Friday, May 12, 2023

🛑 आदर्श स्काऊट मास्टर : सीताराम लांबरसर

🛑 आदर्श स्काऊट मास्टर : सीताराम लांबरसर 

          काही निवडक शिक्षक शैक्षणिक प्रक्रिया राबवित असताना विविध उपक्रम राबवत असतात. हे उपक्रम राबवून ते थांबत नाहीत. त्यांना अधिक आणि वैशिष्टपूर्ण उपक्रमांची धडपड स्वस्थ बसू देत नाही. 

          सीताराम लांबर सर हे अनेक शिक्षकांमधून वेगळे असे त्यासाठीच ठरतात. स्काऊट नावाची चळवळ ते चालवतात. स्काऊटचे नऊ नियम ते काटेकोरपणे पाळतात , नव्हे ते नियम त्यांच्या अंगी भिनले आहेत म्हणा ना !!!

          हे मी आत्मविश्वासपूर्वक का सांगू शकतो ? कारण मी आणि सीताराम लांबरसर मालवण तळगाव येथे निवासी स्काऊट मास्टरचे प्रशिक्षण सलग सात दिवस केले आहे. एकत्र राहिल्यामुळे त्यांच्यासोबत काही महत्त्वाच्या आठवणी अजूनही ताज्या आहेत. ते आमच्या पथकात नव्हते , तरी दिवसभरातील विविध क्रियाकलापांमध्ये त्यांचा असलेला सक्रिय सहभाग डोळ्यासमोर येऊन जातो आहे. 

          रात्री होणाऱ्या ' कॅम्प फायर ' मध्ये त्यांनी मोठया आवाजात दिलेल्या आणि स्वनिर्मित आरोळ्या सर्वांचेच लक्ष वेधून घेणाऱ्या ठरल्या होत्या. नवोपक्रमशील शिक्षक म्हणून त्यांनी अनेक उपक्रम राबवले आहेत , कदाचित या सर्वांचे लिखित स्वरुप त्यांच्याकडून करायचे राहून गेले असेल. 

          लांबरसर ज्या शाळेत जातात , त्या शाळेचा चेहरा मोहरा बदलून टाकतात. त्यांनी आतापर्यंत काम केलेल्या शाळेतील बालक आणि पालक याचे समर्पक उत्तर देऊ शकतात. त्यांनी सर्व शाळांमध्ये धडपड्या शिक्षकांसारखं कार्य केलेलं आहे. 

          लांबरसरांच्या माता पित्यांना त्यांचा रास्त अभिमान असायलाच हवा. त्यामुळे त्यांचं नावच त्यांनी सीताराम ठेवलं असावं.  त्यांच्या नावात सीता आणि राम या दोन्ही उभयतांचं अस्तित्व प्रत्येकवेळी जाणवत राहतं. एकवचनी , एकपत्नी आणि एकबाणी असलेला राम म्हणूनच आपल्या जास्त लक्षात राहतो. पतिव्रतेचं महान पावित्र्य जपणाऱ्या सीतेचं म्हणूनच आपण नित्य स्मरण करतो. या दोहोंच्या नावापासून बनलेल्या नावात आणि ते धारण करणाऱ्या व्यक्तीत देखील नक्कीच त्यांच्या दैवी गुणांचा अंश असण्याची शक्यता नाकारता येणार नाही. 

          नेरुर माड्याचीवाडी माध्यमिक विद्यालयात एक दिवसीय ' भगीरथ प्रतिष्ठान ' चे शिक्षक प्रशिक्षण होते. त्यावेळी वेंगुर्ले तालुक्याचे प्रतिनिधी म्हणून अतिशय मुद्देसूद असे मनोगत व्यक्त करणारे सीताराम लांबर सर म्हणूनच माझ्या जास्त लक्षात राहिले आहेत. ते अग्रकर्मी आहेत. कोणीतरी उठून उभे राहून बोलतील असा विचार न करता झटकन व्यासपीठाकडे हसतमुखाने जात विचार व्यक्त करणारी माणसं सहसा दुर्मिळ असतात. सीताराम लांबरसर त्या दुर्मिळ व्यक्तींपैकी एक आहेत. 

          भाग्यलक्ष्मी सहकार पॅनलचे ते सीताराम आहेत. ते वेंगुर्ल्याच्या पतपेढीच्या सिंहासनावर विराजमान होतील याची शंका बाळगण्याचे कारण नाही. शिक्षक मतदार बंधु आणि भगिनींनो , आपल्या सीताराम लांबरसरांना प्रचंड बहुमतांनी निवडून द्यायचे हे मात्र फक्त तुमच्या आणि तुमच्याच हातात आहे. मग 14 तारखेला होणाऱ्या मतदानाचा तुमचा  हक्क तुम्ही नक्कीच वापरा ही भाग्यलक्ष्मी सहकार पॅनेलची आपणांस कळकळीची विनंती आहे. 

©️ प्रवीण अशितोष कुबलसर , कणकवली



No comments:

Post a Comment

💖 भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये एक अविस्मरणीय सायंकाळ 💖

 💖 भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये एक अविस्मरणीय सायंकाळ 💖           कणकवली येथील भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये कीर्तन महोत्सवाच्या निमित्...