🛑 इस्त्री आणि मी
लहानपणीपासून कपड्यांना इस्त्री करण्याची सवय लागली आहे. स्वतःचे कपडे स्वतः इस्त्री करुन घालायचे. त्यावेळी इस्त्री कुठे होती ? पितळेचा तांब्या होता. त्यात पेटते निखारे घालायचे. थोडी फुंकर मारुन निखारे फुलवायचे. तांब्याचा तळ चांगलाच तापतो. त्यासोबत धातूच्या उष्णता संक्रमणामुळे तांब्याच्या तोंडापर्यंत उष्णता जाणवे. हात चांगलेच भाजत. ते भाजू नयेत , म्हणून ' भानशिरे ' घेतले जाई. भानशिरे म्हणजे जुना कापडी सुती फडका असे. तो चुलीवरची भांडी उचलून उचलून काळाकुट्ट झालेला असे.
इस्त्री करुन सुरकुत्या घालवून शर्ट , पॅन्ट छान दिसत. शाळेचा गणवेश जुना असला तरी नवीन वाटे. शाळेत जाताना पॉश कपडे घातल्याचा अनुभव येई. इतर मुलांचे नवनवे युनिफॉर्म बघून माझे इस्त्री केलेले कपडेही फिके पडत.
इस्त्री करुन करुन कपडे कोरम होत. शर्टाची कॉलर विरघळे. पँटीचा रंग बदलून जाई. पण पँट , शर्ट दोन्ही पूर्ण फाटेपर्यंत वापरावे लागत. उसवले तर बाबा शिवून देत. फाटले तर रिपू करावा लागे. हा रिपू कसातरीच दिसे. तरीही फाटक्या कपड्यांपेक्षा रिपू केलेले कपडे वापरणे केव्हाही चांगले. आता हे फाटलेले कपडे किंवा नको तिथे ठिगळ , रिपू ही फॅशन झाली आहे.
तांब्यानंतर बाबांनी हप्त्यावर एक साधी इस्त्री घेतली. तिला विजेची आवश्यकता असे. भाड्याने राहत असल्याने मालकांच्या परवानगीने लाईट वापरावी लागे. या नवीन इस्त्रीने इस्त्री करताना मजा येई. पटापट इस्त्री करता येई. कपडे आणखी चांगले दिसत. मामांकडे आजोळी माझे मामेभाऊ कसे इस्त्री करतात ते मी नीट बघून ठेवले होते. त्या निरीक्षणाचा उपयोग झाला.
आम्ही सर्व भावंडे इस्त्री करुनच कपडे वापरत असू. आता ऑटोमॅटिक इस्त्री आहे. ती कमी जास्त करता येऊ शकते. ती हलकी व सहज करता येण्यासारखी सुलभ आहे.
इस्त्री करताना आपण इतर काहीही करत नसतो. म्हणून मी नेहमी गाणी ऐकत इस्त्री करत असतो. आता मला ती सवयच जडली आहे. इस्त्री , गाणी आणि मी असे समीकरण झाले आहे. एखाद्या वेळी मी इस्त्री करताना गाणी लावली नाही तर माझ्या मुली मला विचारतात , " पप्पा , आज गाण्याशिवाय इस्त्री करताय , कमाल आहे ? " एवढी मला सवय झाली आहे म्हणजे बघा.
इस्त्री करताना मी अनेकदा भूतकाळात जात असतो. जुनी आणि मला नेहमी आवडणारी गाणीच मी ऐकत असतो. त्या गाण्यांचीही सवय झाली आहे म्हणा ना !! ही गाणी ऐकता ऐकता मी भराभर इस्त्री करत जातो. माझ्या आठवड्याच्या कपड्यांचा ढिग पडलेला असतो.
सलग दोन तासांचा हा इस्त्रीचा कार्यक्रम गाण्यांसह सुरुच असतो. इस्त्री कपड्यांच्या सुरकुत्या घालवत असते आणि गाणी माझ्या मनावरच्या.
©️ प्रवीण अशितोष कुबलसर

.jpeg)
No comments:
Post a Comment