🛑 दूर देशी गेले बाबा
सलील कुलकर्णी यांच्या अल्बम मधील ' दूर देशी गेला बाबा ' हे गाणे मला खूप आवडत असे. बाबा सोबत असताना हे गाणं ऐकताना त्यातल्या शब्दांकडे कमी लक्ष जाई. सलीलच्या आवाजातील आर्तता मला नेहमीच आवडते. पण आता बाबा नसताना हे गाणं ऐकणं मला तरी कठीण जाईल.
लहानपणापासून ज्या बाबांचे बोट पकडून कायमच सगळीकडे जाणारा मी आता या बोटाला पारखा झालो आहे. बाबांचे बोट पकडण्यात एक वेगळ्या प्रकारची आश्वासकता होती. कितीही मोठा झालो तरी बऱ्याच गोष्टी बाबांना विचारल्याशिवाय मी केल्या नाहीत. त्यांचा आदेश शिरसावंद्य मानूनच पुढे जाणे सावधगिरीचे असे याचा मी अनेकदा प्रत्यक्ष अनुभव घेतला आहे.
त्यांची आणि माझी सोबत कधीही न संपणारी असेल असे मला वाटले होते. बाबा गेले आणि माझ्यातून एक अदृश्य चैतन्यशक्ती वेगळी होत असल्याची थरथर जाणवते आहे. बाबा म्हणजे काय अदभूत रसायन असतं ना ?
आज आई आणि बाबा दोघेही नाहीत. त्यांच्यासोबतच्या अनेक उत्तम आठवणी माझ्याभोवती नुसत्या रुंजी घालत आहेत. त्यातल्या अनेक माझ्यासाठी प्रेरणादायी आहेत. त्या जपून ठेवणे माझे कर्तव्य आहे. माझे बाबा माझ्यासोबत सतत सोबत्यासारखे पाठीशी राहिलेले आहेत. त्यांच्या केवळ असण्याने माझी अवघड कामेसुद्धा चुटकीसरशी मार्गी लागत असत. आता मात्र मला त्यांची तीव्र उणीव भासत राहणार आहे.
त्यांच्यासाठी काही दिवसांपूर्वीच नवा बेड घेतला होता. तो बघून त्यांना किती आनंद झाला होता. त्यावर बसून त्यांचे टीव्ही पाहणे, मोबाईल बघणे, पेपर वाचणे अशी दैनंदिन कार्यें पार पडत. आता तो बेड सुना सुना बघवणार नाही. त्यांनी वापरलेल्या सर्व वस्तूंमध्ये मला ते दिसत राहतील. पहिल्यांदा मला त्याचा त्रास होईल, पण मग त्यांच्या आठवणीच्या कोषात मी रमून जाईनही. हे माझे आताचे दिवास्वप्न आहे.
काल बाबा गेल्यानंतरचा दहावा दिवस होता. आम्ही नदीशेजारी स्मशानभूमीत धार्मिक विधीसाठी गेलो होतो. एकही कावळा कुठेही दिसत नव्हता. पिंडाला कावळा स्पर्श करायला येईल अशी सर्वांची इच्छा होती. मी पिंड हातात घेऊन इकडे तिकडे फिरत बाबांना हाका मारत होतो. काव काव, बाबा या हो..... पिंडाला स्पर्श करा ना..... मला एका क्षणाला मोठ्याने हंबरडा फोडावा असे वाटले होते. पण मी स्वतःला सावरलं. माझे बाबा माझे नक्कीच ऐकणारे होते. त्यांनी काकरूपाने येऊन माझ्या हातातील पिंडाला स्पर्श करावा असे वाटत असले तरी मला मुळीच वाईट वाटलेले नाही. त्यांचे माझ्यावर अपार प्रेम होते. त्यांचे पुत्रप्रेम असेच अबाधित राहणार आहे याबद्दल शंका बाळगण्याचे कारणच उरत नाही.
कारण स्वतः बाबांनी मला सांगितले होते. ते असेच कधीतरी वाढी ठेवत होते. लहानगा मी त्यांच्या सोबतच असे. ते ' आ आ ' करत होते. एकही कावळा वाढीला स्पर्श करायला आला नव्हता. मी न राहवून बाबांना विचारले होते, " बाबा, आज कावळा का आला नाही? " तेव्हा बाबा म्हणाले होते, " अरे झिला, हे कावळे असेच असतात, कधी येतील, कधी येणार नाहीत, पण आपण आपल्या पूर्वजांना अजिबात विसरायचे नाही. " बाबा आमचे प्रॅक्टिकल होते. ते आधी करत,मगच सांगत. त्यामुळे त्यांच्या सर्व गोष्टी मला पटत.
कणकवलीतील आमच्या रूमवर बाहेरच्या कटड्यावर बाबांनी बिस्किटे ठेवताक्षणी कुठूनतरी कावळे येत आणि बिस्किटे वरच्यावर उचलत. बाबांना आणि आमच्या घरातील सर्वांनाच मग दैनंदिन सवयच लागली आहे. देवाचे पूजन झाले की आपण काहीही खाण्यापूर्वी कावळ्यांना बिस्किटे, फरसाण असे खाऊ घालण्यात येते.
काल नदीशेजारी एकही कावळा फिरकताना दिसला नाही. कदाचित हे सगळे कावळे कणकवलीला आमच्या खोलीच्या बाहेर बाबांची वाट बघत नसतील ना? किती दिवस खोली बंद आहे. आमचा खाऊ घालणारा कुठे गेला असेल ?
आता तेराव्या दिवशी कणकवलीला गेलो कि मी पहिल्यांदा बाबांच्या ' काकमित्रांसाठी ' साद घालीन आणि त्यांना बिस्किटे, खाऊ दिल्याशिवाय मला स्वतःला स्वस्थता लाभणार नाही. माझे दूर देशी गेलेले बाबा सुद्धा त्यांच्याबरोबर यावेत अशी मी माझ्या बाबांच्या पवित्र आत्म्याकडे साश्रू नयनांनी प्रार्थना करतो.
©️ प्रवीण अशितोष कुबल, मुख्याध्यापक शाळा शिडवणे नं. १

No comments:
Post a Comment