Showing posts with label मी नाट्यवेडा. Show all posts
Showing posts with label मी नाट्यवेडा. Show all posts

Thursday, June 2, 2022

🛑 हायकोटायो

 🛑 हायकोटायो


          आपल्याला किती माणसं भेटत राहतात आयुष्यात ? त्यांचं जगणं बघत असताना त्यांचे कित्येक गुण आपणही नकळत आत्मसात करत असतो हे आपल्याला माहिती नसते. ह्या माणसांमध्ये एक वेगळंच चैतन्य भरुन राहिलेलं असतं. ते त्यांच्या नेहमीच्या वागण्या बोलण्यातून लक्षात येत राहतं. त्यांच्या भारदस्तपणाचं दडपण देखील आपल्यावर येत राहतं. दडपण म्हणजे अधिकची आदरयुक्त भीती असते. या माणसांशी बोलतानाही सतत भीती वाटत राहते. त्यांच्या बरोबर बोलताना कोणते शब्द वापरावेत याचाही खूपच विचार करावा लागतो. असंच एक धीरगंभीर अभिनयाची कार्यशाळा असलेलं व्यक्तिमत्त्व खूप जवळून पाहता आलं याचाही मला आनंद वाटतो. 

          उत्कृष्ट नाटकं करणं ही त्यांची खासियत म्हणायला हवी. त्यांची आवाजाची फेक मी खूप पूर्वीपासून अनुभवली आहे. त्यांच्या शब्द उच्चारांमुळे निर्जीव शब्दांना सजीवपणा प्राप्त होतो. हे सगळं वर्णन एखादया कसलेल्या अभिनेत्याचे असू शकते हे कोणीही मान्य करेल. हो , मी एका अभिनेत्याबद्दलच सांगतोय. त्यांचं नाव आहे सुहास वरूणकर. 

          एसटीत लिपिक म्हणून काम करताना त्यांच्यातील नाटककार त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता. महाविद्यालयात शिकत असताना त्यांनी प्रत्येक गॅदरिंगमध्ये प्रेक्षकांना खुर्चीला खिळवून ठेवलं होतं. यांचे कार्यक्रम शेवटी ठेवले जात. त्यांचा परफॉर्मन्स बघितल्याशिवाय कॉलेज कुमार आणि कुमारीही जागा सोडत नसत. 

          मी त्यावेळी आठवी , नववीत शिकत असेन. माझी मोठी ताई कणकवली कॉलेजमध्ये शिकत होती. मी तिच्याबरोबर गॅदरिंग बघायला गेलो होतो. त्यावेळच्या कॉलेज जीवनातील विविध गमतीजमती मला बघायला मिळत होत्या. सुहास वरुणकर यांचा रंगमंचावर प्रवेश झाला होता. सगळी मुले त्यांच्या प्रवेशालाच टाळ्या आणि शिट्ट्या देऊ लागली होती. मी फक्त टाळ्या वाजवत होतो. मी शिट्टी वाजवण्याचा प्रयत्न केला होता. पण फक्त हवाच बाहेर पडली होती , आवाज आलाच नव्हता. अजूनही माझे तसेच होते , त्यामुळे मी कधी शिट्टी वाजवण्याच्या फंदात पडत नाही. 

          वरुणकरांच्या दोन्ही हातात एक काठी होती. ती त्यांनी आडवी पकडली होती. पोटावर धरुन ते चालत होते. चालता चालता ते कोणते तरी गाणे म्हणत होते. ते जे म्हणत होते त्याचा मला त्यावेळीही अर्थ लागलेला नव्हता आणि आताही लागलेला नाही.  ते म्हणत होते , " हायकोटायो नादे खोटा , हायकोटायो नादे खोटा ". याचा अर्थ त्यांना लक्षात असू शकतो. 

          हे सुहास वरुणकर आमचे सलूनचे कस्टमर. मीही त्यांचे एकदोनदा केस कापले आणि रंगवलेही आहेत. त्यांचे केस कापणे ही सोपी गोष्ट नसते. ते सांगतील तेवढेच केस आपल्याला कापायचे असतात. त्यात जरा जरी कसूर झाली , तर कापणाऱ्याचे काही खरे नसते. बाबांना त्यांच्या केसाचे तंत्र माहिती होतं. त्यांनी कापलेल्या केसात सुहासजी खूप कमीवेळा त्रुटी काढत. एक मोठा अभिनेता आमच्या दुकानात येऊन केस कापून जातोय याचा आम्हाला अभिमान वाटे. ते कायम घाईत प्रवेश करत आणि आपले केस कापून निघून जात. जणू ते रंगमंचावर इन्ट्री करुन गेल्यासारखे वाटत. 

          एकदा मी त्यांच्या जुन्या घरी सहजच गेलो होतो. त्यावेळी ते कोणाचीतरी रिक्षाची सीट बनवून देण्यात मग्न होते. फावल्या वेळेत ते हे काम करीत. 

          नाथ पै एकांकिका , यंगस्टार मित्रमंडळ , अक्षरसिंधु कलामंच , कामगार कल्याण केंद्र , बागेश्री थिएटर आणि एसटीकडून होणाऱ्या अनेक एकांकिका स्पर्धा त्यांनी गाजवल्या. त्यांच्या अभिनयाची एक वेगळीच क्रेझ असते. ' तन माजोरी ' या नाटकात त्यांनी केलेले काम सहकलाकारांसाठी कायमच लक्षात राहणारे असेल. ' किरवंत , आमुषा ' अशा अनेक वेगळा संदेश देणाऱ्या नाटकांचं सादरीकरण त्यांनी केलेलं आहे. अभिनय करता करता त्यांनी दिग्दर्शनाला सुरुवात केली. त्यांनी कित्येक नाटके , एकांकिका बसवल्या असतील. त्यांनी सादर केलेल्या नाटकांना नेहमीच राज्यस्तरावर गौरविण्यात आलेले आहे. 

          आता तर ते यु ट्यूबवर अनेक विनोदी प्रहसनांसाठी प्रसिद्ध झालेले आहेत. कणकवलीत नाट्यक्षेत्राशी निगडित असलेल्या अभिनेत्यांमध्ये त्यांचे नाव प्राधान्याने घेतले जाते. 

          नाटकासाठी एकदा त्यांना मिशी आणि केस पूर्ण काढावे लागले होते. त्यांची परमप्रिय मिशी त्यांनी काढली होती. त्यांना तसे ओळखताही येत नव्हते. नाट्यप्रकारासाठी वाहून घेतलेल्या या कलावंतांबरोबर मलाही काही क्षण जगता आले हेही माझे नाट्यमय भाग्यच. 


 ©️ प्रवीण अशितोष कुबलसर

( 9881471684 )

Thursday, April 7, 2022

🛑 भाव अंतरीचे हळवे

🛑 भाव अंतरीचे हळवे

          सगळे शिक्षक नाटक सुरु होण्याची वाट बघत होते. त्या दिवशी वीजबाईने मात्र हिरमोड केला होता. ती एक दोन वेळा गायब झाली होती. आमच्या शिक्षक मित्रांचा दशावतार पाहण्यासाठी आम्ही उत्सुक आणि आतुर झालेले होतो. आणि एकदाचे नाटक सुरु झाले होते.

          पात्रे परिचय सुरु झाला होता. त्यावेळी अंगात दशावतार संचारु लागले होते. सगळे प्रेक्षागृह भारावले गेले होते. सुनिल गावकरबुवांची बोटे पेटीवर वेगाने फिरु लागली होती. त्यांचा तिसऱ्या पट्टीतील आवाज रंगमंचाच्या आसमंतात घुमू लागला होता. ते तल्लीन होऊन गात होते. माझे शिक्षक स्वतःचा दशावतार सादर करत होते , याचा मला सार्थ अभिमान वाटत होता. प्रथमेश तांबे आणि उत्तम कदमांनी त्यांना उत्तम साथ दिली होती. 

          दिनेश सुद्रीकसरांनी केलेली रंगमंच व्यवस्था साजेशी होती. खूप कमी वेळात त्यांनी व्यासपीठाचे रूपांतर रंगमंचात केले होते. लेखक आणि दिग्दर्शक सुभाष तांबे गुरुजींनी केलेले मार्गदर्शन नाटक बघताना तोंडात बोट घालायला भाग पाडत होतं. सर्व कलाकार शिक्षकांकडून त्यांनी त्यांच्या भूमिका अचूक वटवून घेण्यात बाजी मारली होती. कोणालाही स्टेजमागून प्रॉमटिंग केलेले दिसत नव्हते. सर्वच कलाकारांनी आपापल्या भूमिका चांगल्या रितीने वटवलेल्या दिसत होत्या. 

          संतोष तांबे यांनी साकारलेला भ्रमरासुर खरा भ्रमरासुर वाटत होता. त्यांची वेशभूषा , रंगभूषा , आवाजाची शब्दफेक , रंगमंचावरील वावर अप्रतिमच म्हणायला हवा. त्यांच्या प्रवेशाला जबरदस्त टाळ्यांचा कडकडाट झाला होता. 

          नाटक सुरु झालं होतं. मी जवळून शुटींग करत होतो. अचानक प्रेक्षागृहातूनच मला एका शिक्षकमित्राचा फोन आला होता. भ्रमरासुराची भूमिका करणारे कोण आहेत असे मला त्यांनी विचारले होते. इतके संतोष तांबे ओळखले जाऊ शकत नव्हते. याचा अर्थ त्यांनी साकारलेला भ्रमरासुर खराखुरा असुर ठरला होता. संतोष तांबे हे एक गुणी प्राथमिक शिक्षक आहेत. ते आमच्या किर्लोस आंबवणे गावच्या शाळेत होते. तेव्हापासून मी त्यांना ओळखतो. त्यांनी आमच्या गावातील अनेक विद्यार्थी घडवले आहेत. 

          कोणत्याही नाटकात नारदाची भूमिका करणारा कलाकार अवलिया लागतो. त्याच्यावर सर्व नाटकाची भिस्त असते. आपल्या महेंद्र पवारांनी  नारदाची इन्ट्री घेतली तेव्हा झालेला जल्लोष त्यांच्या कलेला केलेला सलामच होता. कसले भारी दिसत होते ते !!!  त्यांची मान हलवण्याची व हसण्याची पद्धत खऱ्या नारदालाही लाजवणारी होती. त्यांचे दशावतारी भाषेवर असलेले प्रभुत्व उल्लेखनीय होते. 

          त्यानंतर ब्रम्हराक्षस मोठ्या हास्याचा स्फोट करत आला होता. हा कोण आहे हे ओळखेपर्यंत ' मंगेश राणे ' सरांच्या नावाने टाळ्या आणि शिट्या वाजू लागल्या होत्या. त्यांनी केलेले युद्धनृत्य पुन्हा पुन्हा पाहावे असे होते. 

          कार्यक्रमाच्या दीपप्रज्वलन समारंभात ज्यांच्या बासरीवादनाने प्रेक्षक शिक्षक मंत्रमुग्ध होऊन गेले होते ते सदाशिव राणेसर. नाटकात त्यांनी मारुतीची भूमिका उत्तम प्रकारे वटविली. सदाशिव सरांच्या सुप्तगुणांचा हा मुक्त आविष्कारच होता. 

          चंद्रकेतू राजाची भूमिका राजा भिसे सरांनी राजासारखी निभावली. खरंच राजा भिसे सामान्य जीवनात राजाच आहेत. चंद्रवंदना साकारणारा मसुरकर हा मूळ दशावतारी कलाकार होता. त्याने आमच्या सर्व कलाकारांना जे सांभाळून घेतले त्याबद्दल त्याला धन्यवाद द्यावे तितके थोडेच असतील. सुसंस्कृत स्त्रीच्या सर्व लकबी पाहताना हा पुरुष आहे असे कधीही वाटले नाही. 

          दशावतारी नाटकाची संकल्पना राबवणारे शिक्षक नेते गिल्बर्ट फर्नांडिस , तालुकाध्यक्ष विनायक जाधव , तालुका सरचिटणीस सुशांत मर्गज यांनी घेतलेल्या मेहनतीचे ' भ्रमरासुर वध ' हे नाटक म्हणजे मधुर फळच म्हणायला हवे. पडद्याआड असणारे व पडद्यासमोर राहून नाटक पाहणारे शेवटपर्यंत थांबून असल्यामुळे नाटकाला चार चांद लागले. एक अविस्मरणीय नाट्यप्रयोग नाट्यगृहानेही नक्कीच पाहिला असेल असे म्हटले तरीही वावगे ठरु नये. 

          मी राधानगरीला एका गोंधळाला आलो असताना तिथे अजित कडकडेचे गाणे लागले होते. " तुझे नाम आले ओठी , सूर भारावले "  हे गाणे ऐकत असताना या ओळी ऐकायला मिळाल्या. " भाव अंतरीचे हळवे , जसे जुई फुल , स्वतःच्याच सुगंधाची स्वतःलाच भूल " या ओळी ऐकल्या आणि आमच्या समितीच्या कलाकारांचा नाट्यप्रयोग डोळ्यासमोर जसाच्या तसा उभा राहिला. खरंच प्रत्येकाच्या अंतरीचे भाव असेच हळवे असायला हवे , तर आणि तरच स्वतःच्या सुगंधाची भूल पडून असे विलक्षण ' न भूतो , न भविष्यति ' नाट्य घडू शकते.

©️ प्रवीण अशितोष कुबलसर

( 9881471684 )



Tuesday, April 5, 2022

🛑 समितीचा शिक्षकावतार आणि शिक्षकाविष्कार

🛑 समितीचा शिक्षकावतार आणि शिक्षकाविष्कार

          नुकतेच कणकवली शिक्षक समितीचे त्रैवार्षिक अधिवेशन मोठ्या धुमधडाक्यात संपन्न झाले. कार्यक्रमाची पूर्वतयारी , सभा , प्रत्यक्ष अंमलबजावणी यासाठी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी ,  शिलेदारांनी दिलेला वेळ व योगदान लक्षात घेण्यासारखे आहे. आपला सोहळा साजरा होत आहे ही प्रत्येक सदस्याच्या मनात असलेली भावना याला कारणीभूत आहे. स्वतःच्या घरातला सोहळा असावा तसे सर्वजण या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करताना दिसले. 

          आपली समिती ही पूर्वीपासूनच अशा धुरंधर शिलेदारांची खाणच आहे. त्यात आता महिलांनी झाशीच्या राणीप्रमाणे साथ द्यायला सुरुवात केल्यामुळे लढा भक्कम होत चालला आहे. सन १९६२ पासून स्थापन झालेल्या आपल्या महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीला यंदा २०२२ साली साठ वर्षे पूर्ण होत आहेत या गोष्टीचा अत्यानंद आहे. 

          सकाळपासून त्रैवार्षिक अधिवेशनाची लगबग सुरु झाली होती. राज्याध्यक्ष उदय शिंदेसाहेब कार्यक्रमाच्या वेळेपूर्वीच उपस्थित झालेले दिसले. आपल्या शिलेदारांची होत असलेली धावपळ ते स्वतः बघत होते. त्यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे निरीक्षण केले होते. कणकवली तालुका शाखेचे उपक्रम पाहून ते अतिप्रसन्न झालेले दिसले. शाखेच्या शैक्षणिक , सामाजिक व संघटनात्मक कार्याची भलीमोठी यादी पाहून ते त्यावर भरभरुन बोलताना दिसले. त्यांनी कणकवली तालुका शाखेच्या शिलेदारांची विशेषतः तालुकाध्यक्ष , तालुका सरचिटणीस यांची पुनःपुन्हा नावे घेत  तोंड भरुन स्तुती केली. त्यांनी केलेले मार्गदर्शन अनमोल असेच होते. म्हणूनच कणकवली शाखेचे उपक्रम राज्याला रोल मॉडेल ठरावेत असा त्यांनी पुनरुच्चार केला होता. 

          बासरीवादनाने कार्यारंभ झाल्याने सर्वांचे कान तृप्त झाले होते. दीपप्रज्वलन संपन्न होताना सर्वांच्याच चेहऱ्यावर भक्तिभाव फुलताना दिसला. त्याला जोड मिळाली ती महिला आघाडीने सादर केलेल्या ईश्वस्तवन व स्वागतपद्याची. सूर , लय आणि ताल यांचा त्रिवेणी संगम साधत वाद्यवृंदांनी दिलेली साथही अविस्मरणीय अशीच. 

          संपूर्ण प्रेक्षागृहात तुडुंब गर्दी असताना सर्वांचेच लक्ष कार्यक्रमाकडेच होते , हातातल्या मोबाईलकडे नव्हते. कार्यक्रम चढत्या क्रमाने पुढे पुढे सरकत होता. राजेश कदम यांच्या मंत्रमुग्ध करणाऱ्या आवाजाने सर्वांचे लक्ष व्यासपीठाकडे अक्षरशः खिळून राहिले होते. 

          सर्व मान्यवरांचे शाल , श्रीफळ , पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. तालुकाध्यक्ष विनायक जाधव यांनी मुद्देसूद व भावणारे प्रास्ताविक सादर केले. त्यांच्या बोलण्यात विनम्रता होती. प्रत्येक उपक्रमाविषयी त्यांनी आपले अनमोल विचार मांडलेच , आणि व्यक्तींच्या नावांचाही उपक्रमानुरूप उल्लेख केला. सर्वांचीच नावे त्यांना घ्यायची इच्छा दिसत होती. म्हणूनच गेली तीन वर्षे त्यांनी केलेल्या अहोरात्र कामाची शाबासकी त्यांना राज्यात नक्की मिळेल असे राज्याध्यक्ष साहेबांनी सुचित केले आहे हीसुद्धा शाखेच्या उत्तम कार्याची पोचपावतीच म्हणायला हवी. 

          समितीचे पाईक असे आहेत की त्यांच्याकडे कोणतेही पद नसले तरी ते आपले कार्य करीतच राहतात. सर्वसामान्य समिती शिलेदार म्हणूनच अधिक श्रेष्ठ ठरतो अशी प्रत्येक शिक्षक नेत्यांची निर्मळ भावना असते. समिती शिलेदारांच्या रोमारोमात " त्याग आणि सेवा " वास करत असते. समितीच्या सानिध्यात आल्यानंतर समजते की समिती काय चीज आहे ते ? न्यायाची चाड आणि अन्यायाची चीड बाळगत समितीचे शिलेदार नेहमीच संघटनात्मक कार्य करण्यात अग्रस्थानी असतात. 

          विविध शैक्षणिक उपक्रम राबवताना मुलांचा प्राधान्याने विचार केला तो समितीने. मुलांसाठी गाऊ आनंदे , लेट्स लर्न इंग्लिश , राष्ट्रभक्तीपर गीतगायन , खजिना कथांचा , कलांकुर असे अनेक अभिनव नवोपक्रम राबवले. सर्व बंधू भगिनींना सहभागी करुन घेतले. अभ्यासपूरक व ऑनलाईन उपक्रमांमुळे लॉकडाऊन काळातही विद्यार्थी अधिक चांगल्या प्रकारे शिकण्यास प्रवृत्त झाले. बावीस केंद्रातील गरीब होतकरु मुलांना सर्व प्रकारचे शैक्षणिक साहित्य उपलब्ध करुन देतानाही समितीचे दातृत्व लक्षात येते. कोविडमुळे अकाली निधन झाल्यामुळे अनाथ झालेल्या मुलांना तातडीची रोख मदत देऊन ' आम्ही तुमच्यासोबत आहोत ' हा दिलेला दिलासा मानसिक आधार देणारा होता. मोफत शिष्यवृत्ती सराव  परीक्षा घेऊन स्पर्धा परीक्षेला सामोरे जाण्याचे बळ विद्यार्थ्यांना नेहमीच दिले आहे. क्रीडास्पर्धेत खेळताना जखमी झालेल्या मुलांना तातडीची मदत करण्याचे व्रत समितीने अंगिकारले आहे , त्यामुळे आकस्मिक निधी मिळून मदतीचा हात मुलांना , पालकांना प्रासंगिक सहकार्याचा ठरतो आहे. अशा प्रकारे शैक्षणिक , सामाजिक कार्य करत असताना शिक्षकांचे वैयक्तिक प्रश्नही सोडवले जात आहेत. चेकपोस्टवर ड्युटी असताना समिती सदैव शिक्षकांच्या सोबत राहिली आहे. ऑक्सिजन प्लँट सारख्या मोठया आर्थिक घडामोडीत भरीव मदत करणारी समितीची सिंधुदुर्ग शाखा सामाजिक भान जपणारी संघटना ठरली आहे. 

          विविध तालुक्यांमध्ये समितीने अनेक माध्यमातून विद्यार्थी , पालक यांचे हित जपणारे उपक्रम नेहमीच राबवले आहेत. शिक्षकांच्या सांस्कृतिक , शैक्षणिक गुणांना वाव देण्यासाठी विविध गुणदर्शन कार्यक्रम , समितीचे दशावतारी कलाकार घेऊन नाटके सादर केली आहेत. समितीने अशी विविध रत्ने असलेले अवतारी शिक्षक निर्माण केले आहेत. समितीतील शिक्षक शिलेदारांची ही शैक्षणिक धडपड बघून कधी कधी वाटते , देवाने यांना शिक्षक रूपाचा अवतार घेऊन पृथ्वीतलावर पाठवले असावे. 

©️ प्रवीण अशितोष कुबलसर (  9881471684 )



Tuesday, March 29, 2022

🛑 एकदम सही

🛑 एकदम सही

          भरत माझा आवडता मराठी नट आहे. त्याचं ' ऑल दि बेस्ट ' हे पहिलं नाटक खूप पूर्वी पाहिलं होतं. त्यात त्याने केलेली ' मुक्या ' ची भूमिका कमालीची होती. तेव्हा भरत एवढा भरात नव्हता. त्याच्या चित्रपटांची सलग शृंखला येत गेली. अशोक सराफ , लक्ष्मीकांत बेर्डे नंतर भरतला पाहायला प्रेक्षक पसंती देऊ लागले. त्याचा मॅड परफॉर्मन्स लोकांना इतका आवडू लागला कि त्याचे बघितलेले चित्रपट पुन्हा पुन्हा बघण्यात मज्जा वाटू लागली. 

          श्रीमंत दामोदरपंतने तर कहरच केला. त्याच्या ' गोड गोजिरीने ' त्याला खूप प्रसिद्धी मिळाली. एक साधा अभिनेता आपल्या विनोदी अभिनयाच्या जोरावर प्रचंड लोकप्रिय होताना आपण सर्वांनीच पाहिला असेल. त्याचं वेगळं हसणं आपल्याला हसवून जातं. त्याच्या चित्रविचित्र अंगविक्षेपांनी हास्याचे फवारे उडू लागतात. 

          त्याच्या गंभीर भूमिका पाहिल्या. तो हसवतो , तसा रडवू शकतो इतका त्याचा सहज सुंदर अभिनय आहे. त्याचे दहा हजारांपेक्षा अधिक नाट्यप्रयोग झाल्याचे समजते आणि आपला विश्वासही बसत नाही. पण हे खरे आहे. 

          विजय कदम यांनी साकारलेली ' मोरुची मावशी ' करणं सोपी गोष्ट नव्हती. ती त्याने लिलया पेलली आहे. ' टांग टिंग टिंगाक , टांग टिंग टिंगाक , टांग टिंग टिंगाक , टुंग ' हे त्याने स्वतः म्हणून नाचलेलं गाणं पुन्हा पाहावसं वाटत राहतं. 

          हल्लीच त्याचं ' पुन्हा सही रे सही ' हे नाटक पाहिले. एकाच नाटकात पाच भूमिका करताना त्याने केलेले प्रवेश चक्रावून सोडतात. एका विंगेतून निघून जातो आणि दुसऱ्या विंगेतून वेगळी वेशभूषा करुन परत परत येणारा भरत ग्रेटच आहे. डोळ्यांच्या पापण्या लवत नाहीत , तोपर्यंत तो दुसऱ्या भूमिकेत कसा काय हजर होतो हे त्यालाच ठाऊक. ते नाटक पाहताना आमचा गोंधळ उडून जातो , तर त्याचा किती गोंधळ होत असेल याची कल्पना केलेलीच बरी. शेवटपर्यंत रंगमंचावर होणारा गोंधळ अनुभवतानाची मजा प्रत्यक्षच  घ्यायला हवी. 

          मदन सुखात्मे नावाचे एक गृहस्थ असतात. ते मृत झाल्याचे त्यांच्या लांबच्या नातेवाईकांना समजतं आणि त्यांची मालमत्ता आपली करुन घेण्यासाठी सर्वांची चाललेली धडपड माणसाच्या मरणाची वाट पाहणारी ठरते. 

          ज्यांच्याकडे भरपूर इस्टेट असते , त्यांच्या जाण्याची वाट मुलं , पत्नी किंवा नातेवाईक बघत असतील तर किती भयानक गोष्ट आहे. शेवटी हा मदन सुखात्मे मेलेलाच नसतो हे समजते तेव्हा तोतया बनलेल्या मदन सुखात्मेंची झालेली घाई विनोद निर्माण करते. एका वेळी पाच पाच ठिकाणी मदन सुखात्मे दाखवताना दिग्दर्शक आणि सहकलाकार यांनी केलेला अभिनय हुबेहूब भरत जाधव सारखाच वाटतो.  ही कला भरत जाधवांसारखे कलाकारच दाखवू शकतात. ही सगळी ड्रामेबाजी एका सहीसाठी चाललेली असते. प्रत्येक घरात जर सहीसाठी एवढा आटापिटा केला जात असेल तर तो थांबला पाहिजे. इस्टेटीसाठी आपण घरातच शत्रू बनतो. ही इस्टेट नसती तर खूप बरे झाले असते असे जेव्हा वाटते , तेव्हा माणसे डेडस्टॉक संपत्ती वाढवण्यापेक्षा ' मानवीय नात्यांची संपदा ' वाढवण्यासाठी प्रयत्न करु लागतात. हे मात्र ' एकदम सही ' आहे. 

©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 )



Sunday, March 27, 2022

🛑 वेताळ गेलो चोरीक

 🛑 वेताळ गेलो चोरीक

          चांदोबा हे आमचे सर्वांचे लाडके मासिक. कणकवली नगर वाचनालय येथे बालवाचक म्हणून नोंदणी केल्यानंतर दर दोन दिवसांनी नवनवीन पुस्तके वाचायला मिळत. चांदोबा , कुमार , किशोर , ठकठक , लोटपोट अशी अनेक बालवाङमये आम्ही वाचत असू. चांदोबातील ' विक्रम वेताळाच्या गोष्टी '  क्रमशः असत. त्यामुळे पुढच्या अंकाची वाट पाहण्याशिवाय पर्याय नसे. त्या गोष्टीतील वेताळ विक्रमाला प्रत्येक कथेत प्रश्न विचारत असे. विक्रमाच्या पाठीवर लोंबणारा वेताळ त्याकाळी आमच्या स्वप्नातही यायचा. घाबरत उठून आम्ही भावंडे आईबाबांच्या कुशीत सामावत असू. 

          त्यानंतर पाचवी ते सातवीच्या दरम्यानच्या काळात महेश काणेकर नावाचे बालकादंबरीकार आम्हाला एक बालनाट्य शिकवायला येत. त्याचे नावच होते , " वेताळ गेलो चोरीक ". ते स्वतः त्याचे लेखक आणि दिग्दर्शक दोन्ही होते. त्यांनी लहानांसाठी अनेक पुस्तके लिहिली आहेत. ते चित्रकारिता करीत. ते पोर्ट्रेट काढत असताना मी अनेकदा थक्क होऊन पाहत बसत असे. उंच ,  कुरळे केस असलेले महेश काणेकर उत्तम गायक असल्याने त्यांची श्रवणीय गाणी ऐकून मलाही तसं गाण्याची सवय लागली असावी. त्यांच्या या नाटकाची स्टोरी आता अजिबात आठवत नाही. त्यात माझी भूमिका कोणती होती तेही आठवत नाही. रिहर्सलच्या वेळी भालचंद्र मठाच्या रंगमंचावर आम्ही बसत असू. तिथे एक भले मोठे पिंपळाचे झाड होते. त्याची सावली आम्हाला सोबत करी. 

          वाचता वाचता ' कॉमिक्स ' ची पुस्तकेही वाचत गेलो. त्यात वेताळ असे , स्पायडरमॅन असे. गोष्टी चित्ररुप असत. त्यामुळे ही पुस्तके पुन्हा पुन्हा वाचूनही कधीच कंटाळा आला नाही. त्यातील वेताळ वेगळाच असे. त्याच्या अंगावर कायम बुरखा असे. त्याचा बुरखा काढलेला चेहरा कधीच पाहता आला नाही. 

          अभ्यासामुळे काहीच दिवसांत त्यांचे वाचन मागे पडले. वाचण्याची आवड वाढल्यामुळे कणकवली कामगार केंद्रातील पुस्तके वाचायला जाऊ लागलो. अभ्यास जास्त आवडू लागल्याने किंवा स्कॉलरशिप परीक्षेला बसल्यामुळे अभ्यास करण्याचे माझे तास वाढत गेले. 

          ' वेताळ गेलो चोरीक ' या बालनाट्याचे कथानक आठवत नसले तरी माझ्या वाचनातील ' वेताळ ' केव्हाच चोरीला गेला होता. 

©️ प्रवीण अशितोष कुबलसर

( 9881471684 )



Sunday, March 20, 2022

🛑 मी ब्लॅंक झालो

🛑 मी ब्लॅंक झालो

          लहानपणापासून आपण कितीतरी वेळा ब्लॅंक झालो असणार. पण मोठेपणी ते लक्षात येते. ब्लॅंक होणे म्हणजे मन पूर्ण रिक्त होणे असा होतो. पण कधी कधी आपलं मन रिक्त होणं केव्हाही चांगलंच. ब्लॅंक होणे म्हणजे विसरून जाणे असाही अर्थ होतो. तोही बरोबरच आहे. घाबरुन बऱ्याचदा विसरण्याची शक्यता जास्त असते. अनेकांचे तसेच होत असेल. माझे तर अनेकदा तसे झाल्याचे मला चांगलेच आठवते आहे. 

          शाळेत परीक्षेला जाताना सर्व काही आठवत असते , पण पेपर हातात पडला की ब्लॅंक व्हायला होते. जे आठवत होते ते सगळे विस्मरणात जाते. नको ते आठवू लागते. हवे तेव्हा हवे ते आठवत का नाही ते समजण्याला मार्ग नसतो. अर्थात आपला आत्मविश्वास कमी असतो म्हणून असे होत असेल का ? म्हणजे आत्मविश्वास आला की सर्व आठवू लागेल असं आहे का ? तर तसेही होताना दिसत नाही. ज्यांच्याकडे आत्मविश्वास ठासून भरलेला असतो , तेही कधीना कधी ब्लॅंक झालेच असतील ना ? 

          भाषण करताना मोठ्या समुदायासमोर बोलायचे असते. त्यावेळी जे ठरवलेले असते , ते आठवतच नाही. मध्येच लिंक तुटते. बोलायचे असते ते कुठल्या कुठे विरुन जाते. कधी कधी मित्रांमध्ये बोलतानाही ब्लॅंक व्हायला होते. ते आपला असा काही पाणउतारा करतात की त्यापुढे आपणांस बोलता येत नाही. अर्थात त्यावेळी आपण ब्लॅंकच झालेले असतो. 

          डीएडच्या सराव पाठांनाही तसंच. तिथे तर मोजकंच बोलायचं असतं. तिथेही मध्येच ब्लॅंक व्हायला झालं आहे. हे ब्लॅंक होणं काही थांबणारी गोष्ट नाही. कधी आपण निरुत्तर होतो , आपला मेंदूच चालत नाही. तो बंड करु लागतो. त्याच्या भरवश्यावर सर्व चाललेलं असतं , तर तोच आपल्याला दगा देत असतो. समोरचे मस्त एन्जॉय करतात. कशी फजिती झाली !!! असा अविर्भाव आणतात. त्यांची अशी कधीतरी फजिती झालीच असेल ना , याचा ते विचार करताना दिसत नाहीत. 

          डीएडला असताना आमच्या दोन्ही वर्गाच्या म्हणजे ज्युनिअर आणि सिनिअरच्या मुलांनी मिळून एक एकांकिका केली होती. तिचे नाव होतं , " एक मेलेलं पोस्ट , त्याची जिवंत गोष्ट " त्यात आम्ही सात  , आठजण पात्रे होतो. सगळी पात्रे आमचे दिग्दर्शक प्रदिप मांजरेकर यांनी निवडली होती. त्यावेळी धनंजय क्लास म्हणजे आमच्या सरावाची जागा होती. वेळ मिळेल तसे आम्ही सर्व एकत्र येऊन एकांकिकेचा सराव करत होतो. कणकवलीतील नाथ पै एकांकिका स्पर्धेत भाग घेणं ही साधीसुधी गोष्ट नव्हती. पण प्रदिप मांजरेकर यांना कायम आव्हाने पेलण्याची सवय होती. त्यांनी आम्हाला सतत प्रभावित करत ठेवले होते. मंगेश लाड , प्रशांत बोभाटे , शेट्ये आणि असे काही मित्र त्यात भूमिका करणार होते. माझी भूमिका एका म्हाताऱ्याची होती. तालमीच्या वेळी मी माझा म्हातारा छान रंगवत असे. माझ्याकडे मोठी मोठी वाक्ये होती. ती मी चांगलीच पाठ केली होती. बालपणात चार , पाच बालनाट्ये केली होती. पण यावेळी जाणत्या रसिक प्रेक्षकांसमोर सादरीकरण करायचे म्हणजे मोठी कसरतच होती. 

          जसजशी एकांकिकेची तारीख जवळ येत होती , तशी पोटातील पोकळी वाढत चाललेली दिसत होती. ही पोकळी भीतीने भरु लागली होती. 

          मित्रांचे नाटक म्हणून वेशभूषा , रंगभूषा , केशभूषा करण्याची जबाबदारी सहदेव पालकरदादा याने घेतली होती. तो स्वतः एक आर्टिस्ट होता. हाडाचा शिक्षक होता. त्याला आमची रंगभूषा करणे सोपे होते. माझी म्हाताऱ्याची भूमिका असल्याने त्याने मला पांढरी मिशी लावली होती. मिशी चिकटवण्यासाठी त्याने कसलेसे लिक्विड लावले होते. ते लावल्यानंतर मिशी घट्ट चिकटली होती. पण मला बोलता येईना. मिशी अडकू लागली होती. बोलताना तोंड उघडताना त्रास व्हायला लागला होता. मी दादाला तसे सांगितले. दादा म्हणाला , " प्रवीण , घाबरु नकोस , तुला हळूहळू बोलायला येईल. बाहेर जाऊन बोलायचा सराव करत राहा. " त्याने सांगितल्याप्रमाणे मी आपला सराव करायला सुरुवात केली होती. थोडे थोडे जमूही लागले होते. 

          आता आमच्या एकांकिकेचा नंबर आला. नेपथ्यकारांनी अचूक नेपथ्य केले होते. प्रकाश योजना बरोबर होती. ध्वनी योजना हवा तिथे ध्वनी वाजवत होती. आमचा दोघांचा प्रवेश सुरुवातीलाच होता. प्रवेश झक्कास झाला. टाळ्या मिळाल्या. मी म्हाताऱ्यासारखा बोलत होतो. मस्त चेव येत होता. समोरचे प्रेक्षकही दिसू लागले होते. त्यातले काही ओळखीचेही होते. त्यांना बघून मला रंगमंचावरच घाम फुटला. माझे शब्द , माझी वाक्ये मला आठवेनाशी झाली. मीच म्हणालो , " भाऊ , मला आता पुढचे काही आठवत नाही , तूच काय ते बोल. त्यावेळी मी ब्लॅंक झालो होतो. समोरच्या पात्राने मला सांभाळून घेतले, आमचा प्रयोग यशस्वीपणे पूर्ण झाला. पुढची माझी सर्व स्वगते नीट पूर्ण झाली तरी सुरुवातीला मी ब्लॅंक झालो ही खंत होतीच. 

          हल्लीच मी एका नाटयोत्सवाला गेलो होतो. तेव्हाही एक कसलेला नाट्य अभिनेता मध्येच ब्लॅंक झाला होता. त्यावेळी त्याने रंगमंचावरूनच ते कबुलही केले होते.  त्यांचा अभिनय एवढा अफलातून होता की मी तर भारावूनच गेलो होतो. पण त्यांच्या ब्लॅंक झाल्यानंतरच्या विनम्रपणे सांगण्याबद्दल मी जास्त भारावून गेलो आणि मला माझे ब्लॅंक होणे आठवले. 

          आयुष्य हा एक रंगमंच आहे. त्यावर आपण आपल्या जीवनाचे नाट्य सादर करत असतो. ते करतानाही आपण अनेकदा ब्लॅंक होतो , कधी ते ब्लॅंक होणे आवश्यकही असते. पण कधी ब्लॅंक झाल्यामुळे आपणांस पुढील अनर्थांना तोंड देण्याची पाळी येते. प्रयत्नपूर्वक आपल्याला या ब्लॅंकच्या जागा भरता आल्या पाहिजेत. 

©️ प्रवीण अशितोष कुबलसर

( 9881471684 )



Monday, March 14, 2022

🛑 गोमू संगतीनं

🛑 गोमू संगतीनं

          होळी आली की गोमुची आठवण येते. प्रत्येक घराघरात खेळे घेऊन जाणारे गावागावातील गट पुन्हा एकदा त्यानिमित्ताने एकत्र येतात. काही गावात ' कोळीण ' नावाचा प्रकार असतो. ही कोळीण म्हणजे एक पुरुषच असतो. त्याने साडी परिधान केलेली असते. तो किंवा ती अगदी बालगंधर्व दिसत नसली तरी बाईसारखी तरी नक्कीच दिसते. मेकअप थोडा भडकच केलेला असतो. पण ही ' कोळीण ' होळीच्या काळात भाव खाऊन जाते.      

          पूर्वी परंपरेने एकाच घरातील पुरुष साड्या नेसून कोळीणी बनत. मग पुढे पुढे साड्या नेसणारे मिळेनासे झाले. मग आता कोणालाही धर दपट साडी नेसवून रंग फासून कोळीण बनवले जाते. थोडे नाचायला आले की झाले. 

          होळीच्या दिवसांत या कोळीणीचा दर वाढतो. अशा कोळिणी आता अडवून दाखवू लागल्या आहेत. देवस्थानासाठी करावे लागते म्हणून या कोळीण होणाऱ्या नटांच्या हाता पाया पडण्याची वेळ येते. 

          लहानपणी आम्ही कोळीणीच्या मागे फिरत असू. तीच तीच गाणी असली तरी ऐकायला मजा वाटे. कोळीण आपली रुमाल हातात धरुन पुढे मागे  ठेक्यात नाचत राही. डफाच्या तालावर पायांचा ठेका धरणाऱ्या गवळणी प्रशंसेस पात्र ठरत. कोणी वीस , पन्नास , शंभर रुपये तळीमध्ये ठेवून कोळीणीला शबय देत. 

          माझे बालाकाका कोळीण झाले की छान नाचत. त्यांच्यासारखे नाचून गाणे म्हणणारी गवळण मी आजपावेतो पाहिली नाही. सूर , ताल आणि चाळांचा अचूक ठेका असल्यामुळे त्यांची कोळीण सर्वांनाच आवडे. त्यांच्या लावण्या सुद्धा वैविध्यपूर्ण असत. चाली श्रवणीय असत. त्यामुळे प्रत्येक घरात वेगळा नाच पहावयास मिळे. आमच्या भाईकाकांची डफावरची थाप कोणालाही नाचायला भाग पाडेल अशी होती. 

          गुढीपाडव्याच्या रात्री मांडावर सगळी गाणी होत. मध्येच एखादी बतावणी असे. विनोद असत. काही माणसे विचित्र सोंगे आणून उपस्थितांना हसवून सोडत. ती सोंगे पुन्हा पुन्हा पहावीशी वाटत. 

          आम्ही कणकवलीत असल्यामुळे शाळा करुन ' गोमुचा नाच ' करताना खूपच धावपळ उडून जाई. आम्हाला अभ्यासही करायचा असे आणि गोमुचा नाचही करायचा असे. मग शनिवार , रविवार दोन दिवस निवडून किंवा जोडून एखाद्या दिवसाची शाळेला दांडी मारुन गोमुचा नाच घेऊन जात असू. 

          त्यावेळी आम्ही जळकेवाडीत राहत होतो. सदानंद डिचोलकरांच्या घरी भाड्याच्या खोलीत राहत असलो तरी मालक आणि सर्व शेजारी यांच्याशी आमचे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध होते. मी गाणी म्हणण्यात पटाईत होतो. माझा छोटा भाऊ कृष्ण होत असे. शेजारचे दोघे सवंगडी होत असत. 

          त्या दिवशी रविवार होता. आम्ही दिवसभर आमचा गोमू घेऊन फिरत होतो. कोणी दहा पैसे , वीस पैसे असे पैसे देत असत. पन्नास पैसे म्हणजे आमच्यासाठी त्यावेळी सगळ्यात मोठी देणगी असे. सोबत मोठा संजयदादा डिचोलकर कायम असायचा. तो आमचा खजिनदार होता. संध्याकाळपर्यंत आमचे एकूण सोळा रुपये जमले होते. एका दिवसात आमच्या गोमूने केलेली ही कमाई आमच्यासाठी त्यावेळी लाखमोलाची होती. आमच्या वाटणीला येणारे सर्व पैसे आम्ही आमच्या आईच्या ताब्यात देऊन ठेवू. आम्हाला शिक्षणासाठी लागणाऱ्या वस्तूंसाठी आई त्यातले थोडे थोडे पैसे देत राही. आम्ही त्या पैशातून कधीही खाऊ घेतल्याचे मला आठवत नाही. आपल्या या कलेचा उपयोग आम्ही शेवटी शिक्षणासाठीच केला होता या गोष्टीचा आजही मला सार्थ अभिमान वाटतो. 

          लहान असताना लाज वाटत नसे , थोडा मोठा झाल्यानंतर गोमू घेऊन जायला लाज वाटू लागली. होळीच्या काळात परीक्षांचे वातावरण असे. त्यामुळे काही लोक आम्हाला ओरडत असत. परीक्षेत ' गोमूची गाणी ' लिहिणार आहात काय ? असेही म्हणणारी माणसे भेटली आहेत. काहींनी पाठीवर शाबासकीही दिली आहे. शाबासकी देणाऱ्या लोकांना आम्ही नेहमीच लक्षात ठेवले आहे. ओरडणाऱ्या व फुकटचे सल्ले देणाऱ्यांनाही नेहमीच आदर दिला आहे. 

          आता गोमुचा नाच बघितला की माझा लहानपणीचा गोमुचा नाच लक्षात येऊन आजही हसू येतं आणि स्वतःचा अभिमानही वाटतो. 

©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 )



Saturday, March 12, 2022

🛑 पावनखिंड : एक ऐतिहासिक बाजी

         " काळाच्या जबड्यात घालूनी हात , जात ही आमुची , पाहा चाळूनी पाने आमच्या इतिहासाची " हे गाणे मी महाविद्यालयात शिकताना कधी काळी म्हटल्याचे आठवते. खरंच या ओळीतील शेवटची ओळ खूप महत्त्वाची आहे. आपल्याला आपला इतिहास चाळून पाहता यायला हवा. 

          आज दुसऱ्यांदा शाळेतील मुलांसोबत ' पावनखिंड ' हा चित्रपट पाहण्याचा सुवर्णयोग आला. मी एक शिक्षक आहे , म्हणून मला हा सुवर्णयोग वाटतो. कारण कुटुंबासोबत चित्रपट पाहणं आणि आपल्या विद्यार्थ्यांसोबत चित्रपट पाहणं हे वेगवेगळे अनुभव आहेत. मी हे दोन्ही अनुभव घेतले आहेत. दोन्ही वेळेला माझ्या भूमिका बदलल्या होत्या. मनोरंजन आणि ज्ञानार्जन अशा त्या दोन गोष्टी असाव्यात. 

          मुलांना चित्रपटाविषयी सांगितल्यापासून ती बघण्यास अधीर झालेली दिसत होती. दररोज मुलांचे आकडे वाढताना दिसत होते. चित्रपटात मोठया पडद्यावर दिसणारा थरार मुलांना अनुभवायचा होता. 

          शनिवारी सर्रास उशिरा शाळेत येणारी मुले माझ्याअगोदरच शाळेत येऊन वाट बघताना दिसली. गाडीने जायचे तर प्रवासी गोळ्यांपासून तयारी ठेवली होती. सर्वांना शिवाजी महाराजांची प्रतिमा असलेले बॅज लावले. मुले आनंदाने निघाली होती. 

          शाळेतील आम्ही शिक्षक त्यांच्याबरोबर होतो. आज आम्हांला त्यांना अधिक जाणीवपूर्वक सांभाळण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी होती. बोलता बोलता सिनेमागृह कधी आले ते मुलांनाही समजले नाही. आमच्या आधीच बरीच मुले येऊन रांगेत राहिलेली दिसली. आम्ही मुलांना महत्त्वाच्या सूचना द्यायला सुरुवात केली होती. आमचा नंबर यायला उशीर होत होता. मुले नुसती " सर , कधी जाणार आपण ? " असे प्रश्न विचारत राहिली होती. त्यांना कंटाळा येऊ नये म्हणून मी त्यांचे छान छान फोटो काढत राहिलो होतो. शेवटी एकदाचा नंबर लागला. मुले भराभर आत जात होती. त्यांच्या नजरा चौफेर दौडत होत्या. त्यांनी जे बघितले नव्हते , ते त्यांना बघायला मिळत होते. ते सर्व क्षण मुले आपल्या मेंदूत टिपून घेताना दिसत होती. बॅज लावल्यामुळे आम्ही आमची मुले ओळखु शकत होतो. 

          मुलांनी खुर्च्यांचा ताबा घेतला. चित्रपट सुरु होण्याआधीच त्यांनी आपल्याकडील आणलेले खाऊ खायला सुरुवात केली. कदाचित त्यांना भूक लागली असावी !!! चित्रपट सुरु झाला होता. आता मात्र त्यांचे खाऊ खाणे थांबले होते. ती चित्रपटात दंग झाली. 

          शिवाजी महाराजांचा इतिहास बघताना त्यांचे डोळे विलक्षण चमकताना दिसत होते. पहिल्याच दृश्यात शिवाजी महाराज आपल्या शंभुबाळाला पावनखिंडीचा पराक्रम सांगत असताना आमची मुले जणू शंभुबाळ झालेली दिसली. 

          चौथीच्या इतिहासाच्या पुस्तकात नसलेले मावळे पाहून त्यांच्या ज्ञानात अधिक भरच पडत होती. जे वर्षभरात पुस्तकातून शिकवले जाणार नव्हते , ते दोन तीन तासांत बघण्याची संधी मुलांना प्राप्त झाली होती. 

          हरप्या , अगिन्या , रायाजी , कोयाजी , दिपाई , शिवा काशीद , बहिर्जी नाईक , बांदल , बाजीप्रभू आणि सगळी मावळे मंडळी पाहून मुले भारावून गेली होती. आपल्या प्राणांची पर्वा न करणारी कितीही उदाहरणे दिली तरी ती समजली नसती , पण चित्रपट पाहिल्याने त्यांचा देशाभिमान , स्वराज्याभिमान अधिकाधिक वृद्धिंगत होताना पाहायला मिळाला ही विशेष नोंद करण्यासारखी गोष्ट आहे. त्यावेळी शिवाजी महाराजांनी उच्चारलेले हे वाक्य मनात अधिक खोलवर रुजले जायला हवे असे वाटते. राजे म्हणाले , " ज्या सत्ता स्वार्थासाठी असतात , त्यांना त्याग आणि स्वामीनिष्ठा माहिती नसते. " आपण आपल्या कर्तव्याशीही असेच कर्तव्यनिष्ठ असायला पाहिजे असाही एक अर्थ मी काढला होता. 

          " वज्र वलय " हा युद्धाचा प्रकार पहावयास मिळाला. शिवा काशिद जेव्हा शिवाजीराजे बनून सिद्धी जोहरला भेटण्यास गेला तेव्हाची त्याची स्वामीभक्ती पाहिली. डोक्यावरचा शिवरायांचा जिरेटोप उतरवून त्याला त्याने मुजरा केला आणि तो जे वाक्य बोलला त्याने अंगावर शहारे आले. शिवा म्हणाला , " राजं , शेवटचा मुजरा " … 

          रायाजीने पावनखिंड लढवताना आपला देह ठेवला , तेव्हा इकडे त्यांची पत्नी शौर्याचा दीप विझु नये म्हणून आटापिटा करताना दिवा विझतानाचा क्षण हृदय भेदून टाकणाराच होता. 

          बाजीप्रभूंनी आपल्या अखेरच्या क्षणापर्यंत शत्रुसैन्याला रोखून ठेवतानाचे दृश्य पाहताना त्या काळी प्रत्यक्षात काय घडले असेल याची जाणीव होऊन त्यांना नतमस्तक व्हावेसे वाटले. विशाळगडावर पोहोचल्यानंतर शिवाजीराजे म्हणाले , " आमचे बाजी वाट पाहत असतील , तोफा वाजवा. " त्यावेळी ते स्वतः ही गर्भगळीत झाल्याचे दिसले. तेव्हा ते म्हणाले , " बाजी लवकर या " बाजी काही परत आले नाहीत. पण आपले बाजी कायमचे सर्वांच्या मनामनात अमर झाले आहेत. 

          चित्रपट संपला , तरी मुलांना घरी जाईपर्यंत पावनखिंड डोळ्यासमोरुन हलता हलत नव्हती. धन्य ते शिवराय , धन्य तो बाजी.

©️ प्रवीण अशितोष कुबलसर (9881471684 )




















Tuesday, March 1, 2022

🛑 राकेशावतार

          त्याची माझी अगदी लहानपणापासूनची ओळख. तो आमचा सलून मधला कायमचा कस्टमर.  गोड गोंडस मुलगा. गोरा गोरापान. पांढराशुभ्र. त्याच्या आईवडिलांसारखा. किती विनम्र !!! त्याचं नाव राकेश. त्याला दुकानात सोडलं कि सूचना मिळे , " याचे केस बारीक करुन टाका. कट मारताना नवीन ब्लेड वापरा. " आम्ही प्रत्येकाला नवीनच ब्लेड वापरतो. पण त्यांच्या घराकडून ब्लेड पाठवले जात असे. या राकेशच्या केसात फणी घातली रे घातली की तो रडू लागे. तो नाजूक होता , पण त्याच्या डोळ्यांत एक विलक्षण चमक दिसायची. साधा , सरळ मुलगा. शाळेतही नेहमी चांगल्या गुणांनी पास होत पुढे जाणारा. 

          या मुलाच्या पालकांचे आमच्यावर अनेक उपकार झाले आहेत. आम्ही लहान असताना त्यांची आदर्श वर्तणूक आम्हाला चांगलं वागण्याची प्रेरणा देत आली आहे. 

          हा मुलगा नंतर मोठा झाल्यानंतर भेटला तो कलाकार झाल्यानंतरच. त्याच्याशी संवाद साधताना माझाही आनंद वाढत जाताना दिसे. तेव्हाचा तो निरागस राकेश , आताही तितकाच निरागस वाटत होता. त्याचं बोलणं , आदर देणं हे सगळं अगदी जसंच्या तसं !!! 

          आता आज तो एका बड्या प्रिंटिंग प्रेसचा मालक आहे. कोणताही बडेजाव नाही. शांत , संयत व्यक्तिमत्त्व. आता त्याचं व्यक्तिमत्त्व अधिक कोरीव लेण्यासारखं कोरलं गेलेलं. त्याच्या ऑफिसमध्ये गेलो होतो. त्यानं आदरपूर्वक स्वागत केलं. बसायला सांगितलं. एका सुंदर आलिशान अशा वातानुकूलित कार्यालयात बसलेला राकेश मला लहानपणी सारखाच भासला. 

          त्यानं मला त्याच्या एका कार्यक्रमाला बोलावलं होतं. मी जाऊ शकलो नाही याची खंत मी त्याला उघडच बोलून दाखवली. त्याने आपल्या मोबाईलमधून एक बाईचा फोटो काढून दाखवला आणि ओळखण्यास सांगितले. 

          फोटोतली बाई माझ्या ओळखीची नव्हती. मी एकदा दोनदा नव्हे तीन चार वेळा त्याच्याकडे बघत राहिलो. तो त्याचाच फोटो होता. तो राकेशच होता. स्त्रीच्या वेशात त्याला ओळखणं खरंच अवघड गोष्ट होती. मी तो फोटो माझ्या बाबांनाही दाखवला. बाबा त्याला ओळखू शकले नाहीत. मी त्यांना हा राकेशचा स्त्री अवतार आहे असे सांगितले. तो सपशेल स्त्रीच दिसत होता , एवढी जबरदस्त वेशभूषा त्याने केली होती. असा हा राकेशावतार. याचा आज वाढदिवस आहे. त्याला वाढदिवसाच्या लेखरूपी शुभेच्छा. 

©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 )




Thursday, February 17, 2022

🛑 इब्यालो

          संदीप खरेंचं बालगीत लागलं होतं. ते ऐकताना जुन्या आठवणी जागृत झाल्या. गाण्याचे बोल असे होते , " चमालातु चंगतोसा चमी चकए चष्टगो , मजेत बसा पसरुन पाय , मुळीच नाहीत कष्टगो "… म्हणजे त्यांनी चकारी भाषेचा उपयोग केला होता. सगळ्या शब्दांची सुरुवात ' च ' ने होते म्हणून त्या भाषेला ' चकारी ' भाषा म्हणत असावेत. भाषा बोलताना व ऐकताना खूप गंमत वाटते. त्याहीपेक्षा गंमत म्हणजे समोरच्याला अशी भाषा बोलता येत नसेल तर आपण या सांकेतिक भाषेत बोललो तर त्यांना कळायला अवघड जाणारी ही भाषा आहे. थोडा प्रयत्न केला तर ती शिकायला सोपी भाषा आहे. 

          आम्ही लहानपणी ही चकारी भाषा अनेकदा बोलायचो. प्रत्येक भागात ही भाषा वेगवेगळ्या प्रकारे बोलली जात असेल. माझी मोठी आत्या ही भाषा बोलायची. त्यानंतर कणकवलीत आम्ही जशा खोल्या बदलू लागलो तशा भाषेतही बदल घडत गेला. प्रत्येक ठिकाणची भाषा काही फरकाने बदलत गेली. आम्ही लहान मुले एकत्र आलो कि आम्ही मोठ्यांना समजू नये म्हणून चकारी भाषेचा वापर प्रामुख्याने करु लागलो. सतत या भाषेचा उपयोग करत असल्यामुळे सराव होत गेला आणि बोलण्यातील गतीही वाढली. ही भाषा जेवढी जलद गतीने बोलाल तेवढी ती समजायला कठीण जाते. त्यामुळे आपण काय बोललो ते समोरच्याला बिल्कुल समजत नाही. तीच तर खरी गंमत असते. अशी भाषा बोलणाऱ्यांची मग चांगलीच गट्टी जमते. या आगळ्या वेगळ्या सांकेतिक भाषेत बोलणाऱ्यांची वेगळीच मैत्री होऊ शकते. 

          आम्ही पाचही भावंडे ही भाषा लिलया बोलत असू. आमच्या बाबांनाही ती येत होती. शाळेतल्या मोजक्या मित्रांना ती येत होती. आमच्या शेजारी राहणाऱ्या खेळगड्यांना ती चांगलीच येत होती. एखादा नवीन शेजारी आला कि आम्ही काय बोलतोय ते त्याला समजत नसे , त्यामुळे त्याची चांगलीच गोची व्हायची. गोची म्हणजे अडचण बरं का !!!

          आमच्या दुकानाशेजारीच कामगार कल्याण केंद्र होते. तिथे कामगारांच्या कल्याणासाठी विविध उपक्रम राबवले जात. एसटीतील कामगार , त्यांची मुले येथे सतत येत. सकाळी आणि संध्याकाळी तिथे खूप गर्दी होई. त्यामुळे माझ्या ओळखी वाढल्या. या कामगार कल्याण केंद्रात कॅरम , बुद्धिबळ , गायन , भाषण , वाचन , निबंध , दशावतारी नाटक , शिशुवर्ग , नाट्यस्पर्धा , भक्ती गीत गायन आणि असे अनेक उपक्रम बघायला मिळाले. मी कॅरम खेळायला तिथेच शिकलो. चॅम्पियन कॅरम बोर्डवर खेळण्याची संधी तिथेच मला मिळाली. स्ट्रायकर , रिबॉण्ड , क्वीन , बोरिक पावडर , थम असे अनेक शब्दांची भर पडत गेली. कॅरमची पीस अलगद पॉकेटमध्ये टाकण्याचे अवघड कौशल्य प्राप्त करुन घेतलं. क्वीन , कव्हर घेऊन समोरच्याला हरवतानाचा आनंदच वेगळा असायचा. त्यामुळे दररोज शाळा सुटल्यानंतर कॅरम खेळण्याचा छंदच जडला. इवल्याशा बोटात स्ट्रायकर पकडून त्याचा हलकासा स्ट्रोक मारुन पीस पॉकेटमध्ये गेली की त्याला ' कट :' मारणे म्हणत असू. असे अनेक कट मारायला , रिबॉण्ड मारायला मी शिकलो. 

          तिथे कॉलेजमध्ये शिकणारी मोठी मुलेही येत. त्यांचे पालकही येत. या सर्वांबरोबर हे सर्व खेळ खेळता येत. मोठ्यांबरोबर खेळताना जिंकलो तर आत्मविश्वास वाढत राही. मग आमच्या जोडीला चकारी भाषेचा अवलंब करावा लागे. ती भाषा ओठावर असे आणि कॅरम खेळणे बोटावर सुरु असे. 

          राजेश राजाध्यक्ष नावाचे एक कॉलेज कुमार त्यावेळी माझे मित्र बनले. त्यांना ही भाषा जलदगतीने बोलता येत असे. आम्ही मालवणी असल्यामुळे आमच्या मालवणी भाषेत चकारी भाषा बोलू लागलो. ही मालवणी चकारी भाषा बोलताना खूप मजा येई. 

          एकदा मी आणि राजाध्यक्ष कॅरम खेळत जोडीदार होतो. दुसरी जोडी आमच्यापेक्षा चांगली खेळणारी होती. पण आम्ही आमच्या चकारी भाषेत बोलत बोलत प्रतिस्पर्धी जोडीला नामोहरम करुन सोडले. त्यामुळे प्रतिस्पर्धी जोडीतील दोघेही घाबरुन खेळू लागले. त्यात एक चॅम्पियन खेळाडू होता. तोही घाबरला. मी छोटा होतो , पण खेळात आणि चकारी बोलण्यात चॅम्पियन होतो. राजाध्यक्ष आणि मी चकारीत बोलत होतो. राजाध्यक्ष मला मला म्हणाले , " केत इब्यालो " त्यांना असे म्हणायचे होते , " तो घाबरला ". समोरच्या जोडीला " इब्यालो " ही भाषा अजिबात समजली नव्हती. आम्हाला ती समजत होती म्हणून जास्त आनंद होत होता. आता " इब्यालो " या शब्दाचा आणखी काही वेगळा अर्थ असेल तर मला माहीत नाही. नाहीतर बाबा मी " इब्यालो " आधीच सांगतो. 

©️ प्रवीण अशितोष कुबल  ( 9881471684 )



Friday, December 31, 2021

🔴 रात्रीचा राजा

           🔴 रात्रीचा राजा

            जीवन हा एक रंगमंच आहे. त्या रंगमंचावर आपण प्रवेश केलेला आहे. कधीतरी एक्झिट घ्यायची आहेच. आपल्याला या रंगमंचावर विविध पात्रे रंगवावी लागतात. खरा खोटा अभिनय करावा लागतो. कधी अभिनयाला उत्स्फूर्त दाद मिळते , तर कधी मिळतच नाही. 

          मी लहानपणी नाट्यवेडा होतो. कोठेही नाटक असले तर ते प्रत्यक्ष बघावे असे वाटत राही. दशावतारी नाटके बरीच पाहिली असतील. बाबी नालंग , बाबी कलिंगण , आप्पा दळवी , चंद्रकांत तांबे , सुधीर कलिंगण अशा कलाकारांची दशावतारी नाटके विशेष लक्षात राहिली. ' माझी ढवळी , माझी पवळी ' असे म्हणत नाचत गात येणारे बाबी कलिंगण अधिक लक्षात राहिले आहेत. त्यांचा प्रवेश आला कि प्रेक्षक भारावून गेलेले मी पाहिले आहेत. त्यांच्या प्रत्येक वाक्याला आणि हालचालीला जबरदस्त टाळ्या पडत. त्यांनी बहुतेकदा साकारलेली म्हातारी गवळण विलक्षण भाव खाऊन जाई. आम्हाला ती म्हातारी आमच्या आजीसारखी दिसत असे. 

          एक पुरुष हुबेहूब म्हातारीचे सोंग वटवतो आहे अशी शंका सुद्धा येणार नाही , एवढे बारकावे बाबी कलिंगण दाखवत असत. नऊवारी साडीमध्ये ते छान दिसत. लाल मोठे कुंकू लावून,  तोंडात दात असतानाही दात नसल्याचा अभिनय ते करत असत. 

          मी तेव्हा कणकवली नं.३ या शाळेत शिकत होतो. जवळच भालचंद्र महाराजांचा मठ होता. मठात बऱ्याचदा नाटके असत. आम्ही एकही नाटक पहायचे सोडत नसू. त्यावेळी रात्री उशिराच नाटक सुरु होई. ते पहाटे पाच सहा वाजेपर्यंत चालत असे. चणे , शेंगदाणे , कांदाभजी खात खात नाटक बघण्याची लज्जत अधिकच वाढत असे. नाटकात राक्षस आला की मला भीती वाटे. मी बाबांचा हात घट्ट पकडून राही. थंडी असे. कुडकुडायला होई. पण राजाचे आणि राक्षसाचे युद्ध बघायला मज्जा येई. त्यांची गाणी म्हणण्याची पद्धत आवडे. एकही गायक आवाजाची पट्टी सोडत नसत. 

          सगळ्याच पात्रांचा एवढा मोठा आवाज असे की लाईट गेला तरी स्पिकरची गरज पडत नसे. राक्षसाचा आवाज तर खूपच मोठा असे. त्याच्या आवाजाने झोपलेली मुले उठून रडू लागत. पैशाची तळी घेऊन एक बाई प्रेक्षागृहात फिरे. तिच्या तळीमध्ये लोक सुटे पैसे टाकत. ती पैसे न देणाऱ्या लोकांच्या  गालाला हलकेच हात लावत असे. त्यामुळे ते लोकसुद्धा लाजून पैसे देत असत. बाबांनी मला नंतर सांगितले तेव्हा समजले कि ती बाई नसून तो एक साडी नेसून आलेला पुरुष होता ते. पण तो पुरुष होता असे कोणालाही वाटणार नाही अशी त्याची अफलातून वेशभूषा , रंगभूषा असे. 

          नाटकात हनुमान असला कि आणखी मजा येई. चंद्रकांत तांबे यांनी साकारलेला हनुमान मी अनेकदा बघितला आहे. त्यांचा प्रवेश प्रेक्षकांमधूनच होई. हनुमानाची चपळाई दाखवताना त्यांनी प्रेक्षकांची नेहमीच वाहवा मिळवली आहे. टाळ्यांचा कडकडाट.  प्रेक्षक चुरमुऱ्याचे लाडू फेकत असत आणि हनुमान ते अचूक पकडत असे. आम्ही लहान असताना आम्हीही लाडू फेकले होते. हा हनुमान आला कि संपूर्ण रंगमंच दणाणून सोडत असे. त्यावेळी या कलाकारांनी आपली एक वेगळीच छाप प्रेक्षकांच्या मनात कायमची उमटवली होती. त्यावेळी प्रेक्षकांची इतकी गर्दी असे कि बसायला जागा नसे. लोक दाटीवाटीने बसत आणि सकाळपर्यंत तोंडाचा आ करुन नाटक पाहात. सुधीर कलिंगण यांनी केलेला श्रीकृष्ण अगदी खराच वाटे. त्यांची राजाची , विष्णूची भूमिका जीवनविषयक तत्वज्ञान शिकवून जाई. 

          बाबी नालंग म्हणजे एक चालते बोलते नाट्यसाहित्यच. त्यांनी अनेक दशावतारी कलाकार घडवले असतील. त्यांचे शब्दांचे उच्चार स्पष्ट आणि शुद्ध असत. 

          हे दशावतारी कलाकार रात्रीचे राजा असत. सकाळी त्यांच्या सामानाचा बोजा त्यांच्याच कपाळावर घेऊन त्यांना पुढील नाटकासाठी रवाना व्हावे लागत असे. त्यांचे रंगकर्म सुरु असताना आम्ही त्यांच्या रंगखोलीत हळूच जाऊन पाहात असू. स्वतःचा मेकअप स्वतः करत आरशासमोर प्रखर प्रकाशात ते भडक रंग देत असत. त्यांचा प्रवेश येईपर्यंत त्यांचा मेकअप सुरुच राही. 

          यातील काही कलाकार हे हौशी आहेत , तर काही व्यावसायिक झाले आहेत. दिवसा नोकरी करुन रात्री नाटके करणारेही कलाकार मी पाहिले आहेत. एकदा मी रत्नागिरी गाडीत बसलो होतो. त्या गाडीच्या चालकाकडे माझं लक्ष गेलं. गाडी साक्षात श्रीकृष्ण चालवतोय असं मला वाटलं. खरंच तो श्रीकृष्णच होता. श्रीकृष्णाची भूमिका साकारणारे सुधीर कलिंगण गाडीचे सारथ्य करत होते. नाटकात हुबेहूब अर्जुनाच्या रथाचे सारथ्य करणारा हा माणूस आज आम्हाला एसटीने रत्नागिरीला घेऊन चालला होता. समाजाची सेवा करणाऱ्या व समाजाला कलेची संस्कृती जपत विधायक संदेश देणाऱ्या अशा सर्व नाट्यवेड्यांना खरंच अभिवादन करावं तितकं थोडंच असणार आहे. 

©️ प्रवीण अशितोष कुबल

कणकवली ( 9881471684 )



🔴 ब्रह्मचैतन्य आणि पूर्णब्रह्म

🔴 ब्रह्मचैतन्य आणि पूर्णब्रह्म           "आपल्यामध्ये धर्म आचरणाचा गुण असायला हवा," असे माझी आजी नेहमी सांगायची. ती केवळ सांगायची...