Saturday, June 15, 2024

माझा पहिला शाळा प्रवेश

🥘 माझा पहिला शाळा प्रवेश 

    आज मला शिक्षक होऊन अठ्ठावीस वर्षे झाली आहेत. १५ जून हा दिवस मला दरवर्षी जुन्या आठवणींमध्ये घेऊन जात असतो. मी सहा वर्षाचा असताना मला शाळेत नेताना घरच्यांना खूप त्रास झाला असेल. कारण मी काही शाळेत जायला तसा तयार नव्हतो. 

    पण माझे शाळेत जाणे माझ्यावर अजिबात अवलंबून नव्हते. ते माझ्या पालकांच्या मनावर होते. त्यावेळी माझे चार पाच पालक होते. माझे बाबा , माझी आई , माझी ताई , माझी आक्का , माझे दोन काका असे सहा पालक होते. माझ्यावर या सर्वांची सत्ता चाले. यापैकी कोणाचेही ऐकावेच लागे . त्यांच्यापैकी कोणीही मला शाळेत नेण्यासाठी कधीही तयार होण्याची जास्त शक्यता असे. 

    ताई आणि आक्का दोन्ही भावंडे माझ्यापेक्षा सिनियर असल्याने त्यांना शाळेत जाण्याचा अधिक अनुभव होता. कधीतरी त्यांच्यासोबत शाळेत गेलोही असेन. शाळेतले गुरुजी , बाई बघून मला त्यांची नेहमी भीतीच वाटे. त्यात एक धोतरवाले मुख्याध्यापक शिक्षक होते. साधी राहणी असलेले गुरुजी. पण त्यांच्या कडे मला बघायला भीती वाटे. एक दोन बाई मला जवळ घेण्याचा प्रयत्न करीत. पण मी त्यांच्या जवळ जातच नसे. माझ्यासमोर काही मुलांना ओरडताना , पट्टीने मारताना मी पहिले होते. तेव्हापासून तर मी धसकाच घेतला होता. 

    आता माझी शाळेत जाण्याची पाळी आली होती. माझ्यासाठी दप्तराची पिशवी बाबांनी स्वतः शिवून दिली होती. वेगवेगळ्या रंगांचे तुकडे एकत्र करुन शिवलेली ती दप्तराची पिशवी मला सुरुवातीला गोधडीसारखी वाटे. माझी आई नेहमी गोधड्या शिवायची. बाबांनी कपडे शिवताना कापून खराब झालेले छोटे छोटे तुकडे ती गोधडीसाठी वापरायची. त्या गोधडीरूपी पिशवीत माझ्यासाठी पुस्तके , पाटी , खडू घालून मला ते पाटीवर मारुन शाळेत न्यायचे होते. 

    मी दुसऱ्या दिवसापर्यंत शाळेत जाण्याची तयारी करीत होतो. तयारी म्हणजे माझ्या मनाची तयारी. कदाचित ही मनाची तयारीच माझी झालेली दिसत नव्हती. गोधडीसारखी दिसणारी ती पिशवी पाठीला लावून मी शाळेत जाण्याची नक्कल छान वटवत होतो. अखेर तो दिवसही उजाडला. मला सकाळी लवकर उठवण्यात आले. मशेरी लावण्यात आली. त्यावेळी आम्ही रतनज्योत नावाची मशेरी लावत असू. ती नसली तर राखुंडी किंवा कोळसा रगडून त्यापासून मशेरी तयार करीत असू. त्यावेळी टूथपेस्ट म्हणजे काय ते आमच्या घरात माहित नसावे. कारण मोठी माणसे तंबाखू भाजून त्याची मशेरी लावताना दिसत. चुलीत पत्रा टाकून त्यावर तंबाखू भाजला जात असताना माझ्या नाकात जो वास गेला आहे तो अजूनही जात नाही. मग ही मोठी माणसे तंबाखूची काळी मशेरी लावत लावत परसाकडे जात. तिथून आल्यावर सुद्धा यांची मशेरी लावणे सुरुच असे. मग गप्पागोष्टी सुरु होत. मशेरी गालावर चांगलीच ओघळू लागे . दात चांगले घासतो आहोत असे दाखवण्यासाठी ते उजव्या अंगठ्याचा अधिकवेळा वापर करीत. तोंड आणि हात दोन्ही काळेकुट्ट होऊन गेलेले मी अनेकदा पाहिलेले आहे. 

    मी मात्र रतनज्योतीने माझे इवलेसे दात पाजळत बसलो होतो. मोठी माणसे बराच वेळ मशेरी लावतात म्हणून मीही त्या दिवशी बराच वेळा दात पाजळण्याचे ठरवले असावे. तोपर्यंत बाबांची ऑर्डर कानावर आली. " झिला , आजपासून तुका शाळेत जावचा आसा. " आईने मला भरभर आंघोळ घातली. पुसून घेतले. देवाकडे दिवा लावला. देवापुढे साखर ठेवली. वंशाचा दिवा असल्याने देवाकडे दिवा लावला असेल हे मला त्यावेळी अजिबात कळलेले नव्हते. पण आज कळले आहे. आजचे काही पालक आजही आपल्या मुलींपेक्षा मुलाला जास्त सोयी सुविधा उपलब्ध करुन देतात तेव्हा खूप वाईट वाटते. 

    माझी दप्तराची पिशवी पाठीवर अडकवली गेली होती. माझ्या बाबांची ऑर्डर म्हणजे ऑर्डर. त्यांची ऑर्डर ऐकावीच लागली. मी आणि माझ्या मोठ्या दोन बहिणी शाळेला निघालो. दोन्ही बहिणी कधीच तयार झाल्या होत्या. त्या माझी तयारी होण्याची वाट पाहत ताटकळल्या असाव्यात. आता मात्र माझ्या डोळ्यांतून ' गंगा यमुना ' दोन्ही नद्या वाहू लागल्या होत्या. मला माझ्या आईचा सहवास हवाहवासा वाटत होता. तिला सोडून शाळेत जाणं माझ्या जीवावर आलेलं होतं . माझ्या डोळ्यातलं पाणी बघून आईच्या डोळ्यांत पाणी तरळलं. ती मुळातच हळव्या स्वभावाची. मी अधिकच हुंदके देऊन रडू लागलो होतो. पण माझ्या रडण्याचा माझ्या बहिणींवर कोणताही परिणाम होत नव्हता. त्यांना आधीच उशीर झालेला होता. मोठ्या बहिणीने मला हलकेच ओढून बघितलं. पण मी अधिक जोर लावून आईला चिकटून बसलो होतो. आईलाही मला सोडवत नव्हतं. तिला मी जसा बिलगू लागलो , तशी तीही रडत रडत मला शाळेत जाण्याविषयी लाडेलाडे सांगू लागली. माझा लहान भाऊ माझ्यापेक्षा दोन वर्षांनी लहान होता. तो शाळेत जाणार नव्हता आणि मी मात्र शाळेत जायचे हा माझ्यावर अन्याय होत आहे असे मला वाटत होते. 

    अखेर माझ्या दोन नंबर बहिणीने आक्काने मला जोरात ओढलेच. मी आईच्या कुशीतून सुटून मोठ्या संकटात सापडायला जात आहे असे मला त्यावेळी वाटत होते. दोन बहिणींनी दोन बाजूंनी धरुन नेताना मला दोन बगळ्यांची आणि कासवाच्या गोष्टीची आठवण येत होती. शाळेच्या रस्त्याकडे माझे लक्षच नव्हते. मी जमिनीला नीट पायसुद्धा लावत नव्हतो. माझ्या बहिणी मात्र जिद्दी होत्या. त्या मला फरफटत नेत होत्या. जाता जाता बाबांची भीती दाखवत होत्या ते वेगळेच. आमचे दुकान आणि शाळा यात फारसे अंतर नव्हते. त्यामुळे मला पहिल्यांदा दुकानात नेण्यात आले. माझे रडवेले तोंड बाबांना दाखवूनच मला शाळेकडे जायचे होते. 

    बाबांनी काठी काढण्याच्या अगोदर शाळेत गेलेले कधीही चांगले म्हणून मी माझ्या बहिणींबरोबर शाळेची वाट न फरफटत चालू लागलो. शाळेत गेल्यावरही मला माझ्या आईची अतिशय आठवण येत होती. मी स्फुंदून स्फुंदून रडत होतो. पण मला जवळ घेणाऱ्या बाईंना मी अजिबात आई मानत नव्हतो. शाळेतील इतर मुलांबरोबर खेळता खेळता मला शाळेची ओढ वाटू लागली होती. काळ्या दगडी पाटीवर बाईंनी भला मोठा ' ग ' काढून दिला होता. शाळा सुटेपर्यंत मी तो गिरवून गिरवून त्याची पुरती वाट लावून टाकली होती. गणपतीच्या नावातील या ' ग ' ने आज मला शिक्षक बनवले हे आज कोणालाही खरे वाटणार नाही. 


Ⓒ प्रवीण अशितोष कुबल ( मुख्याध्यापक , शिडवणे नं. १ ) 

No comments:

Post a Comment

आमच्या शाळेतील ' अन्नपूर्णा ': सौ. समिता सुतार वहिनी

 ​ 🍽️ आमच्या शाळेतील ' अन्नपूर्णा ': सौ. समिता सुतार वहिनी 👩‍ ​          गेली काही वर्षे सौ. समिता सुतार वहिणी आमच्या शाळेत 'श...