🛑 निवडणुकीची ऋतुजा
प्राथमिक शिक्षक बँकेच्या निवडणुकीचा ऋतु सुरु आहे. प्रचाराची रणधुमाळी सुरु असताना ' भाग्यलक्ष्मी सहकार पॅनल ' ने प्रचाराचा धुमधडाका आरंभलेला आहे.
वारगाव नं. १ शाळेच्या पदवीधर शिक्षिका आणि मुख्याध्यापिका अशी दुहेरी कामगिरी बजावणाऱ्या ऋतुजा दिनेश जंगले यांची महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या कणकवली शाखेकडून जिल्हा महिला उमेदवार म्हणून अभिनंदनीय निवड झाली आहे. एका नवोपक्रमशील व्यक्तिमत्वाची निवड करुन समितीने ऋतुजा यांचा सन्मानच केला आहे.
एखादया गाण्याच्या कार्यक्रमामध्ये बझर टॅप करुन ' मौसम बदल दिया ' असे उत्साहाच्या भरात म्हणणाऱ्या परीक्षकांप्रमाणे ऋतुजा मॅडम या निवडणुकीत मौसम बदलतील असा ठाम विश्वास वाटतो. त्यांच्यासोबत उभे असलेले भाग्यलक्ष्मी सहकार पॅनलचे सर्वच उमेदवार अतिरथी महारथी आहेत. त्यांच्या महारथी असण्यामुळे ते सर्वच प्रचंड बहुमतांनी निवडून येतील याची शंभर टक्के खात्री आहे.
युद्धात लक्ष्मण मूर्च्छित पडल्यानंतर हनुमान द्रोणागिरी पर्वतावरील ' संजिवनी ' आणण्यासाठी गेला. त्याने संपूर्ण पर्वतच उचलून आणला. त्यामुळे युद्धभूमीवर सर्वच मुर्च्छितांना नवजीवन प्राप्त झाले. ' ऋतुजा जंगले ' मॅडम या आपल्या शिक्षक बॅंकेसाठी ' संजिवनी ' ठरतील अशी आशा करुया. काही नवनवीन अभिनव योजना आणून शिक्षकांना आर्थिक स्थैर्य प्राप्त करुन देतील. आपले बॅंकेविषयीचे ज्ञान वाढवून बँकेच्या सभासदांच्या हिताचा विचार करतील.
आम्ही सिंधुदुर्गात नोकरीला लागलो तेव्हा बऱ्याच शिक्षकांची देवगड तालुक्यात रवानगी झाली. विजयदुर्ग , देवगड अशी दोन बसस्थानके असलेला देवगड तालुका 1998 मध्ये दुर्गम समजला जात होता. त्यावेळी ऋतुजा जंगलेमॅडम देवगड तालुक्यात कविता बोडेकर या नावाने रुजू झाल्या. शिरगाव बीटमध्ये विविध प्रशिक्षणांर्गत ऋतुजा मॅडमांची शैक्षणिक कारकिर्द अधोरेखित होताना दिसत होती. त्यांनी केलेल्या ऱ्हाईम्स सादरीकरणात प्रभावीपणे घेतलेला सहभाग त्यांच्यातील आवाजाचे , नृत्याचे आणि सभाधीटपणाचे प्रदर्शन घडवत होता. त्यांनी भाग घेतला असेल तर आम्हाला नंबर मिळणार नाही हे ठरलेलेच असे. त्यांना त्यांच्या घरातूनच शैक्षणिक बाळकडू मिळाले आहे. त्यांच्या घरातील आणि माहेरकडील सर्वच सदस्य प्रतिभावंत आहेत.
आमचे जिवलग मित्र दिनेश जंगले यांच्याशी त्यांचा विवाह संपन्न झाला. पुन्हा फणसगाव बीटमध्ये जंगले दाम्पत्याची भेट घडली. उंडील तिठ्यावर अनेकदा दोघांची भेट घडे. माझी पत्नी ऐश्वर्या आणि ऋतुजा यांची मैत्री झाली. दोघी मैत्रीणी असल्या तरी बहिणीच जास्त वाटत.
माझ्या पत्नीचे 2007 मध्ये निधन झाल्याचे समजताच दिनेश जंगले आणि संतोष राणे ( देवगड उमेदवार ) माझ्या दुःखदप्रसंगी धावून आले होते हे मी कदापि विसरणार नाही.
त्यानंतर आता पुन्हा दोघांचीही तळेरे प्रभागात पुनश्च भेट घडते आहे. साळीस्ते आणि शेर्पे केंद्राच्या टॅग मिटींग एकत्रित व्हायला लागल्या होत्या. त्यावेळीही पुन्हा एकदा ऋतुजा मॅडमांची इंग्रजीवरील मास्टरी दिसली. त्यांच्या इंग्रजी ज्ञानाचा आम्हाला बराच फायदा झाला.
असे अभ्यासू आणि शिक्षकांबद्दल आदर बाळगणाऱ्या व्यक्तींना निवडून देणे हे प्रत्येक शिक्षक मतदाराचे परमकर्तव्य आहे. मला वाटते ऋतुजा जंगले मॅडमांच्या अभ्यासू असण्याचा फायदा बँकेला होणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे. अर्थात ऋतुजा मॅडम शिक्षक बँकेच्या या निवडणुकीत भाग्याचा ऋतू बहरुन टाकतील आणि भाग्यलक्ष्मी पॅनेलचे सर्वच उमेदवार निवडून देण्यासाठी मौसम बदलून टाकतील यासाठी आपण सर्व शिक्षक बंधु भगिनी त्यांच्या पाठीशी बहुमताने राहूया.
©️ प्रवीण अशितोष कुबल

No comments:
Post a Comment