🛑 पाहिला गजानन
आपला गणपती पाहिला कि आपलं मन भरुन येतं. गणपती चित्रशाळेत ऑर्डर दिल्यापासून आपलं गणपतीवर लक्ष असतं. आपला गजानन सुस्वरूप दिसावा ही आपल्या घरातील सर्वांचीच तीव्र इच्छा असते.
चित्रशाळेत सर्वांचे गणपती असतात. पण आपला गणेश सर्वांचे लक्ष वेधून घेणारा असायला हवा असं प्रत्येकाला वाटतं. आपला गणपती आपल्याला खूप खूप आवडतो. अर्थात सर्वांचेच गणपती सुंदरच असतात, पण आपला गणपती आपल्या मनात भरलेला असतो.
माझे बाबा गणपती सुंदर बनवत. असे हे सुंदर गणपती पाहण्यासाठी दररोज आमच्या चित्रशाळेत झालेली गर्दी मी प्रत्यक्ष पाहिली आहे. सुबक गणपती होईपर्यंत बाबा गणपती बाजूला करत नसत. बाबांच्या समोर प्रत्येक गणपती येणारच असे. तो अधिक सुंदर होऊन जाताना बाबांनी त्यात आपला जीव ओतलेला असे. त्यांचे निरीक्षण अफलातून होते. एकही चूक कधीही त्यांच्या नजरेतून सुटत नसे. त्यामुळे गणपती घेऊन जाणारे लोक खुश होऊन जात. पाच पन्नास रुपये जास्त देऊ शकणाऱ्यांपेक्षा खुश होऊन जाणारे लोक बाबांना आणि आम्हांलाही जास्त आवडत.
बाबांची गणपतीची शाळा पुढे चालू राहावी ही सर्वांचीच इच्छा आहे. बाबा गेल्यानंतर चित्रशाळेतील त्यांची उणीव कधीही भरुन न येणारी. त्यांची जागा काका, बाला आणि भाऊ यांनी घेतली आहे. हे तिघेही दिलेली जबाबदारी अधिक गंभीरपणे पेलत आहेत ही विशेष नमूद करण्यासाठी गोष्ट आहे. मी त्यांच्यात कोणत्याही प्रकारे इंटरफियर करीत नाही.
गणेश चतुर्थीचा दिवस आमच्यासाठी ' गाजावाजा ' असणारा दिवस असतो. गणपती न्यायला येणारे लोक आपल्या सोबत संपूर्ण कुटुंबाला घेऊन येत असतात. गणपती वाहून नेण्यासाठी ते गाड्या घेऊन येतात. काही वेळा वाजंत्री मंडळेही घेऊन येतात. अशी मज्जा असणारा हा दिवस पुन्हा येण्यासाठी एक वर्षभर वाट पाहावी लागते. आम्ही गणपतीच्या शाळेचे मालक आहोत हा आमचा अभिमान असतो. हा अभिमान आमच्या कुटुंबातील महिलांना सुद्धा द्यायला हवा. आमच्या घरातील माझ्या बहिणी गायत्री, तृप्ती यांनी गणपतींना अधिक उत्तम दिसण्यासाठी केलेले सजावट काम बघत राहावे असेच असते.
गणपतींच्या यादीत आमच्या गणपतीचे नाव ' घरचा गणपती ' असे लिहिलेले असते. सगळ्यांचे गणपती घरपोच गेले कि आमच्या घरच्या गणपतीचे आगमन होण्याची वेळ येते. घरातील मुले माणसे यासाठी आतुर झालेली असतात. शेवटी गणरायाचे आगमन होते. सुस्वरूप तेजस्वी दृष्टीने आमच्याकडे पाहणारा आमचा गणराय आमच्याकडे पाहू लागतो. त्याने प्रत्येकाकडे पाहत राहावे असे आमच्या सतत मनात असते. आम्ही समोर जिथे उभे राहू, तिथून तो आमच्याकडेच बघतोय असा आमचा गणपती असतो.
आरती सुरु झाली. आरती म्हणजे बाबांचा आवडता विषय. दुपारी आणि रात्री जोशात आरती झालेली बाबांना हवी असे. आज बाबा नाहीत म्हणून मला आरती घ्यावी लागली. आरती घेण्याचा बाबांचा पहिला मान. यंदा ही पहिली चतुर्थी असेल ज्या दिवशी बाबा नाहीत. बाबा आरतीत दंग होऊन जात. आरतीचे स्वर बाबांनी ऐकले आणि बाबा पहिल्या आरतीला आले. आले म्हणजे माझ्या वहिणीच्या अंगात आले. माझ्या हातातील आरती गरम झाली होती, चटके बसू लागले होते. तरीही मला तशीच गरम आरती त्यांच्या हातात द्यावी लागली. बाबांनी थरथरत्या हातांनी आपल्या गणपतीला ' आरती ' ओवाळली आणि आपला सुंदर गजानन पाहिला. आम्ही आमचा गजानन पाहिलाच, पण बाबांनीही तो पाहिला याचा आनंद सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आणून गेला.
©️ प्रवीण अशितोष कुबल, मुख्याध्यापक, शिडवणे नं. १
No comments:
Post a Comment