🛑 शंभर नंबरी शुद्ध सज्जन
जो स्वतः चांगलं वागतो आणि दुसऱ्यांशी चांगलं वागतो तो खरा सज्जन. सज्जन माणसाला अशा अनेक व्याख्या जोडता येतील. ज्याच्या मनात दुसऱ्यांबद्दल अपार प्रेम भरलेले असते तो स्वतःवरही तितकाच प्रेम करत असला पाहिजे. अशी सज्जन माणसं आपल्याला भेटतात तेव्हा ती पुन्हापुन्हा भेटत राहावीत असे वाटत राहते.
सज्जन बनणं हे सर्वस्वी आपल्याच हातात असतं. सज्जनपणाचं नाटक अजिबात करायचं नसतं. ते करु लागलात तर ते कळायला वेळ लागत नाही. कधीही सज्जनपणाचा आव आणू नये. सज्जनपणाचा अभिनय करणाऱ्या माणसांचे बुरखे फाडले जातात तेव्हा खऱ्या सज्जनांवर अविश्वास दाखवले जातात. म्हणून आपल्याला सज्जन बनायचे नसेल तर बनू नका, पण खोटे सज्जन अजिबात बनू नका.
टीव्ही मालिकांमधील अशी माणसं पाहिली की त्यांच्या वागण्याची आपल्यालाही सवय होईल की काय अशी भिती वाटते. एकाच घरातील दोन सख्खी भावंडे सज्जन आणि दुर्जन दाखवली जातात तेव्हा आश्चर्य वाटते. एकाच सुसंस्कारातून जाणारी काही मुले कुविचार कशी करु शकतात ? याचे नवल वाटते.
माझ्या घरातील माणसे ' शंभर नंबरी शुद्ध सज्जन ' बनायला माझ्या बाबांचे संस्कार कामी आले आहेत. माझे बाबा खऱ्या अर्थाने शंभर नंबरी सोनं होते. ते सज्जन होते आणि शुद्ध आचरण करणारे होते. त्यांच्याकडे बघत बघत आम्हीही त्यांच्यासारखे बनण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्यासारखे बनणं खूपच कठीण गोष्ट आहे. त्यांच्या जीवनाचा अखंड प्रवास खूपच गुंतागुंतीचा होता. अनेक अवघड अडचणींनी कायमच भरलेला होता. कितीही संकटे आली तरी त्यावर पाय ठेवून पुढे जाणारे माझे बाबा पाहिले कि आमच्या जिद्दीची दोरी बळकट का झाली मूळ कारण समजते.
बाबा देवाघरी जाण्यापूर्वी सुद्धा बाबांची चौकशी करत राहणारे लोक आजही बाबांच्या जाण्यामुळं हळहळताना दिसतात तेव्हा बाबांच्या मोठेपणाचा नित्यनियमित अभिमान वाटत राहतो. बाबा गेल्यानंतर येणाऱ्या प्रत्येक शोकाकुल व्यक्तीकडे बघून बाबांच्या गोष्टी सांगताना मी त्यांच्या डोळ्यातले पाणी बघितले आहे. सज्जन बाबांच्या सज्जन स्नेही मंडळींना माझा मानाचा मुजरा. त्यांच्या जाण्याने उणीवेचा मोठा खोल खड्डा पडला आहे. तो भरुन काढण्याचा प्रयत्न आम्ही भावंडे नक्कीच करणार आहोत.
©️ मुख्याध्यापक, शाळा शिडवणे नं. १
No comments:
Post a Comment