Showing posts with label माझ्या विद्यार्थ्यांसाठी. Show all posts
Showing posts with label माझ्या विद्यार्थ्यांसाठी. Show all posts

Sunday, September 8, 2024

🛑 पाहिला गजानन

🛑 पाहिला गजानन

         आपला गणपती पाहिला कि आपलं मन भरुन येतं. गणपती चित्रशाळेत ऑर्डर दिल्यापासून आपलं गणपतीवर लक्ष असतं. आपला गजानन सुस्वरूप दिसावा ही आपल्या घरातील सर्वांचीच तीव्र इच्छा असते. 

          चित्रशाळेत सर्वांचे गणपती असतात. पण आपला गणेश सर्वांचे लक्ष वेधून घेणारा असायला हवा असं प्रत्येकाला वाटतं. आपला गणपती आपल्याला खूप खूप आवडतो. अर्थात सर्वांचेच गणपती सुंदरच असतात, पण आपला गणपती आपल्या मनात भरलेला असतो. 

          माझे बाबा गणपती सुंदर बनवत. असे हे सुंदर गणपती पाहण्यासाठी दररोज आमच्या चित्रशाळेत झालेली गर्दी मी प्रत्यक्ष पाहिली आहे. सुबक गणपती होईपर्यंत बाबा गणपती बाजूला करत नसत. बाबांच्या समोर प्रत्येक गणपती येणारच असे. तो अधिक सुंदर होऊन जाताना बाबांनी त्यात आपला जीव ओतलेला असे. त्यांचे निरीक्षण अफलातून होते. एकही चूक कधीही त्यांच्या नजरेतून सुटत नसे. त्यामुळे गणपती घेऊन जाणारे लोक खुश होऊन जात. पाच पन्नास रुपये जास्त देऊ शकणाऱ्यांपेक्षा खुश होऊन जाणारे लोक बाबांना आणि आम्हांलाही जास्त आवडत. 

          बाबांची गणपतीची शाळा पुढे चालू राहावी ही सर्वांचीच इच्छा आहे. बाबा गेल्यानंतर चित्रशाळेतील त्यांची उणीव कधीही भरुन न येणारी. त्यांची जागा काका, बाला आणि भाऊ यांनी घेतली आहे. हे तिघेही दिलेली जबाबदारी अधिक गंभीरपणे पेलत आहेत ही विशेष नमूद करण्यासाठी गोष्ट आहे. मी त्यांच्यात कोणत्याही प्रकारे इंटरफियर करीत नाही. 

          गणेश चतुर्थीचा दिवस आमच्यासाठी ' गाजावाजा ' असणारा दिवस असतो. गणपती न्यायला येणारे लोक आपल्या सोबत संपूर्ण कुटुंबाला घेऊन येत असतात. गणपती वाहून नेण्यासाठी ते गाड्या घेऊन येतात. काही वेळा वाजंत्री मंडळेही घेऊन येतात. अशी मज्जा असणारा हा दिवस पुन्हा येण्यासाठी एक वर्षभर वाट पाहावी लागते. आम्ही गणपतीच्या शाळेचे मालक आहोत हा आमचा अभिमान असतो. हा अभिमान आमच्या कुटुंबातील महिलांना सुद्धा द्यायला हवा. आमच्या घरातील माझ्या बहिणी गायत्री, तृप्ती यांनी गणपतींना अधिक उत्तम दिसण्यासाठी केलेले सजावट काम बघत राहावे असेच असते. 

          गणपतींच्या यादीत आमच्या गणपतीचे नाव ' घरचा गणपती ' असे लिहिलेले असते. सगळ्यांचे गणपती घरपोच गेले कि आमच्या घरच्या गणपतीचे आगमन होण्याची वेळ येते. घरातील मुले माणसे यासाठी आतुर झालेली असतात. शेवटी गणरायाचे आगमन होते. सुस्वरूप तेजस्वी दृष्टीने आमच्याकडे पाहणारा आमचा गणराय आमच्याकडे पाहू लागतो. त्याने प्रत्येकाकडे पाहत राहावे असे आमच्या सतत मनात असते. आम्ही समोर जिथे उभे राहू, तिथून तो आमच्याकडेच बघतोय असा आमचा गणपती असतो. 

          आरती सुरु झाली. आरती म्हणजे बाबांचा आवडता विषय. दुपारी आणि रात्री जोशात आरती झालेली बाबांना हवी असे. आज बाबा नाहीत म्हणून मला आरती घ्यावी लागली. आरती घेण्याचा बाबांचा पहिला मान. यंदा ही पहिली चतुर्थी असेल ज्या दिवशी बाबा नाहीत. बाबा आरतीत दंग होऊन जात. आरतीचे स्वर बाबांनी ऐकले आणि बाबा पहिल्या आरतीला आले. आले म्हणजे माझ्या वहिणीच्या अंगात आले. माझ्या हातातील आरती गरम झाली होती, चटके बसू लागले होते. तरीही मला तशीच गरम आरती त्यांच्या हातात द्यावी लागली. बाबांनी थरथरत्या हातांनी आपल्या गणपतीला ' आरती ' ओवाळली आणि आपला सुंदर गजानन पाहिला. आम्ही आमचा गजानन पाहिलाच, पण बाबांनीही तो पाहिला याचा आनंद सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आणून गेला. 

 ©️ प्रवीण अशितोष कुबल, मुख्याध्यापक, शिडवणे नं. १

🛑 तू बुद्धी दे या बालका

🛑 तू बुद्धी दे या बालका

          चतुर्थीला शाळेला सुट्टी असते. गणपतीच्या येण्याची सर्वांना आतुरता असते. शाळेतील मुलांना तर ती खूपच असते. ती तर गणपती सुट्टीची वाटच बघत असतात. सुट्टी पडते एकदाची. मुलांचा आनंद गगनात मावेनासा झालेला त्यांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळतो. हा मुलांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी तर गणेशाचे आगमन झालेले असते. 

          शाळेत शिक्षकांनी अभ्यास दिलेला असतो. मुलांना अभ्यास हवा सुद्धा असतो आणि नको सुद्धा असतो. शाळेत असताना अभ्यास हवा असतो , पण एकदा घरी गणपती आला की या दिलेल्या अभ्यासाचे त्यांना ओझे वाटू लागते. हल्ली दप्तराचे ओझे होते म्हणून तोलून मापून भरलेले दप्तर शाळेत आणावे लागते. ते ओझेच नको म्हणून दहा दिवस शनिवारी ' दप्तराविना ' शाळा उपक्रम सुरु केला आहे. मुलांना ' आनंददायी शनिवार ' च्या रुपाने अधिक ज्ञान मिळवण्याची संधी मिळालेली आहे. मुलांनी या संधीचे सोने करायला हवे. 

          काही शाळांमध्ये दर व्हेकेशनला प्रिंटिंग अभ्यास दिलेला असतो. मुलांनी घरी काहीतरी वाचन करावे, लेखन करावे, उदाहरणे सोडवावीत अशी माफक अपेक्षा असते. या सरावामुळे मुले नियमित वाचत लिहत रहावीत हा उद्देश असतो. हा उद्देश काही मुले संपूर्णपणे अभ्यास करुन पूर्ण करतात. काही मुले त्याकडे सपशेल दुर्लक्ष करतात. त्यांना या उपक्रमशील अभ्यासाचे ओझे वाटते. 

          गणपती ही बुद्धीची देवता आहे. कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात करताना गणपतीची आराधना केली जाते. या गणनायकाची मुले जितकी भक्ती करतील तितकी अभ्यासावरची त्यांची पकड घट्ट होत जायला हवी आहे. केवळ भक्ती करुन उपयोगाची नाही. शाळेत दिलेला अभ्यास करणारी मुले गणपतीला जास्त आवडतील. पाठांतर तर आजकाल लुप्त होत चालले आहे. मुलांनी विविध गोष्टी, कथा, कविता, गाणी पाठ कराव्यात. आरत्या पाठ करुन न बघता म्हणाव्यात. या पाठांतराचा उपयोग पुढे भाषण करताना नक्की होणार आहे. निबंध लिहिताना , स्वतःचे मनोगत व्यक्त करताना नक्की होणार आहे. 

          मुलांनो, म्हणूनच मी तुम्हाला प्रेमाची विनंती करतो की कोणत्याही सुट्टीत दिलेला अभ्यास हा सरावासाठी दिलेला असतो. तो केल्याने तुम्ही अभ्यासाच्या प्रक्रियेत राहता. तुम्ही शाळेत नुकताच शिकलेला अभ्यास अधिक लक्षात ठेवू शकता. तुमची स्मरणशक्ती वाढते. तुमचे सर्व पाढे पाठ असतात, त्यामुळे गुणाकार, भागाकार या मूलभूत क्रिया करताना तुम्हाला कोणतीही अडचण येत नाही. 

          माझ्या लाडक्या मुलांनो, सुट्टी ही तुमच्यासाठी मौजेची असली तरी तिचा उपयोग चांगल्या गोष्टींसाठी नक्की करा. वाईट गोष्टी सतत खुणावत राहतात. त्या तुम्हाला कराव्याशा वाटतात, पण त्यांना तुम्ही बाय बाय म्हणा. चांगल्या गोष्टी शिका, नवीन गोष्टी आत्मसात करा. हे गणपतीदेवा, माझ्या मुलांना चांगली बुद्धी दे अशी मी तुझ्याकडे प्रेमळ मागणी करीत आहे. 

©️ प्रवीण अशितोष कुबल

 मुख्याध्यापक , शाळा शिडवणे नं.१

Wednesday, July 12, 2023

🛑 रमला वाचनमेळा

🛑 रमला वाचनमेळा

          वाचन करणे ही आपली संस्कृती बनली पाहिजे. वाचनाची चळवळ जोपासणे ही काळाची गरज निर्माण झाली आहे. मुले आणि काही मोठी माणसेही मोबाईल वाचतात. हा मोबाईल वाचणे म्हणजे अनेक मानसिक रोगांना आमंत्रण देणे आहे. त्यापेक्षा पुस्तके वाचणे कधीही चांगले. त्यात मध्येच काहीतरी अनाहूत येत नाही. आपल्या वाचनाचा लक्ष दुसरीकडे वळत नाही. 

          मुलांना वाचनासाठी उद्युक्त करणं हे तसं सोपं काम नसलं तरी अवघड मुळीच नाही. पुस्तकं त्यांच्या आजूबाजूला दिसायला हवीत. ही आकर्षक पुस्तकेच त्यांना आकर्षित करु शकतात. फक्त ही पुस्तके त्यांच्या नजरेच्या कक्षेत ठेवायला हवीत. 

          दुपारी शाळेचे माध्यान्ह भोजन संपन्न झाले. मुले जेवल्यानंतर या वर्गातून त्या वर्गात उगीचच फिरताना दिसत होती. कोणी कोणाची पाठ धरत होतं. कोणी काहीबाही करताना दिसत होती. दप्तरातील पुस्तके त्यांची वाट पाहत होती. ती दप्तरात किंवा कपाटात बंद होती. बिचारी हिरमुसली होती. आपल्याला कोणी वाचत नाही म्हणून त्यांचे नाराज होणे साहजिकच होते. 

          मी हळूच कपाट उघडले. त्यातली कदाचित नाराज झालेली पुस्तके मी बाहेर काढली. मुलांना व्हरांड्यात बोलवून घेतले. एकेका मुलाला आकर्षक मुखपृष्ठ असलेले पुस्तक देताना मला खूपच आनंद होत होता. मी काहीतरी वाटतोय हे बघून हळूहळू सगळी मुले माझ्याकडे पुस्तके मागायला आली. मी आपला पुस्तके काढून काढून वाटतच राहिलो. 

          मुलांनी जागा मिळेल तिथे फतकल मारुन बसणे पसंत केले. पुस्तकातील चित्रे बघताना त्यांचे चेहरे मी बघत होतो. पुस्तकं वाचनाचा हा आगळा वेगळा वाचनमेळा पाहून मलाही माझ्या बालपणीची आठवण येऊन गेली. आम्ही त्यावेळी खूप वाचन करीत असू. शालेय पुस्तकांव्यतिरिक्त अवांतर वाचनाची आवड आम्हांला या पुस्तकांनीच लावली होती. हल्लीच्या मुलांना मोबाईलचे आकर्षण असल्यामुळे त्यांना पुस्तकांविषयीचे आकर्षण वाटत नसावे. 

          नुकताच पहिलीत प्रवेश घेतलेला सार्थक माझ्याकडे आला. तो म्हणाला , " सर , मला पुस्तक द्या. " मी त्याला चित्रांचे छान पुस्तक दिले. त्याने त्यातली सर्व चित्रे भराभर बघून घेतली. थोड्याच वेळात तो धावतच माझ्याकडे आला. म्हणाला , " सर , आता दुसरं पुस्तक द्या. " मी त्याला म्हटलं , " अरे सार्थक , हेच पुस्तक पुन्हा पुन्हा वाच. नंतर आणून दे. " तो तयार नव्हता. ते पुस्तक माझ्या हातात कोंबत तो म्हणाला , " सर , मी पहिलीत आहे. मला हे पुस्तक वाचता कुठे येतंय ? " त्याचे अगदी बरोबर होते. मी त्याला दुसरे पुस्तक दिले. तो ते नवे पुस्तक घेऊन धूम पळाला आणि परत आपल्या जागेवर जाऊन त्यातील चित्रे डोळे फाडून कुतूहलाने वाचताना दिसला. 

          इतर मुलेही असेच काहीसे करत होती. माझा वेळ मात्र सार्थकी लागला होता. नाराज झालेली पुस्तकं पुन्हा हसताना दिसत होती. असा हा वाचनमेळा मुलांसाठी पर्वणीच ठरला होता. मुलांना वाचनाची गोडी लागावी म्हणून असे अनेक उपक्रम अनेक शाळांमध्ये सुरुच असतात. हा उपक्रम त्यांच्यासाठी किंवा माझ्यासाठी नवा नाही , पण मुलांसाठी मात्र नक्कीच वाचनवेडा आहे. 

©️ प्रवीण अशितोष कुबलसर
















Monday, June 5, 2023

🛑 गोष्टींचा तास

🛑 गोष्टींचा तास

          माणसांना गोष्टी खूप आवडतात. गप्पा मारता मारता त्यातून कधी कधी गोष्टींची निर्मिती होते. जुन्या गोष्टी ऐकताना त्या ऐकत राहाव्यात असे वाटत राहते. गोष्टींचा कधी कंटाळा येत नाही. 

          गोष्टी सांगणारा म्हणजेच स्टोरीटेलर. त्याला गोष्ट कशी वाढवावी हे माहिती असते. गोष्टींमध्ये रंगत आणणे ही एक कला आहे. गोष्ट सांगणे आणि गोष्ट खुलवून सांगणे या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. गोष्ट खुलवून सांगता यायला हवी. 

          आपल्या समोर असलेल्या मुलांचा वयोगट लक्षात घेऊन गोष्टींची निवड करावी लागते. त्यातील विविध उदाहरणे देताना ती त्यांच्या परिचयाची हवीत. तर ती मुलांच्या हृदयाचा ठाव घेतात. मुलांचं लक्ष एकाग्र करणं ही आजच्या काळातील अतिशय अवघड गोष्ट होऊन बसली आहे. त्यांना त्यांच्या बालविश्वात फिरवून आणण्याची कला स्टोरीटेलरमध्ये असावी लागते. 

          मुलांना बोलते करत , त्यांच्याशी त्यांच्या वयातील होऊन संवाद साधला तर मुले पटकन एकरुप होतात असा अनुभव आहे. त्यांना प्रेरणा देत गोष्ट पुढे घेऊन जायला लागते. त्यांच्या बालमनावर आघात करणारी गोष्ट सांगणे बरोबर नसते. डोळ्यांतून पाणी आणणारी गोष्ट सांगितली तरी हल्लीच्या मुलांच्या डोळ्यांतून पाणी आणताना स्टोरीटेलरच्या डोळ्यांतून पाणी येऊ शकते. मुलांच्या संवेदना कमी झाल्यात की काय असा प्रश्न पडतो. 

          विष्णु शर्माच्या पंचतंत्रातील नितीपर गोष्टी आम्हाला त्यावेळी खूपच आवडत. आम्ही त्या पुनःपुन्हा वाचत असू. इसापची इसापनीती आम्हाला नीती शिकवून गेली. त्यातील प्राणी , पक्षी आमचे मित्र झाले. 

          श्यामची आई हे सानेगुरुजींचं पुस्तक आमच्या नितांत आवडीचं होतं. ते कितीवेळा वाचलं असेल ते सांगता येत नाही. पुनःपुन्हा वाचण्याइतकी या पुस्तकाची स्टोरी आहे. आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांनी तर तिला ' आईचं महान आणि मंगल स्तोत्र '  म्हटले आहे. 

          मुलांची श्रवण क्षमता म्हणजेच ऐकण्याची क्षमता अधिक विकसित होण्यासाठी , शब्दसंग्रहात भर पडण्यासाठी सकस गोष्टींची खूप गरज असते. मुलांना पूर्वी आजोबा , आजी गोष्टी सांगत असत. आज या गोष्टींची मुलांना उणीव भासू लागली आहे. मग मुलांना युट्युबवर ' आजीच्या / आजोबांच्या गोष्टी ' शोधाव्या लागत आहेत. या संस्कारी गोष्टी शोधता शोधता दुसरेच काहीतरी निकृष्ट दर्जाचे सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. संस्कारक्षम वयात मुलांनी काय बघावे आणि काय बघू नये हेही आता पालकांच्या हातात राहिलेले नाही. जे दिसेल ते सकाळपासून संध्याकाळपर्यंत किंवा मोबाईलमधील डेटा संपेपर्यंत मुले नुसते पाहात आणि ऐकत आहेत. काय चांगले आणि काय वाईट ते समजून सांगताना पालकांनी माघार घ्यायला सुरुवात केलेली दिसते आहे. 

          जुन्या बालभारतीच्या पुस्तकांमध्ये खूप चांगले धडे होते. त्या गोष्टीच होत्या. त्यांचे आपण अजूनही वाचन करताना खूप आनंद होतो. ही पुस्तके बालभारतीच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. त्यांचा वापर मुलांनी , पालकांनी आणि विशेषतः शिक्षकांनी करायला हवा. दिवसभरातील हा गोष्टींचा हा एक तास मुलांचा त्रास कुठल्या कुठे पळवून लावील हे नक्की. 

©️ प्रवीण अशितोष कुबलसर , शिडवणे नं.१

Thursday, May 25, 2023

🛑 मोटू और पतलु की जोडी

🛑 मोटू और पतलु की जोडी

          बालपणी साधारण हिंदी भाषा समजू लागल्यानंतर ' लोटपोट ' हे हिंदी बाल मासिक हाती आले. कणकवली एस.टी. स्टँडवर असलेल्या पेपर स्टॉलवर हे मासिक मला पाहायला मिळाले. मी ते एकदा घेतले. त्यातील चित्रे आणि हिंदी भाषा जवळची वाटत गेली. 

          मुखपृष्ठावरील मोटू आणि पतलु या दोन कार्टून्सची चित्रे मला आकर्षित करु लागली होती. हळूहळू ही दोन्ही पात्रे माझे मित्र कधी झाली मला समजलेही नाही. मी वाचत गेलो आणि पुनःपुन्हा वाचतच राहिलो. एखाद्या महिन्यात ' लोटपोट ' आले नाही तर मी खट्टू होऊन परत येत असे.  मासिक वाचताना खरंच मी लोटपोट होऊन जात असे. आता हे मासिक जिओ मॅगझीन यावर ऑनलाईन वाचनासाठी उपलब्ध आहे. त्याचे वाचन करत गेलात तर तुमची हिंदी नक्कीच सुधारु शकते. 

          लहान मुलांनी अवांतर वाचन करणे ही आजची गरज आहे. आम्ही आमच्या लहानपणापासून ही वाचनाची आवड जोपासली आहे. मिळतील ती पुस्तके वाचून संपवली आहेत. सर्वच पुस्तके आता लक्षातही राहिली नाहीत. मराठीप्रमाणेच हिंदी वाचन करणेही गरजेचे आहे. कारण हिंदी आपली राष्ट्रभाषा आहे. इंग्रजीकडे जास्त लक्ष देण्याच्या हव्यासापोटी हिंदीकडे होत असलेला दुर्लक्ष नाकारुन चालणार नाही. 

          लोटपोट सारखी बालमासिके वाचून आपण आपलं हिंदी भाषेतील ज्ञान वाढवत जाण्याची हिच वेळ आहे. आता सर्वकाही इंटरनेटवर उपलब्ध आहे. त्यामुळे इंटरनेटचा असा फायदा करुन घ्यायला हवा. उगीचच निरर्थक सर्फिंग करणे थांबवायला हवे. सर्वच गोष्टी गुगल करण्याची वाईट सवयसुद्धा सोडून द्यायला हवी. 

          एलईडी टिव्ही नावाच्या आयताकृती वस्तूसमोर बसून संपूर्ण दिवसभर कार्टून्स बघणारी मुले बघितली तर पुढील भावी पिढीची चिंता सतावते आहे. काय करायचं या मुलांचं ? कसं होणार या मुलांचं ? हे आणि असे अनेक प्रश्न प्रत्येक पालकाला पडत असावेत. टिव्ही बंद केला तर , मोबाईल आहेतच. मोबाईलच्या छोट्या स्क्रिनवर डोळे मिचिक मिचिक करत का होईना कार्टून्स आणि रिल्स बघणे सुरुच राहते आहे हा खरा घोळ आहे. 

          एका गोष्टीवर निर्बंध घातले तर दुसरी चुकीची गोष्टच करण्याकडेच मुलांचा कल असतो. त्यांना एखादी गोष्ट करु नका म्हटले तर तीच गोष्ट ती पुनःपुन्हा करत राहतात. मग आपणच कंटाळतो. विषयच सोडून देतो. काय करायचं ते करा असे म्हणत वैतागत आणि चरफडत राहतो. 

          आमच्याकडे बऱ्याचदा ही ' मोटू पतलु' मालिका सुरु असते. त्यातली पात्रं कमालीची आकर्षक आहेत. स्वतः मोटू हा धाडसी आहे. आपल्या ताकदीच्या जोरावर तो कितीही मोठ्या संकटांचा सामना करण्यास पुढे सरसावतो. समोसे खाल्ल्याशिवाय त्याला ताकद येत नाही. तो समोसे कधी चावताना दिसत नाही. तो समोसे गिळतो. आपल्याला असं समोसे गिळंकृत करणं या जन्मात तरी शक्य नाही. 

          पतलु हा त्याच्या नावाप्रमाणे बारीक आहे. तो अतिशय हुशार आहे. त्याने सुचविलेल्या युक्त्या भन्नाट असतात. या दोघांची जोडी म्हणूनच बालांच्याच नव्हे मोठ्यांच्याही मनावर अधिराज्य गाजवत आहे. तुम्ही अगदी कंटाळून घरी आलेले असाल तर ' मोटू पतलु' ही मालिका बघा. तुमचा सगळा शीण कुठल्या कुठे निघून जाईल. 

          त्यांच्यासोबत कायम ' चिंगम ' नावाचा पोलीस अधिकारी असतो. तोही अफलातून कॉमेडी दाखवला आहे. मोटू पतलु या द्वयींच्या मदतीने तो अनेकदा दुष्टांना पकडताना दिसतो. त्याने आपल्या बंदुकीने झाडलेली प्रत्येक गोळी नारळ पाडल्याशिवाय राहत नाही. नारळाचे झाड जवळपास नसले तरी नारळ पडतात त्यामुळे गंमत वाटत राहते. 

          डॉ. झटका यांची संशोधने हटके असतात. प्रयोग करताना होणाऱ्या गमतीजमती पाहताना हसू अजिबात आवरत नाही. ' यार ' हा त्यांच्या तोंडी दिलेला नेहमीचा शब्द तुमच्याही तोंडात कधी येईल ते सांगताही येणार नाही. सोबत घसीटाराम असतो. हे पात्र सुद्धा अवलीच आहे. 

          जॉन आणि त्याच्यासोबत असलेले दोन सहकारी काहीतरी कुरघोडी करण्यात पटाईत असतात. ' जॉन बनेगा डॉन ' असं म्हणत तो मोटू पतलु यांना नामोहरण करण्याचा सदैव प्रयत्न करतात. पण त्यांचे फंडे त्यांच्यावरच उलटतात. त्यामुळे गंमत वाढत राहते. 

          या पात्रांच्या हालचाली मजेशीर असतात. ते आकाशात स्वैरपणे संचार करतात. गाडीखाली सापडले तर त्यांची चपाती होते. पण ते कदापि मरत नाहीत. अशी ही सुखांतिका असलेली बालमालिका अतिशय मनोरंजक आणि हिंदी भाषा बोलण्यास प्रवृत्त करणारी आहे. आपणांस वेळ असेल तर आपणही ही ' मोटू और पतलु की जोडी ' जरुर पाहा आणि हास्याचे फवारे उडवून आपलं रक्त शुद्ध करा. 

©️ प्रवीण अशितोष कुबलसर



🛑 अभिनंदन तुमच्या मुलांचं आणि तुमचंही

🛑 अभिनंदन तुमच्या मुलांचं आणि तुमचंही

          दहावी , बारावीचा रिझल्ट लागला. म्हणजे मराठीत निकाल लागला असे म्हणायचे ना ? 

          अनेक मुलांनी टॉप केलेले आहे. अनेकांनी मेडियम यश प्राप्त केलं आहे. स्वतःची सर्वसामान्य बुद्धिमत्ता आहे असे वाटणाऱ्या मुलांनीही काठापेक्षा जास्त मार्क्स मिळवलेले आहेत. सर्व मुलांचं खरंच मनापासून अभिनंदन. त्यांच्या पालकांचं त्याहीपेक्षा जास्त अभिनंदन. 

          मुलांच्या आणि पालकांच्या दोहोंच्या परीक्षेचा आनंददायी निकाल लागल्यासारखे वाटते आहे. सर्वांनी आपल्या मुलांची गुणपत्रके स्टेटसवर ठेवून अधिक आनंद व्यक्त केलेला आहे यातच सगळे आले. सर्वांचे स्टेटस मुलांचे अभिनंदन करताना दिसत आहेत. हे अभिनंदन होत असताना मार्क्स मिळवणाऱ्या मुलांना कित्ती आनंद होत असेल नाही ? आजचे स्टेटस उद्या किंवा परवा असणार नाही. परंतु हे जबरदस्त स्टेटस कायम ठेवण्याची मुलांची आणि पालकांची जबाबदारीही वाढली आहे हे नक्की. त्यामुळे पुढील आयुष्याची शिखरं पादाक्रांत करताना दहावी , बारावीचे गुण महत्त्वाचे ठरणार आहेत. कोणत्या शाखेत ? किती गुण ? ग्रुपमध्ये किती ? आता पुढे काय ? अजून थोडे अधिक गुण मिळाले असते तर ? तू डॉक्टरच हो , नको नको इंजिनिअरिंग कर. त्यापेक्षा स्पर्धा परीक्षा दे. हे आणि अशा अनेक प्रश्नांच्या सरबत्तीला तोंड द्यावं लागणार आहे. यांची उत्तरे देतानाही नाकीनऊ येणार आहेत असे दिसते आहे. 

          शिक्षकांनी केलेले प्रयत्न , शाळेने केलेले प्रयत्न , संस्थेने केलेले प्रयत्न यांचा सर्वांचा कस लागलेला आहे. यांना यशाची आणि अपयशाची मोजणी करावी लागणार आहे. यापुढे अजून यश मिळवण्यासाठी सज्ज राहावे लागणार आहे. स्पर्धेत ' पळा पळा , कोण पुढे पळे तो ' असं सगळीकडेच बघायला मिळते आहे. 

          अभिनंदन आणि सत्कार यांचीही स्पर्धा सुरुच राहणार आहे. जास्त टक्के मिळवणारे आणि शिक्षणासाठी जास्त पैसे मोजू शकणारे मोठे कोणीतरी होतील यांत शंकाच नाही. परंतु जास्त गुण मिळवूनही केवळ पैशाची कमतरता असल्यामुळे , आर्थिक परिस्थितीमुळे सोपा कोर्स निवडताना दिसणार आहेत. कृपया त्यांनीही आपल्या मार्कांच्या जोरावर  चांगल्या व्यावसायिक प्रशिक्षणाला प्रवेश घ्यायला हवा. जे आपल्याला जमू शकतं , जे आपल्याला आवडतं , ते करण्याचा प्राधान्याने विचार करावा. उगीच दुसरे सांगतात , म्हणून कोणताही कोर्स जॉईन करणे आवश्यकच आहे असे नाही. तो कोर्स तुमच्यासाठी आवश्यक असेल , तर त्याचा थोडाबहुत अभ्यास करुन तो करावा की नाही ते जरुर ठरवावे. उगीच भावनिक होऊन एखादा अभ्यासक्रम सुरु करायचा आणि कंटाळा आला , जमत नाही असे म्हणून सोडून देण्यापेक्षा आधीच सारासार विचार करावा. 

          प्रत्येकवेळी मोठ्या पॅकेजचा विचार करणेही चुकीचे आहे. आपल्याला ज्या पॅकेजमध्ये मानसिक आणि शारीरिक असे दोन्ही समाधान मिळू शकेल असे पॅकेज जरुर निवडावे. 

          काही मुले दहावी किंवा बारावी नंतर जॉबचा पर्याय निवडताना दिसतात. घरातील आर्थिक परिस्थितीनुसार त्यांना ते करावे लागू शकते. पण जॉब करता करता मुक्त विद्यापीठ जॉईन करता येते. आपल्याला हवे असेल ते शिक्षण घेण्याचा पर्याय शिल्लक आहे हे विसरू नये. नोकरी मिळाली तरी शिकतच राहावे. उच्चशिक्षण घेतले तर ते कधीही फुकट जात नसते. उलट तुमच्या पुढील वैभवशाली जीवनाला त्याने सुडौल आकारच मिळणार असतो. 

          सध्या मुली मुलांपेक्षा अधिक बाजी मारताना बघून सावित्रीबाई फुले यांची जास्त प्रकर्षाने आठवण होते आहे. फेसबुक , व्हाट्सएपच्या जगात आपल्याला मिळालेल्या लाईक्सना , कमेंट्सना महत्त्व नसून आपण एक महत्त्वाची परीक्षा पास झालो हे जास्त महत्त्वाचे आहे नाही का ? आता तुम्ही सोळा किंवा अठरा वर्षांचे झाला आहात , तुम्ही या भारताचे एक जागरुक नागरिक बनत चालला आहात हेही महत्त्वाचे आहे. त्यामुळे तुमची जबाबदारी खूपच वाढली आहे. तुम्ही आता लहान नाहीत. तुम्ही आता खऱ्या अर्थाने मोठे झाला आहात. तुम्ही वयाने मोठे झालात , ज्ञानाने मोठे झालात , आता मनानेही मोठे व्हा. समंजस , जिद्दी आणि सकारात्मक विचारसरणी अंगीकारा. तडजोड करायला शिका. आभासी दुनियेतून बाहेर पडा. उघडे असलेले डोळे अधिक व्यवस्थित उघडा आणि जगाकडे जाणीवपूर्वक सजगपणे बघा. तुम्ही मोठे आणि अधिकाधिक मोठे होणार हे फक्त तुमच्यावरच अवलंबून असतं. शुभेच्छा तुम्हाला या सर्वांसाठी. 

©️ प्रवीण अशितोष कुबलसर , मुख्याध्यापक , शाळा शिडवणे नं.१



Saturday, October 15, 2022

🛑 आईबाबा : वाचन पाठ १

 🛑 आईबाबा : वाचन पाठ १

          मुलांनो , तुम्ही तुमच्या आईबाबांवर खूप प्रेम करा. तुमच्या आईबाबांइतकी माया तुमच्यावर कोण करेल ? तुम्हांला शिकवण्यासाठी ते किती परिश्रम करतात. अन्न , वस्त्र आणि झोपण्यासाठी उबेचं पांघरूण हे सगळं तुमच्यासाठी कोण देतात ? तुमची तब्येत बरी नसताना , तुम्हाला दुखत खुपत असताना तुम्हाला मायेने जवळ कोण घेतात ? आणि अधिक ममतेने तुमची सेवा कोण करतात ? आणि तुम्हाला औषधपाणी कोण करतात ? आणि देवाने तुम्हाला आरोग्य , धन आणि संपदा देण्यासाठी देवाची प्रार्थना कोण करतात ? 

          तुमच्या आईवडिलांची स्वतःची तब्येत बरी नसली तर तुम्ही त्यांची सेवा नको का करायला ? त्यांच्या कष्टात त्यांना अधिकचे सहकार्य करा. त्यांनी तुमच्यासाठी किती केले आहे , आणि किती सोसले आहे याची आठवण ठेवा. 

          तुम्हाला तुमच्या मोठ्या भावाबहिणींची भीती वाटली पाहिजे. त्यांना छळू नका. त्यांना त्रास देऊ नका. वाईट नावे ठेऊ नका. त्यांना मारण्यासाठी तुमचे चिमुकले हात उगारु नका. तुमची एखादी वस्तू त्यांनी घेतली तर त्यांना रागे भरु नका. त्यांनीच ती तुम्हाला दिली होती हे लक्षात ठेवा. त्यांनी ती काही काळासाठी घेतली म्हणून हिसकावून घेऊ नका. तुमची आवडती वस्तू दुसऱ्यांनाही काही काळ वापरायला देण्याची सवय अंगी बाळगा. जमेल ते तुम्हाला. प्रयत्न तर करुन पाहा. 

          तुम्ही भांडत असताना तुमचे आई बाबा तुम्हाला पाहतात , तेव्हा त्यांना किती दुःख होत असेल याची कल्पना करा. त्यांची एवढीच इच्छा असते की आपल्या मुलांनी सर्वांशी प्रेमाने , मायेने , गोडीगुलाबीने आणि आपुलकीने वागावे. मग असे वागणार ना ? 

©️ प्रवीण अशितोष कुबल ( 9881471684 )

Saturday, July 30, 2022

🛑 शिष्यवृत्तीची वृत्ती

 🛑 शिष्यवृत्तीची वृत्ती

          हल्ली स्पर्धा परीक्षांचे अनेक वारे वाहू लागले आहेत. प्रत्येक इयत्तेसाठी स्पर्धा परीक्षांची ही कवाडं उघडलेली पाहायला मिळत आहेत. सध्याचं युग हे स्पर्धेचं युग आहे असं मान्य केलं तरी मुलाच्या जन्मापासूनच्या या स्पर्धा जीवघेण्या तर ठरणार नाहीत ना ? याचीही कधी कधी भीती वाटते. मुलांना या परीक्षांना बसवलं जातं. मुलांना या परिक्षांबद्दल माहिती दिली जाते. खरंतर अशा परीक्षा ह्या प्रज्ञावान विद्यार्थ्यांसाठी असतात. परंतु सरसकट सर्व विद्यार्थ्यांना बसवण्यात येतं. 

          प्रत्येक वर्गात तीन प्रकारची मुले असतात. प्रज्ञावान , मध्यम आणि सर्वसाधारण. यांत मध्यम मुलांना प्रज्ञावंत करण्याचा शिक्षकांकडून आणि बऱ्याचदा पालकांकडूनही प्रयत्न केला जातो. सर्वसाधारण मुलं बिचारी नाईलाजाने या परीक्षांना बसत असावीत. शाळेचा अभ्यासक्रम शिकताना त्यांच्या नाकात नऊ आलेले दिसतात. हा आणखीचा अभ्यास त्यांच्या नाकात आणखी काही आकडे आणत असतील की काय असा नेहमी प्रश्न पडतो.

          शिष्यवृत्ती परीक्षा ही खऱ्या अर्थाने शिष्य वृत्ती जोपासण्यासाठी असते. शिष्यवृत्ती म्हणजे विद्यार्थी वृत्ती. विद्यार्थ्याने नित्य नियमाने विद्या घेत राहण्याची सवय अंगी बाणवायला हवी. स्वयंअध्ययन करत राहायला हवे. नवनवीन घटकांचं आकलन स्वतः करुन घ्यायला हवं. शालेय पुस्तकांच्या बरोबरीने इतर स्पर्धा पुस्तकांचं वाचन करत मनन , चिंतन आणि प्रात्यक्षिक करत राहिल्याशिवाय ही शिष्यवृत्ती येणार कशी ? 

          आमच्या बालपणी ४ थी , ७ वी या वर्गांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाई. आता एक वर्ग वाढवून तो ५ वी आणि ८ वी करण्यात आला आहे. अभ्यासक्रम तोच आहे , परीक्षा पद्धतीत थोडा फरक करण्याचा प्रयत्न केला गेलाय. आम्ही त्यावेळी 1 , 2 ,3 किंवा 4 यापैकी एक अचूक पर्याय चौकटीत लिहीत असू. त्यावेळी मोबाईल , टीव्ही आणि कॉम्प्युटर अशी ज्ञानाची साधने नव्हती. आतासारखे उदंड खाजगी क्लास नव्हते. आमच्या शाळेत शिकवणारे शिक्षकच आमचे कोचिंग घेत. शनिवार , रविवार अधिकचे मार्गदर्शन घेण्यासाठी शिक्षकांच्या घरी वर्ग भरत. त्यांच्या घरी चालत जावे यावे लागे. दुपार तिपार कधीही जादा वर्ग घेतले तरी आम्ही वर्गाला जात असू. त्यांच्याच घरी खाऊ खाणे होई. अभ्यासाचे आणि पोटाचे दोन्ही प्रकारचे खाऊ खाऊन शिष्यवृत्ती जोपासली आहे याचा आजही अभिमान वाटतो. 

          पाढे पाठांतर , म्हणी , वाक्प्रचार , गणिताची सूत्रे इत्यादी जय्यत तयारी करुन सराव घेतला जाई. भूमिती हा शब्द सातवीपर्यंत आम्हाला माहीतही नव्हता. पाचवी पासून तासवारी चाले. आता तासवारी क्वचित पाहायला मिळते. एका शिक्षकाकडे दोन , तीन किंवा चार वर्गही असतात. मुलांची पटसंख्या रोडावली आणि त्याचा फटका शिक्षकसंख्येवर झालेला दिसतो आहे. दररोजच्या विविध उपक्रमांच्या गर्दीमुळे शिकवायचे कधी तेही समजेनासे झाले आहे. आमच्या लहानपणी समारंभपूर्वक उपक्रमांचा इतका सुकाळ नक्कीच नव्हता. त्यामुळे शिक्षकांच्या वाट्याला शिकवणे येई आणि विद्यार्थ्यांच्या पदरात ज्ञानकण हमखास पडत. 

          कितीही नियोजन केले असले तरी ते शाळेत जाऊन शिकवता येईल का ?  की त्याऐवजी एखादा कार्यक्रम घेण्याची ऑर्डर येईल हे नित्याचेच बनले आहे की काय ? असे वाटू लागले आहे. त्यामुळे शिक्षकाच्या मनात शिकवायचे असले किंवा विद्यार्थ्यांच्या मनात मनापासून शिकायचे असले तरी वेळापत्रकाप्रमाणे जर घडलेच तर तो भाग्ययोग म्हणण्याची पाळी आल्यासारखे वाटायला लागले आहे.  खरंच परिस्थिती बदलण्याची गरज माझ्यासारखी सर्वांनाच वाटत असावी.

          प्रशिक्षणे घेऊन आम्ही शिक्षक तयार होत आहोत. त्या प्रशिक्षणाचे शाळेत उपयोजन करेपर्यंत दुसरे एखादे प्रशिक्षण येते आणि पहिले विसरले जाते आहे. एकावेळी अनेक गोष्टी करताना शिक्षक आणि विद्यार्थी दोघांचीही जी तारांबळ उडते आहे ते प्रत्यक्ष अनुभवायला मिळते आहे. हे करु की ते करु ? सगळेच करावेसे वाटते , पण वेळच पुरत नाही. ' एक ना धड भाराभर चिंध्या ' ही म्हण शिष्यवृत्तीचा अभ्यास करताना शिकलो होतो. आता त्याचा प्रत्यय प्रत्येक शिक्षकाला येत असेल तर मी त्यांच्या मताशी सहमत आहे.
          मी स्वतः आदर्श शिक्षक पुरस्कार मिळवण्याचा कधी प्रयत्नही केला नाही. मात्र माझ्या प्रत्येक विद्यार्थ्याने शिष्य वृत्ती जोपासण्यासाठी मी आजन्म प्रयत्न करीन. ही सगळी माझी स्वतःची ठाम मते असली तरी त्याच्याशी वाचकांनी सहमत असलेच पाहिजे असा माझा अजिबात आग्रह नाही असे नम्रपणे नमूद करावेसे वाटते.

©️ प्रवीण अशितोष कुबलसर
( 9881471684 ) कणकवली




Friday, June 17, 2022

🛑 अभिनंदन दहावी !!!! 🟢

 🛑 अभिनंदन दहावी !!!! 🟢

          निकालाचा दिवस हा आपल्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा दिवस असतो. कारण या दिवसाची प्रतिक्षा संपून गेलेली असते. हा निकाल धक्कादायक असू शकतो. तो आपलं जीवन कायमचं बदलवून टाकणाराही असू शकतो. अपेक्षित निकाल लागला नाही तर काहीही विचित्र घटना घडवणारी मुले पाहिली की सुन्न व्हायला होते. 

          निकाल ही फक्त टक्केवारी असते. कमी टक्के गुण मिळवणारे नाराज होण्याची शक्यता असते. त्यांना अपयश मिळाले आहे असे वाटत राहते. अपयश ही यशाची पहिली पायरी असते. अपयशाने खचून जायचे नसते , उलट अधिक जोमाने प्रयत्नाला लागायचे असते. दहावीच्या पुढे अजून बऱ्याच परीक्षा बाकी असतात हेही लक्षात ठेवले पाहिजे. हे स्पर्धात्मक युग असले तरी आपण दुसऱ्याशी तुलना करण्याचं सोडून द्या. तुमच्या स्वतःच्या पूर्वीच्या गुणांपेक्षा तुम्ही वरचढ ठरत आहात ना ? मग आणखी काय हवे ? सगळी मुलं ही वेगवेगळ्या क्षमता घेऊन जन्माला आलेली असतात. त्यांना सर्वांना एकाच तराजूत तोलणं कितपत शहाणपणाचं आहे ? ह्या तुलनेमुळेच मुलांचा आत्मविश्वास डळमळीत होत चाललेला आहे. 

          आपल्या मुलांना अजून खूप जग बघायचे आहे. त्याला ज्याची आवड आहे , तेच त्याला करु द्या. त्याला ज्या ज्ञानाची भूक आहे , ते त्याला खाऊ घाला. तो नक्की पोटभर जेवेल. अर्थात करियर करण्यासाठी त्याला सगळ्या गोष्टींची माहिती करुन देणं हीसुद्धा पालक म्हणून आपली जबाबदारी आहे. ती पार पाडण्यास आपण कमी पडणार नाही हेही पाहिले पाहिजे. 

          आम्हीही दहावी शिकलो. भरपूर अभ्यास केला. खूप लेखन केले. पाठांतर केले. उपक्रमात भाग घेतला. नेहमी पुढे पुढे राहण्यासाठी कंबर कसून करत राहिलो. त्यात कधीही खंड पडू दिला नाही. हुशार मुलांकडे बघत बघत त्यांचे चांगले गुण आत्मसात केले. त्यांच्यातल्या वाईट गुणांकडे दुर्लक्ष केले. त्यांच्या रॅगिंगला बळी पडलो नाही. आम्ही यशस्वी होण्यासाठी अभ्यास केला होता. 

          अत्युच्च शिखराचे ध्येय सतत खुणावत होते. ते प्राप्त करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली होती. जागेपणीही स्वप्न पाहात होतो. झोपेत तर स्वप्नांची शृंखलाच असे. सकाळी उठल्यावर पुन्हा अभ्यासाला लागत असू.

          रात्री उशिरापर्यंत झोप आली तरी अभ्यास केला होता. तेव्हा आतासारखे मोबाईल नव्हते. इंटरनेट नव्हते. गुगल सर्च नव्हते. पुस्तके वाचूनच उत्तरे शोधण्यासाठी रात्रीचा दिवस केला होता. क्लास लावले नव्हते. गाईड्स नव्हती. तरीही चांगले गुण प्राप्त करुन पहिल्या तीन नंबरात येण्याचा प्रयत्न असे. केलेले प्रयत्न बऱ्याचदा सफल होत गेले होते. त्यामुळे प्रयत्नांची कास कधीच सोडली नाही. 

          दहावीचे आठ वर्ग होते. प्रत्येक वर्गात हुशार मुले होती. माझ्या वर्गात मी ' वासरात लंगडी गाय ' होतो. माझा अभ्यास बघून माझ्या वर्गाने अभ्यास करायला सुरुवात केली होती. मला माझ्या मित्रमैत्रिणींचा अभिमान आहे. त्यांनी मला कधीही त्रास दिला नाही. त्यांनी मला केलेले सहकार्य मोलाचे होते. त्यांनी मला अभ्यास करायला दिला होता. नंबर आला की त्यांनी माझे पुढे येऊन अभिनंदन केले होते. त्यामुळे माझी जबाबदारी ते अधिकाधिक वाढवत नेत होते. त्यांना एखादे उदाहरण पुन्हा समजावून सांगताना माझे ते अधिक लक्षात राहत होते. त्यांनी मला दिलेला आदर मी कायमच लक्षात ठेवला आहे. 

          कधीतरी ते जुने वर्गमित्र भेटतात. जुन्या आठवणी जाग्या होतात. आता त्यांना ओळखणे शक्य नसते. प्रत्येकाची शरीराची ठेवण पुरती बदललेली दिसते आणि खुदकन हसूच येते. मी शिक्षक झालो आहे हे पाहून त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद वाढताना पाहतो तेव्हा मलाही अत्यानंद होतो. 

          दहावीत भरपूर गुण मिळालेले असतात. तेवढे गुण बारावीत मिळवणे कठीण जाते. पुढे पुढे शिकत जावे तशी गुणांची टक्केवारी खालावत जाते. अभ्यासक्रमाची व्याप्ती वाढलेली असते. ती पेलताना ताकद पणाला लावावी लागते. 

          वेळ निघून गेली की ती पुन्हा येत नाही. वय निघून गेले की तेही तसेच जाते. मग पश्चात्ताप करण्याची वेळ येते. पण मग उशीर झालेला असतो. त्यामुळे वाईट विचार मनात डोकावू लागतात. 

          आपण आपल्या मनाला नियंत्रणात ठेवायला हवे. ते सांगेल तसे करु नये. आपण सांगू तसे मनाने आणि देहाने करावे. हे घडेल तेव्हा आपले उत्तीर्ण झालेले आणि अत्युत्तम गुण मिळवलेले विद्यार्थी खऱ्या अर्थाने उत्तीर्ण झाले असे म्हणता येईल. सर्वांना त्यांच्या पुढील दैदिप्यमान यशासाठी अनंत उदंड शुभेच्छा.

©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 ) कणकवली



Saturday, June 4, 2022

🛑 मॉर्निंग वॉक : एक आल्हाददायक अनुभव

🛑 मॉर्निंग वॉक : एक आल्हाददायक अनुभव


          हल्ली ' मॉर्निंग वॉक ' ला जाण्याचे प्रमाण पुन्हा सुरु झाले आहे. ती एक काळाची गरज आहे. चालणे हा सर्वांत चांगला व्यायाम प्रकार आहे. चालल्यामुळे तुमचे अनेक ताणतणाव कमी होऊ शकतात. 

          अनेकजण कित्येक वर्षे ' पहाट चालणं '  करण्यासाठी बाहेर पडलेली मी प्रत्यक्ष बघितली आहेत. पूर्वी सकाळी शाळा असे , त्यावेळी आपोआप सकाळचे चालणे होऊन जाई. आता काही शाळांच्या वेळा बदलल्या आहेत , त्यामुळे ' प्रातःकालची चाल ' बंद पडली आहे. लोकांनी उशिरापर्यंत झोपण्याच्या सवयी बदलायला हव्यात. तर सकाळी चालायला जाण्यासाठी लवकर जाग येईल. रात्री उशिरापर्यंत हॉरर सिरीयल बघत बसतात. त्याचा प्रभाव झोपेतही राहतो. झोप झाल्यासारखे वाटत नाही. मग सकाळी उशिराच गाढ झोप लागते. अर्थात आज नको उठुया , उद्या उठून ' प्रातःकाल चाल ' सुरु करण्याचा संकल्प करत राहतील आणि तो पूर्णही होणार नाही कधीच.

          ' लवकर निजे , लवकर उठे

    ' तया आरोग्य , संपत्ती , ज्ञान भेटे '

हे सुवचन म्हणूनच अगदी योग्य आहे. लवकर उठावे , मस्त प्रफुल्लोत्तेजन करावे. ताण कुठल्या कुठे निघून जाईल पहा. आज , उद्या , परवा करण्याच्या भानगडीत पडू नका. आज आता ताबडतोब सुरुवात करणं कधीही उत्तमच. मीही या सुट्टीत अनेकदा मॉर्निंग वॉकचा अनुभव घेतला आहे. हा अनुभव खरंच घेतल्याशिवाय समजणार नाही. त्यासाठी दररोज थोडं चालण्यासाठी घराबाहेर पडाच. 

          दिवसाची चांगली सुरुवात अशी करुन पहा. कित्ती मस्त वाटेल तुम्हाला. दिवस आनंदात जाईल. शरीर आणि मन दोन्ही प्रफुल्लित होऊन जातील. तुम्ही कायम तंदुरुस्त राहण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे. 

          त्यासाठी कोणत्याही मोठया पूर्वतयारीची अजिबात गरज नाही. साधे सैल कपडे घालून निघा. हलके शूज असले तर आणखी उत्तम. चालताना तुम्हाला अवघड वाटता कामा नये. बाजाराला जाताना तुमच्या हातात एखादी पिशवी असते , इथे ती नसते. मोबाईल नसला तर तुमचे चालण्याकडे अधिक लक्ष राहू शकेल. नाहीतर प्रत्येक नोटिफिकेशन तुमची चाल मंदावत राहील. याला काय अर्थ आहे ? तुम्ही चालायला गेलात ना ? मग तेवढीच गोष्ट मनापासून करा. काही लोक कानात इअरफोन घालून एका हातात मोबाईल घेऊन चालताना मी बघितले आहेत. त्यामुळे त्यांचे चालणे हा एक उपचार ठरतो. त्याचे हवे तसे फिलिंग येत नाही. काही लोक बोलत बोलत चालत असतात. त्यांचे चालणे थांबेल , पण बोलणे थांबत नाही. काही लोक एखादा व्हिडीओ पाहत पाहत चालत असतात. भीती वाटते अश्यांची. चुकून खड्ड्यात पडले तर ? पडताना अशी माणसे आधी आपला मोबाईल वाचवतील , मग स्वतःला. 

          मॉर्निंग वॉकसाठी कमी वाहतुकीचा रस्ता निवडावा. असा रस्ता आता दुर्मिळ झाला आहे. दोन्ही बाजूंना झाडे असल्यास चालताना मजा येते. जाताना खूप काही पाहायला आणि ऐकायला मिळते. पक्ष्यांचे आवाज ऐकत जावे. निसर्गाच्या सहवास घेत घेत पुढे पुढे चालत राहावे. थोडे ट्रेकिंग करावे. घामाघूम होऊन जावे. घाम हलकेच पुसून टाकावा. एखाद्या शांत ठिकाणी शांत बसून निसर्गातील विविध आवाज ऐकावेत. डोळे बंद करुन जगापासून वेगळे होण्याचा प्रयत्न करावा. 

          वाटेतील झाडांशी ओळख करावी. त्यांच्याकडे प्रेमाने पाहावे. दुसऱ्या दिवशी ती तुमची वाट पाहताना दिसतील. तुम्ही जवळ जाताच तुमच्यासाठी ती डोलताना दिसतील. ती झाडे सजीव आहेत , ती तुम्हाला नक्कीच प्रतिसाद देतात. फक्त ते निरीक्षण करता आले पाहिजे. 

          रानकोंबडी अगदी तुमच्या जवळून जातील. पळसाची फुले , प्राजक्ताची फुले थेट तुमच्या पायावर पडतील. निसर्ग तुमचे स्वागत करायला सुरुवात करेल. कुठूनतरी एखादी कोकिळा तुमच्यासाठी गाणे गात असेल. गोठ्यातील गाई , गुरे हंबरत असतात. दूध काढताना चरवीचा येणारा आवाज , शेणामुताचा आरोग्यदायक वास , पिकलेल्या आंब्यांचा सडा हे सगळं एका मॉर्निंग वॉक मध्ये अनुभवायला मिळतं. वाटेत मित्र भेटतात. ते गुड मॉर्निंग करतात. मोकळी स्वच्छ जागा दिसली की तिथेच बसून राहावेसे वाटते. आपण मध्येच आणि आपल्या चारी बाजूंना निसर्ग. किती मस्त वाटतं !! मग तिथे बसून थोडी योगासने करावीत. शरीराबरोबर मनाचाही भार हलका करावा. शरीरातील दुखणाऱ्या इंद्रियांकडे पहावे. त्यांच्यावर आलेला ताण शिथिल करावा. 

          हे करुन आल्यावर मस्त थंड पाण्याची आंघोळ करावी. मंत्र म्हणत देवाला  नमस्कार करावा. हे सगळे दररोज करता आले तर छानच.  नाहीतर एकदिवसाआड जमते काय बघा. मलाही हे नित्य करता येते का बघतो. 

©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 ) कणकवली



Thursday, June 2, 2022

🛑 सुट्ट्या लागल्या आता मज्जा

 🛑 सुट्ट्या लागल्या आता मज्जा


          सुट्टी हा शब्द सगळ्यांनाच आवडणारा असेल. नुसता शब्द नाही तर त्याची प्रतिक्षा करण्यातही एक आगळा आनंद असतो. तशी प्रत्येकाला आठवड्यातून एक दिवसाची सुट्टी मिळत असेलच. आता काहीजण 24 गुणिले 7 काम करत असतील तर त्यांनाही सुट्टी घेणाऱ्यांचा हेवा वाटत असेल. अर्थात तशी सगळयांनाच कधीना कधी सुट्टी मिळतच असते , फक्त ते सांगत नसतात. किंवा त्यांना आपल्याला सुट्टी आहे हे जाणवत नसेल. 

          आयुष्यात अशा अनेक सुट्ट्या येत असतात. त्या येतात आणि जातातही. पण प्रत्येक सुट्टी आपलं एक वेगळेपण घेऊन येत असते. माणसाला विश्रांतीची गरज असते. ती विश्रांती सुट्टीमुळे त्याला मिळत असते. सुट्टी म्हणजे आपले स्वतःचे दिवस असतात. त्यावर आपला आणि आपलाच अधिकार असतो. ती आपली स्वतःची असते , म्हणून ती आपली लाडकी असते. ती आपल्याला नेहमीच हवीहवीशी वाटणारी असते. ती पुन्हा पुन्हा येत राहावी अशीही असू शकते. सुट्टी आली की आपल्या मनाचे करता येते हा आनंद असतो. तो आनंद कोणी हिरावून घेऊ नये असे प्रत्येकाला वाटत असते. आज मस्त सुट्टी आहे असे म्हणत जर तुम्ही तुमचा सुट्टीचा दिवस ' एक उनाड दिवस ' म्हणून साजरा करणार असाल तर त्यात जर कुणामुळे विघ्न आलंच तर आपण त्याच्यावर मनातून चरफडल्याशिवाय राहत नाही. 

          एक मे हा दिवस मुलांच्या सुट्टीचा सुरुवातीचा दिवस असावा. आता खूप लवकर परीक्षा होतात , त्यामुळे एप्रिलपासूनच मुले शाळेत यायची बंद होतात. परीक्षा झाल्या की शाळेत कशाला जायचे ? हा प्रश्न पडल्यामुळे मुलांना शाळेत पाठवले जात नाही. उलट याही दिवसात शाळांमध्ये शैक्षणिक कामकाज सुरू असते. निकाल , स्वाध्याय पूर्तता , तोंडी काम , तोंडी परीक्षा , प्रकल्प , शाळा पूर्व तयारी अभ्यासक्रम , अप्रगत मुलांसाठी उपचारात्मक अभ्यासक्रम इत्यादी कामकाज सुरुच असते. ते सुरुच असते , पण ते फक्त शिक्षकांना आणि शिक्षणाशी संबंधित घटकांना माहिती असते. 

          वर्षभर अभ्यास करुन करुन दमायला झालेले असते. थोडी विश्रांती म्हणून शाळेतील वाचनालयाच्या पुस्तकांचा वाचून फडशा पाडायला काय हरकत आहे. अनेक पुस्तके वाचल्यामुळे मुलांच्या ज्ञानात आणखी भरच पडणार असते. शिक्षकांनीही आपल्या शाळेतील डेडस्टॉक मध्ये बंदिस्त करुन ठेवलेली पुस्तके मुलांना वाचायला द्यावीत. पुस्तके वाचून फाटून गेली तर ती सार्थकी लागतील नाही का ? हल्ली मुलांच्या घरी पुस्तके असण्याची शक्यताच कमी असते. शहरात काही वाचनवेडे सोडले तर वाचनासाठी पुस्तके घरी आणणारे विरळेच आढळतील. शहरात जर ही अवस्था असेल तर खेड्यात वाचन अपेक्षा ठेवणे दूरच राहिले. दिवाणखान्यात किमती वस्तू दिसतील , पुस्तके दिसणार नाहीत. पुस्तके दाखवण्यासाठी नकोच , ती वाचनासाठी हवी. 

          आमच्या बालपणी आम्ही वाचनालयात बालवाचक म्हणून खाते उघडले होते. त्यावेळी महिन्याला पाच रुपयापेक्षा कमी वर्गणी होती. किती पुस्तके वाचायचो आम्ही. शनिवार रविवार कधी येतो आणि वाचनालय कधी गाठतो असे होईन जाई. आता वाचनालयात जाणे संपले आहे. आता घराचेच पुस्तकघर बनवून टाकले आहे. ज्यावेळी वाटेल त्यावेळी एखादे पुस्तक उघडावे आणि वाचत सुटावे. वेळ कसा निघून जातो समजतही नाही. आताच्या मुलांना वाचनाचा छंद कमीच दिसून येतो. त्यांना तुमचा आवडता छंद कोणता असे विचाराल तर खूप कमी मुलांचे उत्तर वाचन असे असेल. 

          या सुट्टीचा वापर मुलांनी वाचनासाठी करायला हवा. बालसाहित्य बाजारात उपलब्ध आहे. गोष्टींची पुस्तके आहेत. बालकथा , इसापनीती , अकबर बिरबल , नितीकथा , लोककथा , एकांकिका , बालनाट्ये , नाट्यछटा , किशोर , कुमार , ठकठक , चांदोबा , अमृत , कॉमिक्स , विक्रम वेताळ , आजोबांच्या गोष्टी , आजीच्या गोष्टी , सिंदबादच्या सफरी , गुलबकावली , लोटपोट , सिंहासन बत्तीशी , गोट्या , श्यामची आई , सानेगुरुजींच्या गोष्टी अशी अनेक पुस्तके आताच्या मुलांना माहीत असतील की नाही यांवर संशोधन करावे लागेल. या सर्व गोष्टी त्यांना यु ट्यूबवर उपलब्ध असतीलही. पण वाचण्यात जी वेगळी मज्जा असते , ती पाहण्यात नक्कीच असेल असे मला वाटत नाही. ते एक मनोरंजन होईल , पण ज्ञानार्जन कदाचित होईल. म्हणून आताच्या मुलांनी भरपूर वाचले पाहिजे. पुस्तकांचा फडशा पाडला पाहिजे. सकाळी उठून स्टेटस लावण्यापेक्षा एखाद्या पुस्तकातील चार ओळी वाचल्यास त्याचा आयुष्यभरासाठी नक्कीच फायदा होईल. 

          सध्या वर्तमानपत्रात देखील लहान मुलांसाठी विशिष्ट पान असते. ते लहानांपासून मोठ्यांनीही वाचले पाहिजे. घरातल्या मोठ्यांनाही हल्ली वाचनाचा विसर पडत चाललेला दिसून येतो आहे. सकाळपासून रात्री झोपेपर्यंत मोबाईलने आपले जीवन ग्रस्त करून सोडले आहे. मध्यरात्री उठून बसलो तरी पहिल्यांदा मोबाईलकडे हात जाऊ लागला आहे. घराघरात क्रिकेट मॅच , सासूसुनांच्या मालिका सुरु आहेत. मुले , पालक हेच बघत आहेत. यातून वेळच मिळत नसल्यामुळे त्यांना पुस्तक वाचायला सवडच मिळताना दिसत नाही. 

          पूर्वीची मुले एवढी अभ्यासवेडी किंवा वाचनवेडी होती की त्यांच्या हातात नेहमी एखादे पुस्तक दिसे. आता मोबाईल दिसतो. त्या दिवशी वाचनालयात गेलो होतो. तिथे तरुण मंडळी दिसलीच नाहीत. खूप जुनी जाणती माणसेच पुस्तके वाचन करताना दिसली. या जुन्या माणसांनी आपला वाचनाचा छंद जोपासला आहे. व्यासंग जपला आहे. पूर्वीपेक्षा अभ्यासक्रमाची काठिण्यपातळी कमी झालेली आहे , त्यामुळे मिळणारे गुण शंभर टक्क्यांपेक्षा जास्त असले तरी त्यांना अजिबात किंमत नाही. पूर्वीच्या साठ टक्क्यांच्या खालीच आहेत असेही बोलले जात आहे. 

          आता सुट्ट्या पडल्याचं आहेत , तर त्या सुट्टीचा वापर वाचनासाठी करायला हवा. मुलांनी वाचनवेडे बनायला हवे. आम्ही त्यावेळी जेवतानाही समोर पुस्तक उघडून बसत असू. तेव्हा आमचे बाबा आम्हाला ओरडत. आता जेवताना समोर टीव्ही चालू असतो , शेजारी मोबाईलच्या नोटिफिकेशन्सची रिंग वाजत असते. इकडे जेवत असतो , तिकडे हे सुरुच असते. त्यामुळे कधीकधी तोंडात घालायचा घास नाकात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. एकावेळी एकच काम करा. वाचताना वाचा आणि चावताना चावा. कारण काय चावतोय ते जसे समजायला हवे , तसे काय वाचतोय तेही समजायलाच हवे नाही का ? 

©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 )

🛑 पाण्याचा थेंब

🛑 पाण्याचा थेंब

          एक पुरातन काळातील कावळ्याची कथा सर्वांनाच माहिती आहे. त्या गोष्टीला किती वर्षे झाली असतील माहिती नाही. पण अजूनही शाळांमध्ये या कावळ्याची गोष्ट तशीच सांगितली जाते. एक तहानलेला कावळा असतो. तो पाण्याचा शोध घेत असतो. त्याला खूप लांबवर पाण्याचा हंडा दिसतो. त्यातील पाणी खूपच तळाशी असतं. कावळा खूप हुशार असतो. त्याला एक युक्ती सुचते. तो इकडे तिकडे पाहतो. त्याला दगडाचे खडे दिसतात. तो आपल्या चोचीने ते दगडाचे खडे एक एक करुन हंड्यात टाकतो. हंड्यातील तळाला असलेले पाणी वर येते. तो पोट भरुन पाणी पितो आणि आनंदाने उडून जातो. 

          पाण्याचे काही थेंब मिळून पाण्याचा हा साठा तयार होतो. पाणवठा होण्यासाठी पाण्याचे थेंब एकत्र यावे लागतात. थेंबे थेंबे तळे साचे. तळे साचण्यासाठी थेंबांची जरुरी असते हे या म्हणीतूनही स्पष्ट होते. याचा अर्थ पाण्याचा प्रत्येक थेंब महत्त्वाचा आहे. कावळ्याला तहान लागली होती , त्यावेळी त्याला कधी एकदा पाणी पितो असे झाले होते. त्याने विज्ञानातील आर्किमिडीजचे तत्त्व न शिकताही ते वापरले होते. दगडाचे खडे टाकून टाकून त्याने पाणी वर आणले होते. गरज ही शोधाची जननी आहे हे त्या कावळ्यानेही सिद्ध केले होते. आपण तर माणूस आहोत. आपणही तहान लागली की विहीर खणायला लागतो तसे. 

          लहानपणी आकाशवाणी पुणे नेहमी ऐकायचो. तेव्हा त्यातील उद्घोषक नेहमी काहीतरी चांगले सुविचार सांगत. त्यातील पाण्यासंबंधात एक सुविचार माझ्या चांगलाच लक्षात राहिला आहे. " आभाळातून पडणारा पाण्याचा प्रत्येक थेंब जपायला हवा , उद्याच्या अंकुरणाऱ्या कोंबासाठी. " खरंच पाण्याचा प्रत्येक थेंब जपायलाच हवा. 

          सध्या आपल्याला सगळ्यांनाच खूप तहान लागत असेल. तहान लागली की आपण आपली पाण्याची बाटली शोधतो. पाणी पितो तेव्हाच शांत होतो. पाणी पिऊन पिऊन संपून जाते. पाणी हवे असते , पण ते मिळत नसते. आता पाण्याची किंमत समजू लागते. जवळपास पाण्याची बाटली किंवा पाणी मिळते का बघतो. पाणी मिळाल्याशिवाय तृष्णा शांत होत नाही. पाणी मिळाले की ते घटाघटा पिण्यात जो आनंद असतो तो कशातही नसेल. जेवढे पाहिजे तेवढे पाणी पिल्याशिवाय आपण पाणी पिणे थांबवत नाही. आपल्या शरीराला पाण्याची इतकी गरज असते , की पाणी हे आपल्या जीवनाचे जीवन झालेले आहे. म्हणूनच पाण्याला जीवन म्हणत असावेत. हेच पाणी पिण्यासाठी महत्त्वाचे असते , तसे इतर अनेक सुविधांसाठी उपयोगी असते. 

          त्यादिवशी काही मुले नदीत पोहोण्यासाठी गेली होती. उन्हाळ्यात सर्वांनाच पाण्यात डुंबायला जायला खूप आवडते. त्यांनाही तो मोह आवरला नाही. पाण्याच्या खोल डोहात उतरल्यामुळे त्यातील एका मुलाला बुडून प्राण गमवावे लागले. जे पाणी तहान भागवते , ते अतिरिक्त घेतल्याने मृत्यूही ओढवतो. पाण्याने त्या मुलाचा प्राण घेतला होता. त्याच्या नाकातोंडात पाणी गेलं होतं. तो बराच वेळ पाण्यात बुडून राहिल्यामुळे त्याला मृत्यूला सामोरे जावे लागले होते. पोहता येणारे सुद्धा बुडतात. त्यात आमच्यासारख्यांचे काय ? 

          उन्हाळा संपता संपता पाण्याची टंचाई जाणवू लागते. सगळ्या विहिरींमधील पाणी संपू लागते. तळ दिसू लागतो. एकाच विहिरीवर चार पाच पंप लावलेले असतात. विहिरीत पाणी आहे का नाही बघितलेही जात नाही. बटन चालू करतात. पाणी भरुन घेतात. विहिरीमधले पाणी संपले तरी पाहिले जात नाही. कोणीतरी पंपाचा आवाज येतो आहे म्हणून बघायला जातो. तेव्हा लक्षात येते की विहिरीत पाणी नसल्यामुळे ' घरघर ' आवाज येत आहे. टाकीतील पाणी संपून जाते. घरखर्चासाठी पाणी मिळत नाही तेव्हा पाण्याचा वापर जपून करण्याचे लक्षात येते. रात्रभर पंप बंद राहतो. सकाळपर्यंत झऱ्यातून पाणी येत राहते. पुन्हा पाण्याच्या थेंबा थेंबानी विहिरीचा तळ भरुन जातो. तो पाहून पुन्हा हायसे वाटते. पंप पुनश्च सुरु केले जातात. पुन्हा तसेच घडत राहते. 

          उन्हाळ्याची सुट्टी लागते. मुंबईची चाकरमानी मंडळी गावात गर्दी करतात. पाण्याचा बेसुमार वापर सुरु होतो. माठातले थंडगार पाणी पिताना पिणाऱ्याचा तृप्त चेहरा बघत राहावासा वाटतो. गावात नदी असतेच. त्यात एखादी कोंडही असतेच असते. मुले दरवर्षी पोहोण्याची मजा लुटत असतात. एखादा बुडून जाणार असतो हे कोणाच्या गावीही नसतं. पुन्हा तशी नको असलेली घटना घडते. सन्नाटा पसरतो. दोन तीन दिवसांत सन्नाटा संपतो. 

          पावसाचे ढग आकाशात जमू लागतात. अमृतासारखे पाण्याचे थेंब धरतीला येऊन मिळतात. धरतीवर जिकडे तिकडे पाणीच पाणी होऊन जाते. शाळा सुरु होते. मी सातवीच्या वर्गाला शिकवित असतो. अचानक एक कविता समोर येते. " थेंब आज हा पाण्याचा " ही कविता शिकवताना मी शब्द साहित्य आणि व्याकरण शिकवत राहतो. त्यातील समानार्थी शब्द , यमक असणारे शब्द , विरुद्धार्थी शब्द , शब्दार्थ आणि साहित्यिक मूल्य शिकवत राहतो. हे शिकवताना मुलं ते कदाचित लक्षात ठेवतात. पाणी वाचवण्याचे विसरुनच जातात. मुलांना प्रश्नांची उत्तरे देता येतात. व्यवहारात वापरता येत नाही. हे असं चित्र पाहिलं की तो कावळा बरा वाटतो. नळ चालू असताना वाया जाणारे पाणी पाहून काहीच न करणारी माणसे बघून डोळ्यात पाणी आल्यावाचून राहत नाही. 

©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 )



Sunday, March 13, 2022

🛑 शिडवणे नं . १ च्या मुलांनी पाहिली पावनखिंड

🛑 ऐतिहासिक चित्रपट मुलांनी एकत्र बसून अनुभवला

🛑 कणकवली : 

          चौथीच्या ' शिवछत्रपती ' या पुस्तकात शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची गाथा सांगितली आहे. त्यातील बाजीप्रभू देशपांडे यांचा पराक्रम प्रत्यक्ष पाहण्याचा अनुभव शिडवणे नं.१ च्या विद्यार्थ्यांनी लक्ष्मी चित्रमंदिर कणकवली येथे सिनेमागृहात जाऊन घेतला. 

          " पावनखिंड " हा चित्रपट बाजीप्रभू देशपांडे यांच्या जीवनावर आधारित असला तरी त्यात शिवाजी महाराज , शंभूराजे , बहिर्जी नाईक , जिजाऊ , हरप्या , कोयाजी , रायाजी बांदल , दिपाई , अगिन्या , शिवा काशिद , पंत ,  किल्लेदार आणि अशा अनेक मावळ्यांनी केलेल्या पराक्रमाचे प्रसंग दाखविण्यात आले आहेत. त्यामुळे त्यावेळी घडलेले प्रसंग जसेच्या तसे मुलांच्या लक्षात राहण्याइतके दाखवले गेले आहेत. 

          त्यावेळी शाळेतील बत्तीस मुले , शिक्षक प्रवीण कुबल , सुजाता कुडतरकर , सीमा वरूणकर , मुख्याध्यापक सुनिल तांबे आणि शिक्षणप्रेमी सुनिल शेट्ये , पालक सचिन टक्के आदी उपस्थित होते. माफक दरात चित्रपट पाहण्याची संधी उपलब्ध करुन दिल्याबद्दल चित्रमंदिर व्यवस्थापनाचे व शिक्षण विभागाचे सर्व पालक , शिक्षक यांनी आभार मानले आहेत.




आमच्या शाळेतील ' अन्नपूर्णा ': सौ. समिता सुतार वहिनी

 ​ 🍽️ आमच्या शाळेतील ' अन्नपूर्णा ': सौ. समिता सुतार वहिनी 👩‍ ​          गेली काही वर्षे सौ. समिता सुतार वहिणी आमच्या शाळेत 'श...