🛑 ती बोलते
माणसं कसली कसली व्यसनं करतात याची मोठी यादी होऊ शकते. चांगल्या गोष्टींची व्यसनं असणं नक्कीच चांगलं. सतत एखादी गोष्ट करण्याची आवड सवयीत बदलून जाते. काही माणसं ह्या सवयी मुद्दाम लावून घेतात. चांगल्या सवयी लागणं ही गरजेची गोष्ट आहे. त्यांचं संस्कारात रुपांतर होत असतं. ह्या सवयी सतत कराव्याशा वाटत राहतात.
आधी सवय आकर्षित करते. ती सवय होऊ लागते. मग आपण त्या सवयीचे गुलाम होत जातो. सवय लागणं ही दैनंदिन गोष्ट आहे , पण त्या सवयीचा गुलाम होणं ही हानिकारक गोष्ट आहे. कारण कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईटच. त्याचे परिणाम भोगावेच लागतात.
त्या दिवशी मी रत्नागिरीला जाण्यासाठी निघालो होतो. सकाळी लवकरची बस होती. मी अर्धा तास आधीच स्थानकात पोहोचलो. स्थानकात पंचवीस तीसपेक्षा जास्त प्रवासी गाडीची वाट पाहत असावेत. मीही त्या प्रतिक्षेत सामील झालो. मी बाकड्यावर बसलो. मागून मोबाईलवर बोलल्यासारखा आवाज आला. मी हळूच मागे वळून पाहिले. एक माणूस बोलत होता. मी त्याला अधिक निरखून पाहिले. तो मोबाईलवर बोलत नव्हता. तो एकटाच बोलत होता. माझे त्याच्या बोलण्याकडे जास्तच लक्ष जाऊ लागले. त्याने थोडी घेतली असावी असा मला संशय आला. तो सलग बोलत होता. तो बोलता बोलता सतत जागा बदलत होता. त्याचे कुणाशीतरी भांडण चालू होते. तो समोर नसलेल्या माणसावर चरफडत होता. तो बरळत होता. त्याच्या मनाचा ताबा सुटला असावा. शेजारी इतकी माणसं असताना त्याचे त्याला अजिबात भान नव्हते. त्याने जे पेय घेतले होते , त्याचा तीव्र असर त्याच्यावर झालेला कोणाच्याही लक्षात आला असता. मला त्याची कीव येत होती. तो एक चांगला माणूस दिसत होता. पण त्याला लागलेले व्यसन वाईट होते. त्या व्यसनाचा तो गुलाम झाला होता. त्या एकच प्याल्याने त्यालाच पुरते पिऊन टाकले होते. त्याचे बरळणे अजिबात थांबता थांबत नव्हते.
तो दोन तीन माणसांची नावे सतत घेत होता. ती माणसे त्याला त्रास देणारी असावीत. तो आता मानसिक झाला होता. त्याला जे बोलायचे होते , ते तो ओकल्यासारखा बोलतच होता. त्यामुळे त्याला शांत वाटत होते का ? मला समजत नव्हते. मला वाटतं तो बोलतच नव्हता , त्याने घेतलेली ' ती ' मदिरा बोलत होती. त्याचं आयुष्यच उद्ध्वस्त झालेलं दिसत होतं. त्या मदिरेने त्याच्या जीवनाचे तीन तेरा वाजवले होते.
तेवढ्यात रत्नागिरी गाडी लागली होती. मी गाडीत जाऊन बसलो होतो आणि विचार करत राहिलो होतो. अधूनमधून मोबाईलची नोटिफिकेशन्स माझ्या विचारांची शृंखला तोडू पाहात होती. अनेक विचार एकमेकांत मिसळून जात होते.
पुढे मी प्रवासात रमून गेलो होतो. फोन येत होते , मेसेज सुरु होते. त्या ' मदिराप्रेमी ' ला कधीच विसरुन गेलो होतो.
अचानक एक फोन आला. त्यावर एक लहान मुलगी बोलत होती. तिने आपले नाव परी सांगितले. मी ऐकतच राहिलो. ती बोलत होती , " मामा , मी परी बोलतेय , माझे पप्पा माझ्या मम्मीकडे पिण्यासाठी पैसे मागताहेत. " मी उडालोच. मी तिला सांगितले , " बाळा , तुझ्या पप्पांना मी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला , पण मी काहीही करु शकत नाही याचे मला वाईट वाटते. "
एका छोट्या मुलीने आपल्या वडिलांच्या व्यसनाबद्दल मामाला फोन करावा आणि मामाला काहीही करता येऊ नये याचे दुःख मला सतत राहणार होते. मी फोन ठेवला आणि तिच्या पप्पांशी बोललेला संवाद आठवण्याचा प्रयत्न केला. हा माणूस " मला एकदा संधी द्या , माझी चूक झाली , मी आता नक्की सुधारणार " असं बोलून गेला होता. पण प्रत्यक्षात असे घडताना दिसत नव्हते.
अशा पिणाऱ्या माणसांच्या घरात मुले कशी जगत असतील ? वडिलांचे असले अवतार बघून त्यांच्या बालमनावर किती दुष्परिणाम होत असतील याची कल्पनाच मला सहन होत नव्हती. यांच्या बायकांवर होत असलेले अन्याय त्या कशा सहन करत असतील ? हे बळ त्यांच्याकडे कुठून येते ? प्यायलेली उतरली की या माणसांना पश्चात्ताप होतो. पण पुन्हा दुसऱ्या दिवशी असाच अनुभव भोगावा लागतो.
घर हे मंदिर असते. पण या मदिरेने घरमंदिराला उद्ध्वस्त केलेले असते. अशी कित्येक घरे या मदिरेपायी दररोज यमयातना सोसत जगत असतील देव जाणे.
मी परत यायला निघालो होतो. विचारांचं काहूर सुरुच होतं. या माणसाचं काय करावं याचाही विचार येतच होता. तेवढ्यात बाहेर मुसळधार पाऊस सुरु झाला होता. पावसाच्या पाण्याचे तुषार मस्त वाटत होते. मी खुश झालो होतो. आता मस्त प्रवास होणार असे वाटत होते.
खूप मोठा पाऊस मला भिजवू पाहत होता. सर्वांनी खिडक्या बंद करुन घेतल्या होत्या. आता आतले कोंदटलेले वास यायला लागले होते. माझ्या मागच्या सीटवर कोणीतरी ' मदिराधीन ' बसला होता. त्याने आपले पिण्याचे काम सुरु केले होते. माझ्या नाकात तो दर्प जात होता. मला आता ओकारी येईल असे वाटत होते. अधूनमधून खिडकी उघडून मी तो घाणेरडा वास बाहेर घालवण्याचा प्रयत्न सुरु केला होता. बाहेरचा वारा आला की मला हायसे वाटत होते. पण बाहेरच्या पावसाने उधाण मांडले होते. तो मला जास्त भिजवू लागला होता. मला आता या प्रवासाचा वैताग आला होता. माझ्या सोबत इतरांना याचा त्रास होतच असेल ना ? पण कोणीही काहीही करु शकत नव्हते , अगदी मी सुद्धा. तो माणूस अगदी सकाळी भेटलेल्या माणसासारखा बोलत होता. तो फोनवरच बोलत होता. तो प्यायला असला तरी शुद्धीत असल्याप्रमाणे बोलत होता. मी प्यायलो नसलो तरी लवकरच बेशुद्ध पडेन अशी शक्यता दिसत होती.
©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 ) कणकवली

No comments:
Post a Comment