🛑 समितीचे More ( मोअर ) संतोष
काही अशी माणसं शिक्षणक्षेत्रात आली आणि या क्षेत्राचं सोनं करुन टाकलं. शिक्षणक्षेत्रात धडाडीचं कार्य करता करता सहकार क्षेत्रात उतरुन तिथेही आपली पात्रता सिद्ध करुन दाखवली. सर्वांच्या मनात कायमच संतोष पेरण्याचं काम करणं सोपी गोष्ट कधीच नसते. पण हे व्यक्तिमत्त्व याला अपवाद ठरलं. नावातच संतोष असल्यामुळे की काय , जातील तिथे आनंदाच्या शब्दांची साखरपेरणी करत गेले.
वैभववाडी तालुक्याला संतोष मोरे सरांच्या रुपाने एक अनमोल असा हिराच सापडला आहे म्हणा ना !! संतोष मोरे हे वैभववाडी तालुक्याचं वैभव आहेत. संतोष मोरेंचा तालुका म्हणूनही तालुक्याची ओळख करुन दिली तरी चालू शकेल इतकी त्यांची घरोघर पडलेली छाप सांगते. संतोष मोरे कमी बोलतात , पण त्यांनी केलेले कार्य जास्त बोलते.
मी 31 मार्च 2012 साली वैभववाडी तालुक्यातील मांगवली नं.१ शाळेत पदवीधर शिक्षक म्हणून हजर झालो. काही कामानिमित्त भुईबावडा येथे जाणे झाले. तेथे संतोष मोरे सरांची पहिली भेट झाली. त्यांचं दाढीतून हसणं नेहमीच मला भावतं. त्यांच्या प्रेमळ शब्दांनी लगेचच माझं मित्रत्वाचं नातं जोडलं गेलं. असे करत करत त्यांनी अनेक शिक्षक बंधु भगिनी जोडले. शिक्षकच नव्हे तर शिक्षकेतर बांधव देखील त्यांना ओळखतात. एक विद्यार्थी पालकप्रिय शिक्षक म्हणून त्यांनी आपली ओळख सर्वदूर पोहोचवली आहे. त्यांची वेगळी प्रसिद्धी करण्याची अजिबात गरज नाही. त्यांच्या आगळ्या वेगळ्या व्यक्तित्वामुळे त्यांची सुप्रसिद्धीच झाली आहे. वैभववाडी तालुक्याचे शिक्षक समितीचे तालुकाध्यक्ष असताना मी त्यांना अगदी जवळून अनुभवले आहे. त्यांनी आपल्या वेगळ्या शैलीतून शिक्षकांना एकत्र केले आहे. त्यांचे मित्रच जास्त आहेत. शक्यतो मोरे सर एकटे कमीवेळा दिसतील , पण शिक्षकांच्या गराड्यात जास्त दिसतील.
मला शिक्षक बँकेचे कर्ज काढायचे होते. मला दोन जामीन तारण शिक्षकांची नितांत गरज होती. मी वैभववाडीत नवीनच होतो. शाळेतील दोन्ही जामीन मिळणे कठीण झाले होते. प्रत्येकाने आपले त्रिकुट बनवून ठेवले होते. तरीही एक जामीन शाळेतूनच मिळाले. दुसरे जामीन कोण ? हा माझ्यासमोर प्रश्न होता. हा माझा प्रश्न मी न सांगताच त्यांच्यापर्यंत कसा पोहोचला मला माहिती नाही. उलट मोरे सरांनीच मला फोन करुन जामीन व्यक्तीचे नाव सांगितले. ते म्हणाले , " कुबलसर , तुम्ही फक्त प्रिती जाधव मॅडमांकडे जा आणि सही घ्या. माझे नाव सांगा , तुम्हाला सही मिळणार. " आणि खरेच तसेच घडले. हेत केंद्रशाळेत मला अनोळखी असलेल्या प्रिती जाधव मॅडम यांनी जामीन म्हणून सही दिलीसुद्धा. वैभववाडी तालुक्यातून बदली होईपर्यंत मला जामीन बदलण्याची वेळच आली नाही. संतोष मोरे सरांमुळे मला मिळालेली तातडीची सही मी कधीही विसरु शकणार नाही.
मी समितीमध्ये अधिक सक्रिय होण्यासाठी वैभववाडी तालुक्यामध्येच खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. तिथे माझ्याकडे कोणतेही पद नव्हते , तरीही मोरे सर सांगतील तिथे मी जात होतो.
मोरे सरांच्या घरी सात वर्षांत वैयक्तिक कार्यक्रमांना अनेकदा गेलो असेन. त्यामुळे त्यांच्याशी घरोब्याचे संबंध प्रस्थापित होत गेले. माझ्यासारखे अनेक शिक्षक बंधु भगिनी असेच त्यांच्याशी कायमस्वरुपी जोडले गेले आहेत. पुन्हा कणकवलीत आल्यानंतर आता जाणे होत नाही. तरीही त्यांच्यासोबतच्या आठवणी आजही ताज्या आहेत.
माझ्या कणकवलीतील आर्यादुर्गा येथील खोलीच्या गृहप्रवेश प्रसंगी संतोष मोरेसर आपल्या टीमसह आले होते. समिती संघटना वाढीसाठी मोरे सरांनी मोअर प्रयत्न केले आहेत , अजूनही करत आहेतच.
भाग्यलक्ष्मी पॅनलचे वैभववाडी तालुक्याचे उमेदवार म्हणून प्रचंड बहुमतांनी निवडून येणार हे सर्वांच्या मनात आधीच ठरलेले आहे. तरीही ते माझे लाडके शिक्षकनेते म्हणून मीही आवाहन करतो. आपण सर्व वैभववाडी तालुक्यातील शिक्षक बंधु भगिनींनो , आपल्या धडाडीच्या शिक्षक नेत्याला बहुसंख्य मतांनी निवडून आणा आणि वैभववाडी शिक्षक बँकेच्या तख्तावर पुनश्च विराजमान करा.
©️ प्रवीण अशितोष कुबलसर

No comments:
Post a Comment