Tuesday, August 6, 2024

🛑 बाराव्याला बाबा आले

🛑 बाराव्याला बाबा आले

          बाबांचा बारावा दिवस. सकाळपासून माणसांची गर्दी व्हायला सुरु झाली होती. बाबांसाठी हाक मारायला येणाऱ्या हजारो माणसांना शोकाकुल होताना पाहून बाबांचा मोठेपणा अधिक ठळकपणे दिसू लागला होता. मी त्यांच्यासमोर काहीच नाही. ते नेहमीच म्हणत, " मी जे नखाने करीन, ते तुम्हाला कुऱ्हाडीने जमणार नाही. " बाबांचे हे वाक्य अगदी खरे आहे. त्यांनी केलेल्या गोष्टी मला करता येणार नाहीत. त्यांच्या सानिध्यात इतकी वर्षे राहूनसुद्धा मला त्यांच्या नखाचीही सर येणार नाही इतके ते मोठे होते. 

         दहाव्या दिवशी बाबांच्या पिंडाला काकस्पर्श झाला नाही म्हणून बाबा माझ्यावर नाराज असतील असे मला वाटणे साहजिकच होते. माझे प्रेम खरे असेल तर बाबा माझ्यावर नाराज होऊच शकत नाहीत असा भाबडा विश्वास मी नेहमीच बाळगत आलो आहे. 

         त्यांच्याशी माझे मित्रत्वाचे नाते होते. बाबा रागावले तरी त्यांचा तो राग तात्पुरता असे. माझ्या प्रेमाने ते पुनःश्च मेणासारखे विरघळून जात.  मी अगदी त्यांच्यासारखाच झेरॉक्स कॉपी आहे. माझाही राग असाच विरघळून जात असतो. त्यांच्याकडूनच वारसा मिळालाय. प्रेमाने राग जिंकता येतो. 

         दिवसभर बाराव्या दिवसाचे विविध धार्मिक विधी संपन्न होत असताना दुपारनंतर ' सुत '  घालण्याचा विधी सुरु झाला. हा विधी बघवत नाही. तो करत असताना मी डोळे बंद करुन बाबांची आराधना करत होतो. परंपरेने चालत आलेल्या या विविध प्रथा करताना त्या बाबांसाठी करतो आहोत याची जाणीव होती. त्यामुळे बाबांसाठी काहीही करण्याची तयारी असणारा मी निमूटपणे सर्वकाही करत राहत होतो.

         ज्येष्ठ व्यक्तींनी मार्गदर्शन करायला सुरुवात केली होती. माझे लक्ष त्यांच्या शब्दांकडे होते. ते शब्द बाबांचेच आहेत असे मला वाटत होते. मला आलेल्या सर्वांचे हृदय आभार मानावेसे वाटले. मी स्वतःहून उभा राहून बोलू लागलो. मला सर्वांचे आभार मानायचे होते. मी सर्वांच्या ऋणात राहण्याचे ठरवले असल्याचे सांगितले. घरच्यांनी गेले काही दिवस माझ्यासोबत जो प्रेमळ व्यवहार केला होता त्यामुळे मी भावनाप्रधान झालो होतो. माझ्या अश्रुंचा बांध फुटू लागला होता. मी रडताना मलाच मी आवडत नव्हतो. पण रडू काहीकेल्या थांबवता येत नव्हते. मी माझ्या चुका मान्य करुन टाकल्या होत्या. बाबा मला जाताना काहीही सांगून गेले नव्हते. बाबा गेल्याचे दुःख सर्वांनाच झाले होते, पण मला झालेले दुःख मला क्षणाक्षणाला बाबांची माफी मागत राहायला लावणारे होते. बाबा नेहमीच क्षमाशील होते. ते मला क्षमा करणार ही काळ्या दगडावरची रेघ. पण तरीही मनातील भिती डोके वर काढत होती. जाता जाता त्यांनी मला काहीतरी सांगावे असे मला वाटत होते, जे त्यांच्या अचानक जाण्याने राहून गेले होते. 

         त्यांनी आमच्या संगोपनात कोणतीही कसूर सोडली नसताना आम्ही त्यांच्या सेवेत काहीतरी दिरंगाई केली की काय ? अशा प्रश्नांनी माझा मीच व्याकुळ होत होतो. 

        रात्री भजन सुरु झाले. भैरवीचे आर्त सूर आणि टाळांचा आवाज टिपेला पोचत असतानाच आमचे बाबा तेजस्विनीच्या ( वहिणी ) अंगात संचारू लागले होते. ते बाबाच आहेत का याची खात्री करण्यासाठी माझ्या बालाकाकांनी नेहमीप्रमाणे तीन फुले ठेवून त्यातले एक उचलण्याची विनंती केली. काकांच्या मनातील चाफ्याचे फुल त्यांनी न ओळखता पिवळे झेंडूचे फुल त्यांनी निवडले. मी मात्र पिवळे फुलच मनात धरले होते. ते बाबाच आहेत याची मला अगदी खात्री झाली होती. 

         तरीही मी धुपारतीचे भांडे घेऊनच होतो. त्यांनी मला स्वतःहून हाक मारावी अशी माझी इच्छा होती. माझी इच्छा त्यांना कशी समजली तेच जाणो. त्यांनी काहीवेळातच पहिली मलाच हाक मारली. मी आणि सगळेच अवाक झाले. मी धावतच त्यांच्यापाशी गेलो. त्यांनी मला गोंजारले. मी त्यांच्यापाशी काही दिवस सतत बसून होतो. माझी अपेक्षा त्यांनी पूर्ण केली होती. संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी मी आणि माझा भाऊ पेलू शकतो हे त्यांना जिवंतपणीच माहिती होते. तरीही त्यांनी दिलेली ही धुरा मी समर्थपणे सांभाळण्यासाठी त्यांचा भक्कम आशीर्वाद सदैव माझ्या पाठीशी असणार याबाबत मी निशंक झालो आहे. 

©️ प्रवीण अशितोष कुबल, मुख्याध्यापक, शाळा शिडवणे नं. १










No comments:

Post a Comment

💖 भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये एक अविस्मरणीय सायंकाळ 💖

 💖 भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये एक अविस्मरणीय सायंकाळ 💖           कणकवली येथील भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये कीर्तन महोत्सवाच्या निमित्...