Wednesday, May 10, 2023

🛑 विजय सावंतांचा विजय होणारच

🛑 विजय सावंतांचा विजय होणारच

          ज्यांच्या नावातच विजय आहे , ते विजयी होणार यात कोणालाही शंका असायला नको. या माणसाचा ज्यावेळी जन्म झाला असेल त्यावेळी त्यांच्या माता पित्यांनाही किती आनंद झाला असेल ? त्यांच्या जीवनात नव्या बालकाने पदार्पण केलं आणि खऱ्या अर्थाने त्यांच्या मनातील इच्छेचाच विजय झाला होता. असा गोड गोंडस बाळ जन्माला आल्यावर हा पुढे कायमच विजयी ठरावा म्हणून त्याचे नाव विजय ठेवण्यात आलं असावं. 

          कुडाळ तालुक्यातील पदवीधर शिक्षक विजय सावंतांबद्दल मी बोलतोय. एक प्रचंड विजयी मुद्रेचं व्यक्तिमत्त्व मला मित्र म्हणून लाभलं म्हणून मीही भाग्यवानच. 

          एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व म्हणजे विजय सावंत. शिक्षक हा शीलवान , क्षमाशील आणि कलाकार असावा लागतो. हे तिन्ही गुण विजय सरांमध्ये ओतप्रोत भरलेले आहेत. त्यांचं प्रेमळ हास्य आणि आपुलकीचे शब्द समोरच्या माणसाला मित्र करुन जातात. मित्राने कसं असावं ह्याचं मूर्तीमंत उदाहरण म्हणजे विजय सावंत. 

          भाग्यलक्ष्मी सहकार पॅनलच्या कुडाळ तालुक्यातील उमेदवार म्हणून विजय सावंत सरांची निवड ही अपेक्षितच होती. त्यांनी केलेला मनुष्य संग्रह त्यांना यावेळी नक्कीच उपयोगी पडणार आहे. काहीतरी मिळावं म्हणून तात्पुरता हा मनुष्यसंग्रह नसून तो कायमचा आहे हेही सर्वांनी लक्षात घ्यायला हवे. विजय सावंत सर हे तळागाळापर्यंत जाऊन काम करणारे शिक्षक आहेत. विजय सर अन्यायाला वाचा फोडणारे आणि न्यायाची विजयश्री खेचून आणणारे आहेत हे सर्वश्रुत आहे. त्यामुळे त्यांचा विजय हा 100 टक्के निश्चित आहे. 

          हे विजय सर माझे खास मित्र आहेत. त्यामुळे त्यांच्याबद्दल मी लिहू शकतो आहे. यांचा आणि माझा परिचय देवगड तालुक्यात झाला. देवगड तालुका स्कुलमध्ये महिन्याच्या पगाराच्या वेळी अनेकदा आम्ही एकत्र आलो होतो. ओळख वाढत गेली आणि स्नेह वाढत गेला. त्यावेळी माझी गाडी नव्हती. विजय सावंत सरांनी मला बऱ्याचदा माझ्या मुक्कामी सोडले आहे. ' जाता जाता भलं करावं ' अश्या विचारसरणीचे ते आहेत. त्यांनी देवगड तालुक्यात कुवळे शाळेत असताना अनेक विद्यार्थीकेंद्रित उपक्रम राबवले होते. संगीत हा त्यांचा अतिशय आवडीचा विषय आहे. संवादिनीवर त्यांची फिरणारी बोटं पाहिली कि त्याचा अंदाज येतो. त्यांचा स्वतःचा आवाजही कर्णमधुर आहे. त्यांच्या भजनात बसाल , तर भजन संपू नये असं वाटत राहील. त्यांना आपल्या या गुणांचा अजिबात गर्व नाही , अभिमान मात्र नक्कीच आहे. 

          कित्येक प्रशिक्षणांचे मास्टर ट्रेनर म्हणून अतिशय उत्साहाने काम करताना आम्ही त्यांना अनेकदा पाहिले आहे आणि अनुभवलेदेखील आहे. ते तत्त्ववादी आहेत. जे करायचे असते ते हमखास करणारच. त्यात आपला जीव ओतून काम करतील. तहानभूक विसरुन काम करण्याची त्यांची ही क्षमता ते शिक्षक बँकेच्या विकासासाठी नक्कीच वापरतील. आपल्या भाग्यलक्ष्मी सहकार पॅनेलच्या तत्त्वांशी प्रामाणिक राहून कार्य करणारा संचालक कुडाळ तालुक्यात प्रचंड बहुमतांनी निवडून येणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे. जे व्हायचे आहे ते होणारच. त्याला कोणीही विरोधकांनी विरोध करायचा म्हणून केला तरीही कोणताही फरक पडणार नाही. उलट फायदाच होईल. 

          विजय सावंतसर आणि मी एकदा शिरगाव हायस्कुलमध्ये 4 थी इंग्रजीचे मास्टर ट्रेनर म्हणून एका वर्गावर होतो. त्यावेळी त्यांची आणि माझी जास्त जवळीक झाली. त्यांच्या वक्तृत्वाने मी खरंच प्रभावित झालो. त्यांनी आपल्या अनुभवातून केलेलं विवेचन मी लक्षात ठेवलं आहे. त्यांची बोलण्याची शैली श्रोत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवते. मलाही त्यांचा सुवास आणि सहवास लागला आणि मी घडत गेलो. त्यांना असलेली गाण्याची जाण त्यांच्या गायनाने समजते. 

          त्यांच्या शिक्षक मित्रमंडळाच्या माध्यमातून कुडाळ शिक्षक कलामंच नावाची सांस्कृतिक संस्था कदाचित त्यांच्याच सुपिक डोक्यातून आली असावी असे माझे स्पष्ट मत आहे. कोरोना काळात त्यांनी केलेले सादरीकरण यु ट्यूबवरुन पाहताना मला माझ्या या मित्राबद्दलचा  अभिमान सदासर्वदा वाढवत जात होता. विजय सरांच्या शाळेचा संघ असेल तर क्रीडास्पर्धेत त्यांच्याबरोबर स्पर्धा करणं सोपी गोष्ट नसते. पूर्ण तयारीनिशी विजय सर स्पर्धेत उतरत असतात. यावेळीही विजय सावंतसर पूर्ण तयारीनिशी प्राथमिक शिक्षक बँकेच्या निवडणुक रिंगणात उतरले आहेत. त्यांनी खेचून आणलेली विजयश्री मला आताच समोर दिसू लागली आहे. विजय सर म्हणजे कुडाळ तालुक्याला लाभलेला एकमेव विजयाचा चेहरा आहे. माझ्या या खास मित्राला कुडाळ तालुक्यातील आपण शिक्षक बंधु भगिनी मिळून  सर्वांनी प्रचंड बहुमतांनी विजयी करणार आहात म्हणून आधीच मी आपले शतशः आभार मानतो. 

©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 )



No comments:

Post a Comment

💖 भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये एक अविस्मरणीय सायंकाळ 💖

 💖 भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये एक अविस्मरणीय सायंकाळ 💖           कणकवली येथील भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये कीर्तन महोत्सवाच्या निमित्...