🛑 संजय पवारसरांची पॉवर
कुरुक्षेत्रावर युद्ध सुरु झाले होते. त्यावेळी दिव्यांग धृतराष्ट्र राजाला दिव्यदृष्टी असलेला संजय कुरुक्षेत्रावरील चाललेले युद्ध सांगण्याचे महत्त्वाचे कार्य करत होता. संजयच्या अंगी असलेली ही पॉवर श्रेष्ठ म्हणायला हवी. युद्धभूमीवर नसताना तिचं जसंच्या तसं वर्णन करणं ही सोपी गोष्ट नव्हती. काही विशिष्ट व्यक्तींच्याच अंगी अशी पॉवर असते. ते त्या पॉवरचा अतिशय चांगला उपयोग करण्याचे संस्कारही त्यांच्यावर जन्मापासून झालेले असण्याची शक्यता असते.
आमच्या शेर्पे केंद्रात प्रभारी असलेले केंद्रप्रमुख संजय पवारसाहेब हे एक दूरदृष्टी असणारे केंद्रप्रमुख म्हटले तरी वावगे ठरु नये. कासार्डे आणि शेर्पे या दोन्ही केंद्रांची शैक्षणिक , प्रशासकीय गाडी चालवताना त्यांना त्यांच्या तंत्रस्नेही असण्याचा खूपच उपयोग होतो आहे. केंद्राचे कोणतेही कागद त्वरित किंवा जलदगतीने पाठविण्याचे काम त्यांच्या क्रियाशील कार्यतत्परतेमुळे होऊ शकते.
हल्लीच मला या गोष्टीचा प्रत्यक्ष अनुभव आला. आमच्या शाळेत मुख्याध्यापक सहविचार सभा होती. केंद्रस्तर सर्व्हेक्षण करण्याचा विषय सुरु होता. आमच्याशी बोलत असतानाच संजय पवारसरांनी गुगल फॉर्म्स एप्लीकेशनचा वापर करुन लिंक तयार करुन ग्रुपवर पाठवलीसुद्धा. एवढ्या वेगात लिंक तयार करणारे पहिले केंद्रप्रमुख मी बघितले. त्यामुळे मी तरी त्यांच्याजवळच्या तंत्रज्ञान विषयक ज्ञानाने भारावून गेलो आहे.
शालेय तपासणीच्या वेळीही त्यांची तपासणीची पद्धत शिस्तबद्ध असते. काय करावे ते समजून सांगताना अधिकारी म्हणून थोडं कठोर होणं हे आवश्यक असतंच. पहिल्या वेळी कठोर वाटणारे पवारसाहेब त्यांच्या जास्त सहवासात गेल्यानंतर त्यांच्यातला मृदुपणा जाणवू लागला आहे. ते सर्वांचं म्हणणं नीट ऐकून घेतात आणि मगच आपलं मार्गदर्शक मत व्यक्त करतात.
भाग्यलक्ष्मी पॅनलच्या माध्यमातून आमच्या संजय पवार साहेबांची झालेली निवड अभिनंदनीय अशीच आहे. ते या पॅनेलमध्ये आपली पॉवर नक्कीच पणाला लावतील यांत कोणतीही शंका वाटत नाही. शिक्षक बँकेच्या मागील आकडेवारीचा आढावा त्यांच्या तोंडपाठ आहे. असे अभ्यासू व्यक्तिमत्त्व प्रचंड मतांनी निवडून आणल्यास आपल्या सर्वच शिक्षक बंधु भगिनींना दीर्घकाळ फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. महाभारतातील संजयाप्रमाणे आपले संजय पवार आपली तंत्रज्ञानाची पॉवर वापरुन शिक्षक बँकेला एका अधिक संपन्न असलेल्या आर्थिक उंचीवर नेऊन ठेवतील असे म्हणायला काहीच हरकत नाही.
तसे ते माझ्यापेक्षा वयाने लहान आहेत. आम्ही कणकवली डिएड कॉलेजला असताना कणकवलीत त्यांची आणि माझी पहिली भेट झाली. कणकवली बाजारपेठेत आपल्या जीवलग दोन मित्रांसोबत फेरफटका मारताना मी त्यांना त्यावेळी अनेकदा पाहिले होते. त्यावेळचा आणि आता केंद्रप्रमुख म्हणून असलेले वेगवेगळे अनुभव आहेत. आपल्या शैक्षणिक , व्यावसायिक पात्रतेमुळे माणसं उच्चपदापर्यंत पोहोचू शकतात हे त्यांच्याकडे बघून नक्कीच शिकता यावं इतके ते मोठे आहेत.
आज त्यांच्याच संकल्पनेतून बदली झालेल्या आठ शिक्षक शिक्षिकांचा सन्मानपत्र , शाल , श्रीफळ देऊन यथोचित सन्मान करण्यात आला. निवडणुकीच्या प्रचाराच्या धामधुमीत असतानाही आपल्या शिक्षकांचा सन्मान करण्यास न विसरणाऱ्या पवार साहेबांसारख्या केंद्रप्रमुखांना म्हणूनच निवडून देणे ही आपल्या प्रत्येक शिक्षकांची जबाबदारी असायला हवी. आपण ही जबाबदारी खात्रीपूर्वक पार पाडणार आणि संजय पवार साहेबांना बँकेतील महत्त्वाच्या पदावर विराजमान करणार ही तुमच्या प्रत्येकाच्या मनातील सुप्त भावना आहे हे संजय पवार यांनीही दूरदृष्टीने पाहिले आहे असे मी आत्मविश्वासपूर्वक सांगू शकतो.
▪️ प्रवीण कुबलसर

No comments:
Post a Comment