहमीच लक्षात ठेवले आहे. ओरडणाऱ्या व फुकटचे सल्ले देणाऱ्यांनाही नेहमीच आदर दिला आहे. 

          आता गोमुचा नाच बघितला की माझा लहानपणीचा गोमुचा नाच लक्षात येऊन आजही हसू येतं आणि स्वतःचा अभिमानही वाटतो. 

©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 )



Saturday, January 8, 2022

🔵 करणी फिरता

         🔵 करणी फिरता

         " अशी कशी देवाची करणी , नारळाच्या आत पाणी , नारळ दिसतो दगडावाणी, आत गोड गोड पाणी " असा गजराचा अभंग आम्ही भजनामध्ये आळवत असू. त्यावेळी ' करणी ' या शब्दाचा अर्थ एका चांगल्या अर्थाने मनात बसला होता. आपण सर्वजण या आयुष्यात एक नाटक करत आहोत आणि देव हा त्याचा सूत्रधार आहे. आता देव याचा अर्थ निसर्गाची करणी असाही आपण घेऊ शकतो. 

          त्यानंतर ' करणी ' या शब्दाचा दुसरा अर्थ समजला. " जैसी करनी , वैसी भरनी " नावाचा गोविंदाचा हिंदी चित्रपट पाहिला आणि नवीन अर्थाची मांडणी मनात घर करुन गेली. म्हणजे आपण जसे वागणार आहोत , करणार आहोत , तसंच आपल्या बाबतीत घडणार आहे , आणि ते भोगावेही लागणार आहे.तेव्हापासून अधिक चांगले आचरण करत राहण्याची प्रेरणा मिळत गेली. 

          गावाकडे मात्र या ' करणी ' या शब्दाचा नवा अर्थ समजला जात होता. कोणाचे वाईट झाले कि कोणीतरी आपल्यावर ' करणी ' केली असे बोलले जाई. जप , जाप , साक्षी , पंचाक्षरी असे अनेक शब्द कानात गुंजू लागले होते. एक अनामिक भीती मनात उमटत होती. कोणीतरी आपल्यावर ' करणी ' केली तर आपले काय होईल ? असा संस्कारही बालमनावर त्यावेळी झाला. जसा मोठा होत गेलो , शिकत गेलो तसे त्याचे गांभीर्य माझ्या लेखी कमी कमी होत गेले. वैज्ञानिक दृष्टिकोन वाढल्यामुळे असेल , करणीची भिती निघूनच गेली. त्यात एकदा अंधश्रद्धा निर्मूलनच्या नरेंद्र दाभोलकरांचे मार्गदर्शन प्रत्यक्ष लाभल्यामुळेही वैज्ञानिक दृष्टीकोन कमालीचा वृद्धिंगत झालेला दिसला. 

          माध्यमिक शाळेत शिकत असताना असे अनेक साधक बाधक अनुभव येत जात होते. ते मनावर कोरले जात होते. त्यानंतर आपल्या आचरणात सकारात्मक सुधारणा होताना जाणवत होती. एकदा असाच मी शाळेतून दुकानात आलो होतो. दप्तर दुकानाच्या कोपऱ्यात ठेवले होते. ते दप्तर आपोआप हलू लागले होते. दप्तर ज्या भिंतीला टेकले होते , त्या भिंतीच्या मागे एक पोह्याची गिरण होती. गिरण चालू असतानाच दप्तर हलताना दिसे. गिरण बंद झाली कि दफ्तरही हलायचे थांबे. 

          गिरणीचे मालक  नेहमी एक आयडिया करत. त्यांची गिरण सुरु आहे हे लोकांना समजावे म्हणून त्यांनी वाफ बाहेर पडण्याच्या पाईपवर बाटली किंवा प्लास्टिक भांडे लावून ठेवत. त्यामुळे ' फाक फाक फुक फुक ' असा काहीसा मोठा आवाज येई. तो आवाज अतिशय कर्कश असे. आमचे बाबा कधीकधी हळूच जाऊन ती बाटली काढून टाकत असत आणि मग आवाज बंद होई. पण थोड्याच वेळात तो कर्कश आवाज पुन्हा सुरु झालेला असे. 

          त्या दिवशी एक म्हातारे गृहस्थ आमच्या दुकानात आले होते. त्यांनाही तो आवाज ऐकू आला होता.  ते म्हातारे आजोबा अतिशय आस्तिक होते. ते जप, जाप आदि करणारे असावेत. त्यांना तो आवाज वेगळाच वाटू लागला होता. त्यांनी त्या आवाजाला आपल्या मनात असे शब्द ऐकले होते , ' करणी फिरता , करणी फिरता '. आम्ही ज्याला ' फाक फाक फुक फुक ' म्हणत होतो त्याला ते ' करणी फिरता , करणी फिरता ' असे म्हणत स्वतः अतिशय गंभीर आणि अस्वस्थ झालेले दिसत होते. जेव्हा आमच्या बाबांनी ती बाटली काढून टाकली , तेव्हा आवाज बंद झाल्यावर ते म्हातारबाबा पूर्वीसारखे झाले होते. त्यांच्या मनात कोणती ' करणी ' होती ते त्यांनाच माहिती असेल , आम्हाला सांगता येणार नाही. पण या प्रत्यक्ष अनुभवावरून माझ्या असे लक्षात आले कि आपल्या मनात जे सुरु असते , तेच आपल्याला सगळीकडे दिसत असते. त्यानंतर ज्या ज्या वेळी त्या म्हातारबाबांचे दर्शन घडे , तेव्हा मला ' करणी फिरता , करणी फिरता ' ची आठवण येऊन हसू फुटत असे. आता ते म्हातारबुवा राहिलेले नाहीत , पण त्यांची ती ' करणी ' अजूनही कुठेतरी असेल का ? याबद्दल खात्रीपूर्वक सांगताही येत नाही.

©️ प्रवीण अशितोष कुबल, कणकवली ( 9881471684 )



🔴 ब्रह्मचैतन्य आणि पूर्णब्रह्म

🔴 ब्रह्मचैतन्य आणि पूर्णब्रह्म           "आपल्यामध्ये धर्म आचरणाचा गुण असायला हवा," असे माझी आजी नेहमी सांगायची. ती केवळ सांगायची...