Showing posts with label माझ्या आठवणीतील शाळा. Show all posts
Showing posts with label माझ्या आठवणीतील शाळा. Show all posts

Tuesday, September 10, 2024

🛑 शाळा करा रे प्रसन्न

🛑 शाळा करा रे प्रसन्न

          शाळा हे प्रत्येकाच्या जीवनात अनेक वर्षांसाठी आलेलं विद्येचे घर आहे. या शाळेला अनेकांनी जवळ केलं, ज्यांनी जवळ केलं ते शिकले. ज्यांना शाळेची भिती वाटली, त्यांनी शिकायचा कंटाळा केला, अर्थात शिक्षणच त्यांच्यापासून दूर गेलं. 

          पूर्वीच्या शाळा आणि आताची शाळा यात जमीन अस्मानाचा फरक पडला आहे. पूर्वीच्या शाळा मुलांनी भरभरून वाहणाऱ्या असत. गावाकडच्या आमच्या शाळांत मुलांना बसायला जागा नसे. शिक्षकांची संख्या भरपूर असे. एकूणच शाळेत जायला शिक्षकांची आपुलकी कारणीभूत असे. मारकुटे शिक्षक असले तर त्यांच्याबद्दल आधीच गावभर समजे. त्यामुळे मुले भीतीनेच शाळेची पायरी चढत नसत. आता मात्र मारकुटे गुरुजी राहिलेले नाहीत. असले तरी त्यांना मुलांना मारण्याची परवानगी शासनाने अजिबातच दिलेली नाही. त्यामुळे मुलांना मारणाऱ्या शाळा आज असू नयेत असे शासन वारंवार सांगते. अर्थात मुलांना न मारता अध्यापन करुन त्यांचे अध्ययन घडवणे तारेवरची कसरतच आहे. 

          आज सर्व शाळा प्रसन्न आहेत. शाळेत मुलांची संख्या कमी आहे. प्रत्येक मुलाकडे वैयक्तिक शिकवता येण्यासारखी परिस्थिती आहे. शाळेत सर्व सोयी सुविधा उपलब्ध आहेत. शाळेतील शिक्षक पदव्युत्तर पर्यंत शिकलेले आहेत. ते स्वतः तंत्रस्नेही आहेत. मुलांना तंत्रस्नेही बनवत आहेत. 

          वर्गखोल्या मुलांशी बोलत आहेत. शिक्षक विविध उपक्रम राबवत आहेत. दप्तराविना शाळा, आनंददायी शनिवार असे उपक्रम मुलांसाठी उपयुक्त ठरत आहेत. मुले प्रसन्न होत आहेत. मुले प्रसन्न होण्यासाठी शिक्षक आपल्या जीवाचे रान करत आहेत. प्रसन्न शिक्षक असल्यामुळे मुले प्रसन्न होत आहेत. मुले आणि शिक्षक हेच शाळेचे प्राण आहेत. तेच शाळेत नसतील तर शाळा प्रसन्न आहे असे कसे म्हणता येईल ? कमी पटसंख्या असली तरी त्यांना शिकविण्यासाठी तेवढीच शैक्षणिक कामे करावी लागतात. सुट्टीच्या काळात शाळांच्या इमारती पाहाव्यात, मुले नसल्याने त्या गप्प गप्प असतात. या शाळांचा प्राण असणारी मुले आणि त्यांना हासून हसवून खेळून शिकवणारे शिक्षक नसतील तर नेहमीच प्रसन्न असणाऱ्या शाळा अप्रसन्न दिसल्याशिवाय राहणार नाहीत.

          शाळा, मुले, पालक, ग्रामस्थ, देणगीदार, अधिकारी, शासन आणि शाळेशी संबंधित यंत्रणा जेव्हा मुलांच्या गुणवत्तेसाठी आणि सर्वांगीण विकासासाठी निष्ठेने कार्य करत असतात, तेव्हा तिथल्या शाळा सदासर्वकाळ प्रसन्न राहतील यात कोणतीही शंका वाटत नाही. 

©️ प्रवीण अशितोष कुबल

मुख्याध्यापक शिडवणे नं. १

Saturday, June 15, 2024

माझा पहिला शाळा प्रवेश

🥘 माझा पहिला शाळा प्रवेश 

    आज मला शिक्षक होऊन अठ्ठावीस वर्षे झाली आहेत. १५ जून हा दिवस मला दरवर्षी जुन्या आठवणींमध्ये घेऊन जात असतो. मी सहा वर्षाचा असताना मला शाळेत नेताना घरच्यांना खूप त्रास झाला असेल. कारण मी काही शाळेत जायला तसा तयार नव्हतो. 

    पण माझे शाळेत जाणे माझ्यावर अजिबात अवलंबून नव्हते. ते माझ्या पालकांच्या मनावर होते. त्यावेळी माझे चार पाच पालक होते. माझे बाबा , माझी आई , माझी ताई , माझी आक्का , माझे दोन काका असे सहा पालक होते. माझ्यावर या सर्वांची सत्ता चाले. यापैकी कोणाचेही ऐकावेच लागे . त्यांच्यापैकी कोणीही मला शाळेत नेण्यासाठी कधीही तयार होण्याची जास्त शक्यता असे. 

    ताई आणि आक्का दोन्ही भावंडे माझ्यापेक्षा सिनियर असल्याने त्यांना शाळेत जाण्याचा अधिक अनुभव होता. कधीतरी त्यांच्यासोबत शाळेत गेलोही असेन. शाळेतले गुरुजी , बाई बघून मला त्यांची नेहमी भीतीच वाटे. त्यात एक धोतरवाले मुख्याध्यापक शिक्षक होते. साधी राहणी असलेले गुरुजी. पण त्यांच्या कडे मला बघायला भीती वाटे. एक दोन बाई मला जवळ घेण्याचा प्रयत्न करीत. पण मी त्यांच्या जवळ जातच नसे. माझ्यासमोर काही मुलांना ओरडताना , पट्टीने मारताना मी पहिले होते. तेव्हापासून तर मी धसकाच घेतला होता. 

    आता माझी शाळेत जाण्याची पाळी आली होती. माझ्यासाठी दप्तराची पिशवी बाबांनी स्वतः शिवून दिली होती. वेगवेगळ्या रंगांचे तुकडे एकत्र करुन शिवलेली ती दप्तराची पिशवी मला सुरुवातीला गोधडीसारखी वाटे. माझी आई नेहमी गोधड्या शिवायची. बाबांनी कपडे शिवताना कापून खराब झालेले छोटे छोटे तुकडे ती गोधडीसाठी वापरायची. त्या गोधडीरूपी पिशवीत माझ्यासाठी पुस्तके , पाटी , खडू घालून मला ते पाटीवर मारुन शाळेत न्यायचे होते. 

    मी दुसऱ्या दिवसापर्यंत शाळेत जाण्याची तयारी करीत होतो. तयारी म्हणजे माझ्या मनाची तयारी. कदाचित ही मनाची तयारीच माझी झालेली दिसत नव्हती. गोधडीसारखी दिसणारी ती पिशवी पाठीला लावून मी शाळेत जाण्याची नक्कल छान वटवत होतो. अखेर तो दिवसही उजाडला. मला सकाळी लवकर उठवण्यात आले. मशेरी लावण्यात आली. त्यावेळी आम्ही रतनज्योत नावाची मशेरी लावत असू. ती नसली तर राखुंडी किंवा कोळसा रगडून त्यापासून मशेरी तयार करीत असू. त्यावेळी टूथपेस्ट म्हणजे काय ते आमच्या घरात माहित नसावे. कारण मोठी माणसे तंबाखू भाजून त्याची मशेरी लावताना दिसत. चुलीत पत्रा टाकून त्यावर तंबाखू भाजला जात असताना माझ्या नाकात जो वास गेला आहे तो अजूनही जात नाही. मग ही मोठी माणसे तंबाखूची काळी मशेरी लावत लावत परसाकडे जात. तिथून आल्यावर सुद्धा यांची मशेरी लावणे सुरुच असे. मग गप्पागोष्टी सुरु होत. मशेरी गालावर चांगलीच ओघळू लागे . दात चांगले घासतो आहोत असे दाखवण्यासाठी ते उजव्या अंगठ्याचा अधिकवेळा वापर करीत. तोंड आणि हात दोन्ही काळेकुट्ट होऊन गेलेले मी अनेकदा पाहिलेले आहे. 

    मी मात्र रतनज्योतीने माझे इवलेसे दात पाजळत बसलो होतो. मोठी माणसे बराच वेळ मशेरी लावतात म्हणून मीही त्या दिवशी बराच वेळा दात पाजळण्याचे ठरवले असावे. तोपर्यंत बाबांची ऑर्डर कानावर आली. " झिला , आजपासून तुका शाळेत जावचा आसा. " आईने मला भरभर आंघोळ घातली. पुसून घेतले. देवाकडे दिवा लावला. देवापुढे साखर ठेवली. वंशाचा दिवा असल्याने देवाकडे दिवा लावला असेल हे मला त्यावेळी अजिबात कळलेले नव्हते. पण आज कळले आहे. आजचे काही पालक आजही आपल्या मुलींपेक्षा मुलाला जास्त सोयी सुविधा उपलब्ध करुन देतात तेव्हा खूप वाईट वाटते. 

    माझी दप्तराची पिशवी पाठीवर अडकवली गेली होती. माझ्या बाबांची ऑर्डर म्हणजे ऑर्डर. त्यांची ऑर्डर ऐकावीच लागली. मी आणि माझ्या मोठ्या दोन बहिणी शाळेला निघालो. दोन्ही बहिणी कधीच तयार झाल्या होत्या. त्या माझी तयारी होण्याची वाट पाहत ताटकळल्या असाव्यात. आता मात्र माझ्या डोळ्यांतून ' गंगा यमुना ' दोन्ही नद्या वाहू लागल्या होत्या. मला माझ्या आईचा सहवास हवाहवासा वाटत होता. तिला सोडून शाळेत जाणं माझ्या जीवावर आलेलं होतं . माझ्या डोळ्यातलं पाणी बघून आईच्या डोळ्यांत पाणी तरळलं. ती मुळातच हळव्या स्वभावाची. मी अधिकच हुंदके देऊन रडू लागलो होतो. पण माझ्या रडण्याचा माझ्या बहिणींवर कोणताही परिणाम होत नव्हता. त्यांना आधीच उशीर झालेला होता. मोठ्या बहिणीने मला हलकेच ओढून बघितलं. पण मी अधिक जोर लावून आईला चिकटून बसलो होतो. आईलाही मला सोडवत नव्हतं. तिला मी जसा बिलगू लागलो , तशी तीही रडत रडत मला शाळेत जाण्याविषयी लाडेलाडे सांगू लागली. माझा लहान भाऊ माझ्यापेक्षा दोन वर्षांनी लहान होता. तो शाळेत जाणार नव्हता आणि मी मात्र शाळेत जायचे हा माझ्यावर अन्याय होत आहे असे मला वाटत होते. 

    अखेर माझ्या दोन नंबर बहिणीने आक्काने मला जोरात ओढलेच. मी आईच्या कुशीतून सुटून मोठ्या संकटात सापडायला जात आहे असे मला त्यावेळी वाटत होते. दोन बहिणींनी दोन बाजूंनी धरुन नेताना मला दोन बगळ्यांची आणि कासवाच्या गोष्टीची आठवण येत होती. शाळेच्या रस्त्याकडे माझे लक्षच नव्हते. मी जमिनीला नीट पायसुद्धा लावत नव्हतो. माझ्या बहिणी मात्र जिद्दी होत्या. त्या मला फरफटत नेत होत्या. जाता जाता बाबांची भीती दाखवत होत्या ते वेगळेच. आमचे दुकान आणि शाळा यात फारसे अंतर नव्हते. त्यामुळे मला पहिल्यांदा दुकानात नेण्यात आले. माझे रडवेले तोंड बाबांना दाखवूनच मला शाळेकडे जायचे होते. 

    बाबांनी काठी काढण्याच्या अगोदर शाळेत गेलेले कधीही चांगले म्हणून मी माझ्या बहिणींबरोबर शाळेची वाट न फरफटत चालू लागलो. शाळेत गेल्यावरही मला माझ्या आईची अतिशय आठवण येत होती. मी स्फुंदून स्फुंदून रडत होतो. पण मला जवळ घेणाऱ्या बाईंना मी अजिबात आई मानत नव्हतो. शाळेतील इतर मुलांबरोबर खेळता खेळता मला शाळेची ओढ वाटू लागली होती. काळ्या दगडी पाटीवर बाईंनी भला मोठा ' ग ' काढून दिला होता. शाळा सुटेपर्यंत मी तो गिरवून गिरवून त्याची पुरती वाट लावून टाकली होती. गणपतीच्या नावातील या ' ग ' ने आज मला शिक्षक बनवले हे आज कोणालाही खरे वाटणार नाही. 


Ⓒ प्रवीण अशितोष कुबल ( मुख्याध्यापक , शिडवणे नं. १ ) 

Monday, June 5, 2023

🛑 गोष्टींचा तास

🛑 गोष्टींचा तास

          माणसांना गोष्टी खूप आवडतात. गप्पा मारता मारता त्यातून कधी कधी गोष्टींची निर्मिती होते. जुन्या गोष्टी ऐकताना त्या ऐकत राहाव्यात असे वाटत राहते. गोष्टींचा कधी कंटाळा येत नाही. 

          गोष्टी सांगणारा म्हणजेच स्टोरीटेलर. त्याला गोष्ट कशी वाढवावी हे माहिती असते. गोष्टींमध्ये रंगत आणणे ही एक कला आहे. गोष्ट सांगणे आणि गोष्ट खुलवून सांगणे या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. गोष्ट खुलवून सांगता यायला हवी. 

          आपल्या समोर असलेल्या मुलांचा वयोगट लक्षात घेऊन गोष्टींची निवड करावी लागते. त्यातील विविध उदाहरणे देताना ती त्यांच्या परिचयाची हवीत. तर ती मुलांच्या हृदयाचा ठाव घेतात. मुलांचं लक्ष एकाग्र करणं ही आजच्या काळातील अतिशय अवघड गोष्ट होऊन बसली आहे. त्यांना त्यांच्या बालविश्वात फिरवून आणण्याची कला स्टोरीटेलरमध्ये असावी लागते. 

          मुलांना बोलते करत , त्यांच्याशी त्यांच्या वयातील होऊन संवाद साधला तर मुले पटकन एकरुप होतात असा अनुभव आहे. त्यांना प्रेरणा देत गोष्ट पुढे घेऊन जायला लागते. त्यांच्या बालमनावर आघात करणारी गोष्ट सांगणे बरोबर नसते. डोळ्यांतून पाणी आणणारी गोष्ट सांगितली तरी हल्लीच्या मुलांच्या डोळ्यांतून पाणी आणताना स्टोरीटेलरच्या डोळ्यांतून पाणी येऊ शकते. मुलांच्या संवेदना कमी झाल्यात की काय असा प्रश्न पडतो. 

          विष्णु शर्माच्या पंचतंत्रातील नितीपर गोष्टी आम्हाला त्यावेळी खूपच आवडत. आम्ही त्या पुनःपुन्हा वाचत असू. इसापची इसापनीती आम्हाला नीती शिकवून गेली. त्यातील प्राणी , पक्षी आमचे मित्र झाले. 

          श्यामची आई हे सानेगुरुजींचं पुस्तक आमच्या नितांत आवडीचं होतं. ते कितीवेळा वाचलं असेल ते सांगता येत नाही. पुनःपुन्हा वाचण्याइतकी या पुस्तकाची स्टोरी आहे. आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांनी तर तिला ' आईचं महान आणि मंगल स्तोत्र '  म्हटले आहे. 

          मुलांची श्रवण क्षमता म्हणजेच ऐकण्याची क्षमता अधिक विकसित होण्यासाठी , शब्दसंग्रहात भर पडण्यासाठी सकस गोष्टींची खूप गरज असते. मुलांना पूर्वी आजोबा , आजी गोष्टी सांगत असत. आज या गोष्टींची मुलांना उणीव भासू लागली आहे. मग मुलांना युट्युबवर ' आजीच्या / आजोबांच्या गोष्टी ' शोधाव्या लागत आहेत. या संस्कारी गोष्टी शोधता शोधता दुसरेच काहीतरी निकृष्ट दर्जाचे सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. संस्कारक्षम वयात मुलांनी काय बघावे आणि काय बघू नये हेही आता पालकांच्या हातात राहिलेले नाही. जे दिसेल ते सकाळपासून संध्याकाळपर्यंत किंवा मोबाईलमधील डेटा संपेपर्यंत मुले नुसते पाहात आणि ऐकत आहेत. काय चांगले आणि काय वाईट ते समजून सांगताना पालकांनी माघार घ्यायला सुरुवात केलेली दिसते आहे. 

          जुन्या बालभारतीच्या पुस्तकांमध्ये खूप चांगले धडे होते. त्या गोष्टीच होत्या. त्यांचे आपण अजूनही वाचन करताना खूप आनंद होतो. ही पुस्तके बालभारतीच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. त्यांचा वापर मुलांनी , पालकांनी आणि विशेषतः शिक्षकांनी करायला हवा. दिवसभरातील हा गोष्टींचा हा एक तास मुलांचा त्रास कुठल्या कुठे पळवून लावील हे नक्की. 

©️ प्रवीण अशितोष कुबलसर , शिडवणे नं.१

Friday, November 25, 2022

🛑 होईल समदं ठिक

 🛑 होईल समदं ठिक


          कौशल्याधिष्ठित प्रशिक्षण आम्हां सर्व शिक्षकांसाठी महत्त्वाचे होते. नेरुर माड्याची वाडी माध्यमिक विद्यालयातील एक दिवस सर्वच उपस्थितांसाठी अविस्मरणीय ठरला असेल. माझ्यासाठीही हा प्रशिक्षण दिवस अनमोल असाच होता. 

          प्रत्येक तालुक्यातील दहा निवडक शिक्षकांची निवड करण्यात आली होती. तसं पाहिलं तर सगळेच शिक्षक निवडकच असतात. त्यातून निवडून काढणं जिकिरीचे काम असावे. किंवा स्वतःहून प्रशिक्षणाला जाणारे मोजके असावेत. कारण प्रशिक्षण करण्यापेक्षा शाळेत काम करणं काही शिक्षकांसाठी अधिक महत्त्वपूर्ण असतं. अर्थात सर्व शिक्षक हे शाळेत शिकविण्यासाठीच असतात , तरीही शाळेचा एक एक दिवस विद्यार्थ्यांसाठी अतिशय मोलाचा असतो. आपल्या वर्गशिक्षकांची ते आतुरतेने वाट पाहत असतात. 

          प्रत्येक शिक्षकासाठी प्रशिक्षण हे नवनवीन अनुभवांची शिदोरी उघडण्यासारखं असतं. ते उघडून बघितल्याशिवाय आणि त्याचा परिपूर्ण आस्वाद घेतल्याशिवाय त्याची चव कशी समजणार ? जेवणात विविध प्रकारच्या संतुलित आहाराचे सेवन करताना जशी तृप्ती होते , तसा तृप्तीचा ढेकर कालच्या प्रशिक्षणात घेता आला. 

          प्रारंभीच माड्याची वाडी शाळेच्या वाद्यचमूने केलेलं उत्साहवर्धक स्वागत  भारावून टाकणारं होतं. अतिथींचं असं झालेलं स्वागत आमच्यासाठी तसं नवीन नव्हतं. आतापर्यंत आम्ही पदाधिकारी , अधिकारी यांचं स्वागत केलं होतं , आज आमचं असं धुमधडाक्यात झालेलं स्वागत भाव खाऊन गेलं. 

          सिंधुदुर्ग शिक्षण विभाग , माड्याची वाडी शिक्षण संस्था आणि भगीरथ प्रतिष्ठान यांच्या वतीनं घेतलं गेलेलं कौशल्य विकासाचं प्रशिक्षण प्रत्येक शिक्षकाला खूप अनुभुती देऊन गेलं. असं आगळं आणि वेगळं प्रशिक्षण कदाचित प्रत्येक शिक्षकाच्या आयुष्यातील पहिलंवहिलं आणि अविस्मरणीय असावं असं म्हटलं तरी वावगं ठरु नये. 

          औपचारिक स्वागतासाठी जास्त वेळ खर्च न करता प्रत्यक्ष प्रशिक्षणाला आरंभ झाला. माड्याची वाडी विद्यालयाने केलेले शैक्षणिक प्रयोग व व्यावसायिक होण्याचे धडे देणारी संस्कार शाळा पाहून सगळे शिक्षक अचंबित झालेले दिसले. विद्यालयाचे सर्व विद्यार्थी , शिक्षक आणि कर्मचारी आपापलं दिलेले काम मनापासून करत होते. प्रत्येकाचं सादरीकरण आत्मविश्वासयुक्त होतं. त्यात नाटकी भाव अजिबात नव्हता. येथील सर्व शिक्षक मुलांकडून हे सर्व कधी करुन घेतात हा प्रश्न आम्हां प्रत्येकाला पडला. कार्यानुभव विषयांच्या तासिका एकत्र करुन शुक्रवारी आणि शनिवारी जास्तीचा वेळ देऊन हे सर्व उपक्रम राबवले जातात. शाळेचा एक ठराविक वेळ असला तरी अभ्यासक्रम पूर्ण करुनच या उपक्रमांची नियोजनपूर्वक अंमलबजावणी केली जाते हे विशेष आहे. 

          या कार्यशाळेत शाळेने केलेल्या विविध उपक्रमांचा आढावा घेण्यात आला. मधुमक्षिका पालन प्रत्यक्ष दाखवण्यात आले. शाळेतील दोन मुलींनी मधमाश्यांना न घाबरता त्याचे सादरीकरण केले होते. त्यांना प्रशिक्षित करणाऱ्या चेंदवणकरसरांसारखी माणसं या क्षेत्रात कार्यरत असतील तर मुलांचं व्यावसायिक प्रशिक्षण खऱ्या अर्थाने होऊ शकतं. टाकाऊ पासून टिकाऊ हे ब्रीदवाक्य मानून केलेलं वेल्डिंगचं कामही तसंच. आय बी टी च्या माध्यमातून मुलांना प्रशिक्षित करताना शाळेतील अभ्यासात हुशार नसणाऱ्या पण व्यावसायिकतेकडे वळू शकणाऱ्या ऐशी टक्के पटसंख्येचा केलेला विचार अतिशय योग्य वाटतो. नोकरीसाठी शिक्षण घेण्यापेक्षा स्वतः व्यावसायिक होऊन दुसऱ्यांना नोकरी देणारं शिक्षण इथं दिलं जातं. 

          इथल्या स्वच्छता गृहातही भिंतींवर गणिताची महत्त्वाची सूत्रे प्रत्येकाचं लक्ष वेधून घेणारी अशीच. खाद्यपदार्थ विभागातील प्रत्येक पदार्थ विद्यार्थ्यांनी बनवलेले. स्थानिक जत्रेतील त्यांचे स्टॉल्स शाळेचं आर्थिक उत्पन्न आणि विद्यार्थ्यांचं अर्थार्जनाचं ज्ञान वाढवणारे आहेत. एकदा का या मुलांचा व्यवसायातील आत्मविश्वास वाढला की ही मुले आयुष्यात कधीही कमी पडू शकणार नाहीत हा आत्मविश्वास देणारे शिक्षक या शाळेला लाभले आहेत हे नाकारुन चालणार नाही. गुरुने दिलेला ज्ञानरुपी वसा ही मुले पुढे पुढे नक्की चालवतील याचीही खात्री झाल्याशिवाय राहत नाही. 

          मुलांनी केलेली हस्तकला , आधुनिक शेतीतील केलेले विविध नवनवीन प्रयोग पाहून हे बघू की ते बघू असे होऊन गेले. हे सगळं एका दिवसांत पाहत असताना त्याचं ऑटोमॅटिक ट्रेनिंग आमच्या मेंदूत नोंद होत गेलं. 

          डॉ. प्रसाद देवधर यांनी केलेले भगीरथ प्रयत्न येथे अधोरेखित करणारे आहेत. प्रत्येक उपलब्ध वस्तूचा केलेला जाणीवपूर्वक वापर हे त्यांच्या यशाचं गमक आहे. आपणही असा विचार केला तर आपल्याला जमू शकतं हा विश्वास या प्रशिक्षणानं प्रत्येकाला दिला. 

          प्रत्येक शिक्षकाला यात बोलतं करताना त्यांच्याकडून अपेक्षित काढून घेण्याची कला डॉ. देवधर यांनाच जमू शकते. त्यांनी खूप कमी वेळेत ते दाखवून दिले आहे. ठरवलं तर शिक्षकच ही गोष्ट करु शकतात यावर त्यांचा ठाम विश्वास आहे. या विश्वासाकडे त्यांनी जास्त लक्ष दिलेलं होतं. काही शिक्षकांनी आपल्या सादरीकरणात केलेलं विश्लेषण नवनवीन अनुभवांची भर घालणारं होतं. कमी निधीचा कसा छान वापर करता येतो हेही त्यांनी सांगत असताना त्यांचे प्रत्यक्ष अनुभव खूप शिकवून जाणारे होते. 

          यावर खूप लिहिण्यासारखे असले तरी हे प्रशिक्षण एका छोट्या लेखात बंदिस्त होणारे नक्कीच नाही. माननीय शिक्षणाधिकारी धोत्रे साहेबांनी दिलेली प्रेरणा प्रत्येक शिक्षकाला अनमोल असणार आहे. ' एक कौशल्यपूर्ण दिवस ' असंही  शीर्षक या दिवसाला शोभू शकतं. प्रशिक्षणात भेटलेले सर्वच घटक एकमेकांमध्ये तरतरी पेरण्याचं काम करुन गेले हे या प्रशिक्षणाचं वैशिष्ट्य म्हणावं लागेल. 

          मी घरी आलो , तेव्हा टीव्हीवर एक मालिका सुरु होती. त्यात एका बाळाचा जन्म झाला होता. बाळ हलत नव्हतं. श्वास घेत नव्हतं. त्याची आई डोळ्यांत पाणी आणून आपलं बाळ रडण्याची वाट बघत होती. दवाखान्यातील त्या प्रसंगी घरातील सारं कुटुंब बाळाला निश्चेष्ट पाहून पार हबकून गेलं होतं. आणि प्रत्येकानं बाळाच्या पायांना हात लावून म्हणायला सुरुवात केली होती , " होईल समदं ठिक " . बाळ काही सेकंदात पाय हलवू लागलं होतं. तोंड उघडून चिमुकलं तोंड उघडू लागलं होतं. बाळ एक दीर्घ श्वास घेऊन मोठ्यांदा रडू लागलं तेव्हा सगळ्यांच्या डोळ्यांतून आनंदाचे अश्रू वाहू लागले होते. 

          आमच्या समोर असणाऱ्या विद्यार्थ्यांना असं जागं करण्याचं काम आपलं आहे , ते जागं करण्याची प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असू शकते. आपण सर्व शिक्षकांनी आपल्या समोर असलेल्या मुलांसाठी असंच कौशल्यपूर्ण काम करण्याचं कौशल्य अंगी बाळगणं ही आजच्या काळाची गरज आहे आणि ही गरज प्रत्येक शिक्षकाला वाटेल तेव्हा प्रत्येक शाळा माड्याची वाडी झाल्याशिवाय राहणार नाही. 

©️ प्रवीण अशितोष कुबल , कणकवली 

( 9881471684 )
















































































🔴 ब्रह्मचैतन्य आणि पूर्णब्रह्म

🔴 ब्रह्मचैतन्य आणि पूर्णब्रह्म           "आपल्यामध्ये धर्म आचरणाचा गुण असायला हवा," असे माझी आजी नेहमी सांगायची. ती केवळ सांगायची...