Tuesday, February 1, 2022

🛑 आमचा राजू का रुसला ?

          राजू नावाची अनेक मुलं असतील जगात. माझ्याही आयुष्यात तसे अनेक राजू आले आहेत. त्या सर्व राजूंचे जीवन जवळून पाहता आले आहे. या राजूंची खरी नावे वेगळीच असतात. राजू हे त्यांचं टोपण किंवा उर्फ नांव असतं. सगळेच राजू हे सारखे नसतात. त्यांचं दिसणं , असणं , वागणंही निरनिराळंच. 

          लहानपणापासून असे अनेक राजू मला लोभ लावून गेले. सोबती झाले. आम्ही भाड्याने राहात होतो , त्यामुळे खोल्या बदलाव्या लागत , तसे आमच्या आयुष्यात येणारे राजूही तसेच बदलत असत. खोली बदलू तिथे एखादा नवीन राजू भेटत असे. ही राजू नावाची माणसे जीवाला जीव देणारी असत हे विशेष. 

          डीएडला असताना माझी परीक्षा मालवणला होती. तिथे मला दहा पंधरा दिवस राहावे लागले. तिथे मी ज्या मावशीकडे राहायला होतो , त्यांच्या दोन नंबर मुलाचे नावही राजू होते. तो आणि त्याचा भाऊ महेश , बहिणी सगळ्यांनी मला कौटुंबिक प्रेम दिले. त्यांच्यामुळे मी डीएडला द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण होऊ शकलो. हा राजू अजूनही भेटतो , तेव्हा माझ्या विद्यार्थी काळातल्या आठवणी जागृत होतात. 

          काही राजू हे ' राजगो ' नावाने ओळखले जातात. त्यांच्या चांगल्या नावाचे कायमच विडंबन केलेले दिसून येते. आमच्या चुलतकाकांच्या मुलाला राजगो म्हणत. हा राजू किती निरागस होता म्हणून सांगू ? मी सांगेन ते तो ऐकत असे. मी त्याचा मोठा दादा असल्यामुळे तो माझा कमालीचा आदर करत असे. पण तो मोठा होत गेला तसा त्याने आपल्या वाईट सवयींना मोठे केले. त्या वाईट व्यसनांनी त्याचे जीवनच संपून गेले. तो राजू असा रुसून गेला तो परत आलाच नाही. 

          आम्ही ज्या ठिकाणी स्वतःच्या मालकीची खोली घेतली , तिथेही माझी नवीन राजुशी भेट घडली. हा राजू अतिशय प्रेमळ स्वभावाचा होता. जाता येता तो ज्या ज्या वेळी बाल्कनीत दिसे , प्रत्येकवेळी त्याची ' गुर्जी ' अशी आदराची हाक कायमच कानी पडे. उंच, धिप्पाड देहयष्टीचा हा राजू माझ्या सर्व मुलींसाठी राजुदादा बनला होता. माझ्या छोट्या मुलींना तर त्याने इतका लळा लावला होता कि तो त्यांना हाक मारल्याशिवाय कधी पुढे गेलाच नसेल. तो जास्त बोलला नसेल , पण त्याचे डोळे आणि स्मितहास्य खूप काही बोलून जात असत. तो आमचा शेजारी होता आणि त्याने कायमच आपला शेजारधर्म पाळला होता. तो परोपकारी होता. तो घरी आला कि एक चैतन्यच त्यांच्या घरी प्रवेश करत असे. भारदस्त अशी त्याची चाल समोरच्या माणसाला नक्कीच भुलवणारी. कोणाचीही दृष्ट लागेल असाच होता तो. 

          आणि या आमच्या राजुच्या आयुष्यातला तो काळा दिवस आला होता. त्याच्या कौटुंबिक कामानिमित्त तो आपली टू व्हिलर घेऊन दुपारीच निघाला होता. काम तसे महत्त्वाचे असावे म्हणून त्याला जावे लागले होते. तो गाडीवर बसला कि कसला भारी दिसे !!! त्या दिवशी त्याची गाडी त्याला घेऊन सुसाट निघाली असावी. घरातून निघून त्याला काही तास झाले असतील आणि एक वाईट बातमी आमच्या कानावर येऊन धडकली होती. ती बातमी आम्हांला धक्का देऊन गेली होती. राजुचा जबरदस्त अपघात झाला होता. त्याला बघायला मी घाईघाईने निघालो होतो आणि बघतो तर काय ? अपघातस्थळी शेकडो माणसांची गर्दी झालेली दिसत होती. एका महाभयंकर दिसणाऱ्या काळाने त्याचे प्राण हिरावून नेले होते. आमचा राजू आम्हांला कायमचा सोडून निघून गेला होता. 

          जमिनीवर निपचित पडलेला राजु अचानक उठून बोलू लागेल असं मला त्यावेळीही वाटलं होतं. आता त्याची ' गुर्जी ' अशी प्रेमळ हाक पुन्हा कधीच कानावर पडणार नव्हती.  

          आता जेव्हा मी बाल्कनीतून किंवा जिन्यातून येत जात असताना अचानक कधीतरी तो माझ्या समोर येईल आणि मला ' गुर्जी ' अशी हाक मारेल असे वाटण्यापलिकडे मी कोणताही वेगळा आभास निर्माण करु शकत नाही. 

©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 )



5 comments:

💖 भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये एक अविस्मरणीय सायंकाळ 💖

 💖 भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये एक अविस्मरणीय सायंकाळ 💖           कणकवली येथील भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये कीर्तन महोत्सवाच्या निमित्...