🛑 शाळेचा पहिला दिवस
शाळा सर्वांचीच आवडती असावी बहुतेक. कारण सहा वर्षे पूर्ण झाल्यानंतर आपण पहिल्यांदा शाळेची पायरी चढतो. शाळा कधी एकदा सुरु होतेय याची आम्ही अजूनही चातकासारखी वाट पाहतो. चातक पक्षी पहिल्या पावसाचे पाणी प्यायला आतुर झालेला असतो. आम्हीही तसेच शाळेतील ज्ञान प्यायला आतुरच झालेले असतो.
शाळा सुरु होण्यापूर्वी पंधरा दिवस शाळेत जाण्याच्या तयारीची लगबग सुरु होते. हे प्रत्येकाच्या घरी घडत असेल. आम्ही लहान असताना यापेक्षा मजा यायची. शिक्षक झाल्यामुळे ती मजा तशीच सतत घेता येते आहे याचा आनंद होतो. ही मजा इतरांना अनुभवता येणे शक्य असेल असे मला वाटत नाही.
दरवर्षी नवा वर्ग , नवीन इयत्ता , नवी मुले , नवे शिक्षक , नवी पुस्तके , नव्या वह्या , नवी छत्री , नवा रेनकोट , नवी कंपासपेटी , नवे मित्र , नवी पट्टी आणि बरेच नवनवे अनुभवण्याचे क्षण येतच राहतात. त्यांच्याकडे दरवर्षी नवा दृष्टिकोन ठेवून पाहिल्याने नव्या शैक्षणिक वर्षाची लज्जत अधिकाधिक वाढतच राहते.
आज जगन भेटेल. मगन भेटेल. नवे अनुभव घेत यशाची शिखरे पादाक्रांत करण्यासाठी प्रेरणा मिळत जाईल. हे सगळे घरी सुदधा मिळेल , पण त्यात मजा ती कसली ? वर्गातील प्रत्यक्ष अनुभवांची चवच न्यारी असते. ती कधीच कुठे येऊ शकणार नाही.
काही मुले पहिल्या दिवशी शाळेत जात नसतील , तर ती एका मोठ्या आनंदाला मुकत असतील. सफाई करावी लागेल या भीतीने काही पालक आपल्या मुलांना घरी ठेवतील तर मुलांना पहिला दिवसच अनुभवता येणार नाही. त्यासाठी शाळेच्या पहिल्या दिवशी प्रत्यक्ष तनाने आणि मनाने उपस्थित राहायलाच हवे.
मुले मैदान साफ करतात. वर्ग झाडू मारुन लख्ख करतात. घरात कधी एखाद्याने झाडू घेतली नसेल , पण शाळेत मुले एकोप्याने सगळी कामे करतात. येथे समानतेचे धडे मिळतात. घरी नेहमी भरवून घेऊन जेवणारी मुले शाळेत मात्र स्वतःच्या हाताने जेवतात. जे पानात वाढले असेल ते चवीने खातात. त्यांना भूक लागते. हे सर्व शाळेत घडते.
स्वच्छतागृहे साफ करणारी मुले पाहिली की त्यांच्या अंगी येत असलेली श्रमप्रतिष्ठा पाहून थक्क व्हायला होते. हे सगळे शिक्षणच आहे. हे करत असताना त्यांना एकात्मतेची जाणीव होत असते.
पुस्तकात नाक घालून त्याचा वास घेत राहणे , पानफुटीची पाने ठेवणे , जुन्या वह्यांपासून नव्या वह्या बनवणे यांतही अनोखा आनंद असतो. आता तसे होताना दिसत नाही. पूर्वी नवी पुस्तके मिळत नसत आता मिळतात तशी. जुनी पुस्तके वापरत वापरत आम्ही पुढच्या वर्गात गेलो आहोत. ताई आणि आका यांची पुस्तके आम्हांला मिळत. त्यांना वर्तमानपत्रांची कव्हरे घालून आम्ही त्यांना नवी करुन टाकत असू. त्या जुन्या पुस्तकांवर आम्ही नव्यापेक्षाही जास्त प्रेम करीत असू. शेजारपाजारी राहणाऱ्या काकांच्या मुलांची जुनी पुस्तके अर्ध्या किमतीत घेऊन आम्ही चांगले शिक्षण घेतले आहे. तीच पुस्तके आम्ही चार ते पाच वर्षे हस्तांतरित करत वापरत असू. आताच्या मुलांची सोयच सोय आहे.
दरवर्षी नवीन पुस्तकांचा संच मुलांना मिळतो. मोफत गणवेश मिळतात. शालेय पोषण आहार मिळतो. एवढं सगळं मिळतं , तरी शिक्षण घेताना आजच्या मुलांना जड का जातं देव जाणे ? सगळं आयतं मिळतं म्हणून त्याची किंमत राहिलेली नाही की काय ?
पालक स्वतः कमी शिकलेले असले तरी ते आपल्या मुलांना सगळ्या सोयी देऊ करतात. फक्त मुलांना अभ्यासच करायचा असतो. तोही करताना पालक मदत करतात. क्लास लावतात. आम्हांला कुठे पालकांची अभ्यासात मदत होती ? क्लास तर माहितच नव्हता. तरीही आम्ही अभ्यास केलाच ना ? आजच्या मुलांमध्ये चिकाटी दिसत नाही. ती चंचल होत चालली आहेत. त्यांचे लक्ष विचलित होत राहिल्याने अभ्यासात एकाग्रता दिसत नाही. पाढे पाठ नसतात. कविता पाठ नसतात. त्यापेक्षा त्यांना whats app , यु ट्यूब , स्टेटस , इंस्टाग्राम , फेसबुक हे सगळे माहिती असते. प्रत्येक गोष्टीचे फोटोसेशन करणे त्यांना आवडते.
त्यावेळी एका वर्गात तीस चाळीस मुले असत , आता ती एका शाळेत असतात. ग्रामीण भागात उच्चशिक्षित शिक्षकवर्ग आहे. तरीही ग्रामीण भागातील मुले जवळपासच्या शहरी भागातील शाळेत शिकायला जातात. त्यामुळे पटसंख्या रोडावत चालली आहे. शहरातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांची तुडुंब गर्दी बघायला मिळते. ही तुडुंब गर्दी ज्यावेळी ग्रामीण भागात बघायला मिळेल तेव्हाच शाळेचा पहिला दिवस अधिक उत्साहवर्धक असेल.
©️ प्रवीण अशितोष कुबलसर
( 9881471684 ) कणकवली

No comments:
Post a Comment