🛑 ताटारो
माणसं जशी माणसांवर प्रेम करतात , तशी वस्तूंवर प्रेम करतात. सतत वापरावयाच्या वस्तू आपल्या प्रिय होऊन जातात. त्यावर आपला जणू जीवच जडत असावा. ती वस्तू दिसली नाही तर त्यांच्या जीवाचा आटापिटा होईल. एवढे प्रेम कुठून येते ? निर्जीव वस्तूत जीव अडकवून आपण आपलं समाधान करुन घेत असतो का ?
गृहिणीचा जीव स्वयंपाकघरात असलेल्या भांड्यांवर असतो. कारभाऱ्याचा जीव घरातल्या इतर निर्जीव वस्तूंवर असतो. मग हळूहळू त्यांचा जीव जमिनीवर , घरावर आणि घरातल्या डेडस्टॉकवर कधी जडू लागतो ते त्यांनाच कळत नाही.
आमच्या लहानपणी शाळेत जाणारी आम्ही पाचजणं होतो. त्यामुळे आम्हाला प्रत्येकाला छत्री हवी असे. पावसाळा आला की छत्री किंवा रेनकोटसाठी आमच्या मागण्या वाढत असत. एका छत्रीत दोन दोन भावंडे शाळेत जाताना मजा येई. दोघांच्याही एक एक बाह्या भिजून जात. शाळेपासून जवळ खोली असली तर एवढा त्रास होत नसे. त्यावेळी आम्हांला तो त्रासच वाटत नसे. आता बारीकसारीक गोष्टीत त्रास का जाणवतो हा सुद्धा सतत भेडसावणारा प्रश्नच आहे. त्यावेळीच्या त्रासाचा बाऊ होत नसे. आता मात्र जरा त्रास झाला की आकांडतांडव होऊ लागते.
छत्र्यांवर नावे लिहिण्याचे काम मी करायचो. शाळेतून आलो की कोणाच्या छत्र्या आल्यात का बघायचो. त्यावेळी छत्रीवर नाव लिहून दिले की एक किंवा दोन किंवा जास्तीत जास्त पाच रुपये मिळत. हे पैसे आम्हाला वह्या घेण्यासाठी उपयोगी पडत. आमच्या सलूनमध्ये येणारी आमची गिऱ्हाईके चांगली होती. मला पैसे मिळावेत म्हणून ती आपल्या जुन्या छत्र्यांवरदेखील नावे लिहून घेत. मला दिवसाला शाळा करुन चौदा पंधरा रुपये मिळत.
माझे अक्षर पाहून लोक मला शाबासकी देत. त्यांचा प्रेमाचा दृष्टीक्षेप आम्हाला प्रेरणा देत राही. आम्ही त्यांच्यामुळे घडलो हे सांगताना मला आणखीच अभिमान वाटत आहे.
दरवर्षी आम्हांला नव्या छत्र्या मिळण्याची शक्यता असे. एखादी चांगली छत्री दोन वर्षे वापरुनही बाद होत नसे. कदाचित त्यावेळच्या छत्र्या मजबूत असाव्यात. मला रंगीबेरंगी छत्री आवडे. पण ती लेडीजने वापरायची असते असे सांगण्यात येई. त्यामुळे आमची छत्री नेहमी काळी आणि काळीच असे.
पूर्वी इंग्रजी जे आकाराच्या दांड्याच्या छत्र्या टिकाऊ असत. त्या सुद्धा आम्ही वापरत असू. एकावेळी तीन व्यक्तीसुद्धा त्यात सहज मावत. धोतरवाल्या आजोबांच्या हातात ही छत्री कायमची असे. अजूनही बाजारात अशा छत्र्या मिळतात. सध्या अशा छत्र्या वापरणाऱ्यांचे प्रमाण बरेच कमी झालेले आहे.
आमच्या घरात त्यावेळी अशा दोन छत्र्या होत्या. एक आईसाठी आणि एक बाबांसाठी. आईची छत्री जास्त वापरली जात नसे. त्यामुळे तिचे आयुष्य वाढत राही. पाच पेक्षा जास्त वर्षे एकच एक छत्री आईने वापरली असेल.
बाबांना त्यांची छत्री परमप्रिय होती. ते ती कोणालाही देत नसत. त्या छत्रीचा खूपच वापर होत असे. त्यामुळे ती वापरुन वापरुन जीर्ण झाली होती. डॉक्टर उपचार करुन किंवा प्रथमोपचार करुन बाबा ती नेहमी ठिकठाक करुन वापरत असत. कितीही काहीही केले तरी ती जुनी ती जुनीच असे. तिच्यावर बाबांचे निरतिशय प्रेम होते. तिला त्यांनी एक नाव ठेवले होते. त्या छत्रीला ते ' ताटारो ' असे म्हणत. या ताटाऱ्याने बाबांना नेहमी इमानेइतबारे सुके ठेवले. आता बाबांकडे बटन असलेली छत्री आहे. पण त्यांचे त्या ताटाऱ्यावरील प्रेम काही अजूनही कमी झालेले नाही.
©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 ) कणकवली

No comments:
Post a Comment