🛑 माझी जलसफर
लहानपणापासून मला पाण्याची भीती खूपच वाटत आली आहे. पाणी पितानाही अनेकदा माझ्या नाकातून आलेले होते. अर्थात मी पाणी तोंडावाटे पित होतो , पण नेहमी घाई नडायची. गडबडीत पाणी पिऊ नये हेच खरे. तोंड आकाशाच्या दिशेने उघडून त्यात पाणी भरल्यानंतर मला अनेकदा असा अनुभव आला आहे. पाणी तोंडातून घटाघटा आत पोहोचत असे. मध्येच ते नाकातून बाहेर पडताना मोठा ठसका लागे.
पाणी पिताना ही हालत होती. त्यामुळे पाण्यात सफर करताना त्याहीपेक्षा जास्त अनुभव आले होते. आम्हाला गावाकडे जाताना नदी ओलांडूनच जावे लागे.
माझा गाव किर्लोस आंबवणेवाडी. नदीच्या पल्याड आमचे मातीचे घर होते. आमचे घर शेत शिवार संपलं की पहिलंच होतं. आमची नदी पाऊस सुरु झाल्यानंतर पंधरा वीस दिवसांतच दुथडी भरुन वाहू लागते. तिच्या पाण्याचा प्रवाह गतिमान असतो. त्या प्रवाहाला तोडून पलिकडे जायचे म्हणजे एक दिव्यच होते.
अर्थात नदीकिनारी आमचा एक होडीवाला आम्हाला पलिकडे सुखरुप नेऊन सोडत असे. आम्ही त्यांना ' होडीवाले काका ' म्हणत असू. ते होडी बिनधास्त हाकत. मोठी माणसे त्यांना ' विठोबा ' नावाने प्रेमाची हाक मारत.
आम्ही पलिकडे नदीकिनारी आलो होतो. नदी वेगाने वाहत होती. मधेच एखादा लाकडाचा ओंडका जोरात वाहून जाताना दिसत होता. ती आपल्या पोटातून आणखी काय काय वाहून नेत होती तीच जाणे !! किनाऱ्यावर नदीचे पाणी जोरात आदळताना पाहून भीती वाटत होती. आम्ही त्या रौद्ररूप धारण केलेल्या नदीच्या पलिकडे जाण्याची घाई करत होतो. पाऊस थांबण्याचे नाव घेत नव्हता. डोक्यावर धरलेली छत्री चार पाच वेळा उलटी होऊन पुन्हा सरळ झाली होती.
बाबांनी आणि काकांनी मोठ्यांदा कुकारे मारायला सुरुवात केली होती. होडीवाला कुकारे ऐकून होडी घेऊन येणार होता. बाबांना आणि काकांना व्यवस्थित कुकारे घालता येत. माझ्या कुकाऱ्यांचा आवाज ऐकू येतच नव्हता.
पलीकडील झोपडीतून कसलीशी हालचाल झाली होती. ते आमचे होडीवाले काका होते. एवढया भयंकर नदीतून त्यांनी न घाबरता होडी घातली होती. पावसाचे पाणी होडीत साचले होते. काकांनी ते बाहेर काढले होते. काकांनी अतिशय कौशल्याने वल्हे मारत होडी आमच्या दिशेला हाकली होती. ते होडी प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने चढवत पुढे पुढे येत होते. नदीच्या मध्यभागी येताच होडी वाहून प्रवाहाबरोबर खालच्या दिशेने वेगात येत होती. काका पुन्हा वल्हे बदलून कधी उजवीकडे तर कधी डावीकडे वल्हे मारत लवकरच आमच्यापर्यंत येऊन पोहोचले होते.
होडी एकदम किनाऱ्यावर येऊ शकत नव्हती. त्यामुळे थोडे पाण्यात जाऊन आम्हाला होडीत बसावे लागले होते. आम्ही सर्व सात आठजण होडीत बसलो होतो. काकांनी होडी हाकायला पुन्हा सुरुवात केली होती. आमची जलसफर सुरु झाली होती. होडी पाण्यात हिंदोळे देत होती. आमची घाबरगुंडी उडाली होती. वारा थांबता थांबत नव्हता. पावसाचा जोर होताच. माझ्या भाईकाकांनी दुसऱ्या बाजूने वल्हा मारायला सुरुवात केली होती. आता पुन्हा एकदा होडी वरच्या दिशेला प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला हाकणे नेटाने सुरु झाले होते.
होडीला कुठेतरी बारीकसे छिद्र होते. त्यातून पाणी येत होते. पावसाचे पाणी होडीत येत होतेच. बाबांनी होडीतले पाणी बाहेर ओतायला सुरुवात केली होती. आता होडी प्रवाहाच्या दिशेने वेगाने वाहायला लागली होती. होडीवाले काका थोडेसे घाबरलेले दिसले. त्यांचा आत्मविश्वास कमी झालेला दिसत होता. होडी काही केल्या थांबता थांबत नव्हती. माझे काका जिवाच्या आकांताने वल्हे मारतच होते. होडी खूपच पुढे जाऊन एका झाडाच्या पाळाला जाऊन थबकली होती. आता किनारा जवळ होता. पण चारी बाजूला खोलवर पाणी होते. कोणीही होडीतून उतरु शकत नव्हते. शेवटी होडीवाले काकांनी जोरात वल्हे मारुन होडी किनाऱ्याला लावलीच. एवढया पावसातही त्यांच्या अंगातून थबाथब घाम ओथंबत होता. सर्वांचा जीव वाचल्याबद्दल आम्ही सर्वांनीच आमच्या कोसमीवाल्या महापुरुष देवाचे आभार मानले होते.
©️ प्रवीण अशितोष कुबलसर
( 9881471684 )
No comments:
Post a Comment