🛑 महेंद्र पावसकरसर : एक शैक्षणिक महा इंद्र
शिक्षणक्षेत्रात काम करणाऱ्या शिक्षकाकडे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असावे लागते. सगळ्यांकडे सगळेच गुण कसे असतील ? हे गुण प्रयत्नपूर्वक मिळवावे लागतात. कोणीही सर्वगुणसंपन्न नसतं. चांगल्या गुणांचा संचय असणारी माणसं चार चौघात उठून दिसतात. बाह्यगुण आणि आंतरिक गुण दोन्हींची पारख करुनच एखाद्याला मोठेपणा मिळत असतो. दिसणं आणि असणं या दोघांमध्ये थोडीशी जरी फारकत झाली तरी चरित्र डळमळू शकतं.
माझे मित्र महेंद्र पावसकर हे एक उपक्रमशील शिक्षक आहेत. ते साधे , सरळ आहेत. शक्यतो ते मौन पाळतात. संथ वाहणाऱ्या सागराच्या अथांग खोलीचा अंदाज येत नसतो. महेंद्र पावसकर सरांचं ज्ञान हे अथांग सागरासारखं आहे. ते मार्गदर्शन करु लागले कि त्यांच्या ज्ञानाचा प्रत्यय येतो. ते उठसूट बोलत सुटत नाहीत. मोजकेच पण मुद्देसूद बोलण्याची त्यांची पद्धत आहे. त्यांचं बाह्य व्यक्तिमत्त्व आकर्षक आहेच हे कोणीही सांगेल.
ते कलेचे वेडे आहेत. ते कृतीशील शिक्षक म्हणून ओळखले जातात. ' आधी केले , मग सांगितले " ही उक्ती त्यांना बरोबर लागू पडते. त्यांच्याकडे टाकाऊ साहित्य द्या , ते त्यापासून टिकाऊ आकर्षक उपयोगी साहित्य खूप कमी वेळात बनवून दाखवतील. ही चित्र , शिल्प प्रथम त्यांच्या मनात येतात , मगच ती प्रत्यक्षात अवतरतात. त्यांच्या मुलाला त्यांनी हेच कलेचं बाळकडू पाजलं आहे. त्यांचा मुलगा त्यांच्याहीपेक्षा वरचढ बनला आहे. बाप से बेटा सवाई म्हणतात ना !!! अगदी तस्साच.
बाहुली नाट्य सादर करणं म्हणजे महेंद्र सरांच्या हातचा मळ आहे. एकदा फणसगाव बीटस्तरीय शिक्षक संमेलनात त्यांचा हा आविष्कार मला प्रत्यक्ष पाहायला मिळाला. बाहुल्या नाचवत बोलणं ही सोपी गोष्ट नसते. महेंद्र सरांनी त्याचं शास्त्रीय प्रशिक्षण घेतलं आहे.
महेंद्र पावसकरसर यांची भाग्यलक्ष्मी सहकार पॅनलमध्ये जिल्हा उमेदवार म्हणून झालेली निवड अतिशय योग्य आहे. आपल्याला दिलेलं कार्य इमाने इतबारे करताना मी त्यांना कित्येक वर्षे पाहात आलेलो आहे. कार्य तडीस कसं न्यायचं हे त्यांच्याकडून शिकावं. स्वतः कोणतेही टेन्शन न घेता आणि दुसऱ्यांनाही टेन्शन न देता कार्य सिद्धीस नेणं त्यांना लिलया जमतं. सतत काम करत राहणं हा त्यांचा खाक्या आहे.
महेंद्र पावसकर सरांसारखे उच्च विद्याविभूषित पदव्युत्तर पदवी मिळवलेले शिक्षक जर शिक्षक बँकेत निवडून येतील तर बँकेला त्याचा फायदाच होणार आहे. त्यांच्या संकल्पना अफलातून असतात. त्यांनी विविध शाळेत केलेल्या अभिनव कार्याचा दृष्टिकोन ते बँकेसाठी नक्कीच वापरतील याची खात्री आहे. त्यांना अनेक उत्तम सन्मान , पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्यांची यादीही भलीमोठी आहे. ते स्वतः प्रसिद्धीपासून थोडे दूरच असतात. स्वतःबद्दल ते मोठेपणाचा टेंभा कधीच मिरवताना दिसलेले नाहीत.
अशा या अभ्यासू आणि नवोपक्रमशील शिक्षकाला त्यांच्या नावाप्रमाणेच आपण महा इंद्र बनवाल आणि मतांचा पाऊस पाडाल अशी मोठी अपेक्षा करतो.
©️ प्रवीण अशितोष कुबलसर

No comments:
Post a Comment