🛑 मॉर्निंग वॉक : एक आल्हाददायक अनुभव
हल्ली ' मॉर्निंग वॉक ' ला जाण्याचे प्रमाण पुन्हा सुरु झाले आहे. ती एक काळाची गरज आहे. चालणे हा सर्वांत चांगला व्यायाम प्रकार आहे. चालल्यामुळे तुमचे अनेक ताणतणाव कमी होऊ शकतात.
अनेकजण कित्येक वर्षे ' पहाट चालणं ' करण्यासाठी बाहेर पडलेली मी प्रत्यक्ष बघितली आहेत. पूर्वी सकाळी शाळा असे , त्यावेळी आपोआप सकाळचे चालणे होऊन जाई. आता काही शाळांच्या वेळा बदलल्या आहेत , त्यामुळे ' प्रातःकालची चाल ' बंद पडली आहे. लोकांनी उशिरापर्यंत झोपण्याच्या सवयी बदलायला हव्यात. तर सकाळी चालायला जाण्यासाठी लवकर जाग येईल. रात्री उशिरापर्यंत हॉरर सिरीयल बघत बसतात. त्याचा प्रभाव झोपेतही राहतो. झोप झाल्यासारखे वाटत नाही. मग सकाळी उशिराच गाढ झोप लागते. अर्थात आज नको उठुया , उद्या उठून ' प्रातःकाल चाल ' सुरु करण्याचा संकल्प करत राहतील आणि तो पूर्णही होणार नाही कधीच.
' लवकर निजे , लवकर उठे
' तया आरोग्य , संपत्ती , ज्ञान भेटे '
हे सुवचन म्हणूनच अगदी योग्य आहे. लवकर उठावे , मस्त प्रफुल्लोत्तेजन करावे. ताण कुठल्या कुठे निघून जाईल पहा. आज , उद्या , परवा करण्याच्या भानगडीत पडू नका. आज आता ताबडतोब सुरुवात करणं कधीही उत्तमच. मीही या सुट्टीत अनेकदा मॉर्निंग वॉकचा अनुभव घेतला आहे. हा अनुभव खरंच घेतल्याशिवाय समजणार नाही. त्यासाठी दररोज थोडं चालण्यासाठी घराबाहेर पडाच.
दिवसाची चांगली सुरुवात अशी करुन पहा. कित्ती मस्त वाटेल तुम्हाला. दिवस आनंदात जाईल. शरीर आणि मन दोन्ही प्रफुल्लित होऊन जातील. तुम्ही कायम तंदुरुस्त राहण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे.
त्यासाठी कोणत्याही मोठया पूर्वतयारीची अजिबात गरज नाही. साधे सैल कपडे घालून निघा. हलके शूज असले तर आणखी उत्तम. चालताना तुम्हाला अवघड वाटता कामा नये. बाजाराला जाताना तुमच्या हातात एखादी पिशवी असते , इथे ती नसते. मोबाईल नसला तर तुमचे चालण्याकडे अधिक लक्ष राहू शकेल. नाहीतर प्रत्येक नोटिफिकेशन तुमची चाल मंदावत राहील. याला काय अर्थ आहे ? तुम्ही चालायला गेलात ना ? मग तेवढीच गोष्ट मनापासून करा. काही लोक कानात इअरफोन घालून एका हातात मोबाईल घेऊन चालताना मी बघितले आहेत. त्यामुळे त्यांचे चालणे हा एक उपचार ठरतो. त्याचे हवे तसे फिलिंग येत नाही. काही लोक बोलत बोलत चालत असतात. त्यांचे चालणे थांबेल , पण बोलणे थांबत नाही. काही लोक एखादा व्हिडीओ पाहत पाहत चालत असतात. भीती वाटते अश्यांची. चुकून खड्ड्यात पडले तर ? पडताना अशी माणसे आधी आपला मोबाईल वाचवतील , मग स्वतःला.
मॉर्निंग वॉकसाठी कमी वाहतुकीचा रस्ता निवडावा. असा रस्ता आता दुर्मिळ झाला आहे. दोन्ही बाजूंना झाडे असल्यास चालताना मजा येते. जाताना खूप काही पाहायला आणि ऐकायला मिळते. पक्ष्यांचे आवाज ऐकत जावे. निसर्गाच्या सहवास घेत घेत पुढे पुढे चालत राहावे. थोडे ट्रेकिंग करावे. घामाघूम होऊन जावे. घाम हलकेच पुसून टाकावा. एखाद्या शांत ठिकाणी शांत बसून निसर्गातील विविध आवाज ऐकावेत. डोळे बंद करुन जगापासून वेगळे होण्याचा प्रयत्न करावा.
वाटेतील झाडांशी ओळख करावी. त्यांच्याकडे प्रेमाने पाहावे. दुसऱ्या दिवशी ती तुमची वाट पाहताना दिसतील. तुम्ही जवळ जाताच तुमच्यासाठी ती डोलताना दिसतील. ती झाडे सजीव आहेत , ती तुम्हाला नक्कीच प्रतिसाद देतात. फक्त ते निरीक्षण करता आले पाहिजे.
रानकोंबडी अगदी तुमच्या जवळून जातील. पळसाची फुले , प्राजक्ताची फुले थेट तुमच्या पायावर पडतील. निसर्ग तुमचे स्वागत करायला सुरुवात करेल. कुठूनतरी एखादी कोकिळा तुमच्यासाठी गाणे गात असेल. गोठ्यातील गाई , गुरे हंबरत असतात. दूध काढताना चरवीचा येणारा आवाज , शेणामुताचा आरोग्यदायक वास , पिकलेल्या आंब्यांचा सडा हे सगळं एका मॉर्निंग वॉक मध्ये अनुभवायला मिळतं. वाटेत मित्र भेटतात. ते गुड मॉर्निंग करतात. मोकळी स्वच्छ जागा दिसली की तिथेच बसून राहावेसे वाटते. आपण मध्येच आणि आपल्या चारी बाजूंना निसर्ग. किती मस्त वाटतं !! मग तिथे बसून थोडी योगासने करावीत. शरीराबरोबर मनाचाही भार हलका करावा. शरीरातील दुखणाऱ्या इंद्रियांकडे पहावे. त्यांच्यावर आलेला ताण शिथिल करावा.
हे करुन आल्यावर मस्त थंड पाण्याची आंघोळ करावी. मंत्र म्हणत देवाला नमस्कार करावा. हे सगळे दररोज करता आले तर छानच. नाहीतर एकदिवसाआड जमते काय बघा. मलाही हे नित्य करता येते का बघतो.
©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 ) कणकवली

No comments:
Post a Comment