🛑 कबचे शंकर : यादवसर
काही माणसं एखाद्या क्षेत्रात जातात , तेव्हा त्या क्षेत्राचे सोने करतात. किंबहुना ते क्षेत्रच त्यांची वाट पाहत असावं. ते समोर आले की चैतन्याचा झरा वाहू लागतो. नाराजांवर राज करण्याचं सामर्थ्य अशा थोड्याच निवडक माणसांमध्ये असतं. त्या निवडक माणसांची याद आल्याशिवाय राहत नाही. हे शैक्षणिक दव सतत ओलं ठेवण्याचं महत्कार्य करणारे म्हणूनच दीर्घकाळ लक्षात राहतात. त्यांनी समोर यावं आणि तरतरी पेरावी असंच त्यांचं दुर्मिळ व्यक्तिमत्त्व म्हणूनच हवंहवंसं वाटत राहतं.
हिमालयाच्या निर्जन ठिकाणी असे शंकर नेहमीच साधना करुन येतात आणि त्यांच्या जटेतून अव्याहत शैक्षणिक गंगा वाहती ठेवतात. म्हणून ते नुसते शंकर नसतात तर ते सर्वांचे शंकरराव असतात.
आम्हाला सलग सात दिवस अहोरात्र ज्यांचं मार्गदर्शन लाभलं त्या शंकरराव यादव सरांविषयी मला रास्त अभिमान वाटतो. त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आमच्या सात दिवसांचं प्रशिक्षण अफलातून केलं होतं.
माझी आतापर्यंत अनेक प्रशिक्षणे झाली आहेत. प्रशिक्षणे घ्यायची असतात. ती कोणी देत नसतात. तुम्ही त्यात हिरिरीने भाग घेतलात तरच त्या प्रशिक्षणाचा तुम्ही एक भागच होऊन जाता. सात दिवस यादवसरांनी आम्हांला आमच्या घराचा विसर पडेल अशी वागणूक दिली. सर्व क्षण सुवर्णक्षण बनवले. त्यांच्या सानिध्यात राहताना भीतीही वाटली , पण त्यांच्याबद्दलचा आदर दिवसागणिक अधिकाधिक वाढत जाताना दिसला. ते म्हणजे एक चालतं बोलतं स्काऊटिंग आहेत.
यादवसर नेहमीच हसतमुख दिसत होते. नेहमी ' तैयार ' दिसत होते. त्यांनी आपल्या गुणांचा परिचय आपल्या आचरणातून आम्हाला दिला. त्यांनी आमच्यात दुसऱ्यांच्यात स्फूर्ती कशी पेरावी ते शिकवलं. त्यांची बॉडी लँग्वेज भारीच. यादव सरांसारखं एक भारदस्त व्यक्तिमत्त्व आम्हाला लाभलं हे आमचंच भाग्य म्हणायला हवं. एवढया कमी दिवसांत त्यांनी भरपूर शिकवलं. एकही गोष्ट रिपीट केली नाही. जुन्या गोष्टी नवीन करुन सांगितल्या. त्यांचे भाषेवरील प्रभुत्व आम्हांला भारावून टाकत असे. त्यांनी बोलायला सुरुवात करावी आणि आम्ही फक्त आ वासून ऐकत राहावं असंच नेहमी घडे.
अनेक प्रशिक्षणांचा अनुभव त्यांच्या गाठीशी असला तरी प्रत्येक प्रशिक्षण ते नवीन उर्मीने घेतात हे कमाल करण्यासारखं आहे. त्यांना कधी कंटाळा आल्याचे दिसले नाही. त्यांनी नाचून गायलेली आणि आमच्याकडून करुन घेतलेली कृतीगीते कायमच लक्षात राहतील. रंकाळा तलावावर बाहेरील निसर्गात गाणी नाचताना त्यांना त्यांच्या वयाचा विसर पडलेला पाहून आम्हालाही लाजायला व्हायचं. त्यांचं हसणं , लटक्या रागानं बघणं जसंच्या तसं लक्षात राहिलं आहे. त्यांच्या हाताखाली कित्येक कबमास्टर शिक्षक घडले आहेत. त्यांच्या हाताखाली शिकणं ही माझ्यासारख्या शिक्षकासाठी पर्वणीच असते.
मी शेवटच्या निरोप समारंभात बोलत होतो. मला यादव सरांची भीती वाटत होती. तरीही त्यांच्याकडे बघून उलट माझा आत्मविश्वास वाढला होता. त्यांचा तो चेहरा आताही मला दिसतोय. त्यांच्या आयुष्यात कोरोना काळात अत्यंत वाईट घटना घडली होती याचा त्यांनी शेवटपर्यंत उच्चारही केला नव्हता. त्यांच्या परमपत्नीचे कोरोना काळात स्वर्गवासी झाल्याचे ऐकले तेव्हा तर आम्हाला सगळ्यांनाच जबरदस्त धक्का बसला होता. स्वतः दुःखात असणारा हा माणूस दुसऱ्यांना हसवत होता. जीवनात अशी कर्तव्यदक्ष माणसं आहेत म्हणून हे जग उभं आहे. त्यांनी यापुढेही आमच्यासारख्या काहीतरी करु पाहणाऱ्या शिक्षकांना सदैव ज्ञानाचा हा अखंड झरा अव्याहत ठेवावा. त्यांच्या अफाट व्यक्तित्वापुढे माझी ही लेखरुपी गुरुदक्षिणा सागरातील छोट्या थेंबासारखी आहे याची मला जाणीव आहे. तरीही या छोट्या थेंबाने माझ्या आयुष्यात मोठ्या सागराएवढी साहित्यसंपदा निर्माण करु दिली हेही नसे थोडके.
©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 ) कणकवली


No comments:
Post a Comment