Thursday, September 1, 2022

🛑 मी पुन्हा पुन्हा येईन

🛑 मी पुन्हा पुन्हा येईन

          दरवर्षी बाप्पा घरी येतात. ते पुन्हा पुन्हा येत राहतात. त्यांचं येणं किती आनंददायी असतं ! त्यांचं पुन्हा येणं असलं तरी त्यांचं जाणं हुरहुर लावणारं असतं. 

          लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्वानाच बाप्पाचं असणं स्वर्गीय सुखासारखं असतं.  वर्षातले हे गणपतीचे दिवस प्रत्येकाला हवेहवेसे वाटत राहतात. त्या निमित्ताने सर्व कुटुंब एकत्र आलेले असते. हेवेदावे विसरुन एकत्र आल्यामुळे गणपतीचे दिवस स्नेहपूर्ण वाटतात. मनाने एकत्र येण्यासाठी गणपतीचा सण नेहमीच लाभदायक ठरत आला आहे. 

          आमचे मोठे कुटुंब. बाबा , तीन काका , त्यांची कुटुंबे , आम्ही दोन भाऊ आणि आमची कुटुंबे मिळून सतरा अठरा मुले माणसे एकत्र येतो , तेव्हा खरी चतुर्थी साजरी होत असते. लग्न होऊन सासरी गेलेल्या बहिणी येतात. त्यांचं हे येणं चतुर्थीमुळेच शक्य होते. आपला हा बाप्पा असा सर्वांना एकत्र आणतो म्हणून हा सण खऱ्या अर्थाने साजरा होतो. 

          गणपती आमच्याच शाळेतला. त्यामुळे तो आणायला जावे लागत नाही. उलट इतर कुटुंबे आमच्याकडून गणपती घेऊन जाताना आमच्या कुटुंबाची लगबग सुरु असते. गणपती सुखरुप आसनावर पोहोचेपर्यंत जीवात जीव नसतो. एकदा बाप्पा सुखरुप घरोघर पोहोचले की जीव भांड्यात पडतो. 

          आम्ही आमचा गणपती घरात आणला. बाबांनी प्रथम पूजा केली. प्रथम पूजा म्हणजे सुरुवातीची पूजा. ही पूजा नेहमी बाबांकडूनच होत असते. यंदा भाईकाका नव्हते , गेल्या वर्षी ते दीर्घ आजारामुळे गणपतीच्या दिवसांत देवाघरी गेले होते. त्यांचा फक्त देह दिसत नव्हता. मात्र त्यांचा आत्मा जिथे तिथे वावरताना जाणवतो आहे. 

          आमच्या भाईकाकांचे सजावट , स्पिकर आणि लायटिंगवर भारी प्रेम होते. ते नाहीत तर त्यांच्या या सगळ्या वस्तू पारख्या झाल्या आहेत. त्यांच्या परमप्रिय वस्तूंना कोणीही वाली राहिलेला नाही. त्यांचा आत्मा त्या सर्व वस्तूंमध्ये वास करत असेल. त्यांची ती मालमत्ता जपून ठेवणे हे आमचे कर्तव्य आहे. त्या सजावटीच्या वस्तू लावताना प्रत्येकक्षणी त्यांची आठवण दाटून येते आहे. त्यांनी जिवापाड प्रेम केलेली तोरणे लुकलुकताना दिसत आहेत. स्पिकरमधले अजित कडकडे  अभंग गात आहेत. त्यांच्या संग्रहातील हजारो गाण्यांच्या सिड्या त्यांच्याशिवाय अधुऱ्या आहेत. 

          पहिले पूजन संपन्न झाले. पहिली आरती सुरु झाली. घालीन लोटांगणचा टिपेचा सुर भाईकाकांच्या कानी पोचला असेल. त्यांच्या मुलीच्या अंगात भाईकाका संचारले. आमची आरती संपण्याऐवजी वाढत चालली होती. गणेशभक्तीचे सूर ' भाईकाकांना ' परत आणण्यात यशस्वी ठरले होते. बहिणीच्या अंगातील भाईकाका आपली नेहमीची वज्रमांडी घालून आले होते. त्यांनी मृदुंगाचा ताबा घेतला. एक वर्षानंतर वाजवायला मिळाल्यामुळे त्यांनी मनसोक्त वाजवायला सुरुवात केली होती. वाजवून झाल्यानंतर त्यांनी गणपती पूजनाची इच्छा व्यक्त केली. डोळे बंद असूनही त्यांना अक्षता , गंध आणि फुले दिसत होती. त्यांनी पूजन केले. हे सगळे आम्ही साक्षात पाहात होतो. सगळ्यांच्या डोळ्यांत भाईकाकांसाठी गंगा यमुना दाटून आल्या होत्या. दरवर्षी गणपती येणारच होता , तसे आमचे भाईकाकाही पुन्हा पुन्हा येणार म्हणून आम्हा सगळ्यांनाच झालेला आनंद लपवता येत नव्हता.

©️ प्रवीण अशितोष कुबलसर  ( 9881471684 )



No comments:

Post a Comment

💖 भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये एक अविस्मरणीय सायंकाळ 💖

 💖 भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये एक अविस्मरणीय सायंकाळ 💖           कणकवली येथील भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये कीर्तन महोत्सवाच्या निमित्...