🛑 तेरा जून मेरा
तारखा खूप महत्त्वाच्या असतात. त्या लक्षात राहतात. आपल्या आयुष्यात काही तारखांना अनन्यसाधारण महत्त्व असतं. त्या काही केल्या विसरता येत नाहीत. कधी ते दिन होऊन येतात , कधी दीन ? कधी सुखमय आठवणींचा पुष्पगुच्छ घेऊन येतात , कधी दुःखमय काटेरी निवडुंग. या तारखा दररोज नवीन होऊन येत राहतात , त्या आपली पाठ सोडत नाहीत.
तेरा जून दोन हजार. माझ्या लग्नाची तारीख मी विसरणे कठीण आहे. माझ्या आनंदाचा बहरलेला गुलमोहर म्हणजे ही तारीख. आज माझ्या आयुष्यात मला एक मैत्रिण मिळाली होती. आयुष्यभरासाठी साथ देणारी.
लग्नाचा दिवस उजाडला होता. माझी आणि तिची ओळख नव्हतीच. जुन्या पद्धतीने पसंतीने लग्न ठरवले होते. लग्न ठरल्यानंतर लग्न होईपर्यंत एकदाही संवाद झाला नव्हता. त्यावेळी साधे फोन होते. माझ्या आणि तिच्या घरी फोन नावाचं यंत्र नव्हतं. शेजाऱ्यांकडे फोन करावा लागे.
एकदा मी तिथे फोन केला होता. तिकडून फोनवर ती आली. मला काय बोलायचे ते सुचेना. मी आणि तीही तशीच. शेवटी नंतर फोन करतो असे म्हणून मीच फोन ठेवला. पुन्हा एकदा असाच फोन केला तेव्हाही तसेच काहीसे झाले होते. मग तीच म्हणाली होती , " तुम्हाला काय बोलायचे असेल ते लग्नानंतरच बोला. आता फोन ठेवा. " असे म्हणत ती अशी खळखळून हसली होती कि तो आवाज माझ्या कानात अजूनही घुमतो आहे.
मी काळा आणि ती गोरी गोरी पान होती. त्यामुळे अनेकांना आमचे जोडे विजोड वाटल्यास तो त्यांचा दोष नव्हताच मुळी. माझे अनेक मित्र लग्नाला आले होते. ते अधूनमधून माझ्याकडे बघून हसत होते. मला त्यांच्या हसण्याचे कारण समजत नव्हते. मी आपला घामाघूम झालो होतो. ती माझ्या अगदी जवळ बसली होती. मला तशी सवय नव्हती. मी पुरता गांगरून गेलो होतो. आताच्या नवऱ्यामुलांकडे पाहतो , त्यावेळी मला माझेच हसू येते. आताचे वर वधू खूप सराईत झाले आहेत. त्यांच्या व्हाट्सअँपच्या मैत्रीचे रूपांतर कधीही लग्नात होऊ शकेल याची गॅरंटी देता येते. पण त्यांचे हे आकर्षण लवकरच संपून त्यांचे ब्रेकअप किंवा डिव्होर्स होताना पाहून या तकलादू प्रेमाविषयी राग करावासा वाटतो. प्रेम म्हणजे एक पवित्र गोष्ट आहे. प्रेम म्हणजे शारीरिक आकर्षण नसते , ते आयुष्यभराची साथ असते.
माझ्या डोक्यावर तेव्हा थोडेसे केस होते. आता ते शोधावे लागतात. माझ्या अशा डोक्यावर फेटा टोपी घातली होती. ती थोडी सैल बसत होती. त्या टोपीमुळे माझा एक कान दुमडला गेला होता. त्यामुळे मी विचित्र दिसत होतो. माझे मित्र का हसत होते ते मला माझे फोटो बघितल्यावर कळले. पण आता नाईलाज होता. मी फोटो इडिट करु शकत नव्हतो. बायकोचे सगळे फोटो मस्तच आले होते.
आज मी ते फोटो पाहतो तेव्हा माझे मलाच हसू येते. माझ्या अनेक मित्रांचे , नातेवाईकांचे फोटो मी जपून ठेवले आहेत. त्यातली अनेक माणसे आता हयात नाहीत. माझे सासरे गेले , आई गेली , आजी गेली , आत्ये गेली , काका गेले आणि माझी बायकोही गेली. त्यांच्या अनेक वर्षांपूर्वीच्या प्रतिमा आठवणी कधीतरी बघून डोळ्यांत पाणी येईपर्यंत पाहत राहण्याची माझी सवय काहीकेल्या जात नाही त्याला मी तरी काय करणार ?
कोणतीही माणसं आपल्याला जन्माला पुरत नाहीत , त्या पुरवाव्या लागण्यासाठी अशा सवयी लावून घ्याव्या लागतात. माझ्यावर झालेले संस्कार मला तसं करायला भाग पाडतात. मी तसाच आहे , जसा असायला हवा.
आज मी ऐश्वर्या गेली असे मानत नाही , ती ईश्वरीच्या नव्या रुपाने माझ्या जीवनात पुन्हा आली आहे असे मानतो. आज मी तिला गजरा आणून दिला आठवणीने. तिला तो तिच्याइतकाच खूप आवडला.
बायकांना बाकी काही नको असते. त्यांना आपल्या नवऱ्याचे निर्मळ प्रेम हवे असते. त्यात कुणीही भागीदार असल्याचे त्यांना अजिबात आवडत नाही. आपला नवरा ही आपलीच सुंदर भेट आहे अशी त्यांची भावना असते आणि ती असायलाच हवी. असे निरागस प्रेम करणाऱ्या पत्नी मग सावित्री ठरतात. आपल्या सत्यवानाचे गेलेले प्राण आणणाऱ्या सावित्रीला म्हणूनच श्रेष्ठ मानले जाते. माझ्यासाठी ऐश्वर्या आणि ईश्वरी दोन्ही सावित्रीच आहेत.
©️ प्रवीण अशितोष कुबलसर
( 9881471684 ) कणकवली
.jpeg)
No comments:
Post a Comment