🛑 रस्त्यातले देव
हल्ली देवांची संख्या बरीच वाढली आहे. कारण माणसांची संख्या वाढली आहे. एवढ्या सगळ्या माणसांना देव पुरायला हवेत म्हणून की काय देवांची संख्या माणसांनी वाढवली असावी.
संत गाडगेबाबा म्हणतात , " माणसांत देव पाहा. " आपण जर माणसा माणसात देव शोधत राहिलो तर देवांची संख्या दर चार सेकंदाला वाढत जाईल.
आपण जेव्हा प्रवासाला निघतो , तेव्हा रस्त्यावर पाच पाच मिनिटांच्या अंतरावर देव सापडतात. आपण त्यांना गाडीतूनच नमस्कार करतो. हे देव म्हणजे जणू गतिरोधक आहेत. कारण त्यामुळे आपण आपल्या गाडीचा वेग कमी करतो. थोडा वेळ थांबून नमस्कार करतो. देवाशी एकाग्र होतो. पुन्हा निघतो. काही वेळानंतर आपण जातोय त्याच रस्त्यात एखादा मोठा अपघात झाल्याचे पाहायला मिळते. आपण त्यात सापडणार असतो , पण रस्त्यातील देवाला नमस्कार करण्यासाठी थांबल्यामुळे आपण अपघातात सापडलो नाही याबद्दल देवाचे आभार मानत राहतो. काळ आलेला असतो , पण वेळ आलेली नसते.
रस्त्यातले देव म्हणूनच आवश्यक वाटतात. मी काही क्षणांसाठी थांबतो आणि नमस्कार करुनच पुढे निघतो.
शाळेत जाताना मला असे अनेक देव सतत भेटले आहेत. ते मला भेटले. मी त्यांना भेटलो. त्यांच्याशी मनोमन संवाद साधून पुढे निघणे एवढेच मला जमले. तिथल्या कुणीतरी दिलेला खोबऱ्याचा प्रसाद चावत पुढे निघेपर्यंत पुढचा देव भेटतोच. धडधाकट असलेले दोन हात फक्त जोडायचे असतात. बाकी काहीच करायचे नसते. हे देव आपल्या पाठीशी आहेत एवढी भावनाच तुम्हाला सुखरुप ठेवत असते. माझा तसा अनुभव आहे.
फोंडा रस्त्याला ' पाचोबा ' देव भेटतो. मग माझा जप सुरु होतो. " पाचोबा , पाचोबा , पाचोबा , माझा देव आहे पाचोबा " हाच जप मनापासून करत पुढचा प्रवास सुखरुप करत आलो आहे. तळेरे रस्त्याला ' कोळंबा ' देव भेटतो. त्याचाही जप असाच करत पुढे पुढे जायचे असते. वाटेत मंदिरे उभी असतात. गाडी सुरु असतानाच आपला एक हात मुजऱ्यासारखा नतमस्तक होतो. ती एक सवयच जडली आहे.
शाळेत चालत जायचो तेव्हा वाटेत गढिताम्हाण्याचा गणेश वड भेटत असे. " गणेश स्तोत्र ' म्हणत वंदन करुनच पुढे पाय वळत असत. पायातल्या वहाणा आपोआप पायातून निघतात. नमस्कार केलाच जातो.
आमच्या गावी जाताना वाटेत परदेशी गांगो , एडदोबा , पावणादेवी , टोकयोदेव , कोसंबी महापुरुष यांचे दर्शन घडते. निसर्गातील प्रत्येक ठिकाणी असे माणसाने बसवलेले देव , देवी थांबवतात. त्यामुळे आपल्या जीवनातील काही क्षण भक्तिमय बनतात. त्यामुळे मानसिक दृष्टीने आपण शक्तिमान बनत राहतो.
आपला एखादा अपघात घडतो. तेव्हा काही माणसे आपणांस मदत करायला धावून येतात. हे सुद्धा रस्त्यातले देवच आहेत. मी अनेकदा गाडीवरुन पडलो असेन. प्रत्येकवेळी माणसाचे रुप घेऊन हे रस्त्यातले देव मला मदत करायला , उचलायला धावून आलेले आहेत.
माझ्या गाडीचा वेग जास्त असतो असे सगळ्यांचेच म्हणणे आहे. हे सगळेजण मला ' गाडी सावकाश चालवा ' असे सांगत असतात. मी काळजीपूर्वक गाडी चालवत असतो. समोरचा नीट आला नाही तर मला त्यांच्याकडेही लक्ष द्यायचे असते. सध्या पावसाचे दिवस सुरु झाले आहेत. आता तर मला जास्तच काळजी घ्यावी लागणार आहे. पण माझे हे ' रस्त्यातले देव ' आहेत म्हणून मी निर्धास्त आहे.
©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 ) कणकवली

No comments:
Post a Comment