🛑 4 मे ची भीषण काळरात्र
दरवर्षी हा 4 मे येतो. गेली 16 वर्षे हा दिवस येताना मी मात्र जुन्या काळात जातोच जातो. कितीही कोणीही समजावून सांगितले तरी माझ्यात कोणताच फरक पडत नाही.
जगातील सगळ्या माणसांचं असंच होत असेल का ? मला माहित नाही. पण मला नाही सहन होत !!! त्या दिवसांपूर्वीचे दोन्ही संघर्षमय दिवस आठवून अंगाला कापरे भरतेच. रात्र रात्र पुन्हा तेच ते भयानक क्षण आठवत राहतात.
ती भयाण काळरात्र जशीच्या तशी आठवून तीव्र होत जात राहते. मी तिच्या जवळ बसलो आहे. तिच्यासोबत बोलत आहे. हातात हात घेतला आहे. तिच्याशी गप्पा मारण्याचा प्रयत्न करतो आहे. तीही मग मी आनंदी दिसावं म्हणून तशीच करते आहे. मनातून दोघेही दुःखी असताना आनंदाचं नाटक करताना किती भीषण अनुभवत होतो मी.
दोन दिवसांपूर्वी तिच्या पदरातून नव्हे उदरातून गोंडस बाळाचं हिरावून नेणं ती कशी विसरु शकणार होती. शरीराला होत असलेल्या वेदना तिला कमी वाटत असाव्यात. मनाच्या वेदना मात्र तिच्या डोळ्यांतून घळाघळा पाणी आणत होत्या. मी मात्र रडायला विसरु पाहत होतो. तिच्यासमोर न रडता तिच्या अपरोक्ष जेवढं जमेल तेवढं रड रड रडत होतो.
ती मला सांभाळू पाहात होती आणि मी तिला. तिने मला बऱ्यापैकी सावरले होते. मीच तिला सावरण्यात कुठे कमी पडलो की काय देव जाणे ?
रिकामं झालेलं शिवलेलं पोट तिला जणू नकोसं झालेलं. झालेला मुलगा आम्ही तिला बघूही दिला नव्हता हा मात्र आमचा सर्वात मोठा दोष असावा. तिला गतप्राण झालेला मुलगा आम्ही तरी कसा काय दाखवू शकणार होतो ? बोलण्याइतकी ती सोपी गोष्ट नक्कीच नव्हती. अर्थात मुलाला तसं दाखवल्यानंतर तिला मोठा मानसिक धक्का बसेल असे आम्हाला वाटले. भुलीतून बाहेर आल्यानंतर तिचे सत्य समजले तेव्हा तिला ते बिल्कुल मान्यच नव्हते. तिचे डोळे पाण्याने इतके भरुन गेले होते कि पाणी थांबता थांबत नव्हते.
मी एकांतात तिला अनेक पद्धतीने समजावून सांगण्याचा प्रयत्न केला होता. मला अजून दुःख होऊ नये म्हणून तिने तिला झालेलं दुःखही गिळून टाकण्याचा प्रयत्न करुन पाहिला होता. शारीरिक वेदना आणि मानसिक वेदना या दोघांची बेरीज झाली होती. तिचे शरीर आणि मन दोन्ही तिला साथ देईनासे झाले होते.
एक दोन तासांनी नर्स येत आणि एखादे मोठे इंजेक्शन देऊन निघून जात. ते घेत असताना तिला दुखत असल्याचा लवलेश तिच्या चेहऱ्यावर दिसत नसे. आज मात्र इंजेक्शन दुखत असल्याचे मलाही जाणवले. तिला दरदरून घामही फुटला होता. मी तिचा घाम रुमालाने पुसण्याचा प्रयत्न करेपर्यंत तिचे डोळे पांढरे झाले होते. दातखिळी बसली होती.
परिस्थिती चिंताजनक असल्याचे समजताच डॉक्टर आले. त्यांनी आपल्या परीने तिला वाचवण्याचे शेवटचे प्रयत्न करताना मी प्रत्यक्ष पाहत होतो. मी मोठ्याने ओरडण्याशिवाय काहीही करु शकत नव्हतो.
तिचा हात माझ्या हातातून सुटला होता कायमचा. ती भीषण काळरात्र मी कधीही न विसरण्यासारखी आहे. माणसं जिवंत नसली तरी त्यांच्या सोबतच्या आठवणी मात्र जिवंत होऊन अशी पाठ धरतात. माझ्या कै. पत्नीला ( ऐश्वर्याला ) भावपूर्ण आदरांजली. ती गेली आणि तिनेच मला ईश्वरी आणून दिली आहे अशी माझी भावना आहे. इतकी वर्षे तिच्यात मी तिलाच बघतो आहे. त्यामुळे ऐश्वर्या आणि ईश्वरी दोघांच्या नावातही मी बरंच साम्य आणण्याचा प्रयत्न केला आहे.
©️ प्रवीण अशितोष कुबल

No comments:
Post a Comment