Monday, February 28, 2022

🛑 पत्रकार सुधीर

          आज मी जी मुक्त पत्रकारिता करतो आहे , त्याचे अनेकांना श्रेय जाते. पण त्यात पत्रकार सुधीरजी राणे यांचे नाव प्राधान्याने घ्यावे लागेल. पत्रकारिता शिकताना मला एक वर्षाचे प्रशिक्षण घ्यावे लागले. ते घेत असताना मित्र राजेश मोंडकर , कै. पत्रकार शिरसाटसर , डॉ. रुपेश पाटकर , पत्रकार संदीप तेंडोलकर आणि दिग्गज पत्रकारांचे अनुभव ऐकायला मिळाले.त्यातून पत्रकारितेचे बाळकडू पिता आले. 

          पत्रकारितेमध्ये जिल्ह्यात प्रथम क्रमांक प्राप्त झाला. पण क्रमांक येणे आणि प्रत्यक्ष पत्रकारिता या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. पत्रकार म्हणून लिहिताना खूप मर्यादा येतात. कसेही लिहून चालत नाही. त्यात शब्दमर्यादा असतेच , पण कमीत कमी शब्दांत जास्त आशय वाचकांपर्यंत पोहोचवायचा असतो. 

          माझे बातमी लेखन परिपूर्ण व्हावे म्हणून मला सुधीरजी यांनी मार्गदर्शन केले. लहानपणी त्यांच्या शेजारी आम्ही राहात होतो. कणकवली टेंबवाडीतील घोलकर वकिलांच्या घरात भाड्याने राहात असताना ते आमचे अगदी जवळचे शेजारी होते. त्यांची बहीण माझ्याच वर्गात होती. आता ती डॉक्टर झाली आहे. त्यांचं संपूर्ण कुटुंब आम्हांला ओळखते. 

          शाळेत एकत्र शिकत असताना  सुधीरजी आमच्या पुढच्या वर्गात होते. माध्यमिक शिक्षण सुरु असताना सुधीरजी कराटे प्रशिक्षण घेत होते. नंतर त्यांनी स्वतःचा कराटे क्लास सुरु केला. मातीच्या विटा , कौले एका झटक्यात फोडतानाचे प्रात्यक्षिक दाखवताना मी त्यांना अनेकदा प्रत्यक्ष पाहिले आहे. ते ब्लॅक बेल्टधारक आहेत. त्यांच्यासोबत हेमलता पारधीये , जोशी अशी मंडळी होती. 

          शिक्षण घेत असतानाच त्यांना पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. त्यांनी लेखन करणे आरंभिले. त्यांचे लेख , बातम्या प्रसिद्ध होऊ लागल्या. त्यांचा आत्मविश्वास वाढत गेला. आता ते एक प्रथितयश पत्रकार आहेत. त्यांचे मुद्देसूद लेख वाचताना त्यांची पत्रकारितेतील उंची लक्षात येते. ते कोणत्याही विषयावर मुक्तलेखन करु शकतात. एवढे करूनही त्यांना अजिबात अहंकार नाही. 

          मला लेख लिहिण्यासाठी प्रवृत्त करणारे ते पहिले पत्रकार आहेत. त्यांनी मला लेख कसा असावा यांवर फोनवरुन मार्गदर्शन केले आहे. लेखात काय असू नये , हे मला त्यांनीच सांगितले आहे. त्यांचे वाचन अथांग आहे. पत्रकाराला नेहमी अपडेट राहावे लागते. ते स्वतः दररोज सगळे पेपर वाचतात. ते एक आदर्श पत्रकार आहेत. त्यांनी अनेक सामाजिक , राजकीय आणि शैक्षणिक बाबींवर लेख लिहून जनमानसात जागृतीचा प्रकाश टाकला आहे. 

          नुकतेच त्यांना उत्कृष्ट पत्रकार म्हणून सन्मानित करण्यात आले ही माझ्यासाठी अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. त्यांनी मला पत्रकारिता करण्यामध्ये नेहमीच धीर दिला आहे. संयम ठेऊन लेखन करण्याचे मार्गदर्शन केले आहे. ते नावाप्रमाणेच सु ' धीर ' आहेत. पत्रकारिता करताना खूप पैसा मिळत नसेल , पण त्यांना जे समाधान मिळत आहे त्यावर ते खुश आहेत. त्यांना पुढील वाटचालीसाठी कोटी कोटी शुभेच्छा.

©️ प्रवीण अशितोष कुबलसर

( 9881471684 )



No comments:

Post a Comment

💖 भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये एक अविस्मरणीय सायंकाळ 💖

 💖 भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये एक अविस्मरणीय सायंकाळ 💖           कणकवली येथील भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये कीर्तन महोत्सवाच्या निमित्...