Monday, July 28, 2025

🔴 माझ्या मातीचं गाणं: नागपंचमीच्या ओढीनं!

🔴 माझ्या मातीचं गाणं: नागपंचमीच्या ओढीनं!

          आपल्या गावच्या मातीत पाऊल टाकलं की, मनात एक अनामिक आनंद दाटून येतो! खरंच, गाव म्हणजे आपलं हक्काचं स्थान. इथे आपली हक्काची, हृदयातली माणसं राहतात. त्यांना पाहिलं की ती धावत येतात आणि मिठीत घेतात. त्या प्रेमाला कशाचीच तोड नसते. हीच खरी आपली माणसं! ती कधी रागावतातही, पण त्यांच्या रागातही केवळ प्रेमच ओतप्रोत भरलेलं असतं.

          आज नागपंचमी असल्याने, नेहमीप्रमाणे मी माझ्या गावी आलो आहे. माझी मुलंही मोठ्या ओढीने गावाकडे येतात. त्यांनाही गावची शुद्ध हवा खूप आवडते आणि मानवते. शिक्षणासाठी जरी आम्ही गावापासून 10-12 किलोमीटर दूर राहत असलो, तरी माझी नाळ गावाशी घट्ट जोडलेली आहे. गावातील लोकं, लहान-मोठी मुलं माझ्या घरी येतात, माझी विचारपूस करतात, आदर देतात. त्यांचा हा आदर माझ्या घरामुळे दिवसेंदिवस वाढतच चालला आहे.

          घरी आल्यावर अळूवडी आणि कानवले बनवले जातात. यांची चव फक्त गावातच मिळते, शहरात ती कधीच अनुभवायला मिळत नाही. कारण या पाककृतींसोबत गावाकडचा मातीचा सुगंध दरवळत असतो! मला आणि माझ्या भावाला तर अळूवडी म्हणजे मेजवानीच वाटते. नागपंचमीला नागोबाला नैवेद्य दाखवायचा असतो. दुधाबरोबर लाह्यांचेही सेवन होते. आमच्या घरी 'गणेश चित्रशाळा' असल्यामुळे, खास 'नागोबा' मूर्ती बनवल्या जातात. आजच्या दिवशी लोकं गणपतीचा 'पाट' देण्यासाठी येतात आणि गणपती कसा बनवायचा, किती किमतीचा बनवायचा, हेही आवर्जून सांगतात. जाताना 'नागोबाची सुस्वरूप मूर्ती' घेऊन जातात, कोणीही ती फुकट नेत नाही. दररोज आपापला गणपती पाहण्यासाठी मंडळी येतात. माझा गणपती सुंदर आकार घेत आहे, याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसतो.

          अळूची बने सर्वत्र वाढलेली असतात. त्यातील एक मोठं पान घेऊन येतात. दुर्वा तर आपोआपच वाढलेल्या असतात. या दुर्वा नागाच्या मूर्तीच्या तोंडात टोचून त्याची जीभ बनवली जाते. मनोभावे पाटावर ठेवून मूर्तीचे आगमन होते. नागोबाचे सुंदर चित्र रेखाटलेल्या भिंतीपुढे, सुंदर पाटाभोवती रांगोळी काढून त्या पाटावर नागराजाला विराजमान केलं जातं. आपापला घरचा नागोबा इतरांच्या मूर्तींपेक्षा खूप मोठा असतो. त्यामुळे आपापल्या नागोबाची ओढ आम्हांला नेहमीच अधिक असते. सर्वजण मनोभावे पूजन आणि आरती करतात. गाऱ्हाणे घालून, नैवेद्य अर्पण करून आम्ही भोजनास सज्ज होतो. कुटुंबातील सर्वजण एकत्र जेवताना जुनी जाणती माणसं आठवतात. त्यांच्या आठवणी जेवताना डोळ्यासमोर येत राहतात. आजी, आजोबा, दांडगे आये, ऐशू, बाबा, आई, भाई या सर्वांची उणीव भासू लागते. त्यांच्या काळातील नागपंचमी जशीच्या तशी समोर उभी राहते.

          सर्वजण यथेच्छ जेवण करतात. सायंकाळी नागोबाचे अळूच्या बनात विसर्जन केले जाते. निसर्ग देवता प्रसन्न झाल्याबद्दल आजच्या दिवशी नागदेवतेचे केलेले पूजन सर्वांच्या सदैव लक्षात राहते, ते यामुळेच. कुटुंबातील सर्व माणसांच्या प्रेमभावना उचंबळून येतात. नागपंचमी सणाचा खरा उद्देश सफल होताना दिसतो.

©️ प्रवीण कुबल 









No comments:

Post a Comment

💖 भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये एक अविस्मरणीय सायंकाळ 💖

 💖 भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये एक अविस्मरणीय सायंकाळ 💖           कणकवली येथील भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये कीर्तन महोत्सवाच्या निमित्...