🛑 बाबांविण नाही दुजा आधार
बाबा मला नेहमीच गुरुच्या जागी आहेत. मी आयुष्यात अनेक गुरूंचे मार्गदर्शन घेतले आहे. त्या सर्वांचे शिक्षक दिनादिवशी ऋण व्यक्त करतो. बाबा माझे पहिले शिक्षक होते. त्यांच्याशिवाय मी अधुरा आहे. ते गेले आणि माझा भक्कम आधारच गेला. शरीरातील स्फूल्लिंगाइतके तरतरी पेरणारे माझे बाबा मला अधिक जवळचे होते.
ते गेल्यानंतर मी सगळ्या गोष्टी नियमित करतो आहे. पण त्यांची उणीव भरुन येत नाहीच. ते नाहीत म्हणजे काहीच नाही. ते आहेत म्हणजे सर्वकाही आहे. त्यांच्या सगळ्या गोष्टी मला आज आता अगदी जशाच्या तशा आठवत आहेत. मी त्या विसरता येणे अजिबात शक्यच नाही.
दोन दिवसांवर गणपती येत आहे. आज माझे बाबा असते तर गणपतीच्या आगमनाची त्यांनी जय्यत तयारी केली असती. मी सुद्धा करणार पण त्यांची सर मला अजिबातच येणार नाही. त्यांचा गणपतीवर भारीच जीव होता. त्यांच्या हातात गणपतीची माती जिवंत होत असे. त्यांनी माती वळवली ती त्यांना हवी तशी वळत असे.
बाबांनी आमच्या देहाच्या मातीला असेच वळवले. त्यांना हवे तसे वळवले आणि सुंदर संस्कारीत बनवले. त्यांनी केलेले संस्कार आजच्या पिढीसाठी आदर्श आहेत. ते शिक्षक नव्हते, पण शिक्षकांपेक्षा वरचढ होते. त्यांनी आमच्यापेक्षा जास्त पुस्तके आणि जास्त माणसे वाचली होती. त्यांच्या ज्ञानाची भूक कधीही न संपणारी होती.
त्यांनी सांगितलेल्या गोष्टी केल्या तर यश नक्की मिळे. नाही केल्या तर यशापर्यंत पोहोचताना त्यांच्या शब्दांची आठवण येत राही. आता बाबा नसले तरी ते सतत माझ्यासोबतच आहेत असा मला अनुभव येतो आहे. कोणतीही गोष्ट करताना बाबांना विचारून करण्याची माझी सवय होती. आता सुद्धा मी त्यांच्याशी हृदय संवाद साधू शकतो. ते अदृश्य रुपाने आमच्यात वास करतात. ते घरातील प्रत्येक गोष्टीत लपलेले दिसतात. त्यांची नजर कायमच आमच्यावर भिरभिरते आहे. माझ्यावर जरा जास्तच. का कोण जाणे, पण त्यांनी मला झिला म्हणावे असे मला सतत वाटत राही. त्यांची ती गोड हाक आज ऐकू येत नाही आणि मी कमालीचा कावराबावरा होतो.
त्यांचे अदृश्य अस्तित्व माझे चैतन्य बनले आहे. त्यांचा हा अदृश्य सहवास मला लाभतो आहे हे माझे भाग्यच. मी त्यांना कदापि विसरूच शकणार नाही.
माझी पत्नी गेल्यानंतर सुद्धा मी असाच झालो होतो. तिच्या आठवांनी मी सतत डोळ्यात पाणी आणत असे. ती गेल्याचे दुःख प्रचंड होते. ती गेल्यावर मी दुसऱ्या पत्नीमध्ये तिचे रुप पाहिले. त्यामुळे ती अजूनही माझ्याजवळच आहे असे मी स्वतःला समजावून समजावून आता ती तीच आली आहे या निर्णयापर्यंत आलो आहे. आपले जीवन पुनःश्च होते तसेच जगायचे असेल तर मी बाळगलेला दृष्टिकोन मला बरोबर वाटतो.
बायकोची रिप्लेसमेंट करता आली हे चांगलेच झाले. पण बाबांची जागा भरुन कशी काढणार ? ते कुडीने माझ्यासोबत नाहीत, ते पवित्र आत्म्याच्या रूपाने सतत माझ्या पाठीशी आहेत हा दृष्टिकोन मला नियमित जागृत ठेवावा लागण्याशिवाय गत्यंतर नाही.
काल रात्री झोपताना बाबांच्या आठवणी सांगत असताना माझी छोटी मुलगी उर्मी मला म्हणाली, " पप्पा, आता अजून बाबांना आठवू नका, मला रडू येते आहे. " तिच्या त्या शब्दांनी आमच्या सर्वांच्याच डोळ्यातून घळाघळा पाणी ओघळू लागले होते.
©️ प्रवीण अशितोष कुबल
मुख्याध्यापक शाळा शिडवणे नं. १

No comments:
Post a Comment