Thursday, February 17, 2022

🛑 इब्यालो

          संदीप खरेंचं बालगीत लागलं होतं. ते ऐकताना जुन्या आठवणी जागृत झाल्या. गाण्याचे बोल असे होते , " चमालातु चंगतोसा चमी चकए चष्टगो , मजेत बसा पसरुन पाय , मुळीच नाहीत कष्टगो "… म्हणजे त्यांनी चकारी भाषेचा उपयोग केला होता. सगळ्या शब्दांची सुरुवात ' च ' ने होते म्हणून त्या भाषेला ' चकारी ' भाषा म्हणत असावेत. भाषा बोलताना व ऐकताना खूप गंमत वाटते. त्याहीपेक्षा गंमत म्हणजे समोरच्याला अशी भाषा बोलता येत नसेल तर आपण या सांकेतिक भाषेत बोललो तर त्यांना कळायला अवघड जाणारी ही भाषा आहे. थोडा प्रयत्न केला तर ती शिकायला सोपी भाषा आहे. 

          आम्ही लहानपणी ही चकारी भाषा अनेकदा बोलायचो. प्रत्येक भागात ही भाषा वेगवेगळ्या प्रकारे बोलली जात असेल. माझी मोठी आत्या ही भाषा बोलायची. त्यानंतर कणकवलीत आम्ही जशा खोल्या बदलू लागलो तशा भाषेतही बदल घडत गेला. प्रत्येक ठिकाणची भाषा काही फरकाने बदलत गेली. आम्ही लहान मुले एकत्र आलो कि आम्ही मोठ्यांना समजू नये म्हणून चकारी भाषेचा वापर प्रामुख्याने करु लागलो. सतत या भाषेचा उपयोग करत असल्यामुळे सराव होत गेला आणि बोलण्यातील गतीही वाढली. ही भाषा जेवढी जलद गतीने बोलाल तेवढी ती समजायला कठीण जाते. त्यामुळे आपण काय बोललो ते समोरच्याला बिल्कुल समजत नाही. तीच तर खरी गंमत असते. अशी भाषा बोलणाऱ्यांची मग चांगलीच गट्टी जमते. या आगळ्या वेगळ्या सांकेतिक भाषेत बोलणाऱ्यांची वेगळीच मैत्री होऊ शकते. 

          आम्ही पाचही भावंडे ही भाषा लिलया बोलत असू. आमच्या बाबांनाही ती येत होती. शाळेतल्या मोजक्या मित्रांना ती येत होती. आमच्या शेजारी राहणाऱ्या खेळगड्यांना ती चांगलीच येत होती. एखादा नवीन शेजारी आला कि आम्ही काय बोलतोय ते त्याला समजत नसे , त्यामुळे त्याची चांगलीच गोची व्हायची. गोची म्हणजे अडचण बरं का !!!

          आमच्या दुकानाशेजारीच कामगार कल्याण केंद्र होते. तिथे कामगारांच्या कल्याणासाठी विविध उपक्रम राबवले जात. एसटीतील कामगार , त्यांची मुले येथे सतत येत. सकाळी आणि संध्याकाळी तिथे खूप गर्दी होई. त्यामुळे माझ्या ओळखी वाढल्या. या कामगार कल्याण केंद्रात कॅरम , बुद्धिबळ , गायन , भाषण , वाचन , निबंध , दशावतारी नाटक , शिशुवर्ग , नाट्यस्पर्धा , भक्ती गीत गायन आणि असे अनेक उपक्रम बघायला मिळाले. मी कॅरम खेळायला तिथेच शिकलो. चॅम्पियन कॅरम बोर्डवर खेळण्याची संधी तिथेच मला मिळाली. स्ट्रायकर , रिबॉण्ड , क्वीन , बोरिक पावडर , थम असे अनेक शब्दांची भर पडत गेली. कॅरमची पीस अलगद पॉकेटमध्ये टाकण्याचे अवघड कौशल्य प्राप्त करुन घेतलं. क्वीन , कव्हर घेऊन समोरच्याला हरवतानाचा आनंदच वेगळा असायचा. त्यामुळे दररोज शाळा सुटल्यानंतर कॅरम खेळण्याचा छंदच जडला. इवल्याशा बोटात स्ट्रायकर पकडून त्याचा हलकासा स्ट्रोक मारुन पीस पॉकेटमध्ये गेली की त्याला ' कट :' मारणे म्हणत असू. असे अनेक कट मारायला , रिबॉण्ड मारायला मी शिकलो. 

          तिथे कॉलेजमध्ये शिकणारी मोठी मुलेही येत. त्यांचे पालकही येत. या सर्वांबरोबर हे सर्व खेळ खेळता येत. मोठ्यांबरोबर खेळताना जिंकलो तर आत्मविश्वास वाढत राही. मग आमच्या जोडीला चकारी भाषेचा अवलंब करावा लागे. ती भाषा ओठावर असे आणि कॅरम खेळणे बोटावर सुरु असे. 

          राजेश राजाध्यक्ष नावाचे एक कॉलेज कुमार त्यावेळी माझे मित्र बनले. त्यांना ही भाषा जलदगतीने बोलता येत असे. आम्ही मालवणी असल्यामुळे आमच्या मालवणी भाषेत चकारी भाषा बोलू लागलो. ही मालवणी चकारी भाषा बोलताना खूप मजा येई. 

          एकदा मी आणि राजाध्यक्ष कॅरम खेळत जोडीदार होतो. दुसरी जोडी आमच्यापेक्षा चांगली खेळणारी होती. पण आम्ही आमच्या चकारी भाषेत बोलत बोलत प्रतिस्पर्धी जोडीला नामोहरम करुन सोडले. त्यामुळे प्रतिस्पर्धी जोडीतील दोघेही घाबरुन खेळू लागले. त्यात एक चॅम्पियन खेळाडू होता. तोही घाबरला. मी छोटा होतो , पण खेळात आणि चकारी बोलण्यात चॅम्पियन होतो. राजाध्यक्ष आणि मी चकारीत बोलत होतो. राजाध्यक्ष मला मला म्हणाले , " केत इब्यालो " त्यांना असे म्हणायचे होते , " तो घाबरला ". समोरच्या जोडीला " इब्यालो " ही भाषा अजिबात समजली नव्हती. आम्हाला ती समजत होती म्हणून जास्त आनंद होत होता. आता " इब्यालो " या शब्दाचा आणखी काही वेगळा अर्थ असेल तर मला माहीत नाही. नाहीतर बाबा मी " इब्यालो " आधीच सांगतो. 

©️ प्रवीण अशितोष कुबल  ( 9881471684 )



No comments:

Post a Comment

💖 भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये एक अविस्मरणीय सायंकाळ 💖

 💖 भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये एक अविस्मरणीय सायंकाळ 💖           कणकवली येथील भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये कीर्तन महोत्सवाच्या निमित्...