Saturday, September 3, 2022

🛑 जिजी

🛑 जिजी

          नावात काय आहे म्हणा ? पण काही नावं आपलं अस्तित्व मागे ठेवून जातात. भाई , अण्णा , दादा आणि जिजी अशी काही नावं पूर्वीपासून खूप आदराने घेतली जातात. ही नावे समोर आली की एक सर्वांगसुंदर व्यक्तिमत्त्व असणार याची जाणीव होत राहते. 

          मोठया बंधुला दादा आणि छोट्या बंधुला अण्णा म्हणायचा प्रघात असावा. हे भावांचे प्रमाण वाढले की मग ' भाई ' म्हटले जाते. आता काय सर्वांच्या नावापुढे भाई या शब्दाचा प्रत्यय लावण्यात येतो. राजकारणात या नावांचा सर्रास वापर सुरु झाला आहे. 

          जिजी हे नाव विशेष व्यक्तींसाठी वापरले जात असावे. दाजी या नावाचा सुद्धा अधिक बोलबाला असे. माझ्या आयुष्यात अशी अनेक नावांची माणसे नातेवाईक म्हणून जास्त आली आहेत. 

          आमचे एक मुख्याध्यापक होते. त्यांच्या पहिल्या दोन नावांची आद्याक्षरे घेऊन त्यांना सारेच ' जिजी '  म्हणत असत. त्यांनीही ते नाव स्विकारले होते. ते स्वतःचे मूळ नाव विसरतील इतके ते जिजी म्हणून प्रसिद्ध झाले आहेत. 

          माझ्या आत्येचे पती म्हणजे माझे काका ' जिजी ' नावानेच गावात प्रसिद्ध आहेत. आता ते हयात नाहीत. तरीही त्यांच्या नावाने आणि त्यांच्या स्वभावाने ते कायमच सर्वांच्या लक्षात राहिले आहेत. त्यांच्या स्मृती ताज्या असल्यासारख्या जाणवत राहतात. एक धीरगंभीर व्यक्तिमत्त्व. उंच असले तरी सडपातळ बांधा. गोऱ्या वर्णाचे. त्यांच्या डोक्यावर केस असताना माझा जन्म झाला नव्हता. त्यांना टक्कल असले तरी ते त्यांना शोभून दिसे. त्यांनी शेती करुन कुटुंबाची गुजराण केली. सोबतीला नाभिकाचा व्यवसाय केला. कधी गावात फिरुन तर कधी दुकान मांडून मोठया कुटुंबाचे पालनपोषण केले. स्वतः मितभाषी होते. ते कमी बोलत असले तरी त्यांचे शुद्ध आचरण खूप काही बोलून जाई. आम्हाला त्यांचा आदर वाटे. भीतीही वाटे. ते आमच्यावर कधीही रागावले नाहीत. 

          ते मांत्रिक होते. ते वैद्य होते. त्यांनी मंत्र म्हटला तर सरपटणारी जनावरे जागच्या जागी थांबत. बिळात गेलेली बाहेर पडत. त्यांच्या मंत्रोच्चाराने नाग , सर्प निसर्गाच्या दिशेने आपल्या मार्गाने निघून जात. त्यांनी दिलेल्या तांदळाच्या दाण्यांनी सरपटणाऱ्या जनावरांना घाबरणारी माणसे भयमुक्त होत असत. 

          वैद्य म्हणून त्यांनी कित्येकांना रोगमुक्त केले असेल. कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न करता त्यांनी अनेकांवर मोफत उपचार केले असतील. जंगली औषधी वनस्पतींची नावे त्यांना तोंडपाठ होती. त्यांची प्रथमोपचार पेटी अशा प्रकारच्या मुळ्यांनी भरलेली असे. आम्ही त्या मुळीला ' पाळ ' म्हणत असू. जुने चिवट रोग जिजींच्या या पाळांनी बरे केले आहेत. त्या काळात आमच्या घरातील उपचार त्यांच्या पाळांवरच चाले. 

          माझे लग्न झाल्यानंतर मी पाटगाव येथे राहात होतो. ते माझा संसार बघायला आले होते. ते खूप आनंदी दिसत होते. त्यांना व्यसन नव्हते. अचानक त्यांच्या जिभेला एक जखम झाली. तपासणीअंती ती वाढण्याची शक्यता सांगण्यात आली. ऑपरेशन झाले. तरीही त्या आजाराने त्यांचा बळी घेतला. आमचे सर्वांचे लाडके जिजी गेले आणि सारा गावच हादरला. दुसऱ्यांवर उपचार करणारा वैद्य , स्वतःवर उपचार करु शकला नव्हता.

          त्यानंतर अनेकदा त्यांच्याकडे जाणे झाले. त्यांचं जुनं सलून आणि त्यांनी काम केलेली लाकडी फिरकीची खुर्ची बघून ' जिजींची ' आठवण उफाळून येई. संपूर्ण गावात नव्हे पंचक्रोशीत जिजींचे नाव आजही खूप आदराने घेतले जाते. जोपर्यंत त्यांच्या गावात आजार आहेत , तोपर्यंत ' जिजींचे ' नाव विसरले जाऊ शकत नाही. एक वेगळाच ठसा जिजींनी जनमानसात उमटवला होता. 

©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 )



No comments:

Post a Comment

💖 भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये एक अविस्मरणीय सायंकाळ 💖

 💖 भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये एक अविस्मरणीय सायंकाळ 💖           कणकवली येथील भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये कीर्तन महोत्सवाच्या निमित्...