🛑 भेटला विठ्ठल माझा
हल्लीच एक चित्रपट बघितला होता. त्यातलं एक गाणं माझ्या ओठी आलं होतं. एखादा चित्रपट बघितल्यानंतर माझं असंच होतं.त्यातलं एखादं भावलेलं आणि आवडलेलं गाणं आपसूक माझ्या मुखातून बाहेर पडायला लागतं. गाणं म्हणणं आणि ऐकणं ही अतिशय चांगली गोष्ट आहे. तुम्ही तुमचा सगळा ताण कुठल्या कुठे विसरुन जाता.
मी अर्जित रजेवर होतो. मला थोडे बरे वाटत नव्हते. प्रत्येकाला काहीतरी हायदुख पायदुख असतेच. शाळा सुरु झाली होती.मला नाईलाजाने रजा घ्यावी लागली होती. मला बरे नाही म्हणून मी माझ्यावरच चिडत होतो. अर्थात असं स्वतःवर चिडणं ही चांगली गोष्ट नव्हतीच. गाण्यामुळे या चिडण्याची तीव्रता थोडी कमी झाली होती.
माझे बरे नाही असे समजल्याने अनेकांनी प्रत्यक्ष भेटून , फोन करुन तब्येतीची चौकशी केली होती. पुन्हा पुन्हा तेच तेच सांगून मीही कंटाळलो होतो. व्हाट्सएपच्या भरलेल्या संदेशांना बघून त्यांना रिप्लाय द्यायचाही वैतागच वाटत होता. बिचाऱ्या आपल्या माणसांनी आपली चौकशी केली ही माझ्यासाठी नवी गोष्ट नव्हती. ही सगळी माणसे मला सतत फोन करुन , प्रत्यक्ष भेटून दिलासा देतात त्यामुळेही मी लवकर बरा होण्याची जास्त शक्यता असते. सर्वांचे आशिर्वाद पाठीशी असले की देवच पाठीशी असल्यासारखे असते.
माझे विद्यार्थी माझी वाट बघत असतील ही कल्पनाच मला जास्त त्रास देत होती. नुकतीच शाळा सुरु झाली आहे आणि मी रजेवर आहे ही मला न पटणारी गोष्ट होती. त्यात शिक्षणाचा सेतू बांधायचे काम सुरु होते. माझा सेतू माझ्या शिक्षक बांधवांना बांधावा लागत होता. कधी एकदा मी बरा होतो आणि शाळेत जातो असे मला झाले होते. बाबा , पत्नी आणि भावाचं कुटुंब माझी अतिशय काळजी घेताना दिसत होतं. त्यांच्या या प्रेमामुळे मीही अधिक भावनाशील बनत चाललो होतो. पण काही केल्या शाळा काही डोळ्यासमोरुन हटत नव्हती. एवढी मी शाळेची आणि माझ्या विद्यार्थ्यांची का काळजी करतोय तेच मला समजत नव्हते. त्यामुळे माझा बीपी थोडा इकडे तिकडे होत होता.
डॉक्टर उपचार करत असताना त्या भल्यामोठ्या गोळ्या घशाखाली उतरताना दिसत नव्हत्या. ते पथ्याचं खाणं मला चिडवून दाखवताना दिसत होतं. मी बरा होण्यासाठी आटापिटा करत होतो. थोडा फरक पडला तेव्हा कुठे मी मोकळा श्वास घेतला होता.
न राहवून शेवटी रजा पूर्ण न भोगताच शाळेत जायला निघालो होतो. आज मला जो आनंद होत होता , त्याचं वर्णन करायला माझ्याकडे खरंच शब्द सापडत नव्हते. वारकरी जसा विठ्ठलाच्या ओढीने पंढरपूरला जायला निघतो , तसाच काहीसा मी निघालो होतो.
गेल्या काही वर्षांपूर्वी शिक्षणाच्या वारीत सहभागी होण्यासाठी मी पुण्याला गेलो होतो. तेव्हा मला खूप आनंद झाला होता. त्याच्याहीपेक्षा जास्त आनंद मला आज होत होता.
माझे अनेक विठ्ठल शाळेत माझी वाट बघत असतील या कल्पनेने मी भारावून गेलो होतो. मी माझं दुखणं खुपणं पार विसरुन जात चाललो होतो. त्यात पुन्हा एक गाणं मुखातून बाहेर पडत होतं. " कुणी पाहिला , पाहिला , पाहिला हो , माझा देव कुणी पाहिला ? " गाणं म्हणताना निसर्गात मला सगळीकडेच देवांचा सूक्ष्म भास होऊ लागला होता. माझा मोबाईल खणखणला होता , त्याकडेही मी मुद्दाम दुर्लक्ष करत रस्ता कापत निघालो होतो. शाळेच्या कक्षेत आलो होतो.
मुले वाट बघतच होती. चार पाच मुले धावतच गाडीकडे आली होती. त्यांनी शाळेची चावी माझ्याकडून घेतली होती. मी त्यांचा चार्ज घेण्याऐवजी त्यांनीच माझा चार्ज घेतला होता. त्यांना बघून माझेही चार्जिंग झाले होते. माझे विठ्ठल मला साक्षात पाहायला मिळाले होते. काही क्षणातच मी आजारी होतो हे पूर्णपणे विसरुन गेलो होतो आणि शिक्षणाच्या वारीत विद्यार्थीरुपी विठ्ठलासंगे हरवून गेलो होतो.
©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 ) कणकवली
.jpeg)
No comments:
Post a Comment