🛑 मोटू और पतलु की जोडी
बालपणी साधारण हिंदी भाषा समजू लागल्यानंतर ' लोटपोट ' हे हिंदी बाल मासिक हाती आले. कणकवली एस.टी. स्टँडवर असलेल्या पेपर स्टॉलवर हे मासिक मला पाहायला मिळाले. मी ते एकदा घेतले. त्यातील चित्रे आणि हिंदी भाषा जवळची वाटत गेली.
मुखपृष्ठावरील मोटू आणि पतलु या दोन कार्टून्सची चित्रे मला आकर्षित करु लागली होती. हळूहळू ही दोन्ही पात्रे माझे मित्र कधी झाली मला समजलेही नाही. मी वाचत गेलो आणि पुनःपुन्हा वाचतच राहिलो. एखाद्या महिन्यात ' लोटपोट ' आले नाही तर मी खट्टू होऊन परत येत असे. मासिक वाचताना खरंच मी लोटपोट होऊन जात असे. आता हे मासिक जिओ मॅगझीन यावर ऑनलाईन वाचनासाठी उपलब्ध आहे. त्याचे वाचन करत गेलात तर तुमची हिंदी नक्कीच सुधारु शकते.
लहान मुलांनी अवांतर वाचन करणे ही आजची गरज आहे. आम्ही आमच्या लहानपणापासून ही वाचनाची आवड जोपासली आहे. मिळतील ती पुस्तके वाचून संपवली आहेत. सर्वच पुस्तके आता लक्षातही राहिली नाहीत. मराठीप्रमाणेच हिंदी वाचन करणेही गरजेचे आहे. कारण हिंदी आपली राष्ट्रभाषा आहे. इंग्रजीकडे जास्त लक्ष देण्याच्या हव्यासापोटी हिंदीकडे होत असलेला दुर्लक्ष नाकारुन चालणार नाही.
लोटपोट सारखी बालमासिके वाचून आपण आपलं हिंदी भाषेतील ज्ञान वाढवत जाण्याची हिच वेळ आहे. आता सर्वकाही इंटरनेटवर उपलब्ध आहे. त्यामुळे इंटरनेटचा असा फायदा करुन घ्यायला हवा. उगीचच निरर्थक सर्फिंग करणे थांबवायला हवे. सर्वच गोष्टी गुगल करण्याची वाईट सवयसुद्धा सोडून द्यायला हवी.
एलईडी टिव्ही नावाच्या आयताकृती वस्तूसमोर बसून संपूर्ण दिवसभर कार्टून्स बघणारी मुले बघितली तर पुढील भावी पिढीची चिंता सतावते आहे. काय करायचं या मुलांचं ? कसं होणार या मुलांचं ? हे आणि असे अनेक प्रश्न प्रत्येक पालकाला पडत असावेत. टिव्ही बंद केला तर , मोबाईल आहेतच. मोबाईलच्या छोट्या स्क्रिनवर डोळे मिचिक मिचिक करत का होईना कार्टून्स आणि रिल्स बघणे सुरुच राहते आहे हा खरा घोळ आहे.
एका गोष्टीवर निर्बंध घातले तर दुसरी चुकीची गोष्टच करण्याकडेच मुलांचा कल असतो. त्यांना एखादी गोष्ट करु नका म्हटले तर तीच गोष्ट ती पुनःपुन्हा करत राहतात. मग आपणच कंटाळतो. विषयच सोडून देतो. काय करायचं ते करा असे म्हणत वैतागत आणि चरफडत राहतो.
आमच्याकडे बऱ्याचदा ही ' मोटू पतलु' मालिका सुरु असते. त्यातली पात्रं कमालीची आकर्षक आहेत. स्वतः मोटू हा धाडसी आहे. आपल्या ताकदीच्या जोरावर तो कितीही मोठ्या संकटांचा सामना करण्यास पुढे सरसावतो. समोसे खाल्ल्याशिवाय त्याला ताकद येत नाही. तो समोसे कधी चावताना दिसत नाही. तो समोसे गिळतो. आपल्याला असं समोसे गिळंकृत करणं या जन्मात तरी शक्य नाही.
पतलु हा त्याच्या नावाप्रमाणे बारीक आहे. तो अतिशय हुशार आहे. त्याने सुचविलेल्या युक्त्या भन्नाट असतात. या दोघांची जोडी म्हणूनच बालांच्याच नव्हे मोठ्यांच्याही मनावर अधिराज्य गाजवत आहे. तुम्ही अगदी कंटाळून घरी आलेले असाल तर ' मोटू पतलु' ही मालिका बघा. तुमचा सगळा शीण कुठल्या कुठे निघून जाईल.
त्यांच्यासोबत कायम ' चिंगम ' नावाचा पोलीस अधिकारी असतो. तोही अफलातून कॉमेडी दाखवला आहे. मोटू पतलु या द्वयींच्या मदतीने तो अनेकदा दुष्टांना पकडताना दिसतो. त्याने आपल्या बंदुकीने झाडलेली प्रत्येक गोळी नारळ पाडल्याशिवाय राहत नाही. नारळाचे झाड जवळपास नसले तरी नारळ पडतात त्यामुळे गंमत वाटत राहते.
डॉ. झटका यांची संशोधने हटके असतात. प्रयोग करताना होणाऱ्या गमतीजमती पाहताना हसू अजिबात आवरत नाही. ' यार ' हा त्यांच्या तोंडी दिलेला नेहमीचा शब्द तुमच्याही तोंडात कधी येईल ते सांगताही येणार नाही. सोबत घसीटाराम असतो. हे पात्र सुद्धा अवलीच आहे.
जॉन आणि त्याच्यासोबत असलेले दोन सहकारी काहीतरी कुरघोडी करण्यात पटाईत असतात. ' जॉन बनेगा डॉन ' असं म्हणत तो मोटू पतलु यांना नामोहरण करण्याचा सदैव प्रयत्न करतात. पण त्यांचे फंडे त्यांच्यावरच उलटतात. त्यामुळे गंमत वाढत राहते.
या पात्रांच्या हालचाली मजेशीर असतात. ते आकाशात स्वैरपणे संचार करतात. गाडीखाली सापडले तर त्यांची चपाती होते. पण ते कदापि मरत नाहीत. अशी ही सुखांतिका असलेली बालमालिका अतिशय मनोरंजक आणि हिंदी भाषा बोलण्यास प्रवृत्त करणारी आहे. आपणांस वेळ असेल तर आपणही ही ' मोटू और पतलु की जोडी ' जरुर पाहा आणि हास्याचे फवारे उडवून आपलं रक्त शुद्ध करा.
©️ प्रवीण अशितोष कुबलसर
.jpeg)
No comments:
Post a Comment