🛑 दशरथा , घे हे लेखन दान
बारावी सायन्स नंतर डीएड केलं. कै. सौ. इंगेट्राऊट नाईक अध्यापक विद्यालयात पहिल्या वर्षात चाळीस जणांना गुणवत्तेच्या आधारावर प्रवेश मिळाला. दहावी झाल्यानंतर डीएड बंद होऊन ते बारावी नंतर सुरु झाले होते. पदवीधर आणि पदव्युत्तर झालेल्या अनेकांनी बारावीच्या मार्कांवर प्रवेश मिळवला होता.
दहावी डीएड बॅचची मुलेही काही कमी नव्हती. पहिल्या परिपाठात त्यांच्या विद्वत्तेचा अनुभव आला. तीही जबरदस्त टक्क्यांनी गुणवत्ता सिद्ध करुन प्रवेश घेतलेली मुले होती. कदाचित आम्हीच त्यांच्यापुढे कमी पडू की काय असा धसका पहिल्या दिवसापासून आमच्या अनेकांच्या चेहऱ्यावर दिसू लागला होता. काहींनी कॉलेज लाईफ अनुभवलेले होते. त्यांना हे कठीण नव्हते.
अभ्यास एके अभ्यास करणाऱ्या मुलांसाठी मात्र थोडे कठीण जात होते. कारण आता फक्त लिहायचे नव्हते तर बोलायचेही होते. नुसतेच बोलायचे नव्हते तर शिक्षकाला शोभेल असे बोलायचे होते. त्यासाठी दोन वर्षे शिकून शिक्षक होण्यासाठी सगळे तयार झाले होते.
चाळीसच्या चाळीस छात्र अध्यापक विशेष तयारीचे होते. एकापेक्षा एक हुशार होते. प्रत्येकात काहीतरी वेगळा गुण होता , जो इतरांवर प्रभाव पाडायचा. अर्थात प्रत्येकावर दररोज एकोणचाळीस प्रभाव पडत होते. ते प्रभाव टिपणं सोपं काम नव्हतं.
परिपाठात प्रत्येकातील आगळे वेगळेपणा नजरेत भरायचा. आपल्याला असे जमेल का ? असे वाटायचे. प्रत्येकजण एकमेवाद्वितीय होता. आज हे सगळे शिक्षक कुठे ना कुठे आदर्श शिक्षक म्हणून काम करत असतील तेव्हा मला माझ्या बॅचचा सार्थ अभिमान वाटतो. त्यावेळी जे साधे सरळ वाटत होते , ते आता बोलके आणि उपक्रमशील झाले आहेत. शिक्षकी पेशाचा तो गुण असतो. पाण्यात पडले की जसे पोहायला शिकता येते , तसे शिक्षकी पेशा स्वीकारला की त्यातील सर्वकाही अंगी बाणत जाते.
संतोष तुळसकर नावाचा माझा मित्र उत्तम बोलका होता. स्मार्ट होता. सगळ्यांच्या गळ्यातील ताईत होता. मुलीदेखील त्याच्या अशा असण्यावर फिदा असाव्यात. बिचारा खेड येथील क्षमताधिष्ठित प्रशिक्षणाच्या सकाळी नदीवर आंघोळीला गेला तो वर आलाच नाही. तो गेला आणि आम्हां मित्रांमधील संतोषच हरपला.
संजय शेट्ये हा माझा बेंचमेट. कुठेही जाताना तो आणि मी सतत बरोबर असू. त्याचे तिरपे तिरपे अक्षर अजूनही आठवते. गोड गोबऱ्या गालांचा , मान तिरपी करुन हसणारा संज्या कुठेतरी हरवला आहे की त्याचे काय झाले आहे समजायला मार्ग नाही. दोन वर्षे एकत्र असणारा मित्र अचानक कुठे निघून जातो आणि सापडता सापडत नाही यासारखे दुःख नाही. तो कुठे असेल तर तो सुखात असावा हीच देवाकडे प्रार्थना आहे.
दशरथ सावंत एक सुजाण , संस्कारी मित्र. उंच , बारीक , गोरापान. गाल थोडेसे आत गेलेले. केस नीट विंचरलेले. सगळ्यांचा यथोचित आदर करणारा. काळजीपूर्वक पाठ टाचण काढणारा. पाठात चित्रांचा वापर करणारा. माझ्याही पाठीवर अलगद आश्वासक थाप मारुन प्रोत्साहन देणारा.
त्या दिवशी शिक्षक समितीचे धरणे आंदोलन होते. तिथे त्याच्या आत्महत्येची खबर ऐकायला मिळाली. खूप वाईट वाटले. त्याचे डीएडच्या वर्गातील क्रियाकलाप डोळ्यासमोर नाचू लागले. त्याला खेळाची खूप आवड होती. तो दरवर्षी आपले विद्यार्थी जिल्हास्तरापर्यंत आणायचा. त्यावेळी धावती भेट होई. पण विद्यार्थ्यांसाठी तो सतत धाव घेणारा आदर्श शिक्षक होता. तो असा अचानक कसा निघून गेला हे आमच्यासमोर असलेले प्रश्नचिन्ह आहे. त्याने आत्महत्या का केली असावी ? कोणते प्रश्न त्याला भेडसावत होते ? सुखी संसाराला सोडून तो का जावा ? दुसऱ्यांना विजयी होण्यासाठी प्रेरणा देणारा एक उपक्रमशील शिक्षक एवढा स्वतःच्या जीवनावर नाराज का व्हावा नकळे !! जीवन सुंदर असताना त्या जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने बघायला हवे असे सांगणारा दशरथ निराशेच्या खाईत कसा जाऊ शकतो ? हे आम्हाला सर्वांना न उलगडणारे कोडे आहे.
दशरथासारखे अनेक शिक्षक असतील , ज्यांना अनेक संकटांना तोंड द्यावे लागत असेल. संकटे तर येतच असतात. कामाचा ताण येऊन तणाव येतच राहणार आहे. त्यावर मात करुन जगणे हेच खरे जगणे आहे. अशा आव्हानात्मक जगण्यात अर्थ आहे. आजच्या शिक्षकांना अनेक तणावांना सामोरे जावे लागत असेल , पण त्यामुळे त्यांनी असा मार्ग कधीही अवलंबू नये. आपल्याला जमेल तसे काम करत राहावे. दशरथा , माझे हे विचार तुझ्यापर्यंत अंतराळातून पोहोचत असतील तर तुझ्यासाठी माझ्याकडून हे लेखाचे दान आहे असे समज.
©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 )
No comments:
Post a Comment